पटतंय का बघा...! बंटीभाऊ तुमचे खरोखरी चुकलेच...

 पटतंय का बघा...!

बंटीभाऊ तुमचे खरोखरी चुकलेच...



भारतीय संस्कृतीत मामा आणि भाच्यांच्या नात्याला एक वेगळेच महत्त्व आहे. त्याला एक भावनिक पदर सुद्धा आहे. मामा हा केव्हाही भाच्यांच्या मदतीसाठी धावून जाणारा असतो असे म्हटले जाते. त्यामुळेच भारतीय संस्कृतीत मुला-मुलींच्या लग्नात वधू आणि वरांच्या मागे त्यांचे मामा उभे राहतात, अशी पद्धत आहे.

अर्थात कधीकधी एखाद्या श्रीकृष्णाला त्याचा कंसमामा भेटतोच. मात्र ही उदाहरणे अपवादात्मक असतात. एरवी भाच्याची सत्ता कायम राहावी यासाठी भूतांच्या खेळात शागल्ये करणारा शकुनीमामा देखील असतोच ना. काही वेळा भाच्यांमुळे मामांची पंचाईत होऊन जाते. मग अशावेळी त्या मामाची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी होते. मात्र अशावेळी त्या मामाने पहिले महत्त्व नात्याला द्यावे असेच जनसामान्यांना वाटते. 

हे नमनाला घडाभर तेल टाकण्याचे कारण असे की, नुकतीच पुणे पदवीधर मतदार संघातील विधान परिषदेची निवडणूक पार पडली. तिथे मामा एका पक्षाकडून होता तर त्याची भाची दुसऱ्या पक्षाकडून निवडणूक लढत होती. साधारणपणे मामा जसा लग्नात भाचीच्या पाठीशी उभा राहिला होता, आणि आयुष्यभर तुझ्या पाठीशी राहील असा शब्द देऊन गेला होता, तसाच इथे देखील भाचीच्या पाठीशी उभा राहील असे सर्वांना वाटत होते. मात्र या मामाने पहिल्याच दिवशी चक्क हात वर करून दिले आणि मी नात्याला नाही तर पक्षाला महत्त्व देणार, पक्षनिष्ठेला महत्त्व देणार असे सांगून टाकले. त्यामुळे भाजीची बिचारीची चांगलीच अडचण झाली.

तर या निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार होत्या डॉ. स्मिता जाधव आणि त्यांचे बहाद्दर मामा आहेत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आणि जे ज्येष्ठ काँग्रेसी नेते सतेज उपाख्य बंटी पाटील. या मामा भाचीमुळे ही निवडणूक जास्तच चर्चेत राहिली. 

वस्तूतः भाची निवडणुकीला उभी राहते आहे हे कळल्यावर मामाने तिला आशीर्वाद द्यायला हवा होता आणि तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे होते. आता इथे पक्षनिष्ठा आडवी येते असे बोलले गेले. मग तसे होते तर किमानपक्षी निवडणुकीपासून दूर तरी राहायचे होते. बंटीभाऊंनी तसेही केले नाही, तर ते काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात कंबर कसून उतरले. मात्र भाचीच्या प्रेम आणि जिव्हाळ्याचे काय झाले? त्याची तर तुम्ही पुरती वाट लावली बंटीभाऊ...

बंटीभाऊ पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील दिवंगत शिक्षण महर्षी आणि माझी राज्यपाल डॉ. डी वाय पाटील यांचे धाकटे चिरंजीव आहेत. ते सुरुवातीपासूनच राजकारणात सक्रिय राहिलेले आहेत, तर भाजप उमेदवार डॉ. स्मिता जाधव या डी वाय पाटील यांच्या मुलीची मुलगी, म्हणजेच बंटीभाऊंची भाची आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील आघाडीचे वृत्तपत्र दैनिक पुढारी आणि पुढारी न्युज चैनल चे मालक प्रतापसिंह जाधव यांच्या त्या स्नुषा आहेत, तर पुढारी समूहाचे प्रबंध संचालक योगेश जाधव यांच्या त्या पत्नी आहेत.

पुणे पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला. त्याच वेळी भारतीय जनता पक्षाने डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा देखील घटक पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसने देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच उमेदवाराला पाठिंबा देणे अपेक्षित होते. त्यानुसार बंटीभाऊ आता काय करणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. मात्र त्यांनी अगदी सुरुवातीलाच नातेसंबंध नंतर, प्रथम पक्षनिष्ठा असे जाहीर करून आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्याच श्रद्धा देशमुख जाधव यांच्या प्रचारात राहणार असे जाहीर केले, आणि तसाच त्यांनी प्रचार देखील केला, श्रद्धा जाधव यांच्या विजयात बंटी भाऊंचा थोडा का होईना पण हातभार लागला आहे. 

राजकारणात पक्षनिष्ठा हा फार घासून गुळगुळीत झालेला शब्द आहे. त्यामुळे तो आपल्या सोयीनुसार वापरता येतो. बंटीभाऊंनी देखील हा शब्द आपल्या सोयीनुसार वापरला आणि सख्ख्या भाचीला पाठिंबा द्यायचे नाकारले. आता त्यामागे फक्त पक्षनिष्ठा कारणीभूत आहे की विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद त्यांना खुणावते आहे, हे त्यांचे त्यांनाच माहीत! मात्र पक्षनिष्ठेचे कारण सांगून बंटी भाऊंनी भाचीला नाकारले. 

पक्षनिष्ठेवरून आठवले, याच बंटीभाऊ पाटलांनी २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या विरोधात करवीर मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती आणि त्या जागा वाटपात करवीरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली होती. त्यावेळी बंटीभाऊ काँग्रेसचे सदस्य तर होतेच, पण सक्रिय कार्यकर्ते देखील होते. मात्र त्यावेळी त्यांनी पक्षनिष्ठा खुंटीला टांगली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी दिग्विजय खानविलकरांचा पराभव केला आणि ते आमदार झाले. 

या निवडणुकीत काँग्रेस त्यांना उघडपणे पाठिंबा देणार नाही याची बंटी भाऊंना खात्री होती. त्यामुळे बंटीभाऊंनी त्या मतदारसंघात भाजपचा देखील पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता अशी खात्रीलायक माहिती आहे. त्यासाठी त्यांनी काही पत्रकारांना देखील हाताशी धरले होते, हे देखील बोलले गेले होते. आता भाजपाने त्यांना उघडपणे पाठिंबा दिला की आतून दिला याची नेमकी माहिती नाही. २००४ मध्ये जर अपघाताने का होईना पण शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले असते, तर बंटीभाऊ नक्कीच भाजप किंवा शिवसेनेसोबत गेले असते. त्यावेळी मग पक्षानेष्ठा आडवी आली नसती. आता हा प्रश्न डॉ. स्मिता जाधव यांनी आपल्या मामांना विचारायला हवा. मात्र त्यांनी वृत्तवाहिन्यांच्या मुलाखतीत मामाचे मोठेपण उघडपणे मान्य केले आहे. आता हा त्यांच्या मनाचा मोठेपणाच मानावा लागेल. 

राजकारणात अशा नात्यांचा गुंता बरेचदा बघायला मिळतो. मला आठवते १९७७ मध्ये काँग्रेस नेते बाबासाहेब धारफळकर यांचा मुलगा नरसिंहराव धारफळकर याने यवतमाळ मतदार संघातून काँग्रेस विरोधात तत्कालीन जनता पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. तिथे बाबासाहेबांची चांगली चडचण झाली होती. असाच प्रकार १९८४ मध्ये ग्वाल्हेरच्या शिंदे परिवाराबाबत देखील झाला होता. तिथल्या महाराणी विजयाराजे शिंदे या भारतीय जनता पक्षाच्या कट्टर नेत्या, त्या काही काळ खासदार देखील होत्या. त्या मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी निवडणूक लढवत होते. विजयाराजे अटलजींच्या प्रचारात पूर्णतः झोकून देत सहभागी झाल्या होत्या. त्याचवेळी त्यांचाच मुलगा माधवराव शिंदे याने चक्क काँग्रेसमध्ये घरठाव केला आणि अटलजींच्या विरोधात निवडणूक लढवली. त्याने चक्क अटलजींचा पराभव केला. त्यामुळे मायलेकरांमध्ये दीर्घकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते असे बोलले जाते. 

१९७८ मध्ये नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर मतदारसंघात काँग्रेसचे बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे निवडणुकीला उभे होते. त्यावेळी त्यांचाच पुतण्या चंद्रशेखर वानखेडे हा जनता पक्षाकडून उभा झाला होता. याच परिवारात पुढे १९९५ मध्ये शेषराव वानखेडे यांचे नातजावई म्हणजेच कुंदा विजयकरांचे जावई सुनील केदार यांनी काँग्रेस मधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी कुंदा विजयकरांची चांगलीच गोची झाली होती. पुढे १९९६ मध्ये कुंदाताई विजयकरांना काँग्रेसने नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यावेळी अपक्ष म्हणून निवडून आलेले सुनील केदार महाराष्ट्रातील युती सरकारमध्ये राज्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराचा प्रचार करणे अपेक्षित होते. मात्र इथे त्यांनी नातेसंबंधाला महत्त्व देत सासूबाईंचा प्रचार केला परिणामी त्यांना राज्यमंत्रीपद गमावावे लागले होते. २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत पवार कुटुंबात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष देखील महाराष्ट्राने बघितलेलाच आहे.

अशा गमतीजमती राजकारणात होत असतात. मात्र सामान्य माणसाच्या मते राजकारणापेक्षा नातेसंबंधांना जास्त महत्त्व दिले जायला हवे. त्यातही मामा भाचीचे नाते हे एक नाजूक नाते असते. तिथे बंटीभाऊंनी अशी पक्षनिष्ठा दाखवत आपल्या भाचीला एकाकी सोडायला नको होते असेच सर्वसामान्यांचे मत झालेले आहे. एकूणच काय, तर बंटीभाऊ तुमचे खरोखरी चुकलेच......

आता हे माझं मत झालं.....

 तुम्हाला पटतंय का ते बघा...

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.