"सहज सुचलं म्हणून", इतरांचे नुकसान करून आंदोलन करत आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा प्रकार चुकीचाच..

"सहज सुचलं म्हणून"

इतरांचे नुकसान करून आंदोलन करत आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा प्रकार चुकीचाच..



अखेर राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन तब्बल ६० तासापेक्षा अधिक काळ चालून अखेर मागे घेतले गेलेले आहे. दीर्घकाळ कोल्हापूर पुणे महामार्ग रोखून धरत शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या आहेत. याबद्दल शेतकऱ्यांच्या चिकाटीचे कौतुक करायलाच हवे. 

मात्र मात्र आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी या शेतकऱ्यांनी तीन दिवस जनसामान्यांना वेठीस धरले त्याचे काय करायचे हा देखील प्रश्न आहे. तीन दिवस हा महामार्ग अडवून धरलेला असल्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्या जनसामान्यांचे चांगलेच हाल झाले. त्याशिवाय या रस्त्याने कोल्हापूर परिसरातील गोपालकांनी उत्पादित केलेले लाखो लिटर दूध जे मुंबईला जायचे होते ते जाऊ शकले नाही, त्यामुळे गोपालकांसे तर प्रचंड नुकसान झालेच आहे, कारण दूध वाया गेल्यामुळे त्यांना त्याचा काहीही मोबदला मिळणार नाही. त्याचबरोबर लाखो मुंबईकरांना दुधाविना दिवस काढावे लागले. मग त्यातल्या काहींना दाम दुप्पट दरात निम्न दर्जाचे दूध विकत घेऊन काम भागवावे लागले. या रस्त्याने बाहेरगावी शेतमाल पाठवणाऱ्या गाड्या देखील रस्त्यात अडकून पडल्या. त्यामुळे शेतमालाचे देखील प्रचंड नुकसान झाले. आधीच दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे अडचणीत असलेला शेतकरी अधिकच भरडला जाणार आहे, या रस्त्याने बाहेरगावी जाणाऱ्या सामान्य नागरिकांना मग दुसऱ्या रस्त्याने लांबचा फेरा घेऊन जावे लागले. तिथेही अशा अनेक वाहनांनी गर्दी केल्यामुळे ट्रॅफिक जाम व्हायचा तो झालाच. मग या रस्त्यावर साधे पिण्याचे पाणी सुद्धा दामदुप्पट दराने घ्यावे लागले. त्याशिवाय इतर हाल व्हायचे ते झालेच. रस्त्यात खाद्यपदार्थांची सुद्धा वानवा जाणवली. इतकेच काय, पण या रस्त्याने बाहेरगावी रुग्णांना घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्स गाड्या सुद्धा ट्रॅफिक जाम मध्ये अडकून पडल्या होत्या. जनसामान्यांचे असे हाल करून आणि इतरांचे लाखो करोडो चे नुकसान करून या शेतकऱ्यांनी आपल्या पदरात ऊसाला अपेक्षित भाव पाडून घेतला आहे. त्यामुळे त्यांचा आता फायदा होणार आहे हे निश्चित. मात्र स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी इतरांचे असे नुकसान किंवा गैरसोय करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार आहे काय याचाही आंदोलकांनी विचार करायला हवा. जनसामान्यांची गैरसोय होते आहे म्हणून आंदोलकांचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी जनसामान्यांची माफी मागून टाकली. त्यांनी हा सोपस्कार पार पाडला. मात्र त्यामुळे झालेल्या त्रासाचे प्रमाण कमी होणार आहे काय आणि झालेले आर्थिक नुकसान भरून निघणार आहे काय याचाही विचार राजू शेट्टींनी करायला हवा, 

अर्थात असा विचार कोणतेच आंदोलक आणि आंदोलनाचे नेते कधीच करताना दिसत नाहीत. नुकतेच जुलैमध्ये दिल्लीत जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन झाले होते. बरेच दिवस चाललेल्या या आंदोलनामुळे त्या परिसरातील व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार व्यावसायिकांनी केली होती. तिथे जनसामान्यांचे देखील प्रचंड हाल झाले होते, तुम्हाला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मिळाला. अर्थात त्यामुळे तसा विचार करता आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचा तत्काळ फायदा काहीच झाला नाही. फक्त नेत्यांचा इगो सुखावल्या गेला. आम्ही एका मंत्र्याचा राजीनामा घेतला हे समाधान त्यांना मिळाले, पण त्या बदल्यात तुम्ही असंख्य व्यावसायिकांचे नुकसान केले त्याला जबाबदार कोणाला धरायचे याचेही उत्तर अभिजीत दिपके यांनी द्यायला हवे. 

नुकतेच काँग्रेस पार्टीने देखील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी दिल्लीत आधी जंतर-मंतरवर आंदोलन केले. मग सरकारने तिथे आंदोलन करायला बंदी घातली म्हणून १ नोव्हेंबरला रामलीला मैदानावर भव्य रॅली घेण्याचा निर्णय घोषित केला. त्यावेळी तिथल्या व्यावसायिकांनी देखील या रॅलीला विरोध केला होता. १ नोव्हेंबर हा दिवाळीपूर्वी येणारा शेवटचा रविवार होता. त्यामुळे त्या दिवशी मोठ्या प्रमाणात व्यापार होणार हे उघड होते. मात्र त्याच दिवशी तिथे रॅली असल्यामुळे इतर सामान्य नागरिक कुणीच खरेदीला आले नाहीत. परिणामी व्यापाऱ्यांना माशा मारत बसावे लागले. या आंदोलनामुळे दहा हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असा दावा व्यापारी संघटनांनी केला आहे. यातील वास्तव देखील नाकारता येत नाही. 

त्यामुळेच याच आंदोलनासंदर्भात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी तुमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी तुम्ही आंदोलन करता, मात्र त्यावेळी इतरांचे नुकसान करण्याचा तुम्हाला अधिकार आहे का आणि दीर्घकाळ एखादे आंदोलनाचे सार्वजनिक स्थान किंवा असा हमरस्ता अडवून ठेवण्याचा तुम्हाला अधिकार आहे का असा प्रश्न विचारत अशा प्रकारांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र त्याचबरोबर इतर लोकांची रोजी रोटी हिसकावून घेण्याचा किंवा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात हस्तक्षेप करून त्यांची कामे ठप्प करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. तुम्ही जर कोणतेही आंदोलन करणार असाल, आणि तुमच्या मागण्या जनसामान्यांना पटणाऱ्या असतील तर जनसामान्यांनी स्वयंस्फूर्तीने तुम्हाला पाठिंबा द्यायला हवा आणि काही काळ आपले व्यवहार थांबवायला हवेत. अन्यथा जनसामान्यांना असे अडवण्याचा तुम्हाला काय अधिकार याचाही विचार आता आंदोलकांनी करण्याची वेळ आली आहे, 

एकूणच आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी जे कोणी मान्य करणारे अधिकारी कारखानदार किंवा प्रशासन असेल त्यांना तुम्ही जरूर वेठीस धरू शकता. मात्र त्यामुळे इतरांना त्रास देणे चुकीचेच आहे. तसे करण्याचा कोणत्याही आंदोलकाला किंवा आंदोलनाच्या नेत्यांना कोणताही अधिकार नाही याची जाणीव आता सर्वांनीच ठेवायला हवी इतकेच सहज सुचले म्हणून सांगावेसे वाटते, 

       ✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.