माझंही मत काँग्रेसच्या रामलीला मैदानावरील रॅलीने नवे मुद्दे उपस्थित होणार..

 माझंही मत

काँग्रेसच्या रामलीला मैदानावरील रॅलीने नवे मुद्दे उपस्थित होणार..

१ नोव्हेंबर २०२६ रोजी काँग्रेस पक्षाने दिल्लीतील रामलीला मैदानावर व्होट बचाओ, देश बचाओ रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीला दिल्लीतील रामलीला मैदान परिसरातील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. ही रॅली दिवाळीनंतर घेण्यात यावी अशी विनंती व्यापाऱ्यांनी केली आहे. याला कारण म्हणजे रॅली झाल्यास त्या दिवशी त्या भागातील वाहतूक पूर्णतः विस्कळीत होईल, दिवाळीचा मोसम असल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात येतात, त्यांना दुकानात येण्यास अडचण होईल आणि परिणामी व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, असा व्यापाऱ्यांचा दावा आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक दिवस जर व्यापार बंद राहिला तर त्या काळात दहा हजार कोटीची उलाढाल थंडावेल. त्यामुळेच व्यापाऱ्यांचा रॅलीला विरोध आहे.

मात्र लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी १ नोव्हेंबरलाच रॅली घेण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता नवा संघर्ष उपस्थित होईल काय असे चित्र दिसत आहे. सध्या काँग्रेस पक्षाचे निवडणूक आयोगाविरुद्ध दंड थोपटले आहेत. त्यांच्या मते देशात जी मतदार यादी पुनरिक्षण मोहीम चालवली आहे ती अनाठायी आहे. त्यामुळे ती थांबवली जावी अशी काँग्रेसची मागणी आहे. त्याचबरोबर ज्या मतदारांची नावे आतापर्यंत वगळली, ती देखील पुन्हा घेण्यात यावी असा काँग्रेसचा आग्रह आहे. याशिवाय नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतांची हेराफेरी केली गेली, त्यासाठी ईव्हीएम मशीन हॅक केल्या गेल्या, त्यामुळे ईव्हीएम मशीन रद्द केल्या जाव्या आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे ही देखील काँग्रेसची मागणी आहे. 

काँग्रेसच्या या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांचे देशभरात आंदोलन सुरू आहे. अर्थात त्याला प्रतिसाद किती मिळाला हा प्रश्न वेगळा आहे, पण काँग्रेस ते आंदोलन पुढे रेटते आहे. मध्यंतरी दिल्लीत याच मागणीसाठी आधी काँग्रेसचे, मग सीजेपी चे आंदोलन झाले होते. या आंदोलनामुळे जंतर-मंतर वरील व्यापाऱ्यांची देखील चांगलीच गोची झाली होती. त्यामुळे त्या व्यापाऱ्यांनी देखील तिथे आंदोलन करण्याला विरोध दर्शवला होता. आता रामलीला मैदानातील व्यापारी देखील विरोध करीत आहेत. यातून आता काय निष्पन्न होणार हे लवकरच कळेल. 

सध्याचे हे मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेविरुद्ध काँग्रेसचे सुरू असलेले आंदोलन हे त्यांच्या अस्तित्वासाठी सुरू आहे हे उघडे गुपित आहे. एका काळात देशात बहुसंख्या राज्यांवर आणि केंद्रात देखील निरंकुश सत्ता राबवता येत असलेल्या काँग्रेसला गेल्या बारा वर्षापासून केंद्रात विरोधी पक्षात बसावे लागले आहे. त्यातील पहिली दहा वर्षे तर त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदही नव्हते. यावेळी ते अपघातानेच मिळाले. मात्र नंतरच्या विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवालाच सामोरे जावे लागले. त्यामुळे आपला जनाधार संपलेला आहे हे त्यांच्या लक्षात आले आहे. सध्या जनसामान्यांच्या हिताचे विषय घेऊन आंदोलन करायचे म्हटले तर त्यांच्याजवळ कोणतेही विषय राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी आता हा मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेला विरोध करण्याचा कार्यक्रम हातात घेतला आहे. लोकशाहीत आंदोलन करण्याचा कोणालाही अधिकार आहे. तो नाकारलेला नाही. मात्र त्यासाठी इतरांना वेठीला धरण्याचा तुम्हाला अधिकार आहे का हा देखील प्रश्न उपस्थित होतो. ऐन दिवाळीच्या तोंडावर तुम्ही आंदोलन करता आणि त्या परिसरातील व्यापाऱ्यांचे नुकसान करता. जर तुम्ही त्यांचा कोणताही फायदा करणार नसाल, तर किमान नुकसान तरी करू नये याचे भान तुम्ही ठेवायला हवे. तेही तुम्ही ठेवणार नसाल तर उद्या हे व्यापारी आणि त्या दिवशी खरेदीला मुकलेले ग्राहक तुमच्याबद्दल काय भावना ठेवतील याचाही तुम्ही विचार करायला हवा. मात्र राहुल गांधी रॅली आयोजित करण्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता कशी परिस्थिती निर्माण होईल हे सांगणे कठीण आहे. 

१ नोव्हेंबर हा शीख हत्याविरोधी दिवस आहे. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येचा आरोप असलेले त्यांच्याच सुरक्षा पथकातील दोन शिपाई हे शीख होते. त्यांनी इंदिरा गांधींनी सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवल्याच्या रागावरून इंदिरा गांधींवर स्टेनगनने गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्त्येने देशभरातील इंदिरा गांधी समर्थक संतप्त झाले होते आणि १ नोव्हेंबर रोजी त्यांनी देशभरात शिखांवर हल्ले करून त्यांची मालमत्ता तर जाळलीच, पण अनेक शिखांच्याही हत्या केल्या होत्या. या प्रकरणात तत्कालीन काँग्रेस नेते हरिकिशनलाल भगत यांच्यासह अनेक मोठे नेते सहभागी झाले होते. त्यांच्यावर नंतर अनेक वर्ष खटले चालले आणि त्यातील काहीजण दोषी देखील ठरवले गेले होते. आज या घटनेला ४२ वर्ष पूर्ण होत असले, तरी देशातील शिखांच्या विशेषतः दिल्ली आणि पंजाब मधील शिखांच्या मनावरील जखमा अजूनही ताज्या आहेत. 

हाच मुद्दा उचलून धरत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने शिखांच्या मनावरील जखमांवर मीठ चोळण्यासाठीच राहुल गांधी १ नोव्हेंबर रोजी ही रॅली आयोजित करत असल्याचा आरोप केला आहे. भाजपाचे एक प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी काल पत्र परिषद घेऊन हा आरोप  केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात अधिकच खळबळ माजली आहे. दिल्लीला रामलीला मैदानात शीख व्यापारी मोठ्या प्रमाणात आहेत. तसा दिल्ली शहरातच व्यवसायात पंजाबी समाज मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. त्यामुळे १ नोव्हेंबर रोजीच जर ही रॅली होणार असेल आणि राहुल गांधी या रॅलीला संबोधित करणार असतील तर शीख समाज नाराज होईल ही शक्यता देखील नाकारता येत नाही. 

१ नोव्हेंबर रोजी शिखांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी म्हणूनच काँग्रेसने एक नोव्हेंबर हा दिवस निवडला असा थेट आरोप करता येणार नसला तरीही त्या दिवशी रॅली घेतल्यामुळे शिखांच्या भावना दुखावतील हा मुद्दा देखील नाकारता येत नाही. दुसरे असे की एक दिवस दिल्लीत रॅली घेतल्यामुळे निवडणूक आयोग मतदार यादी पुनरिक्षण मोहीम लगेच  थांबवेल असेही नाही. आतापर्यंत काँग्रेसने या मुद्द्यावर बरीच आंदोलने केली आहेत. मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. अशावेळी फक्त आपले अस्तित्व दाखवण्यासाठी हे आंदोलन करताना एखाद्या समाजाला आणि त्या माध्यमातून व्यापाऱ्यांना दुखावण्यात कोणताही शहाणपणा नाही. हे आंदोलन १ नोव्हेंबरला न घेता ११नोव्हेंबर नंतर कधीही घ्या असे व्यापाऱ्यांनी सुचवले आहे. नंतर आंदोलन झाले तर व्यापाऱ्यांची ही विनंती मान्य केली जाईल आणि शिखांच्याही भावना जपल्या जातील. मात्र राहुल गांधी ऐकायला तयार नाहीत असे वृत्त सर्व प्रसिद्धी माध्यमे दाखवत आहेत. त्यामुळे यात आता नेमके पुढे काय वाद निर्माण होतील आणि त्यातून कशी परिस्थिती निर्माण होईल याचे उत्तर १ नोव्हेंबर नंतरच मिळणार आहे. मात्र माझ्या मते आपले राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी अजाणता का होईना पण देशातील एका मोठ्या समाजाला आणि देशभरातील व्यापाऱ्यांना दुखावण्याचे धाडस करू नये ते त्यांच्या हिताचे ठरणार नाही. त्यांनी आंदोलन पुढे ढकलून ११ नोव्हेंबरनंतर ते आयोजित करावे. तेच हितावह ठरेल.

अर्थात हे माझं मत झालं......

 तुमचं स्पष्ट आणि परखड मत तुम्ही देखील मांडू शकता.....

 त्याचे स्वागतच होईल...


✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.