पटतंय का बघा...! "पाणीबाणी" टाळण्यासाठी पाणी जपूनच वापरायला हवे.

 पटतंय का बघा...!

"पाणीबाणी" टाळण्यासाठी पाणी जपूनच वापरायला हवे



आमच्या घरासमोर एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. काल दुपारी काही कामाने घराबाहेर पडलो, तर त्या इमारतीचा चौकीदार एक कार पाण्याने धुत होता. ती कार बहुदा विकासकाची किंवा कंत्राटदाराची असावी. त्यासाठी इमारतीच्या बांधकामासाठी असलेल्या नळाला लांबलचक ट्यूब जोडून तो त्या कारवर पाण्याचा अक्षरशः वर्षाव करत होता. परिणामी पाण्याचे लोट रस्त्यावर दूरपर्यंत वाहिलेले दिसत होते. त्यातही विशेष म्हणजे ती ट्युब किमान तीन ठिकाणी फुटलेली दिसत होती आणि त्या तीनही ठिकाणाहून कारंजासारखे पाणी उंच उडत होते. 

माझे रोजचेच जाणे येणे असल्यामुळे त्या चौकीदाराने मला बघून नमस्कार केला. मी त्याला टोकले," एकीकडे नागपूरचे म्युनिसिपल कमिशनर सांगताहेत की कार धुण्यासाठी असे पाणी उधळू नका. यंदा पाणी सगळ्यांनीच जपून वापरा, आणि इकडे तू असे पाणी उधळतो आहेस. जर कार्पोरेशनच्या एखाद्या अधिकाऱ्याने तुला बघितले तर तुझ्यावर कारवाई होईल." त्यावर तो चौकीदार उतरला "काय करू साहेब? शेवटी साहेब लोकांची गाडी धु म्हटले तर धुवावीच लागते." मग मी त्याला विचारले "ही ट्यूब तीन ठिकाणाहून फाटलेली आहे, ती का बदलत नाही?" त्यावर त्याने काहीच उत्तर दिले नाही. एकूणच अगदी मुक्तहस्ते तो तिथे पाणी उधळत होता. तिथे त्याच्यावर कोणाचेही काहीही निर्बंध नव्हते आणि पाणी अकारण वाया जात असल्यामुळे कोणालाही त्याचे सोयर सुतक नव्हते.

यंदा अल निनोमुळे पाऊस खूप कमी झाला आहे. नागपूर शहरापुरते बोलायचे झाल्यास शहराला पाणीपुरवठा करणारे जे जलाशय आहेत, त्यात जेमतेम ५० टक्केच पाणीसाठा जमा झालेला आहे. आता पाऊस येण्याची काही शक्यता नाही. त्यामुळे आहे हे पाणीच जपून वापरावे लागणार आहेत. त्यामुळेच प्रशासनाने आता आतापासूनच कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. सध्या जो पाणीसाठा आहे, तो लक्षात घेता हे पाणी शहराला फेब्रुवारी पर्यंतच पुरेल. नंतर पाणीटंचाई जाणवेल असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे जर योग्य काळजी घेतली नाही तर एप्रिल मे जून हे तीन महिने पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवेल आणि एकूणच गोंधळाची स्थिती निर्माण होईल ही शक्यता नाकारता येत नाही. 

समजा अशी परिस्थिती आली, तर आम्ही सर्व नागरिक मुक्तकंठाने प्रशासनाला तोंड भरून शिव्या घालत त्यांनाच या परिस्थितीसाठी जबाबदार ठरणार आहोत. मात्र निर्माण होत असलेल्या परिस्थितीला फक्त प्रशासनच जबाबदार आहे असे नाही तर आम्ही सुद्धा तेवढेच जबाबदार आहोत याचे कोणीही भान ठेवत नाही हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल. 

खरे तर गेल्या काही वर्षांपासून तसेही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याला देखील माणूसच जबाबदार आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. पाऊस पुरेसा येण्यासाठी हवेत पाण्याचे ढग तयार व्हावे लागतात. त्यासाठी फक्त जमीन असून चालत नाही तर वृक्ष आणि डोंगर देखील असावे लागतात. गेल्या काही वर्षात माणसाने विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड चालवली आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी डोंगर पोखरून तिथे नवीन वस्ती बनवली जात आहे, किंवा मग डोंगराच्या खालून बोगदे काढून रस्ते बनवले जात आहेत. आज आम्ही वृक्षतोड करतो. मात्र त्यानंतर नवीन झाडेही लावायला हवीत याचे आम्हाला भान नसते. पूर्वी प्रत्येक घराभोवती पाच-दहा तरी मोठे वृक्ष डौलात उभे असायचे. आज नवीन इमारती उभ्या करण्याच्या नादात तिथले वृक्ष तोडून टाकले जातात आणि विकासात नवीन वृक्ष लावण्याची कधीच तसदी घेत नाही. या सर्व गोष्टींचा परिणाम पावसावर निश्चित होत असतो. मात्र आम्ही त्याचा कधीच विचार करत नाही. 

पूर्वी ठीकठिकाणी मातीच्या जमिनी असायच्या. त्यामुळे पावसाचे पाणी हे जमिनीत मुरत असे. पाणी मुरल्यामुळे जमिनीची पाण्याची पातळी आपसुकच वाढत असे. अशावेळी विहीर खणली तर फारसे खोल न जाता पाण्याचे झरे लागत असत. आता सगळीकडे नवीन इमारती झाल्यावर तिथे संपूर्ण जमिनीवर कडप्पा लावून सिमेंट काँक्रीटच्या जमिनी बनवल्या जातात. त्यावर पावसाचे पडलेले पाणी वाहून जाते. जर मुसळधार पाऊस झाला तर ते प्रसंगी घरात सुद्धा शिरते, मात्र जमिनीत ते मुरत नाही. पूर्वी रस्त्याच्या काठालाही मातीची जमीन असायची. तिथे देखील मोठी झाडे लावली जायची. आता रस्ते तर सिमेंट काँक्रीटचे झालेच, पण दोन्ही बाजूंनी तिथे गट्टू लावून फुटपाथ बनवले आहेत. तिथे झाड लावायला सुद्धा जागा नाही आणि पावसाचे पाणी मुरण्याचा तर प्रश्नाचे येत नाही. तिथे जर पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसेल तर प्रसंगी ते पाणी तुंबते आणि घराघरात शिरते. मग आम्ही प्रशासनाला दोष देतो. मात्र सर्व काही सिमेंट काँक्रीटचे हवे हा आग्रह आम्हीच केलेला असतो. असे सिमेंट काँक्रीटचे रस्ते व तिच्या सिमेंट काँक्रीटच्या जमिनी आणि सिमेंट काँक्रीटच्या बहुमजली इमारती यामुळे हवेतील उष्णतामान देखील वाढलेली आहे. त्याचाही परिणाम पावसावर होत असतो. 

मात्र विकासाच्या नावाखाली आम्ही पर्यावरणाचा ऱ्हास करत चाललो आहोत. नुकतेच नागपूरच्या महापौरांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक इमारतीत कंपल्सरी करावे अशा सूचना दिली असल्याची माहिती आहे. तसे झाले तर प्रत्येक इमारतीच्या आवारात एक गड्डा कडून त्यात पाणी साचण्याची आणि ते जमिनीत मुरवण्याची सोय तरी करता येईल. त्यामुळे भूजलाची पातळी सुद्धा वाढू शकेल. 

अर्थात हे सर्व प्रयोग आम्ही सामान्य माणसं कितपत करू याबाबत मलाच काय पण प्रत्येकाला शंका आहे. इकडे प्रशासन सांगते पाणी जपून वापरा, पण आम्ही मात्र बिनधास्त पाणी उधळतो. तासचे तास न चालू ठेवतो. मात्र पाणी ही आजची गरज आहे, इतकेच काय पण उद्याचीही गरज आहे हे आम्ही विसरतो. सध्या विकासाच्या नावाखाली जो पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, तो बघता भविष्यातील युद्धे पाण्याच्या मुद्द्यावर होतील असे बोलले जाते. त्यातील वास्तव देखील नाकारता येत नाही. 

त्यामुळेच आता प्रत्येकाने या सर्व बाबींचा विचार करून किमान स्वतःपासून पाणी जपून वापरावे हे धोरण अवलंबायला हवे. तसे झाले तर किमान यावर्षी तरी पाणी तुटवडा कमी जाणवू शकेल. अन्यथा एप्रिल मे जून या तीन महिन्यात आपल्याला प्रचंड पाणी  दुर्भिक्षाला सामोरे जावे लागेल, थोडक्यात सर्वत्र पाणीबाणी निर्माण झाली असेल हा धोका लक्षात घ्यायला हवा.

अर्थात हे माझं मत झालं.... 

 तुम्हाला पटतंय का ते बघा..!

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.