झाडाझडती ✍️विनोद देशमुख , शतक आणि शंभरी !
झाडाझडती ✍️विनोद देशमुख
शतक आणि शंभरी !
2014 पासून दिल्लीत भाजपाचं राष्ट्रीय सरकार आलं आणि सलग तिसऱ्या कारकीर्दीत सत्तेत कायम आहे, हे पाहून भाजपाच्या राजकीय विरोधकांचा तिळपापड होणं स्वाभाविक आहे. किमान चौथ्या कारकीर्दीसाठी तरी हे सरकार येऊ नये (2029) यासाठी त्यांनी आतापासूनच प्रयत्न करणं हेही समजू शकतं. पण त्यासाठी हिंदुत्व आणि एकूणच हिंदू समाजावर आगपाखड करण्याची त्यांची वृत्ती मात्र त्यांचा खरा चेहरा उघडा पाडणारी आहे. हिंदुद्वेष हा या सर्वांचा एककलमी कार्यक्रम असल्याचं स्वच्छ दिसत आहे. भाजपाचा विरोध करताना हिंदुत्व आणि रा. स्व. संघ यांचा उल्लेख केल्याशिवाय त्यांचं एकही पाऊल पुढे पडत नाही. याचं एक ताजं उदाहरण पाहा-
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरुद्ध काक्रोच जनता पार्टीनं देशभरात आंदोलन सुरू केलं आहे. (भाजपाविरुद्ध हे असल्यानं सर्व विरोधी पक्षांना त्यात झक्कत सहभागी व्हावं लागत आहे, हा उलटा राजकीय प्रवास !) गोव्याची राजधानी पणजी येथे 11 ऑक्टोबरला या आंदोलनांतर्गत निदर्शने झाली. तीनेकशे निदर्शकांनी फलके झळकवली, नारेबाजी केली. यातील एक घोषणा होती- "मुर्दाबाद मुर्दाबाद, हिंदुत्व मुर्दाबाद". (ही डाव्यांची स्टाईल- लाल सलाम, लाल सलाम असं दोनदा म्हणतात ते !) गोव्याच्या पोलिसांनी या घोषणेची गंभीर दखल घेत 300 अज्ञात आंदोलकांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. धार्मिक भावना भडकवून समाजासमाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा हेतुपुरस्सर प्रयत्न असल्याचा आरोप या लोकांवर ठेवण्यात आला आहे. राज्यातील सामाजिक शांतता भंग करणारे असे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, या शब्दात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आंदोलकांना ठणकावले आहे. हिंदुत्वाला ओढूनताणून आंदोलनात ओढणाऱ्या या लोकांना चांगला धडा शिकवणारी शिक्षा होते का, ते भविष्यात दिसेलच.
तमिळनाडूत तर रा. स्व. संघाला अडवण्याचे प्रयत्न सरकारी स्तरावरच सुरू आहेत. विजयादशमी उत्सवानिमित्त राज्यात सव्वाशेवर पथसंचलनं काढण्याची परवानगी संघानं रीतसर मागितली असता राज्य सरकारनं वारंवार नकार दिला. या निर्णयावरून मद्रास हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं आणि संघाला 128 पथसंचलनं काढू द्यावी, असा आदेश दिला. पथसंचलनं रोकण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला, अशा कडक शब्दात कानउघाडणी करून न्यायालयानं सरकारला बजावलं- "स्वत:च्या जबाबदारीपासून पळ काढू नका ! सुरक्षेच्या योग्य त्या उपाययोजना करा. कारण, पथसंचलनं काढण्याचा संघ स्वयंसेवकांना अधिकार आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही."
बिचारं तमिळनाडू सरकार या आदेशाचं पालन करण्याच्या तयारीला लागलं. हे पाहून माकप या डाव्या पक्षानं विरोधाचा लाल झेंडा फडकवला ! "राज्य सरकारनं हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊन संघाची पथसंचलनं रोकण्याचा प्रयत्न केला पाहिजे", अशी मागणी करून प्रदेश माकपनं संघाच्या मार्गात खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय 'थलपती' यांचं सरकार यावर काय ठरवतं, हे लवकरच कळेल. कारण, पथसंचलनाच्या नियोजित तारखा आहेत 25 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर.
डाव्यांची मला नेहमीच गंमत वाटत आली आहे. संघ आणि भारतातील डावे पक्ष या दोघांचाही जन्म 1925 चा. त्यामुळे दोघांचंही आजचं वय आहे 101 वर्षे ! या वयात संघानं जागतिक झेप घेतली आहे आणि डावे बिचारे जर्जर होऊन पडले आहेत. भारतासह संपूर्ण जगातच ते संपण्याच्या उंबरठ्यावर आहेत. केरळ राज्य कसंबसं हातात होतं, तेही गेलं आणि माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन स्वत:च भ्रष्टाचाराच्या प्रकरणात फसले आहेत. अशा अडचणीत सापडलेल्या माकपला प्रकाशात येण्याची आणि विरोधकांची सहानुभूती मिळवण्याची संधीच जणू संघाच्या पथसंचलनानं दिली. हायकोर्टाच्या निर्णयावर थलपतीला, न मागता, सल्ला देऊन माकपवाले मोकळे झाले. याच जोसेफ विजयनं त्याच्या विजयी मिरवणुकीत येशू ख्रिस्तांचा फोटो झळकवला होता, तेव्हा ते बहुदा अ'धर्माची अफूची गोळी' घेऊन झोपी गेले होते ! संघाचं नाव आलं रे आलं की आपला चिरका आवाज काढायचा आणि हिंदुद्वेषाचं प्रदर्शन करायचं, हे मात्र त्यांना चांगलं जमतं. जनतेनं संपवत आणलं तरी त्यांचं वाकडं शेपूट काही सरळ होत नाही ! म्हणूनच असेल कदाचित, त्यांची शंभरी भरली. याउलट, संघानं मात्र शतक उत्साहात साजरं केलं. हा काळाचा न्याय तर नव्हे ?
✍️ विनोद देशमुख, नागपूर ✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment