अभारतीय आंदोलक ?:-विनोद देशमुख.

 अभारतीय आंदोलक ?

:--विनोद देशमुख नागपूर.

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या आपल्या भारताचा मतांच्या राजकारणापायी सत्यानाश झालेला आहे. त्यामुळे "कुणीही यावे अन् टपली मारून जावे" अशी आपली स्थिती आहे. चोरून घुसलेले परदेशी नागरिक या गोंधळाचा फायदा घेतच आहेत. पण, अधिकृतपणे आलेलेही गैरकृत्य करण्यास धजावत आहेत आणि वरून आपल्यालाच शहाणपण शिकवत आहेत की काय, असे वाटायला लागले आहे. याचे एक गंभीर उदाहरण म्हणजे अभिनेता इम्रान खानचे ताजे प्रकरण !

कोण हा इम्रान खान ? तर, आमीर खानचा भाचा आणि निर्माता-दिग्दर्शक नासिर हुसेनचा नातू. तो जन्माने अमेरिकी नागरिक आहे. पण त्याला ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (ओसीआय) म्हणजेच परदेशस्थ भारतीय नागरिक या दर्जामुळे भारतात राहण्याचा अधिकार प्राप्त आहे. त्यामुळे तो मुंबईत येतजात असतो. इम्रानचे वडील अनिल पाल हे बंगाली ॲंग्लोइंडियन आणि आई नुजहत खान नासिर हुसेन. वयाच्या पाचव्या वर्षी याने "कयामत से कयामत तक", तर नवव्या वर्षी "जो जिता वही सिकंदर" या चित्रपटांमध्ये बाल भूमिका केल्या. नंतर तो न्यूयॉर्क फिल्म ॲकेडमीत शिकायला गेला. तिकडे तो हिंदी सिनेमे काढतो. 

10 ऑक्टोबरला इम्रान अचानक चर्चेत आला. झुरळ पक्षाच्या दिल्ली आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत झालेल्या आंदोलनात तो सहभागी झाल्यासारखा दिसला. त्याचे व्हिडिओही प्रसारित झाले. सुरक्षा यंत्रणांनी याची नोंद घेतल्यानंतर पुढील कारवाईची सूत्रे हलली. मुंबईच्या फॉरेनर्स रीजनल रजिस्ट्रेशन ऑफिसने  इम्रानला नोटीस दिली- "ओसीआयमुळे नागरिकत्व आणि तद्नुषंगिक सर्व अधिकार मिळत नाहीत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण आंदोलन हे अधिकार फक्त भारतीय नागरिकालाच आहेत. असे असताना राजकीय कार्यात भाग घेऊन तुम्ही नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे येत्या 28 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही भारत सोडून जा !" यापाठोपाठ दुसरी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली की, तुमचा ओसीआय दर्जाच रद्द का केला जाऊ नये ?

दुसरा कोणता देश असता तर, या प्रकरणानंतर इम्रानचे चंबूगबाळे आवरून आतापर्यंत त्याला अमेरिकेत पाठवून दिले गेले असते. पण आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे त्याला न्यायालयाचे दरवाजे खुले आहेत. इम्रानने मुंबई हायकोर्टात याचिका करून या कारवाईला आव्हान दिले आहे. "माझे म्हणणे ऐकून न घेताच एकतर्फी नोटिसा बजावण्यात आल्या. एकूणच जनभावनेला खुश करण्यासाठी किंवा लोकांचा असंतोष दडपण्यासाठी मला बळीचा बकरा बनवून ही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे," असा पवित्रा इम्रानने घेतला आहे. आंदोलनात मी भाग घेतला नाही. कुटुंबासह जात असताना मार्गात नाना चौकाजवळ रस्ता  अडवलेला दिसला. म्हणून चौकशी केली. या भागात आंदोलन सुरू असल्याने मागे फिरण्याचा सल्ला पोलिसांनी दिल्यानंतर माझ्या वाहनाजवळ परत आलो, तेव्हा पत्रकारांनी गाठले. त्यांना एवढेच म्हणालो की, येथे जमलेल्या लोकांबद्दल मला चिंता वाटते ! पण मी आंदोलनात भाग घेतला नाही, अशी मखलाशीही इम्रानने याचिकेतून केली आहे.

व्हायरल व्हिडिओंमध्ये मात्र तसे दिसत नाही. पोलिस त्याला ताब्यात घेताना दिसतात. काही तासानंतर त्याला सोडून देण्यात आल्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या. पोलिस त्याला अडवत असतानाही त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते, असेही अनेकांचे म्हणणे आहे. इम्राननने आंदोलकांबद्दल सहानुभूतिदर्शक (चिंताही त्याचेच प्रतीक !) हावभाव केल्याचा, पाठिंबा व्यक्त करणारे बोलल्याचाही आरोप आहे. इम्रानवरील आरोप आणि त्याने केलेले प्रतिदावे यांची कसून चौकशी होण्याची गरज आहे. यासंदर्भात हायकोर्ट काय भूमिका घेते ते महत्त्वाचे ठरेल. आपल्या देशाचा नागरिक नसलेला कोणीही भारताच्या कोणत्याही व्यवहारात, भारतीय भूमीवरून हस्तक्षेप करण्याची हिंमत भविष्यात दाखवणार नाही, अशी काहीतरी ठोस व्यवस्था इम्रान प्रकरणातून पुढे येईल, अशी अपेक्षा करावी काय ?

✍️ विनोद देशमुख, नागपूर ✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.