कालचक्र चंद्रशेखर बावनकुळे वस्तुनिष्ठ चौकशी करणार काय?

 कालचक्र 

चंद्रशेखर बावनकुळे वस्तुनिष्ठ चौकशी करणार काय?

विधान परिषदेसाठी नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातून निवडून देण्याच्या एका जागेवर भारतीय जनता पक्षाचा पुन्हा लागोपाठ दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परवा या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे घोषित केले आहे. त्याचबरोबर आपण पराभव का आणि कसा झाला याची सखोल चौकशी करणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले आहेत, तर काल पक्षातूनच कोणीतरी ठरवून धोकेबाजी केली असल्याचेही शंका त्यांनी बोलून दाखवली आहे. 

कोणत्याही निवडणुकीचा निकाल लागला की त्या निकालाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि परीक्षण सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवार करत असतात. त्यामुळे बावनकुळे यांनी सखोल चौकशी करण्याचे संकेत दिले, त्यात नवे काहीही नाही. मात्र बरेचदा अशा चौकशीत मुळापर्यंत कोणीच जात नाही, आणि कोणालातरी बळीचा बकरा बनवण्यासाठी त्याच्यावर दोषारोप केला जातो, मग हा चौकशी अहवाल फाईल बंद केला जातो. तसेच इथे होणार आहे काय हा प्रश्न देखील नागपूर विभागातील भाजप समर्थक विचारत आहेत. 

महाराष्ट्राचे गठन झाले तेव्हापासून नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ हा आधी जुन्या जनसंघाकडे आणि मग भारतीय जनता पक्षाकडेच राहत होता. इथून पंडित  बच्छराज व्यास, गोविंदराव आठवले, रामजीवन चौधरी, गंगाधरराव फडणवीस, नितीन गडकरी, अनिल सोले असे सर्व भाजपाचे दिग्गज निवडून जात होते. त्यामुळे २०२० मध्ये हा मतदार संघ हातून गेला, ही बाब भाजपमध्ये काय किंवा बाहेरही काय सर्वांनाच खटकली होती. म्हणूनच यावेळी कसेही करून हा मतदार संघ राखायचाच अशा जिद्दीने भाजप नेते मैदानात उतरले असल्याचे दिसत होते. 

याबाबतीत भाजप गोटात आणि राजकीय विश्लेषकांमध्ये कानोसा घेतला असता इथे भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा उमेदवार निवडीपासूनच चूक केलेली आहे. इथे योग्य उमेदवार का निवडला गेला नाही, त्यासाठी जबाबदार कोण? कोणाच्या हट्टासाठी सुधाकर कोहळे यांनाच उमेदवारी दिली गेली? आणि कुणाच्या हट्टामुळे इतर उमेदवार लायक असूनही त्यांना उमेदवारी नाकारली गेली, याची खरी खरी चौकशी करून वास्तव लोकांसमोर आणणार का हा प्रश्न देखील राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील पदवीधर साठी दुसरा कोणीतरी चांगला चेहरा द्या असे सुचवले होते. याचाच अर्थ तुम्ही निवडलेला उमेदवार हा पदवीधर मतदारसंघासाठी लायक चेहरा नव्हता. मात्र स्थानिक नेत्यांनी त्यांचे ऐकले नाही असे बोलले जात आहे. याबाबत देखील नेमके वास्तव काय होते हे चौकशीतून पुढे येणार का हे देखील बावनकुळे यांनी स्पष्ट करायला हवे.

आपल्याकडे विद्यमान पद्धतीनुसार पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीच्या आधी मतदारांची नव्याने नोंदणी करावी लागते. सुमारे वर्षभरापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे चित्र दिसत असताना बावनकुळे यांनीच आपल्या कार्यकर्त्यांना प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात किमान हजार पदवीधर मतदार नोंदवावे, तरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवारी देताना तुमच्या नावाचा विचार करू असा दम भरला होता. मात्र अनेक ठिकाणी मतदार नोंदणीसाठी भाजपचे कार्यकर्ते पोहोचलेच नाहीत. आजही भाजपचे खात्रीलायक असलेले अनेक मतदार आमच्याकडे नाव नोंदणीसाठी कोणीच आले नाही, अशी खाजगीत तक्रार करतात. असे कसे झाले याचीही चौकशी बावनकुळे यांनी करायला हवी. 

पक्षाने दिलेल्या उमेदवाराला पदवीधर निवडणुकीत उभे राहण्यासाठी चेहरा नाही असा सल्ला अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी खाजगीत दिला होता. मात्र त्याला पक्षाकडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या. उमेदवार निवड करताना स्थानिक ज्येष्ठांना विश्वासातच घेतले नाही. परिणामी मग मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. ती बंडखोरी शमवण्यासाठी आधी प्रदेशाध्यक्ष आणि मग मुख्यमंत्र्यांना दारोदार फिरावे लागले. हे प्रकार टाळता आले नसते का? बंडखोरांनी अर्ज जरूर मागे घेतले. मात्र त्यांची नाराजी आजही संपलेली नाही. अशांवर कारवाई करणार की त्यांना पक्षात पुन्हा सक्रिय करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणार हे देखील बावनकुळेंनी सांगायला हवे. पक्ष विस्तार करायचा असेल तर तुम्हाला माणसं तोडता येत नाहीत, तर जोडावी लागतात, हे बावनकुळे यांना माहीत असावे अशी अपेक्षा आहे. 

सार्वत्रिक निवडणुकीत मतदाराला पक्षाचा उमेदवार आणि त्याचे चिन्ह इतके कळले की पुरेसे असते. पदवीधर मतदार संघात मात्र तसे नसते. इथे प्राथम्य क्रमाने मते द्यायची असतात. त्यातही थोडीही गडबड झाली तर तुमचे मत बाद ठरते. त्यासाठी मतदारांना प्रशिक्षित करणे देखील गरजेचे असते. मला आठवते पूर्वी भाजपासाठी संघाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांना तुम्ही पहिल्या क्रमांकावर कोणाचे नाव लिहा आणि दुसऱ्या क्रमांकावर कुठे खूण करा याच्या सविस्तर सूचना देत असत. मग पहिल्या फेरीत कोटा पूर्ण करता आला नाही, तर दुसरी फेरी कशी सांभाळता येईल याचेही नियोजन करायचे असते. वाचकांना आठवत असेल तर २०२२ मध्ये राज्यसभा आणि विधान परिषदेत झालेल्या निवडणुकीत तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी इथे काटेकोर नियोजन केले होते आणि सत्ताधाऱ्यांना धोबीपछाड दिली होती. यावेळी तसे कोणतेही नियोजन नव्हते असे लक्षात आले आहे. त्यामुळे मग पहिल्या फेरीत तुम्ही आघाडी घेतली पण दुसऱ्या फेरीत मात्र तुम्हाला अपशकून झाला हा टाळता आला नसता का? वस्तुतः काटेकोर नियोजन केले असते तर नागपूर विभागात भाजपाला पहिल्या फेरीतच कोटा पूर्ण करता आला असता. 

पदवीधर मतदार संघाची निवडणूक जिंकायची तर सेंटर पॉइंट, तुली इम्पिरियल, अशोका, रेडिसन ब्ल्यू अशा महागड्या हॉटेलमध्ये बैठका घेऊन ती जिंकता येत नाही. त्यासाठी आधीपासूनच जिथे मोठ्या प्रमाणात पदवीधर उपलब्ध आहेत अशा संघटनांशी आणि त्यांच्या प्रमुखांशी संवाद व्हायला हवा. भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, अधिवक्ता परिषद अशा तत्सम संघ परिवाराशी संबंधित संघटना तसेच वकील इंजिनियर बांधकाम व्यावसायिक फार्मासिस्ट अशांच्या संघटना यांच्याशी आधीपासून संवाद ठेवणे गरजेचे होते. ते ना उमेदवाराने केले ना पक्ष नेत्यांनी. फक्त महागड्या हॉटेलमध्ये बैठकी घेतल्या आणि आपण जिंकून येणार हा  खोटा विश्वास देत पक्षनेते फिरले. त्याचाच परिणाम म्हणून पक्षाचा हा पराभव झाला आहे असे सर्वच जाणकारांचे मत आहे.

काल माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी पक्षाला पक्षाचा उमेदवार पाडण्यासाठी कोणीतरी ठरवून धोकेबाजी केली असल्याची शंका व्यक्त केली आहे. झालेल्या मतदानात एकूण १५००० मते बाद ठरवली गेली. त्यातील ९००० मतांवर  सुधाकर कोहळे यांच्या नावासमोर दोन आकडा लिहिला आहे, तर बाकी मतपत्रिका कोरी आहे. हे कोणीतरी ठरवून घडवून आणले अशी बावनकुळे यांनी शंका व्यक्त केली आहे. त्यातील वास्तव नाकारता येणार नाही. मात्र असे प्रकार करण्याची वेळ ज्यांनी कोणी हे केले असेल त्यांच्यावर का आली याचेही आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. अन्यथा पक्ष शिस्तीच्या नावाखाली आणि आमच्या हट्टासाठी आम्ही कारवाई केली असे चित्र दिसेल, आणि चांगले कार्यकर्ते पक्षापासून दूर जातील हा धोका देखील लक्षात घ्यायला हवा. 

एकूणच बावनकुळे यांनी सखोल चौकशीचे संकेत दिले हे चांगले झाले. मात्र ती थातूरमातूर चौकशी नसावी तर वस्तुनिष्ठ चौकशी केली जावी आणि कोणताही मुद्दा प्रतिष्ठेचा न करता पक्षात आणि कार्यपद्धती सुधारणा केल्या जाणार आहेत का हा देखील खुलासा केला जायला हवा. तरच किमान २०३२ मध्ये तरी भाजप ही जागा परत मिळवू शकेल. त्यासाठी त्यांना आजपासूनच आमच्या शुभेच्छा आहेत. 

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.