मतपत्रिकेतही काँग्रेसची फजिती : लावला एक दिवा !
मतपत्रिकेतही काँग्रेसची
फजिती : लावला एक दिवा !
EVM fraud है... हिंमत है तो बॅलट पेपर फिरसे चालू करो... असं आव्हान वेळोवेळी सत्ताधारी भाजपाला देणाऱ्या कॉंग्रेसची मतपत्रिकेवरील विधान परिषद निवडणुकीतही दयनीय स्थिती झाली. 28 जागांमधील फक्त एक जागा (3.57 टक्के यश !) त्यांना कशीबशी मिळाली. देशाच्या मुख्य विरोधी पक्षाची लाज राखण्याचं हे कामही संघ मुख्यालय असलेल्या नागपूरनं केलं. खरं तर, अभिजित वंजारी यांनी लागोपाठ दुसऱ्यांदा हे करून दाखवून पक्षाला वाचवल्याबद्दल त्यांना कॉंग्रेसनं डोक्यावर घ्यायला पाहिजे. ते राहिलं बाजूला, काँग्रेसची नेतेमंडळी संघविरोधी टेंभा मिरवण्यातच मश्गुल आहे आणि वर समूह माध्यमांवर आपल्या प्रचारकांकडून विचारतही आहेत-
"पंतप्रधान नरेन्द्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, भाजपाध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघांमध्ये भाजपाचा पराभव झाला, हे गोदी मीडिया लोकांना सांगत आहे का ?" अरे लेकहो, तुमच्या बुडाखाली काय अंगार लागली आहे ती आधी पाहा ना ! प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात झालेल्या पराभवानंतरही २८ मध्ये भाजपाचे १३ उमेदवार (४६.४२ टक्के यश) आणि रालोआचे १६ निवडून आले. मुख्य म्हणजे, कर्नाटकात तुमची सत्ता असतानाही चारही जागा जिंकून रालोआनं तुमचं नाक करवतीनं कापलं ! नुसतं मोदी आणि गोदी करून काय उपयोग ? लोक सातत्यानं तुम्हाला ईव्हीएमवर आणि मतपत्रिकेवरही नाकारत आहेत. मतदानाच्या बाजारात तुमची पतच राहिलेली नाही. गोदी... गोदी... म्हटल्यानं ती परत येणार आहे का ? मोदींना घालवण्याची तुम्हाला घाई झाली आहे. पण, लोकं म्हणताहेत- काँग्रेस आता पर्याय होऊच शकत नाही. राहुल गांधी पंतप्रधान होणं तर दूरच राहिलं ! काँग्रेस पक्षानं यातून योग्य धडा घेऊन स्वत:ला सुधारलं पाहिजे.
या निवडणुकीनं भाजपालाही धडा दिला आहे. पंतप्रधान ते मुख्यमंत्री यांच्या मतदारसंघांमध्ये पक्षाचे उमेदवार पराभूत होत असतील तर मग... जरूर कुछ गडबड है ! अन् नागपुरात तर गडबड हैच है ! दोन दिग्गज नेत्यांच्या गावात भाजपा दुसऱ्यांदा हारतो, हे समर्थकांना पचलेलं नाही. उमेदवाराची निवड चुकली, पक्षात असंतोष, नियोजनात दोष अशी काही कारणं पुढे आली आहेत. बाद ठरलेल्या मतांमधील काही हजार मतपत्रिकांवर भाजपा उमेदवार कोहळे यांना एकट्यालाच दुसरी पसंती कशी ? या मतदारांनी एखाद्या चिल्लर उमेदवारालाही 1 नंबर दिला असता तरी सेकंड प्रिफरन्समध्ये कोहळे निवडून आले असते ना ! हे अवैध मतदान जाणूनबुजून केलं गेलं का ? भाजपानं शोध घ्यावा. दुसरं म्हणजे, मविआ बंडखोर कराळे मास्तरांची दुसऱ्या पसंतीची जास्तीत जास्त मतं वंजारींना मिळणं अत्यंत मोलाचं ठरलं. हा कुशल नियोजनाचा भाग की सत्ताधारी कमी पडल्याचं लक्षण ? या दोनच मुद्यांनी निवडणूक निकाल अखेरच्या क्षणी फिरवला, यावर सर्वांचं एकमत आहे.
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक या चार मोठ्या राज्यांमधील या निवडणुकीनं एकीकडे कॉंग्रेसला जबर धक्का दिला आणि दुसरीकडे भाजपा-रालोआलाही इशारा दिला आहे, हे विसरून चालणार नाही. यातून हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष काही शिकतात का, ते पुढील वर्षीच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पाहायचं. तो मोठा रणसंग्राम राहणार आहे. कारण, समाजवादी पार्टीनं यावेळी भाजपाखालोखाल ५ जागा जिंकून शंखनाद केला आहे.
✍️ विनोद देशमुख, नागपूर ✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment