स्पष्ट आणि परखड पृथ्वीराजबाबांना पोटशुळ का उठला..?

 स्पष्ट आणि परखड

पृथ्वीराजबाबांना पोटशुळ का उठला..?

राष्ट्रवादी काँग्रेसचे  संस्थापक आणि देशातील ज्येष्ठ राजकारणी शरद पवार हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे आधी पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये आणि आता मुंबईच्या ब्रिज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाले आहेत. तिथे त्यांच्या प्रकृतीवर उपचार सुरू आहेत, हे वृत्त कळताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर पवारांनी आता दगदग करू नये, विश्रांती घ्यावी, देशाचे राजकारण आमच्याबरोबर सुप्रिया सुळे सांभाळतील  असेही पंतप्रधानांनी सुचवले असल्याचे वृत्त माध्यमांनी प्रसारित केले आहे. 

नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांच्या प्रकृतीची फोन करून चौकशी केली आणि त्यांना लवकर बरे व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आता दगदग करू नका असा सल्ला दिला. त्यात चुकीचे असे काहीच नाही. शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे दोघे काही एकमेकांचे शत्रू नाहीत. राजकारणात विरोधकांचे आणि तुमचे मतभेद असू शकतात, मात्र मनभेद नसावेत असे म्हटले जाते. भारतीय राजकारणात गत अनेक वर्षांचा इतिहास बघता हे तत्व अनेकांनी पाळलेले आहे. तसेच तत्त्व पाळणारे समंजस नेते नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे दोघेही आहेत, यात शंका नाही. त्यामुळेच मोदींनी पवारांची चौकशी केली आणि पवारांनी देखील त्यांना तसा प्रतिसाद दिला हे योग्यच झाले. 

मात्र कसा काय तो काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण यांना याबाबत पोटशुळ उठला असून त्यांना ओवा खायची वेळ आली आहे असे चित्र दिसते आहे. परवा मोदींनी पवारांची चौकशी केल्याची बातमी आल्यावर काल पृथ्वीराज चव्हाण त्यावर व्यक्त झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आता आपल्या सोबत येणार हे गृहीत धरले आहे का असा प्रश्न त्यांनी माध्यमांशी बोलताना विचारला आहे. त्याचबरोबर या मुद्द्यावर शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण द्यावे अशीही मागणी त्यांनी केली आहे. 

पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने अशी हास्यास्पद विधाने करावी हे कुठेतरी खटकणारेच आहे. भारतीय राजकारणात मतभेद कितीही असले तरी मनभेद नसतात. त्यामुळेच ज्या शरद पवारांना बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभेत बारामतीचा ममद्या, मैद्याचं पोतं अशा शब्दात हिणवले होते, त्या बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचे कौटुंबिक संबंध अतिशय मधुर होते. हे एक उदाहरण झाले. अशी अनेक उदाहरणे आहेत. जिथे मतभेद असले तरी ते बाजूला ठेवत कौटुंबिक संबंध आणि जिव्हाळ्याचे संबंध कायम जपले जातात. 

आता अजून काही उदाहरणे द्यायची झाली तर गोपीनाथ मुंडे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्ष नेते म्हणून गाजले होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना गोपीनाथजींनी त्यांना प्रचंड अडचणीत आणण्याचा प्रयत्न अनेकदा केला होता. मात्र प्रमोद महाजनांचा हिंदुजा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची बातमी कळताच विलासराव देशमुख आणि त्या वेळचे उपमुख्यमंत्री आर आर पाटील हे दोघेही हिंदुजा हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि तिथे प्रमोदजींसोबत असलेल्या गोपीनाथजींचे त्यांनी सांत्वन केले. विलासराव तिथे येताच इतका वेळ आवरून धरलेले आपले दुःख प्रकट करत गोपीनाथजी विलासरावंच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसढसा रडले. हे वृत्त वृत्तवाहिन्यांनी उभ्या देशाला दाखवले होते. इथे राजाकीय मतभेद बाजूला पडले होते आणि व्यक्तिगत संबंध पुढे आले होते. केंद्रीय मंत्री वसंतराव साठे हे अखेर पर्यंत काँग्रेसचे होते. ते मंत्री असताना सुमित्रा महाजन या भाजपाच्या खासदार होत्या. मात्र ज्यावेळी सुमित्रा महाजन या माहेरच्या साठे आहेत हे वसंतराव साठे यांना कळले, तेव्हा त्यांनी ही माझी बहीण आहे म्हणून सांगायला सुरुवात केली आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवत त्यांनी कौटुंबिक संबंध जपले होते. आजही वसंतराव साठे नसताना सुमित्रा महाजनांनी साठे परिवाराशी संबंध जपलेले आहेत. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा काँग्रेसच्या कायम हिटलिस्टवर राहिला होता. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना तर त्यांनी संघाला कायम पाण्यातच पाहिले होते. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींचे निधन झाले, तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. त्यानंतर संसदेच्या झालेल्या अधिवेशनात प्रथा परंपरा बाजूला सारत इंदिरा गांधींनी गोळवलकर गुरुजींच्या निधनाबद्दल सभागृहात शोक प्रस्ताव मांडला होता आणि त्यांनी स्वतः त्यावर भाषण केले होते. जरी ते विरोधक होते तरी ते एका मोठ्या राष्ट्रीय संघटनेचे प्रमुख होते हे त्यांचे मोठेपण इंदिरा गांधींनी मान्य केले होते. एकूणच काय तर भारताच्या राजकारणात मतभेद कितीही असले तरी मनभेद दूर ठेवले जातात हीच परंपरा राहिलेली आहे. 

शरद पवार हे नरेंद्र मोदींपेक्षा  वयाने ज्येष्ठ आहेत. देशाच्या राजकारणात त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. राजकारणातले छक्के पंजे त्यांना व्यवस्थित माहित आहेत. त्यांचे हे श्रेष्ठत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधीही नाकारलेले नाही. त्याचबरोबर नरेंद्र मोदींचे कर्तृत्व आणि त्यांना असलेला व्यापक जनाधार हा देखील शरद पवारांनी कायम मान्य केलेला आहे. राजकारणात त्या दोघांमध्येही प्रचंड मतभेद आहेत, मात्र ते मतभेद दूर करून त्यांनी व्यक्तिगत संबंध जपले आहेत. त्यामुळेच पवारांनी जेव्हा जेव्हा मोदींना बारामतीत निमंत्रित केले, तेव्हा तेव्हा नरेंद्र मोदी बारामतीत कार्यक्रमाला आलेले आहेत आणि त्यांनी पवारांचा उल्लेख कायम माझे मोठे भाऊ असाच केलेला आहे. हे सर्व काही व्यक्तिगत संबंध जपल्यामुळेच शक्य झाले आहे. 

याच व्यक्तिगत संबंधांमधून नरेंद्र मोदींनी शरद पवारांच्या प्रकृतीची चौकशी केली हे योग्यच म्हणावे लागेल. शरद पवारांचे आता बरेच वय झाले आहे. वयाची ८५ वर्षे त्यांनी पूर्ण केली आहेत. आता ते थकलेले देखील आहेत. आधी झालेला कर्करोग देखील त्यांना त्रास देत असतो. त्यामुळेच नरेंद्र मोदींनी आता पवारांनी प्रकृती सांभाळावी आणि विश्रांती घ्यावी असा सल्ला दिला. त्याचे खरे तर स्वागतच करायला हवे. पवारांची एकुलती एक कन्या सुप्रिया सुळे यादेखील राजकारणात सक्रिय आहेत, आणि एक बाप म्हणून शरद पवारांना सुप्रिया सुळेंबाबत काळजी असणे सहाजिक आहे. तिथे सुद्धा मोदींनी सुप्रिया सुळे आमच्याबरोबर राजकारणात राहून देशाची काळजी करतीलच असे आश्वस्त केले आहे हे देखील उचितच मानावे लागेल. 

मात्र त्याबाबत पृथ्वीराज बाबांना का पोटशुळ उठावा हा देखील प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडलेला आहे. पृथ्वीराज बाबा काँग्रेसची परंपरेतले शिलेदार आहेत. त्यातही ते पश्चिम महाराष्ट्रातले राजकारणी असल्यामुळे पवारांचे त्यांचे फारसे संख्या नाही. त्यामुळे संधी मिळताच तिथे पाचर मारायचीच हा त्यांचा विघ्नसंतोषी स्वभाव आहे. त्यातूनच त्यांनी नरेंद्र मोदींनी शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांच्यासोबत जाणार का हे गृहीत धरले आहे असा तर्क लढावला आहे आणि पवार किंवा सुप्रिया सुळेंनी यावर खुलासा करावा अशीही मागणी करून टाकली आहे.

इथे त्यांनी अशी शंका घेता घेण्यासाठी आणखी एक कारण असू शकते. नरेंद्र मोदींना संसदेत मतदार संघ  फेररचना विधेयक मंजूर करून घ्यायचे आहे. त्यासाठी त्यांना काही विरोधक सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. अशा प्रकारे नरेंद्र मोदी पवारांच्या लोकसभेतील आठ खासदारांचा पाठिंबा मिळू बघत आहेत अशी शंका त्यांना आलेली असू शकते. त्यामुळेच हा पोटशूळ उठलेला असू शकतो. मात्र या व्यक्तिगत चौकशीमुळे पवारांचे मतपरिवर्तन होईल किंवा तशी अपेक्षा ठेवून नरेंद्र मोदी यांनी फोन केला असेल असे सकृत दर्शनी तरी वाटत नाही,

पृथ्वीराज चव्हाण हे गांधी कुटुंबाच्या जवळचे मानले जातात. अशावेळी त्यांनी इंदिरा गांधींचा आदर्श कुठेतरी डोळ्यासमोर ठेवायला हवा. इंदिराजींनी आयुष्यभर राजकारण केले. मात्र त्यावेळी त्यांनी माणसं देखील जपली. त्यामुळेच त्या मोठ्या होऊ शकल्या. त्यांना कधी पृथ्वीराज चव्हाणांसारखा पोटशुळ उठत नव्हता. म्हणूनच त्यांनी या देशावर आधी अकरा वर्षे आणि मग साडेचार वर्षे राज्य केले आणि दीर्घकाळ देशाचे राजकारण चालवले, याचे भान ठेवत पृथ्वीराज चव्हाण यांनी अशी विधाने करू नये इतकेच त्यांना सांगावेसे वाटते. 

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.