घ्या समजून राजेहो, राष्ट्रवादी काँग्रेसचे कथित विलीनीकरण: एक चिंतन...

 घ्या समजून राजेहो

 राष्ट्रवादी काँग्रेसचे कथित विलीनीकरण: एक चिंतन...



गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये आजारी असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पार्थ पवार त्यांना दोनदा भेटायला गेले आणि दीड तास चर्चा केली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एक नेते सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण ठरले आहे आणि १२फेब्रुवारीला त्याबाबत निर्णय घेऊ असे अजितदादा माझ्याशी बोलले होते असे विधान केल्यामुळे त्या चर्चांना पुन्हा एकदा जोर चढला आहे.

तिथे मुळात प्रश्न असा उपस्थित होतो की खरोखरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होईल काय? आणि झाले तर ते कशाप्रकारे होईल? आणि त्यातून कोणकोणत्या समस्या उद्भवू शकतील? याचा अशा चर्चा करणारे कोणीच विचार करताना दिसत नाही. त्यामुळे काही वेळा या चर्चा देखील वांझोट्या तर नाहीत ना, अशी शंका निश्चित मनात येते. त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कथित विलीनीकरण हे कितपत शक्य आहे या मुद्द्यावर आज मी लिहिण्याचे ठरवले आहे. 

या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यापूर्वी एक बाब लक्षात घेतली पाहिजे, की राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापनाच मुळी एका व्यक्तीच्या राजकीय लालसेपोटी झाली आहे. साधारणपणे नवा पक्ष काढायचा तर तिथे काहीतरी विचार डोळ्यासमोर ठेवून पक्षाची स्थापना केली जात असते. त्यामागे काही सिद्धांत देखील असतात. मात्र इथे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली ती सोनिया गांधींनी पंतप्रधान होऊ नये आणि त्यावेळी शरद पवारांना पंतप्रधान पद मिळावे या एका हेतूमुळेच. याशिवाय पक्षाला कोणतीही सैद्धांतिक पार्श्वभूमी नव्हती.

१९७८ मध्ये शरद पवारांनी मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून काँग्रेस फोडून बाहेर निघत समाजवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी जवळजवळ दीड वर्ष मुख्यमंत्रीपदाचा आनंद घेतला नंतर पाच वर्ष ते विरोधी पक्षनेते देखील राहिले. मात्र त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्रीपद हवे म्हणून ते काँग्रेसमध्ये परतले होते. नंतर १९९१ मध्ये त्यांनी पंतप्रधानपदावर दावा सांगून पाहिला. मात्र त्यावेळी ते जमले नाही. म्हणून "दुधाची तहान ताकावर" या न्यायाने केंद्रात काही काळ संरक्षणमंत्रीपद त्यांनी भूषविले. नंतर पुन्हा गरज म्हणून महाराष्ट्रात त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवले होते. 

१९९६ आणि १९९८ अशा लागोपाठ दोन निवडणुका होऊन देखील केंद्रात स्थिर सरकार नसल्यामुळे १९९९ मध्ये पुन्हा लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या. १९९१ मध्ये राजीव गांधींची हत्या झाल्यावर त्यांच्या पत्नी सोनिया गांधी या राजकारणातून पूर्णतः दूर होत्या. मात्र १९९८ च्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांना राजकारणात सक्रिय केले गेले, तर १९९९ च्या निवडणुकीत त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्याचा काँग्रेस पक्षाचा निर्णय निश्चित झाला होता. मात्र शरद पवारांना स्वतःला पंतप्रधानपद हवे होते. जर सोनियांना पंतप्रधान पदाचे उमेदवार दाखवले गेले आणि कदाचित पक्ष सत्ता मिळवण्याच्या परिस्थितीत असला तर सोनियाच पंतप्रधान होतील आणि आपला नंबर काही लागणार नाही या भीतीने शरद पवार यांनी सोनिया गांधींच्या नावाला विरोध केला. त्यांच्यासोबत उत्तरेकडे तारिक अनवर आणि ईशान्येतले पी ए संगमा हे देखील होते मग या तिघांवर पक्ष कारवाई करणार असे संकेत मिळताच या तिघांनी देखील काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. शरद पवारांचा खरा जोर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आहे. अर्थात इतर जिल्ह्यांमध्ये देखील त्यांनी इतक्या वर्षाच्या राजकारणात काही शिलेदार तयार करून ठेवले होते. त्यामुळे ते सर्वच शरद पवारांच्या सोबत आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसला व्यापक रूप देण्याची तयारी सुरू झाली. सुदैवाने त्यावेळी देशभरातून पवारांना काही गटांचा पाठिंबा मिळाला होता. 

१९९९ च्या लोकसभा निवडणुकीत पवारांना माझ्या आठवणीनुसार जेमतेम २५ जागा मिळाल्या होत्या. त्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस सत्ता मिळवू शकणार नव्हती. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकत्र आली आणि त्यांनी भाजपचे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात सरकार बनवले. परिणामी पवारांना विरोधी पक्षात बसावे लागणार होते. मग किमान महाराष्ट्रात तरी सत्ता असावी म्हणून  काँग्रेसशी भांडून ते बाहेर पडले होते,त्या काँग्रेसच्या नेत्यांशीच हात मिळवणी करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली. 

सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसला देशाच्या विविध भागातून पाठिंबा मिळाला होता. मला आठवते ऑक्टोबर २००० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसांचे अखिल भारतीय अधिवेशन नागपुरात झाले होते. त्यावेळी देशाच्या विविध भागातून प्रतिनिधी  तिथे आले होते. मात्र ही परिस्थिती पुढे हळूहळू बदलत गेली. आज महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस फक्त साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो, बाकी भारतात ईशान्य भारतातले एक छोटे राज्य सोडले तर कुठेही त्यांचे अस्तित्व नाही. नाही म्हणायला आधी शरद पवार आता स्वतःच जमत नाही तर मुलीची तरी कुठेतरी सोय लावावी या दृष्टीने धडपड करत होते. मात्र २०२३ मध्ये त्यांचाच पुतण्या अजित पवार यांनीच पक्षात बंडखोरी करून सर्व बिनीचे शिलेदार पळवले आणि पवारांना जास्तच खिळखिळे करून टाकले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत तरी आपण आपले ताकद दाखवू आणि अजित पवारांना धोबीपछाड देऊ असे शरद पवारांचे स्वप्न होते. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुमारे ४० च्या जवळपास जागा विधानसभेत मिळवल्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र १० जागांवरच समाधान मानावे लागले. नंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये देखील शरद पवारांची पीछेहाट होतानाच दिसून आली. 

२०२६ च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पुण्यात अजित पवारांनी त्या निवडणुकीपूरती काकांशी हातमिळवणी केली होती. त्याच दरम्यान मग अजित पवारांचे अपघाती निधन झाले अजित पवारांचे तेरा दिवस व्हायचेच होते, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी दोन्ही काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्या अशी अजितदादांची इच्छा होती आणि त्यांचे बोलणे होऊन १२ फेब्रुवारी ही तारीख ठरली होती असा दावा करून टाकला. त्यावर मग प्रतिक्रिया सुरू झाल्या. तेव्हापासून हे गुऱ्हाळ चालूच आहे. मात्र जेव्हा जेव्हा चर्चा झाल्या तेव्हा अजित पवारांचे वारस सुनेत्रा पवार पार्थ पवार आणि जय पवार हे या विषयावर फारसे कधीच काही बोललेले नाहीत. 

मधल्या काळात थंडावलेली ही चर्चा आता पुन्हा नव्याने सुरू झाली आहे. मात्र या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर त्या कशा एकत्र येतील आणि एकत्र आल्या तर काही फरक पडेल का हाच खरा कळीचा मुद्दा राहणार आहे. मुळात १९९९मध्ये शरद पवारांचे जे साथीदार त्यांच्यासोबत आले होते, ते आपल्याला पुढे जाऊन सत्ता मिळेल याच हेतूने आले होते. नंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली, त्यावेळी हवा कशी फिरते आहे याचा अंदाज घेत बहुसंख्य लोक शरद पवारांचा हात सोडून अजित पवार गटात आले. त्यातही त्यांना सत्ताच हवी होती. अन्यथा त्यांनी पक्ष बदलला नसता. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली तर आपल्याला सत्ता मिळणार का आणि शरद पवार सोबत आले तर आपली काय अवस्था असेल याचा सर्वजण विचार करणारच. इथे शेवटी शरद पवारांच्या विश्वासार्हतेचा देखील प्रश्न उपस्थित होतो. ज्या सोनियांना विरोध करण्यासाठी त्यांनी काँग्रेस सोडली त्यात सोनियांना २००४ मध्ये भावी पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करण्यासाठी शरद पवार आघाडीवर होते, हा इतिहास त्यांचे कार्यकर्ते विसरलेले नाही.

अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ते वेगळे झाले आणि नंतर त्यांनी पक्षच पळवला. त्यामागे निश्चित कारणे होती. १९८५नंतर शरद पवारांनी अजित पवारांना आपला राजकीय वारस म्हणून पुढे आणले होते. त्यानुसार ते झपाट्याने पुढेही सरकले होते. मात्र लग्न करून सिंगापूरला गेलेल्या सुप्रिया सुळे भारतात परत आल्या आणि त्यांना राजकारणात आणण्याचे शरद पवारांचे प्रयत्न सुरू झाले. तेव्हापासून पवारांनी मुलीसाठी पुतण्याचे खच्चीकरण करणे सुरू केले. त्या इतिहासात मी जाणार नाही. मात्र ज्यावेळी मे २०२३ मध्ये आता शरद पवार पक्षाची सर्व सूत्रे सुप्रियाकडे सोपवणार हे चित्र स्पष्ट झाले, त्यावेळी अजित पवारांनी आधी पक्ष सोडला आणि मग पक्षच पळवला, हा इतिहास ताजा आहे.

अशा परिस्थितीत विलीनीकरण करायचे तर कोणी कोणात विलीन व्हायचे हा पहिला मुद्दा येणार आहे. त्यानंतर आज अजित पवार गट भाजपासोबत आहे जर शरद पवार गट अजित पवार गटात विलीन झाला तर भाजप त्यांना सामावून घेईल का हा देखील प्रश्न उपस्थित होतो. जर भाजप त्यांना सामावून घेणार नसेल तर मग पक्षाला विरोधी बाकावर बसावे लागेल. आज अजित पवार गटाचे जे नेते सत्तेचे लाभार्थी आहेत ते या तडजोडीला कसे तयार होतील हा देखील प्रश्न आहे. 

आता शरद पवार म्हातारे झाले आहेत. त्यांची शक्ती क्षीण झाली आहे. त्यामुळे त्यांना सोबत घ्यावे, त्यांचा आग्रह असेल तर सुप्रियाला केंद्रात एखादे थातूरमातूर मंत्रिपद देऊन चूप बसवावे, आणि दोन्ही काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ द्याव्या, असा भाजप कदाचित विचार करू शकते. आज भाजपाला केंद्रात अतिरिक्त पाठिंब्याची गरज आहे. शरद पवारांजवळ आज आठ खासदार आहेत. त्यामुळे इथे भाजप तडजोड करू शकतो. मात्र पुढे या दोन पक्षातच एकत्र आल्यावर वेगवेगळे वाद होऊ शकतात हा मुद्दा देखील विचारात घ्यायला हवा. 

आज दोन्ही पक्ष एकत्र आले तरी त्यांची राजकीय ताकद फारशी वाढेल अशी परिस्थिती नाही. आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी कोणत्याही परिस्थितीत ते महाराष्ट्रात सत्ता मिळवू शकणार नाहीत, हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे त्यांना कोणत्यातरी दुसऱ्या पक्षाच्या कुबड्या घेऊनच चालावे लागणार आहे. आज अजित पवार गट भाजपसोबत आहे. त्यांनी काही मंत्रिपदे मिळवली आहेत. आज राज्यात दहा आमदारांचा पाठिंबा वाढला म्हणून भाजप नेते अजित पवार शरद पवार गटाला काही जास्तीचे मंत्रिपदे देतील अशी परिस्थिती नाही. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये मारामाऱ्या सुरू होतील हे निश्चित. मग शरद पवार गटाला सोबत घेऊन आपल्या हातात जे काही आहे ते का गमावायचे असा विचार अजित पवार गटाचे नेतृत्व निश्चित करू शकते. 

इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येणार आहे की या पक्षाचे दिलीनीकरण झाले तर नेतृत्व कोण करणार? शरद पवारांची सहाजिकच आपल्या मुलीने नेतृत्व करावे अशी इच्छा राहणार. मात्र सुप्रिया सुळे मध्ये ती क्षमता नाही, जी शरद पवार किंवा अजित पवारांमध्ये होती. शिवाय आज पक्षात रोहित पवार नावाचे नवे नेतृत्व देखील समोर आले आहे. त्यांचा आणि सुप्रिया सुळे यांचा देखील संघर्ष होऊ शकतो. याशिवाय नव्या पिढीतले पार्थ पवार आणि जय पवार हे देखील दंड थोपटून आहेतच. अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांना पूर्ण पाठिंबा देत त्यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवली आहे. अर्थात तिथेही पार्थ पवार यांचे जास्त वर्चस्व सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल अशी मंडळी मानायला तयार नाहीत. अशावेळी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे वर्चस्व ही मंडळी कितपत मानतील हा देखील महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. 

इतके करूनही जर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाले तर त्यांना फारसा फायदा होईल, असे चित्र आज तरी दिसत नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते तो एक भ्रम पसरवणारा देखावाच ठरेल. मात्र इथे अंतर्गत संघर्ष वाढेल. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, छगन भुजबळ ही मंडळी सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व कितपत मानतील याबाबत सर्वच साशंक आहेत. मग या एकत्र आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते हा पक्ष सोडून एक तर भारतीय जनता पक्षात जातील किंवा मग शिंदे यांच्या शिवसेनेत जातील हे चित्र आजच दिसते आहे. ज्यावेळी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली, त्यावेळी लगेचच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार उद्या भाजपत जातील अशी भविष्यवाणी करूनच टाकलेली आहे. 

हे सर्व मुद्दे लक्षात येत आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कथित विलीनीकरण अशक्य वाटते आहे. त्यातही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे लोक जास्त उतावळे झालेले आहेत, कारण त्यांना आता सत्तेजवळ जायचे आहे. मात्र भाजप त्यांना सोबत घेईल का हा देखील प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यामुळे आज तरी हे विलीनीकरण अशक्य आहे आणि खुदा ना खास्ता ते एकत्र आले ही तरी ते कोणाच्या हिताचे ठरणार नाही. 

मात्र शेवटी हे राजकारण आहे. राजकारणात बरेचदा अशा अतर्क्य आणि अनाकलनीय घटना घडत असतात. तसेच काही झाले तर सांगता येत नाही. त्यासाठी आपल्याला वाट बघावी लागणार आहे. 

वाचक हो पटतय का तुम्हाला हे......

 त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो....

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.