कालचक्र फारुख अब्दुल्लांचे देशद्रोही विधान गांभीर्यानेच घ्यायला हवे..
कालचक्र
फारुख अब्दुल्लांचे देशद्रोही विधान गांभीर्यानेच घ्यायला हवे..
काश्मीरचा शेजारी पाकिस्तान ठिकठिकाणी जाऊन काश्मिरी नागरिकांचा आवाज उठवत आहे, त्यामुळेच जम्मू-काश्मीरातील लोकांचे जीव वाचत आहेत, आपल्या काश्मिरी नागरिकांबाबत भारताचा हेतू योग्य नाही, असा दावा करत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष तथा जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी नवा वाद उभा केला आहे. बारामुल्ला येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाषण करताना त्यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. सहाजिकच त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी भाजपसह विविध भारतप्रेमी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
काश्मीर हा भारताचा भाग नसून तो पाकिस्तानचाच भाग आहे असे मानणारा एक फार मोठा वर्ग पाकिस्तानात आजही अस्तित्वात आहे. फारूक अब्दुल्ला हे याच मंडळींचे नेतृत्व करणारे नेते आहेत. फारूक अब्दुल्लाच काय पण त्यांचे वडील शेख अब्दुल्ला किंवा त्यांचे चिरंजीव ओमर अब्दुल्ला हे देखील याच भूमिकेचा पाठपुरावा करत असतात. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळून आता ८०वर्षे व्हायला आली आहेत, मात्र काश्मिरातील काही वर्ग अजूनही भावनिकदृष्ट्या भारताशी जुळलेला नाही हे वास्तव नाकारता येत नाही.
इंग्रजांच्या गुलामीत भारत गेला, तेव्हा देशात वेगवेगळी संस्थाने होती. इंग्रजांनी सर्व संस्थाने खालसा करत आपले साम्राज्य वसवले होते. ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी काश्मीर मधला एक वर्ग पाकिस्तानात जाण्यास उत्सुक होता. तसेच पाकिस्तानला सुद्धा काश्मीर आपल्या ताब्यातच हवा होता. मात्र त्यावेळी काश्मीरमध्ये असलेल्या हिंदू राजांनी आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ऑगस्ट १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि महिनाभरातच पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला. त्यावेळी तिथल्या राजांनी भारताकडे मदत मागितली. भारताने काश्मीर भारतात सहभागी होणार असेल तर आम्ही मदत करू या अटीवर मदत करत आपले सैन्य पाठवले आणि पाकिस्तानी सैन्य पिटाळून लावले. मात्र तोवर पाकिस्तानने काश्मीरचा काही भाग गिळंकृत केला होताच, तोच भाग आज पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो. वस्तूतः त्याच वेळी भारताने हा भूभाग परत घ्यायला हवा होता. मात्र तत्कालीन सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे ते शक्य झाले नाही. इतकेच काय पण संयुक्त राष्ट्र संघात देखील भारताची भूमिका ही कुठेतरी चुकीची राहिली. त्यामुळे आजही हा भाग पाकिस्तानच्याच ताब्यात आहे. आजही तिथे पाकिस्तानी सैन्य आणि स्थानिक नागरिक यांच्यात संघर्ष आहे आणि तिथे फार मोठा वर्ग भारतात परत येण्यास उत्सुक आहे.
काश्मीर भारतात सहभागी झाले, मात्र आम्हाला स्वतंत्र दर्जा हवा अशी मागणी तिथल्या काही मुस्लिम नेत्यांनी केली. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या मुस्लिमधार्जिण्या धोरणामुळे ती मागणी मान्य झाली आणि घटनेतील कलम ३७० अन्वये जम्मू आणि काश्मीरला वेगळा दर्जा देण्यात आला होता. त्यामुळे तिथे जरी जम्मू काश्मीर भारताचा भाग असला तरी त्यांची स्वतंत्र घटना होती. वेगळा झेंडा होता. जसा भारताचा पंतप्रधान होता तसा जम्मू-काश्मीरचा मुख्यमंत्री सुद्धा पंतप्रधान म्हणवला जात असे.
याच काळात तिथे मुस्लिमांचे प्राबल्य वाढत होते. त्यांनी काश्मिरी हिंदूंवर अत्याचार करत काश्मिरी पंडितांना तिथून अक्षरशः हुसकावून लावले होते. कलम ३७० अन्वये वेगळा दर्जा असल्यामुळे देशातील अन्य भागातील कोणीही नागरिकांना काश्मीरमध्ये भूभाग खरिदाणे शक्य होत नव्हते. इतरही बऱ्याच अडचणी होत्या. त्यामुळे जुना जनसंघ आणि आजचा भारतीय जनता पक्ष कायम कलम ३७० रद्द करावे आणि काश्मीरचा वेगळा दर्जा रद्द करावा ही मागणी करत होता. त्यासाठी आंदोलन करत जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरच्या तुरुंगातच आपला देह ठेवला होता, तर १९९२ मध्ये तत्कालीन भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी तिरंगा यात्रा काढत काश्मीरातील श्रीनगरच्या लाल चौकात जाऊन तिरंगा फडकवला होता.
ज्याप्रमाणे काश्मीर मधली काही मुस्लिम नेते काश्मीर हा भारताचा भाग नाहीच तर पाकिस्तानचा भाग आहे असा दावा करत होते, तसाच दावा पाकिस्तानचे सत्ताधारी देखील आजही करत आहेत. मात्र भारताने त्यांना कधीच दाद दिली नाही. त्यामुळे काश्मीरमधल्या सरकारच्या मदतीने काश्मीरमध्ये आणि भारतात इतर अन्यत्र ठिकाणी दहशतवादी कृत्ये घडवून आणण्यात पाकिस्तान सरकार आणि तिथले धर्मांध मुस्लिम आघाडीवर होते. परिणामी काश्मीर हे पृथ्वीवरील नंदनवन न राहता तिथे मृत्यूचे तांडव बघायला मिळत होते.
२०१४मध्ये देशात भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. त्यानंतर भाजपने हळूहळू काश्मीरमध्ये शिरगाव कसा करता येईल हा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी अल्पमतात आलेल्या नॅशनल कॉन्फरन्स ला मदत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सोबत सरकार बनवले आणि काश्मीरच्या प्रशासकीय यंत्रणेचा पूर्ण अभ्यास केला. त्यानंतर २०१९ मध्ये भाजपने केंद्रात विधेयक पारित करत घटनादुरुस्ती केली आणि ३७०तसेच ३५ अ ही कलमे रद्दबातल ठरवत जम्मू अशी आणि काश्मीरचे विभाजन केले, तसेच!¡तिथे राष्ट्रपती राजवट लावत आपली हुकूमत चालू केली. मग हळूहळू तिथले वातावरण निवळेल कसे हा प्रयत्न करून मग तिथे निवडणुका घेतल्या. आजही जम्मू आणि काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे तिथे गृह खाते केंद्राच्या तयारीत आहे. मात्र अजूनही नॅशनल कॉन्फरन्स वर्चस्व असल्यामुळे सत्ता त्यांच्या हातात गेली आहे. फारूक अब्दुल्ला यांचे चिरंजीव ओमर अब्दुल्ला हेच आता मुख्यमंत्री आहेत. असे असले तरी केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे त्यांना आता जास्त गडबड करता येत नाही.
तरीही अब्दुल्ला परिवाराची पाकिस्तानप्रेमाची खूमखूमी अजूनही जात नाही. त्यामुळेच फारूक अब्दुल्ला अशी भारतद्रोही बेताल वक्तव्ये करीत आहेत. बारामुल्ला येथे आपल्या भाषणात भारत सरकारकडून काश्मिरी जनतेने न्यायाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे, असे विधान करत शेजारी पाकिस्तान काश्मिरी नागरिकांसाठी झटत आहे, म्हणूनच काश्मीरमधील लोकांचे जीव वाचले आहेत असे विधान केले आहे. काश्मिरी नागरिकांनी लढा देण्याचे धाडस दाखवावे आणि भारताविरुद्ध उभे राहावे, अन्यथा आपली ओळख पूर्णतः पुसली जाईल असाही दावा त्यांनी केला. जागतिक दबावामुळे केंद्र सरकार सध्या गप्प आहे, काश्मीरचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, हा मुद्दा आमचा शेजारी देश जगभरात मांडतो आहे. आज काश्मीरात मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात आहे. त्यामुळेच देशातील मुस्लिम समाजाने एकत्र यावे ही काळाची गरज आहे असेही अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
फारुख अब्दुल्ला यांची ही विधाने देशद्रोहीच म्हणता येतील. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे तो तोडून पाकिस्तानला जोडण्याचा फारूक अब्दुल्लांचा प्रयत्न दिसतो आहे, किंवा मग भारतापासून वेगळे होत काश्मीरचे स्वतंत्र साम्राज्य त्यांना हवे आहे. मात्र अशी देशद्रोही विधाने या देशातील देशप्रेमी नागरिकांनी चालवून घ्यायची का आणि काश्मीरला भारतापासून तोडण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ द्यायचा का हा देखील विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने तत्काळ पावले उचलत फारुख अब्दुल्ला यांच्यावर कठोर कारवाई करावी, त्याचप्रमाणे त्यांच्या भोवती जमलेली पिलावळ आहे तिचाही तत्काळ बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने पावले उचलावी. आजची गरज आहे हे निश्चित
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment