"एक...कहाणी"... दमलेल्या बाबाची..."

"एक...कहाणी"... दमलेल्या बाबाची..."

दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर एक पोस्ट वाचण्यात आली. त्यात माळेगाव आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात शरद पवारांच्या पॅनलच्या झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांची राजकीय शक्ती संपत आली असल्याचे नमूद केले होते. आपल्या म्हणण्याच्या  पुष्ट्यर्थ प्रस्तुत लेखकाने विविध दाखले देखील दिले होते. बारामती मतदारसंघातील या दोन साखर कारखान्यांशिवाय नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये देखील पवारांच्या उमेदवारांना चांगलाच फटका बसला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या होत्या, त्याच मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत अजितदादा आणि त्यांच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. हे बघता पवारांचा राजकारणातला दबदबा आता संपला असा दावा प्रस्तुत लेखकाने केला होता. 

प्रस्तुत दाव्यातील वास्तव एकदम नाकारता देखील येत नाही. या बाबतीत सविस्तर बोलायचे झाल्यास आपल्याला शरद पवारांच्या राजकीय वाटचालीचा मागोवा घेणे आवश्यक ठरते. ऐन तरुण वयात पुण्यात शिक्षणासाठी आलेले शरद पवार काँग्रेसच्या संपर्कात आले आणि तिथून त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. याबाबत त्यांनी आपल्या "लोक माझे सांगाती" या आत्मचरित्रात देखील नमूद केले आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील तत्कालीन वजनदार नेते यशवंतराव चव्हाण यांच्या ते अतिशय जवळ सरकले होते. त्यामुळे ऐन पंचविशीत त्यांना १९६७ साली आमदारकीची उमेदवारी मिळाली आणि पहिल्याच झटक्यात ते आमदार झाले. १९७२ मध्ये ते राज्यमंत्री झाले, तर नंतर लगेचच ते कॅबिनेट मंत्री देखील झाले. मात्र त्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली होती. ते राज्यमंत्री झाले वसंतराव नाईक यांच्या कारकीर्दीत. नंतर शंकरराव चव्हाण आणि त्यानंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना देखील ते त्यांच्या मंत्रिमंडळात होते. १९७७ मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या, तेव्हा मूळ काँग्रेस होती. नंतर वर्षभरातच काँग्रेसचे विभाजन झाले. आधीची इंदिरा काँग्रेस आता इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेसमध्ये विभागली गेली होती. शरद पवार त्यावेळी रेड्डी काँग्रेसमध्ये होते. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेस परस्पर विरोधात लढल्या.  त्यावेळी जनता पक्ष देखील स्वतंत्रपणे लढला होता. या गोंधळात कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या आणि काही अपक्षांच्या मदतीने वसंतदादा पाटील यांनी पुन्हा मंत्रिमंडळ बनवले. हे मंत्रिमंडळ बनवून जेमतेम पाच-सहा महिने झाले होते. तेव्हा अचानक विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना शरद पवारांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची बातमी आली. त्यांच्यासोबत अजूनही चार-पाच आमदार होते. त्यावेळी पक्षांतरबंदी कायदा लागू नव्हता. शरद पवार कुणालाही कळू न देता बाहेर पडले, त्यावेळी त्यांनी व्यवस्थित  फिल्डिंग लावली असावी. कारण त्याचवेळी काँग्रेसमधून देखील अजून काही लोक बाहेर पडले. हळूहळू २४ तासातच हा आकडा वाढत वाढत ४० पर्यंत गेला. त्यावेळी मग तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी सभागृह पाच दिवसांसाठी तहकुब केले होते. 

शरद पवारांनी मग जनता पक्षाशी बोलणी केली आणि त्यांचा पाठिंबा मिळवून पुरोगामी लोकशाही दल स्थापन करत नवे सरकार बनवले. पुरोगामी लोकशाही दल म्हणजे पुलोदचा हा त्यांनी महाराष्ट्रात पहिला प्रयोग घडवून आणला होता. त्यावेळी शरद पवारांचे वय जेमतेम ३७ वर्षाचे होते. त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले आणि फेब्रुवारी १९८० पर्यंत राज्यकारभार सुरळीतपणे चालवला. विविध पक्षांची मोट बांधून त्यांनी राज्यकारभार केला होता. तेव्हापासून शरद पवार हे देशाच्या राजकीय नकाशावर सातत्याने एक ताकद म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यावेळी त्यांनी काँग्रेस मधून बाहेर पडत समाजवादी काँग्रेस गठीत केली होती. त्यांचे हे कृत्य काँग्रेसजनांना फारसे रुचले नव्हते. त्यावेळी वसंतदादा पाटील यांनी शरद पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला अशी खंत व्यक्त केली होती.

जानेवारी १९८० मध्ये केंद्रात सत्ताबदल होऊन पुन्हा एकदा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. सत्तेत येताच महिनाभरात त्यांनी विरोधी पक्षाची जितकी काही सरकारे होती ती बरखास्त केली. त्यात महाराष्ट्राचाही नंबर लागला. त्यामुळे शरद पवारांचे मुख्यमंत्रीपद गेले. लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. समाजवादी काँग्रेससह जनता पक्ष आणि इतर छोटे पक्ष विरोधात बसले होते. त्यावेळी मग शरद पवार विरोधी पक्षनेते झाले. 

१९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्यानंतर देशातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. शरद पवारांनी देखील वाऱ्याची दिशा ओळखली आणि आपली समाजवादी काँग्रेस पुन्हा एकदा राजीव गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी आजच्या छत्रपती संभाजी नगरमध्ये राजीव गांधींच्या उपस्थितीत मोठा सोहळा देखील घडवून आणला होता. त्यानंतर वर्षभरात शरद पवार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. नंतरची बरीच वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हा अंतिम शब्द असल्यासारखीच परिस्थिती होती. त्यांच्या या एकमुखी साम्राज्याला आव्हान देण्याची ताकद आणि हिंमत तरुण देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली होती. 

१९९१ मध्ये लोकसभा निवडणुकांचा माहोल असतानाच अचानक राजीव गांधींची हत्या झाली. मग काँग्रेसचे नेतृत्व कोणी करायचे हा प्रश्न आला. हंगामी अध्यक्ष म्हणून पी.व्ही. नरसिंहराव यांना नेमले गेले. त्यांच्या नेतृत्वात उर्वरित निवडणुका झाल्या. काँग्रेसला स्पष्ट बहुमत नसले तरी लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष होता. त्यामुळे तडजोडीचे राजकारण करत काँग्रेसने सत्तेत यायचे ठरवले. मग पंतप्रधान कोणी व्हायचे हा प्रश्न आला. त्यावेळी नरसिंहराव अर्जुनसिंग ही नावे आघाडीवर होती. अचानक शरद पवारांनीही दंड थोपटले. तोवर अर्जुनसिंग मैदानात बाजूला पडले. मग शरद पवार आणि नरसिंहराव यांच्यात कोणाला पंतप्रधान करायचे यावर काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये आणि खासदारांच्या बैठकीत मतदान झाले. दोन्हीमध्ये नरसिंहराव यांचेच नाव पुढे आले. सहाजिकच मग नरसिंहराव यांच्या गळ्यात पंतप्रधान पदाची माळ घातली गेली. मात्र नरसिंहराव यांनी शरद पवारांचे ज्येष्ठत्व लक्षात येत त्यांना केंद्रात येऊन मंत्रिपद घ्यावे असे सुचवले. त्यानुसार मग शरद पवार केंद्रात संरक्षण मंत्री बनले होते.

शरद पवार संरक्षण मंत्री, तरीपण त्यांचे लक्ष महाराष्ट्राकडेच होते. त्यांच्यानंतर महाराष्ट्रात सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री बनले होते. १९८२ मध्ये अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेली. त्यानंतर देशभरात दंगे उसळले. मुंबईत देखील हिंदू मुस्लिमांचे दंगे होऊन प्रचंड नुकसान झाले होते. या सर्व प्रकरणात पुढे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न आला, तेव्हा पक्षाध्यक्ष असलेल्या नरसिंहराव यांनी पवारांनाच पुन्हा महाराष्ट्रात पाठवले. नंतर १९९५ पर्यंत शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मात्र त्यांची ही राजवट विविध कारणांनी चांगलीच गाजली. त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्याविरुद्ध जनजागरण यात्रा काढून राज्यात पवारविरोधी वातावरण तयार केले होते. परिणामी १९९५ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेबाहेर गेली आणि भाजप शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले. शरद पवार हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते बनले. 

१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार बारामतीतून लोकसभेत गेले. राजीव गांधींच्या हत्येनंतर सोनिया गांधी या राजकारणाबाहेर होत्या. तर हवाला घोटाळ्यामुळे चर्चेत असलेले नरसिंहराव हे देखील बॅकफुटवर गेले होते. त्यामुळे शरद पवार लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले. मात्र पुन्हा वर्षभरात विरोधकांनी अविश्वास ठराव आणून हे सरकार पाडले. परिणामी सप्टेंबर १९९९ मध्ये पुन्हा लोकसभा निवडणुका झाल्या. 

या निवडणुका होणार हे एप्रिल १९९९ मध्येच निश्चित झाले होते. त्यावेळी काँग्रेसमध्ये काहीशी अस्वस्थता असल्याचे जाणवत होते. मात्र नेमके काय चालू आहे हे कोणालाच कळत नव्हते. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही सक्षम नाही असे चित्र उभे करून या आघाडीला पराभूत करायचे आणि काँग्रेसची सत्ता पुन्हा आणायची असा प्रयत्न सुरू झाला होता. यावेळी काँग्रेसची सत्ता आली तर सोनिया गांधी पंतप्रधान होतील अशी हवा निर्माण केली गेली होती. इथेच शरद पवार नवी खेळी खेळले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर जून १९९९ मध्ये त्यांनी आपल्या देशात पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे स्वदेशी मुळाचेच असावे अशी मागणी केली आणि काँग्रेस पक्षाने पंतप्रधानपदासाठी सोनिया गांधींचे नाव पुढे करू नये असा आग्रह धरला. इथे नवा संघर्ष सुरू झाला. त्यातून मग शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारीक अन्वर या तिघा काँग्रेसनेत्यांनी बंडखोरी करत सोनियांना खुला विरोध केला. काँग्रेस पक्षात सोनिया समर्थक आणि विरोधक असे दोन गट पडले. त्यात समर्थक गटाने या तिघांवरही कारवाईचा बडगा उगारला. कारवाई होण्यापूर्वीच हे तिघेही बाहेर पडले. त्यांच्यासोबत अजूनही अनेक जण बाहेर निघाले. विशेषतः महाराष्ट्रात फार मोठा वर्ग बाहेर पडला. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यात शरद पवारांना पंतप्रधान करणार या हेतूनेच सगळे काही झाले असे चित्र निर्माण केले गेले. त्यावेळी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकदमच झाल्या. या निवडणुकीत लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसला देशभरात माझ्या आठवणीनुसार जेमतेम २५ जागा मिळाल्या, तर महाराष्ट्रातही ६० च्या आसपास जागा मिळाल्या होत्या. दोन्ही ठिकाणी स्वबळावर सत्ता शक्य नव्हती. केंद्रात तर विरोधातच बसायचे हे नक्की होते. त्यावेळी मग राज्यात त्यांनी आधीच्या काँग्रेसशी वैर धरून बाहेर पडले होते. त्यांच्याशीच हात मिळवणी केली आणि महाराष्ट्रात सत्ता मिळवली. अर्थात या काळात भाजपशी देखील जुळवून घेता येते का हे बघणे चालू होतेच. भाजपने देखील त्यांना चुचकारणे सुरू ठेवून त्यांना आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदही देऊ केले होते.

२००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी काहीशी माघारली. मग काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीने सरकार बनवण्याचा निर्णय घेतला. यावेळी मात्र सोनिया गांधी यांनी अंतरात्म्याचा आवाज सांगतो म्हणून पंतप्रधानपद नाकारले आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांना पंतप्रधान बनवले. त्या मंत्रिमंडळात शरद पवार कृषिमंत्री बनले. सुमारे दहा वर्ष ते कृषिमंत्री राहिले होते. त्यांच्याच काळात शेतकऱ्यांना आधी एक पॅकेज दिले आणि मग कर्जमाफी देखील केली,२०१४ मध्ये केंद्रात सत्तांतर झाले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार सत्तेत आले. त्या पाठोपाठ राज्यात देखील सत्तांतर घडले. परिणामी केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे पवारांचा पक्ष विरोधी पक्षात होता. इथून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे महत्त्व कमी होणे सुरू झाले होते. महाराष्ट्रात विरोधी पक्षात बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले होते. त्याचप्रमाणे भाजपमधील प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे देखील दिवंगत झाले होते. नितीन गडकरी हे केंद्रात असल्यामुळे राज्याच्या राजकारणात फारसे लक्ष घालत नव्हते. यावेळी देवेंद्र फडणवीस या तुलनेत तरुण नेत्याकडे राज्याची सूत्रे आली आणि त्याने शरद पवारांना अगदी शिंगावरच घेण्याचा कार्यक्रम सुरू केला. त्यामुळे पवार चांगलेच वैतागले. परिणामी २०१९ मध्ये पवारांनी फडणवीसांना धोबीपछाड देण्याची योजना आखली. त्यांनी निवडणुकीच्या निकालानंतर भाजप शिवसेनेची युती तोडत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी आघाडी केली आणि भाजपला विरोधात बसवले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले. त्यानंतरची अडीच वर्षे राज्यात नुसताच गोंधळ होता. मात्र फडणवीसांना सत्तेबाहेर ठेवले. यामुळे पवार खुशीत होते. 

अर्थात फडणवीस देखील काही कच्च्या गुरुचे केले नाहीत. त्यांनी आधी राज्यसभा आणि पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत पवारांच्या महाविकास आघाडीला आडवे केले आणि या धक्क्यातून ते सावरण्यापूर्वीच शिवसेनेत फूट पाडली आणि उद्धव ठाकरे यांचे सरकारही पाडले. मग महाराष्ट्रात शिंदे फडणवीस राजवट सुरू झाली. हे सुरू असतानाच वर्षभरातच फडणवीस यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील फोडली. इतकेच काय पण पवारांचे घर देखील फोडले. अजित पवारच राष्ट्रवादी काँग्रेसकडून फोडून बाहेर पडले. सोबत ४० आमदार देखील त्यांनी घेतले होते. त्यामुळे पवारांचा पक्ष एकदमच अल्पमतात आला होता. २००६-७च्या दरम्यान शरद पवारांनी गोपीनाथ मुंडे यांचा पुतण्या धनंजय मुंडे यांना भाजपमधून फोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले होते. शरद पवारांचे कुटुंब फोडून देवेंद्र फडणवीस यांनी याचा बदला देखील घेऊन टाकला. पवारांना हा मोठा धक्का होता.

तरीही आपण धोबीपछाड द्यायचीच या तयारीत शरद पवार होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रात आपली ताकद दाखवली. देखील त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेला काहीसा सेटबॅक देखील बसला. मग पवार, ठाकरे हे हवेत उडू लागले. त्यावेळी शिंदे फडणवीस यांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढत संघटना बांधली आणि चारच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाला पुरते गारद केले.२८८ सदस्यांच्या विधानसभेत शिवसेनेला २० जागा, काँग्रेसला १६ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त १० जागा मिळाल्या. या सर्वांचेच अनेक शिलेदार आडवे झाले. हा शरद पवारांना खरा मोठा धक्का होता. 

शरद पवारांना पंतप्रधान होण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. अनेकदा त्यांनी विरोधी पक्षांची एकत्र मोट बांधण्याचाही प्रयत्न केला. मात्र विरोधी पक्ष एकत्र येत नव्हते आणि एकत्र आले तरी पंतप्रधान कोणी व्हायचे हा मुद्दा आडवा येत होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद फक्त महाराष्ट्रा पुरतीच उरली होती. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी होती. तरीही त्यांचे प्रयत्न सुरू होतेच… मात्र शेवटपर्यंत ते शक्य झाले नाही. ज्यावेळी एपीजे अब्दुल कलाम निवृत्त झाले त्यावेळी आपल्याला किमान राष्ट्रपती तरी बनवावे असाही त्यांचा प्रयत्न होता. मात्र तिथे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाले, तेव्हादेखील त्यांना आपले नाव पुढे करता आले नाही. त्यामुळे राष्ट्रपतीपदाची देखील संधी त्यांच्या हातून गेली. मोदी पंतप्रधान .झाल्यावर २०१७ मध्ये सर्व सहमतीचे उमेदवार म्हणून तरी आपला विचार व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र तिथे त्यांना बाजूला सारत रामनाथ कोविद यांना राष्ट्रपती केले गेले. त्यामुळे इथेही पवारांचा पुरता पचका झाला होता. 

 एव्हाना आपल्याला तर काही मिळत नाही, तेव्हा मुलीला तरी केंद्रात मंत्री करावे असे प्रयत्न त्यांनी सुरू केले होते. संयुक्त पुरोगामी आघाडीत कृषिमंत्री असतानाच त्यांनी सुप्रिया सुळे यांना राज्यसभेत निवडून आणले होते. नंतर त्यांना बारामतीतून निवडून आणत आपण माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पुढे ते राज्यसभेत जाऊ लागले. मात्र सुप्रिया सुळे अजूनही बारामतीतूनच विजयी होत आहेत. जोपर्यंत अजित पवार शरद पवारांसोबत होते तोपर्यंत बारामतीचा कारभार ते सांभाळून घेत होते. जेव्हा अजित पवारांनी साथ सोडला, तेव्हापासून पवारांना ते सांभाळणे जड जाऊ लागले. २०२४ मध्ये केंद्रात भाजपला थोडा सेटबॅक बसला होता. त्यामुळे त्यांना काही बाहेरील पाठिंब्याची गरज भासणार होती. आजही महिला आरक्षण आणि परिसिमन विधेयकासाठी भाजपाला काही बाहेरील पाठिंब्याची गरज लागणार आहे. अशाच संधी हेरत पवारांनी भाजप नेत्यांशी देखील आम्ही तुमच्या सोबत येतो, मात्र सुप्रियाला केंद्रात मंत्री करा अशी गळ घातली असल्याच्या राजकीय चर्चा होत्या. मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी त्यांना कोणतीही दाद दिली नाही, अशीही चर्चा रंगली आहे

अजित पवारांनी शरद पवारांचा साथ सोडण्यामागे पवारांचे कन्याप्रेम हेच कारणीभूत ठरले होते. शरद पवारांना सुप्रियांना पुढे न्यायचे होते. त्यासाठी ते अजित पवारांचा देखील राजकीय बळी द्यायला तयार झाले होते. म्हणूनच २००४ मध्ये संधी असूनही त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री बनु दिले नव्हते. त्यांना कायम उपमुख्यमंत्रीच ठेवले होते. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा पवारानंतर कोणाकडे सोपवायची हा प्रश्न आला, त्यावेळी अजित पवारांना बाजूला सारत सुप्रिया सुळे यांना पक्षाची सूत्र सोपवायची या हालचाली सुरू झाल्या. तेव्हा अजित पवार सावध झाले आणि त्यांनी काकाचा साथ सोडण्याचा निर्णय घेतला. पुढे काय आणि कसे घडले हे चित्र आपण सर्वांनी बघितले आहेच.

अजित पवारांनी शरद पवारांचा साथ सोडल्यानंतरही आपण बाजी मारू अशी शरद पवारांना आशा होती. लोकसभेत त्यांनी यशस्वी प्रयत्न केलेही, मात्र विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी शिंदे फडणवीस यांच्या साथीने त्यांना पुरते झोपवले. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरोधात अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना उभे केले होते. त्या बदल्यात शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या विरोधात आपला नातू युगेंद्र पवार याला उभे केले.  अर्थात अजित पवारांनी त्याला चांगलीच धोबीपछाड दिली. २०१९ मध्ये अजित पवार आपला मुलगा पार्थ पवार याला राजकारणात पुढे आणण्यासाठी पक्षाने विधानसभेत उमेदवारी द्यावी म्हणून प्रयत्नशील होते. मात्र त्यावेळी शरद पवारांनी अजित पवारांचे पंख कापत पार्थ पवारला उमेदवारी नाकारली आणि रोहित पवारला मात्र पुढे केले. अजित पवार दुखावण्यामागे हे देखील एक कारण होते. विधानसभा निवडणुकीत झालेल्या अजित पवारांच्या दणदणीत विजयानंतर आणि शरद पवारांच्या दारुण पराभवानंतर आता पवार राजकारणातून हळूहळू कमी होणार ही चर्चा सुरू झाली होती. नंतर लगेच आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये त्याचे प्रत्यंतर आलेच. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊनही त्यांना सत्ता टिकवता आली नाही. पिंपरी चिंचवडमध्ये देखील तेच झाले. जिल्हा परिषदा इतकेच काय पण बारामती मतदारसंघातील नगरपरिषदा इथेही शरद पवारांना चांगलाच सेटबॅक बसला. त्यांचे राजकीय अस्तित्व आता संपते आहे असेच चित्र दिसू लागले. याच दरम्यान अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला. ती संधी साधत शरद पवारांनी पुन्हा एकदा दोन्ही काँग्रेस एकत्र करण्याचा प्रयत्न जरूर केला. मात्र तो देखील फसला. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री बनल्या आणि त्यांची ताकद हळूहळू वाढते आहे, असेच चित्र दिसते आहे. त्याच वेळी पवारांच्या पक्षात मात्र आज अस्वस्थता दिसत आहे. 

पवारांच्या मतदारसंघातील माळेगाव आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाने हे राजकीय नेत्याच्या ताकदीचे थर्मामीटर मानले जात होते. इथे आतापर्यंत शरद पवारांची ताकद दिसत होती. यावेळी मात्र तिथे यावेळी वेगवेगळे पॅनल उभे झाले होते. यात देखील शरद पवारांना चांगलाच धोबीपछाड मिळाला असून आता तिथे देखील सुनेत्रा पवारांची ताकद वाढलेली दिसते आहे, आणि आज तरी सुनेत्रा पवारांना सोयीचे राहील असेच चित्र राजकीय क्षितिजावर उमटलेले दिसते आहे. त्याच वेळी पवार आता दमले आहेत त्यामुळे इथून त्यांना भवितव्य नाही असेच बोलले जाऊ लागले आहे.

एका काळात शरद पवार हे धाडसी आणि आक्रमक म्हणून ओळखले जात होते. फक्त राजकारणातच नाही तर व्यक्तिगत जीवनात देखील धाडस दाखवणे दाखवण्याचे काम ते करत असत. मला आठवते १९८९ मध्ये पवार मुख्यमंत्री असताना विदर्भात सर्वत्र पूर आला होता. त्यावेळी ज्या ठिकाणी कार पोहोचू शकत नव्हते तिथे मंत्र्यांना जीपने नेले जात होते. त्यावेळी शरद पवार प्रोटोकॉल बाजूला सारून स्वतः जीप चालवायला बसायचे. दूरदर्शनचा छायाचित्रकार या नात्याने पवारांबरोबर या दौऱ्यात काही काळ मी देखील प्रवास केला आहे. नंतर तब्बल बारा वर्षांनी केंद्रीय संरक्षण मंत्री असताना नौदलाच्या एका जहाजातून दुसऱ्या जहाजात समुद्र उसळला असताना दोरखंडाला लटकून जाण्याचे धाडस त्यांनी १९९२मध्ये दाखवले होते. त्याला देशभर यावर प्रसिद्धी देखील मिळाली होती. मात्र आता तो धाडसी स्वभाव वयानुसार कमी झालेला दिसतो आहे.

एकूणच एक आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, केंद्रात दोनदा मंत्री, केंद्रातही काही काळ विरोधी पक्षनेता इतपत मजल मारल्यानंतर पंतप्रधान पदांनी मात्र पवारांना कायम हुलकावणी दिली. त्याचबरोबर राष्ट्रपती देखील त्यांना होता आले नाही. किमान मुलीला तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करावे, तेही त्यांना आतापर्यंत शक्य झाले नाही आणि आता सद्यस्थितीत त्यांच्या हयातीत त्यांना ते करणे शक्य होईल असे वाटत नाही. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्री करता आले तर बघावे म्हणून प्रयत्न केले मात्र ते देखील जमलेले नाही. तेच काय पण त्यांनी इतकी वर्ष जोडून ठेवलेले जुने कार्यकर्ते देखील हळूहळू त्यांच्यापासून दुरावत आहेत. आज त्यांच्या बारामती मतदारसंघात देखील स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था इथेही त्यांचे महत्त्व संपते आहे. त्यांनी वयाची ८५ वर्षे पूर्ण केली आहेत. आता त्यांची बुद्धी तल्लख असली, तरीही गात्रे शिथिल झाली आहेत. आणि आता मुलीसाठी काही भरीव करण्याकरिता सुद्धा फारसा स्कोप राहिलेला दिसत नाही. एकूणच आता ते थकलेले आहेत, दमलेले आहेत हे स्पष्ट दिसते आहे. 

याचवेळी सलील कुलकर्णी यांनी गायलेले "दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला" हे गीत आठवते आहे. त्या गीतातील त्या दमलेल्या बाबासारखीच शरद पवारांची आज अवस्था झालेली आहे. आज आयुष्यभर संघर्ष करत हवे ते मिळवण्यासाठी शरद पवार धडपडले. त्यात त्यांनी काही गोष्टी मिळवल्या जरूर, मात्र अंतिम लक्ष्य त्यांना गाठता आले नाही. आपल्याला मिळाले नाही, तर किमान आपल्या मुलीला तरी काही देता यावे हा प्रयत्न देखील त्यांनी केला, मात्र या क्षणी तरी तो फसलेला आहे आणि आता पुढे काही पवारांना करण्यासारखे फारसे राहिलेले दिसत नाही. ते स्वतःसाठी तर नाहीच, पण मुलीसाठी देखील आता फारसे काही करू शकतील असे वाटत नाही. जर सुप्रिया सुळेंनी स्वबळावर काही मिळवले, तर तो भाग वेगळा, पण त्यांचे व्यक्तिमत्व लक्षात घेता त्या काही फारसे मिळवू शकतील असे वाटत नाही. वडिलांच्या पुण्याईवर जे काही मिळेल त्यावरच त्यांना समाधान मानावे लागणार आहे असे आजचे चित्र आहे. त्यामुळे आज आपल्या मुलीला आपल्याला हवे ते मिळवून देण्याच्या प्रयत्नात शरद पवार या क्षणी तरी पुरते दमलेले आहेत. म्हणूनच "दमलेल्या बाबाची" ही कहाणी आहे. यातला बाबा आता पुरता हताश झालेला आहे. या दमलेल्या बाबांनी आता निवृत्ती स्वीकारावी असे सर्वच बोलू लागले आहेत. अजित पवार हयात असताना देखील त्यांनी आपल्या काकांना ही सूचना केली होती, कदाचित उद्या रोहित पवार देखील ही सूचना करू शकतील. त्यावेळी हा दमलेला बाबा अधिकच हताश झालेला असेल हे नक्की. 

तोवर तरी या दमलेल्या बाबांनी आपले उर्वरित आयुष्य शांतपणे घालवावे यासाठी आपण त्यांना फक्त शुभेच्छाच देऊ शकतो.

       ✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.