दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात पत्रकार संघाने फुलविला दिवाळीचा आनंद!
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा स्तुत्य सामाजिक उपक्रम; किराणा, शैक्षणिक साहित्य, मिठाई, दैनिक सह्याद्रीचा राखणदार दिवाळी विशेषांक व भेटवस्तूंचे वाटप
मूल : दीपक देशपांडे.
दिवाळी म्हणजे आनंद,आपुलकी आणि माणुसकीचा सण! या सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या संवेदनशील भावनेतून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने मूल येथे दिव्यांग बांधवांसाठी विशेष स्नेहभेट वितरण उपक्रम राबविण्यात आला. केवळ शुभेच्छा न देता प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करीत दिव्यांग बांधवांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा ठरला.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रा.महेश पानसे व जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांच्या सूचनेनुसार आयोजित या उपक्रमात दिव्यांग बांधवांना किराणा साहित्य, शैक्षणिक साहित्य, मिठाई, दैनिक सह्याद्रीचा राखणदारचा दिवाळी विशेषांक तसेच विविध भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. सणासुदीच्या काळात आपुलकीची विचारपूस, स्नेहाची भेट आणि मदतीचा आधार मिळाल्याने उपस्थित दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सतीश राजुरवार,तालुका डिजिटल मीडिया अध्यक्ष रोहित कामडे, धर्मेंद्र सूत्रपवार, पिंटू पिंपळे आणि जुवेद शेख यांची उपस्थिती होती.
पत्रकारिता ही केवळ बातम्यांपुरती मर्यादित नसून समाजातील वंचित, दुर्लक्षित आणि गरजू घटकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचीही तिची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. याच सामाजिक जाणिवेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम माणुसकीचा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरला. दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारी ही स्नेहाची दिवाळी समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment