घ्या समजून राजेहो मल्लिकार्जुन खर्गे यांचे दर्जाहीन वक्तव्य

 घ्या समजून राजेहो

मल्लिकार्जुन खर्गे यांचे दर्जाहीन वक्तव्य



काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील एक विधान सध्या प्रचंड वादग्रस्त ठरलेले आहे. त्यांच्या या विधानामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून ठिकठिकाणी खर्गे यांचे विरोधात आंदोलने सुरू आहेत, तर भाजपच्या सर्व राष्ट्रीय नेत्यांनी देखील खर्गे यांचा निषेध केला आहे. इतकेच काय पण खर्गे यांच्याच पक्षाचे एक ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील खरगेंच्या विधानाला असहमती दर्शवली आहे.

बिहारमध्ये एका सभेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे यांनी सध्याच्या विरोधी पक्षांच्या कार्यक्रमानुसार मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर ज्ञानेश कुमारच काय पण मोदींनाही जावे लागेल असा दावा त्यांनी केला. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका मोदीप्रेमी नागरिकाने कुठून "मोदी कही नही जायेगा" असा आवाज दिला. हे ऐकताच खरगे संताप्त झाले आणि "मोदीही क्या मोदी का बाप भी जायेंगा" असे वक्तव्य त्यांनी केले. त्याचवेळी सभेत उपस्थित असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्याने "मोदी कही नही जायेंगा" असे म्हणणाऱ्या नागरिकालाही चांगलेच झोडपून काढले हे सर्व दृश्य विविध वृत्तवाहिन्यांनी दाखवलेले आहे. या भाषणाची चित्रफित युट्युब वर आजही उपलब्ध आहे.

आपल्या आपल्या देशात लोकशाही व्यवस्था रूढ झालेली आहे. लोकशाही व्यवस्थेत सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही तेवढेच महत्त्व असते. त्याचवेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद जरूर असावेत पण मनभेद नसावेत असे तत्व मांडले जाते आणि बरेचदा पाळलेही गेलेले आहे. म्हणूनच विरोधकांनाही योग्य तो सन्मान देण्याची आपल्या लोकशाहीत पद्धत आहे. मात्र आज आम्ही राजकारण करताना सर्व सभ्यता आणि संस्कृतीचे संकेत विसरून एकेरीवर येत आहोत, ही खरोखरी चिंतेची बाब मानावी लागेल. 

आपल्या देशात राजकारणापलीकडे जाऊन व्यक्तिगत संबंध जपण्याची पद्धत जुन्या काळात सर्वच राजकारण्यांनी पाळली होती. काँग्रेसच्या काळात केंद्रीय मंत्री असणारे वसंत साठे यांना जेव्हा कळले की विरोधी पक्षात म्हणजे भाजपमध्ये खासदार म्हणून निवडून आलेल्या सुमित्रा महाजन या माहेरच्या साठे आहेत, त्यावेळी वसंत साठे यांनी सुमित्रा ही माझी बहीण आहे असे सांगून त्यांच्याशी व्यक्तिगत स्नेह संबंध प्रस्थापित केले होते. आज वसंतराव साठे नाहीत, मात्र सुमित्रा महाजनांनी आजही साठे परिवाराशी हे स्नेहबंध जपलेले आहेत. ही आठवण दस्तुरखुद्द सुमित्रा महाजन यांनीच मला सांगितलेली आहे.

राजकारण्यांचे असे व्यक्तिगत स्नेहबंध माझ्या गेल्या ५४ वर्षांच्या पत्रकारितेत मी अनेकांचे बघितले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रातील मंत्री शेषराव वानखेडे यांच्या पत्नी कुसुमताई वानखेडे यांचे तत्कालीन जनसंघाच्या नेत्या सुमतीबाई सुकळीकर यांच्याशी व्यक्तिगत मैत्रीचे संबंध होते. तिथे पक्षभेद अडवा येत नव्हता. कुसुमताई वानखेडे जाऊन बरीच वर्षे झालीत, मात्र नंतर त्यांची मुलगी नागपूरच्या माजी महापौर कुंदा विजयकर या सुमतीबाई सुकळीकर भेटल्यावर सुमतीमावशी म्हणूनच हाक मारायच्या. सुमतीबाई गेल्यानंतर त्यांचे स्मारक व्हावे म्हणूनही कुंदाताईंनी प्रयत्न केले आहेत. 

जुन्या काळात राजकारणातील सभ्यतेचा दर्जा कसा होता याचे एक उदाहरण मला इथे सांगावेसे वाटते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तर त्या काळात महाराष्ट्राच्या विधानसभेत ख्यातनाम पत्रकार आणि साहित्यिक प्रल्हाद केशव अत्रे हे विरोधी पक्षातील मुलुखमैदान तोफ म्हणून प्रसिद्ध होते. यशवंतराव चव्हाण हे निपुत्रिक होते. एका सभेत चव्हाण आणि अत्रे एका व्यासपीठावर असताना अत्रे यांनी आपल्या भाषणात चव्हाण यांच्या निपुत्रिक असण्यावर खोचक शब्दात मल्लिनाथी केली होती. ही ऐकूनही चव्हाण शांत राहिले. आपल्या भाषणात त्यांनी त्यावर काहीही भाष्य केले नाही. मात्र घरी गेल्यावर त्यांनी अत्रे यांना फोन केला आणि यशवंतराव आणि वेणूताई हे दाम्पत्य निपुत्रिक का आहे याचे कारण स्पष्ट केले. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेताना वेणुताई चव्हाण यांना तुरुंगवास झाला होता आणि तिथे झालेल्या मारहाणीत त्याची जननक्षमता बाधित झाली होती. त्यामुळे चव्हाण दांपत्य निपुत्रिक राहिले. हे कारण कळल्यावर अत्रेंना देखील आपली चूक लक्षात आली आणि लगेचच ते यशवंतरावांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले आणि तिथे त्यांनी यशवंतराव आणि वेणूताई या दांपत्याची हात जोडून माफी मागितली होती आणि यानंतर याबाबत मी कधीही असा उल्लेख करणार नाही हा शब्द देखील दिला. अत्रे यांनी तो शब्द शेवटपर्यंत पाळला देखील होता. ही आपल्या देशातील राजकारणाची जुनी संस्कृती होती.

मात्र आज आम्ही बघतो प्रत्येक राजकारणी विरोधात असलेल्या नेत्यावर पातळी सोडून टीका करायला मागेपुढे पाहत नाही. मग त्याचे परिणाम काय होतील याचा कधीही विचार केला जात नाही. महाराष्ट्रातीलच एक नेता दररोज सकाळी नऊ वाजता माध्यमांसमोर येऊन विरोधकांवर हवे तसे पातळी सोडून तोंडसुख घेत असतो. या प्रकाराला सकाळी नऊचा भोंगा म्हणूनच हिणवले जाते. हे बघता राजकारण खरोखरी सज्जन माणसांचे राहिले आहे का असा प्रश्न निर्माण होतो. इथे मला १९७८ च्या विधानसभा निवडणुकीतील एक प्रसंग आठवतो. त्यावेळी कळमेश्वर मतदार संघातून काँग्रेस मंत्रिमंडळातील मंत्री शेषराव वानखेडे काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे होते. त्या निवडणुकीत बरेच गोंधळ झाले होते. मतदानाच्या दिवशी आम्ही पत्रकार सरकारी जिपने कळमेश्वर मतदारसंघात फेरफटका मारत असताना अचानक वानखेडे यांची भेट झाली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना राजकारणातले गोंधळ आणि गुंडागर्दी याबाबत खंत व्यक्त करत असेच चालू राहिले तर पुढील दहा वर्षात कुणीही सज्जन माणूस निवडणुकीला उभा राहणार नाही आणि राजकारणात येण्याची हिंमतही करणार नाही असे विधान केले होते. त्यावेळी या विधानावर नंतर बरीच चर्चा झाली होती. मात्र १९७८ साली बॅरिस्टर वानखेडे यांनी केलेले हे विधान किती यथार्थ होते हे आज लक्षात येते. 

राजकारणात वैचारिक मतभेद जरूर असतात. काही वेळा आपल्या अस्तित्वासाठी मतभेद उकरून काढत राजकारणी नेत्यांना विरोधकांवर आग पाखड करावी लागते. त्यात वावगे काहीही नाही. मात्र हे करत असताना पातळी सोडली जाऊ नये हे अपेक्षित असते. आज मात्र सर्वांनीच पातळी सोडलेली दिसते आहे. त्यात तरुणाईने जर अशी पातळी सोडून विधाने केली तर पोट्टेशाही म्हणून दुर्लक्षही केले जाऊ शकते. मात्र खरगेंसारख्या वयोवृद्ध नेत्याने अशी पातळी सोडावी आणि प्रतिस्पर्ध्याचा बाप काढावा हे कुठेतरी दुखावणारेच नव्हे संताप जनकच ठरते. 

काँग्रेस पक्ष हा एका काळात संपूर्ण देशात आपले एकछत्री वर्चस्व ठेवून होता. बरीच वर्षे देशात त्यांची सत्ता राहिली. मात्र हळूहळू त्यांची लोकप्रियता घसरत गेली. २०१४ मध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भारतीय जनता पक्ष लोकसभेत सत्ता त्याला सत्तेत आला. त्यावेळी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळेल इतकेही खासदार निवडून आणता आले नव्हते. ही परिस्थिती २०१९ मध्येही कायम राहिली. नाही म्हणायला २०२४ मध्ये थोडी त्यांची परिस्थिती सुधारली. मात्र नंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा त्यांना पिछाडीवरच जावे लागले. त्यामुळे काँग्रेसमध्ये आज प्रचंड अस्वस्थता आहे. विशेष म्हणजे त्यांना सत्ताधाऱ्यांनी विरोधात आंदोलन करायला मुद्दे देखील सापडत नाहीत. परिणामी बरेच जुने काँग्रेसी नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. अशावेळी मग मतदार यादी पुनरीक्षणासारखा मुद्दा, जो की एरवी मुद्दा वाटू नये, असा मुद्दा उचलून धरत त्यांनी देशभर आंदोलन करण्यासाठी तयारी केली आहे. 

काँग्रेसने आंदोलन जरूर करावे, मात्र या आंदोलनात पातळी सोडली जाऊ नये इतकीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. आपण सभ्य सुसंस्कृत समाजात वावरणारे नागरिक आहोत. सभ्यतेच्या मर्यादा पाळून आपल्याला पुढे जायचे आहे. राजकारणात मतभेद असतात, ते असायलाही हवेत. मात्र त्याचवेळी कोणावरही व्यक्तिगत टीका केली जाऊ नये आणि व्यक्तिगत टीका केली तरी ती पातळी सोडून नसावी. कोणाचाही बाप जाहीररित्या काढला जाऊ नये. तर कोणाच्या आई बहिणी वरून विपरीत उल्लेख केले जाऊ नयेत. आम्ही आरक्षण मागतो तुमची बायको मागत नाही अशी विधाने केली जाऊ नयेत. इतकीच जनसामान्यांची अपेक्षा आहे. त्यातही खर्गेंसारख्या ज्येष्ठ नेत्याने अशी पातळी सोडू नये हे प्रत्येकालाच मनापासून वाटते. त्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांनी हे भान पाळायला हवे. 

तोपर्यंत तरी मल्लिकार्जुन खर्गे यांचे हे विधान असंस्कृत आणि दर्जाहीन म्हणूनच इतिहासात नोंदले जाणार आहे..

वाचकहो पटतय का तुम्हाला हे.....?

 त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो....

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.