माझंही मत नवी पिढी संघाकडे आकर्षित होण्यासाठी नवे प्रयोग गरजेचे..
माझंही मत
नवी पिढी संघाकडे आकर्षित होण्यासाठी नवे प्रयोग गरजेचे..
मात्र इथे मुद्दा असा उपस्थित होतो की, या ९९ हजारावर असलेल्या दैनंदिन शाखांमध्ये प्रभात शाखा किती आणि सायं शाखा किती आहेत? कारण साधारणपणे प्रभातशाखेत जे नोकरी धंद्याला लागलेले ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत, तेच जात असतात. तर सायंशाखेमध्ये बाल आणि तरुण मोठ्या संख्येत येतात. अर्थात ही परिस्थिती सुमारे ४० वर्षांपूर्वीची होती. आज चित्र बदललेले दिसते आहे. आज देशात संघाच्या सायंशाखांची संख्या हळूहळू घटतांना दिसते आहे. पूर्वी प्रत्येक वस्तीत किमान एक तरी संघाची शाखा दिसायची. साधारणपणे १९८०-८५ पर्यंत हे चित्र दिसत होते. या शाखांमध्ये बाल स्वयंसेवक आणि तरुणांची संख्या देखील लक्षणीय असायची. मात्र याच काळात ही संख्या हळूहळू घटत गेली आणि आज किमान महाराष्ट्रात तरी सायम शाखा तुरळक दिसतात.
अर्थात त्याला विविध कारणे देखील आहेत. मला आठवते, आज पासून ५५-६० वर्षांपूर्वी मुल शाळेतून घरी आले की रात्री अभ्यासाची वेळ होईपर्यंत त्याच्यामागे काहीही काम नसायचे. मग ही सर्वच मुले गावात उनाडक्या करत फिरायची. घरासमोर विटी दांडू, भोवरा, कंचे, लाकडाचे फळकुट वापरून तयार केलेल्या बॅटने आणि रबरी बॉलने खेळलेले क्रिकेट असे विविध खेळ ही मुले त्या काळात खेळायची. अशा वेळी मुलांना संघाच्या शाखेत पाठवले तर त्यांना थोडी शिस्त लागते, चांगले संस्कारही होतात, या भावनेतून एरवी संघाविषयी फारसे प्रेम नसणारे मायबाप देखील मुलांना संघात पाठवायचे. माझ्या आठवणीनुसार त्या काळात एरवी संघाला शिव्या देणाऱ्या काँग्रेसवाल्यांची मुले देखील खेळायला मिळते म्हणून शाखेत यायची. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी संघ शाखांची मैदाने अगदी फुललेली दिसायची.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरुवातीच्या काळात अशीच बालमने आणि तरुणाई संस्कारित करून संघाशी जोडली गेली होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात अनेक तरुण शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ संघासाठी पूर्णवेळ प्रचारक म्हणून देत होते आणि संघाला अपेक्षित राष्ट्रनिर्माणाच्या कामात हातभार लावत होते. अशा प्रचाराकांमधूनच संघाचे अनेक मोठे अधिकारी घडले, तर अशाच प्रचारकांमधून भाजपमध्ये आलेलेही अनेक नेते घडलेले आहेत. सध्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील तरुण वयात संघाचे पूर्णकालीन प्रचारक राहिलेले आहेत. या अशा तरुणाईच्या जोरावरच संघकार्य वाढले आणि संघाने शताब्दी पूर्ण केलेली आहे.
मात्र साधारणपणे १९८० नंतरच्या काळात देशातील शिक्षण पद्धतीत जबरदस्त स्पर्धा निर्माण झाली. त्यातही प्रत्येक कुटुंबात मोजकीच मुले असल्यामुळे त्यांच्यावरच आई-वडिलांचे पूर्ण लक्ष राहू लागले. मग आपला मुलगा आजच्या ग्लोबल युगात स्पर्धेत टिकला पाहिजे, म्हणून त्याला शाळेतून आल्यावर विविध क्लासेसमध्ये गुंतवणे सुरू झाले. जी मुले संध्याकाळी संघाच्या शाखेत खेळायला जायची, त्या मुलांना मग बॅडमिंटन किंवा टेनिस किंवा मग क्रिकेटच्या कोचिंगला पाठवले जाऊ लागले. त्याशिवाय दहावीत आणि बारावीत भरपूर गुण मिळावे म्हणून सकाळ दुपार संध्याकाळ त्या मुलांना कोचिंग क्लासेस मध्ये गुंतवले जाऊ लागले. कधी नाट्य प्रशिक्षण तर कधी विदेशी भाषांचे क्लासेस याचे सुद्धा त्या काळात पेव फुटले होते. परिणामी संघ शाखेतील संख्या हळूहळू कमी होऊ लागली. आज संध्याकाळी भरणाऱ्या संघ शाखांचीच संख्या हळूहळू घटत चालली आहे असे दिसते. मला आठवते मी राहत असलेल्या लक्ष्मी नगरच्या वस्तीत १९७० ते १९८० या काळात तीन सायं शाखा लागत होत्या. मात्र नंतर एकही शाखा लागताना दिसेनाशी झाली. नुकतीच एका ठिकाणी एक सायंशाखा पुन्हा सुरू झाल्याची माहिती मिळाली. अर्थात तिथेही संख्या तुरळकच असल्याचे दिसून आले.
हा प्रकार १९८० ते ९० च्या दरम्यानच हळूहळू वाढू लागला होता. तर २००० पर्यंत तो बराच वाढला होता. त्यामुळे मार्च २००० मध्ये संघात जेव्हा खांदेपालट झाला आणि सरसंघचालक रज्जूभैया निवृत्त होऊन के सुदर्शन हे सरसंघचालक झाले, त्यावेळी त्यांच्या पहिल्या पत्रपरिषदेत मी त्यांना याच संदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी या समस्येवर देखील आम्ही विचार करतो आहोत आणि त्याबाबतीत लवकरच मार्ग काढला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र तरीही आज सायंशाखांची घटती संख्या ही माझ्यासारख्या संघ प्रेमी व्यक्तीला कुठेतरी चिंताजनकच वाटते.
त्या सुरुवातीच्या काळात संघ शाखेत अगदी बालवयापासून मुलांना विविध खेळांचे शिक्षण दिले जात होते. त्याचबरोबर सामूहिक खेळ खेळल्यामुळे एकमेकांशी जुळवून घेण्याची प्रवृत्ती देखील वाढीला लागत होती. त्याचबरोबर विविध कथांच्या माध्यमातून बालमने संस्कारित देखील केली जात होती. मुलांना तिथे शिस्त देखील लागत होती. त्यातून एक संस्कारित पिढी घडवली जात होती. "अखंड अविरत या ध्येयास्तव घडवू ही जीवने, क्षणाक्षणाला दिसादिसाला संस्कारु ही मने" हे धोरण ठेवून त्यावेळी ती पिढी घडवली गेली होती. संघाच्या शिबिरांमधून देखील त्यांच्यावर संस्कार केले जात होते. यातूनच संघाने देशभरात एक समर्पित स्वयंसेवकांचे कॅडर तयार केले होते.
मात्र आज किमान महाराष्ट्रात तरी कायम शाखांची संख्या ही अगदी बोटावर मोजण्यासारखी दिसते आहे. किमान मला तरी तसे जाणवते आहे. माझे मत चुकीचे असल्यास ते दुरुस्त करावे. त्याचे स्वागतच होईल. मात्र विद्यमान स्थितीत नवी पिढी विशेषतः बाल आणि तरुण पुन्हा संघाकडे आकर्षित होण्यासाठी काही नवीन प्रयोगांची गरज आहे असे मला सुचवावेसे वाटते. ज्यावेळी सुदर्शनजींना मी हा प्रश्न विचारला होता, त्यानंतर याच विषयावर लिहिलेल्या एका लेखात मी स्वर्गीय नानाजी देशमुख यांनी केलेल्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाचा उल्लेख केला होता. त्यातूनही बालमने राष्ट्रीय विचारांशी जोडली जाऊ शकतात असे माझे मत होते.
अर्थात संघाने देखील याची कुठेतरी दखल घेतली असणारच याची मला खात्री आहे. त्यांचे या विषयावर नियोजन आणि अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली असू शकते. तसे झाले असेल तर त्यालाही फळे आलेली भविष्यात आपल्याला दिसतील. मात्र आज तरी तरुणाई आणि बालमने संघाकडे येण्याची संख्या जी कमी झाली आहे, त्यावर गांभीर्याने विचार व्हावा असे मला वाटते.
अर्थात हे माझे मत झाले....
आपले स्पष्ट आणि परखड मत आपण देखील मांडू शकता....
त्याचे स्वागतच आहे...
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment