आठवणींच्या हिंदोळ्यावर शहनवाज हुसेन आणि महाराष्ट्रीयन थालीपीठ

 आठवणींच्या हिंदोळ्यावर

शहनवाज हुसेन आणि महाराष्ट्रीयन थालीपीठ



आपण परप्रांतात जेव्हा जातो तेव्हा तिथल्या पदार्थांबद्दल आपल्याला उत्सुकता असते, तसेच अन्य प्रांतीयांना महाराष्ट्रातील विविध पदार्थांबद्दल काही वेळा उत्सुकता असते आणि आवडही असते. असाच एक अनुभव मला देखील आला. ज्यांना उत्सुकता निर्माण झाली होती ते मान्यवर होते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शहानवाज हुसेन आणि पदार्थ होता महाराष्ट्रातील थालीपीठे. 

ही घटना २००४ सालची आहे. त्यावेळी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या. प्रचार अगदी रंगात आला होता. नागपुरातील आणि विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर हे च्या संचेती परिवाराशी माझे स्नेहसंबंध आहेत. तिथले भाजप आमदार चैनसुख संचेती तसेच माजी राज्यसभा खासदार अजय संचेती या सर्वांची माझे मित्रत्वाचे संबंध आहेत. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत चैनसुख संचेती मलकापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होते. त्या दरम्यान एक दिवस मला अजय संचेतींचा फोन आला," पाठकजी चैनुभाऊंच्या प्रचारासाठी दिल्लीहून शहानवाज हुसेन येत आहेत. ते विमानाने नागपूरला येतील आणि मग आपल्या कारने मलकापूरला जाणार आहेत. त्यांच्यासोबत कोणीतरी जायला हवे. तर तुम्ही जावं असे वाटते. तुमच्या त्यांच्याशी गप्पा होतील आणि तुम्हाला तुमच्या न्युजपेपरसाठी त्यांची मुलाखत देखील घेता येईल. मला देखील हा प्रस्ताव आवडला. त्यामुळे मी तात्काळ होकार दिला. 

ठरल्याप्रमाणे त्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता संचेतींची कार माझ्याकडे पोहोचली. ती कार घेऊन मी हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉइंटला पोहोचलो. तिथे शहनवाजजी ज्या रूम मध्ये थांबले होते, तिथे जाऊन त्यांना माझी ओळख करून दिली. तसे त्याआधी देखील आम्ही तीन-चार वेळा पत्रकार परिषदांमध्ये भेटलेलो होतोच. शहनवाजजी तयारीतच होते. ते लगेच उठले आणि सामान घेऊन खाली कारकडे निघाले. 

कारमध्ये मी आणि शहानवाजजी असे दोघेच होतो. दोघेही मागच्या सीटवर गप्पा मारत बसलो होतो. कार वर्धा रोडने निघाली. आधी आम्हाला अकोला जिल्ह्यातील बाळापुर येथे जायचे होते. बाळापुर मतदार संघातून भाजपाचे नारायण गव्हाणकर निवडणूक लढवत होते. त्या मतदारसंघात देखील मुस्लिमबहुल वस्ती मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे तिथे शहनवाज हुसेन यांची जाहीर सभा ठेवली होती. ती सभा आटोपून मग आम्ही मलकापूरला पोहोचणार होतो. संध्याकाळी मलकापुरात दोन सभा होत्या. मलकापूरला देखील मुस्लिमबहुल वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तिथे दोन सभा ठरल्या होत्या.

कार जशी जशी पुढे जाऊ लागली, तशा तशा आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी पत्रकार आहे हे कळल्यावर शहानवाज हुसेन अधिकच खुश झाले. मग चालू राजकारणावर आमची चर्चा सुरू झाली. त्यावेळी भारतीय जनता पक्षाची केंद्रातील सत्ता जाऊन जेमतेम तीन-चार महिने झाले होते. मनमोहन सिंग यांचे सरकार सत्तेत होते, मग त्यावर आमच्या गप्पा सुरू झाल्या. शहानवाज हुसेन हे बोलून चालून मोकळे व्यक्तिमत्व असल्यामुळे मला देखील त्यांना बोलते करायला फारसा त्रास गेला नाही. 

त्यादिवशी सकाळी साडेआठला निघून आम्ही संध्याकाळी सहा पर्यंत मलकापूरला पोहोचणार होतो. मध्ये बाळापूरला पोहोचायला देखील तीन वाजणार होते. मी डायबिटीस पेशंट असल्यामुळे सकाळी माझी पत्नी अनुरूपाने थालीपीठं तयार करून दिली होती. सोबत एक दोघजण राहतील या अंदाजानेच तिने जास्तीची थालीपीठ दिली होती. सोबत एका डब्यात खोबरं मिरचीची चटणी देखील दिली होती. साडेनऊच्या सुमारास शहानवाजजी मला म्हणाले "पाठकजी आज फ्लाईट थोडा लेट हो गया, इसलिये सुबह जल्दी मे नाश्ता नही कर पाये. रास्ते मे ही काही रुकेंगे." त्यावर मी उत्तर दिले "मैने साथ मे नाश्ता लाया है, हम कार मे ही नाश्ता कर लेंगे." त्यावर ते लगेच उत्तरले, "क्या लाया है आपने" मग मी पिशवीतून सर्व साहित्य काढले आणि त्यांना दिले. मी सुद्धा खाऊ लागलो. मग त्यांनी हा पदार्थ कोणता आहे याची चौकशी केली. "दिल्ली के पराठे जैसा ये लगता है, पर थोडा कडक है," अशी कॉमेंटही त्यांनी केली.जेव्हा मी त्यांना हा महाराष्ट्रीयन पदार्थ असून याला थालीपीठ असे म्हणतात असे सांगितले, तेव्हा ते लगेच म्हणाले "पाठकजी येतो बहुत टेस्टी है, कैसा बनाते है?" मग मी त्यांना माझ्या ज्ञानानुसार हे कसे बनवले जाते त्याची रेसिपी सांगितली. त्यावर ते म्हणाले "अब एक बार नागपूर मे आ कंर भाभीजीसेही समझा लेना पडेगा. मुझे यह चीज बहुत पसंद आई है," त्यावर मी त्यांना पुढल्या भेटीत नागपुरातच घरी या म्हणून आमंत्रणही दिले. 

एव्हाना आम्ही वर्धेच्या पुढे सरकलो होतो. मग एका गावाबाहेर रस्त्यात एक टपरी पाहून तिथे आम्ही चहा घेतला. तिथेच एका हातगाडीवर सीताफळ विकायला होती. शहनवाजजींना सीताफळ खाण्याची इच्छा झाली. त्यांनी सिताफळ विकत घेतली. मग कारमध्ये रस्त्यात आम्ही सीताफळ खाता खात पुढे निघालो. 

"आधी पोटोबा मग विठोबा" या न्यायाने भरपेट नाश्ता झाल्यावर मी त्यांना माझ्या वर्तमानपत्रासाठी तुमचा इंटरव्यू हवा आहे असा प्रस्ताव दिला. त्यावर तत्काळ होकार देत "पूछईये पाठकजी, क्या आप पूछना चाहते है" मग मी त्यांना प्रश्न विचारत होतो आणि ते अगदी दिलखुलास उत्तरे देत होते. हे आटोपल्यावर मग पुन्हा आमच्या राजकीय गप्पा सुरू झाल्या. 

दुपारी साडेतीनच्या सुमाराला आम्ही बाळापूरला पोहोचलो. तिथे स्थानिक मंडळी आमच्या स्वागतासाठी उपस्थित होतीच. तिथे शहानवाज हुसेन यांची सभा झाली नंतर तिथेच नारायणरावांच्या घरी भोजन करून आम्ही मलकापूरच्या दिशेने निघालो. 

मलकापूरला पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे साडेसहा वाजत होते. मग तिथे पारपेट या मुस्लिमबहुल वस्तीत एक सभा झाली. तर एक सभा बाजार चौकातही झाली. दोन्ही सभांना प्रचंड गर्दी लोटली होती. त्यानंतर रात्री भोजनाच्या वेळी शहानवाजजींनी विचारले "पाठकजी मेरा इंटरव्यू कब पब्लिश होगा? वैसे मुझे कॉपी भेजना," त्यावर मी "हे इंटरव्यू मराठीत पब्लिश होतील" असे त्यांना सांगितले. "मराठी भी चलेगा, मै समझ लूंगा" असे त्यांनी आश्वस्त केले. मग लगेच म्हणाले "और पाठकजी अगले बार नागपूर आऊंगा, तो आपको जरूर कॉन्टॅक्ट करुंगा. भाभीजी से मिलकर ये आपका महाराष्ट्रीयन थालीपीठ फिरसे खाना है". 

मग रात्री मी त्यांचा निरोप घेतला. ते तिथून पुढे जळगावला जाणार होते, आणि दुसऱ्या दिवशी त्या परिसरात सभा घेऊन मग पुढे मुंबईला जाणार होते. मी मात्र तिथूनच रात्रीच्या सेवाग्राम एक्सप्रेस नागपूरला परतलो. दुसऱ्या दिवशीच मी त्यांची मुलाखत मी वार्तांकन करत असलेल्या सर्व वृत्तपत्रांना पाठवून दिली. ती प्रसिद्ध झाल्यावर त्यांच्या दिल्लीच्या पत्त्यावर अंक देखील पाठवले होते. त्यावर त्यांचे धन्यवादाचे पत्र देखील आले होते. 

त्यानंतर दोन-तीनदा नागपुरात आल्यावर ते भेटले. दरवेळी प्रेस कॉन्फरन्स मध्ये भेटले की ते चौकशी करायचे आणि आपके घर भाभी जी के हात का थालीपीठ खाने आना है असे आश्वासन द्यायचे. मी देखील त्यांना आग्रहाचे निमंत्रण द्यायचो. मात्र त्यांचे आश्वासन कधीच पूर्ण करता आले नाही. सहाजिकच आहे, राजकीय नेत्याच्या मागे धावपळ बरीच असते. त्यामुळे ते शक्य होतेच असे नाही 

मात्र राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या एका नेत्याने या महाराष्ट्रीयन पदार्थाबद्दल उत्सुकता दाखवावी आणि आठवण ठेवत दरवेळी विचारावे, याचे मला जास्त अप्रूप वाटत होते. एका राष्ट्रीय नेत्याबरोबर दिवसभर सोबत केलेल्या या प्रवासाची आठवण कायम माझ्या स्मरणात आहे. 

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.