सहज सुचलं म्हणून... बहुमजली इमारतींमधील सुरक्षारक्षकांना घरगडी का बनवता?

 सहज सुचलं म्हणून...

बहुमजली इमारतींमधील सुरक्षारक्षकांना घरगडी का बनवता?

आज-काल सर्वच महानगरांमध्ये जुनी एक मजली किंवा दोन मजली घरे पाडून तिथे बहुमजली इमारती उभे करणे सुरू झाले आहे. या इमारतींमध्ये एका कुटुंबाला राहण्यायोग्य अशा सदनिका तयार केल्या जातात आणि त्या विकल्या जातात. त्या इमारतीत मग किमान सहा पासून तर कमाल शंभर पर्यंत सदनिका धारक निवासाला असतात. या सदनिकाधारकांची एक सहकारी सोसायटी केली जाते आणि ती सोसायटी संपूर्ण इमारतीची देखभाल करत असते. 

या बहुमजली इमारतींच्या आणि तिथे राहणाऱ्या सदनिकाधारकांच्या सुरक्षेसाठी मग या सहकारी सोसायटी २४ तासाचे सुरक्षारक्षक नेमत असतात. या सुरक्षारक्षकांचे काम इमारतीची आणि तिथे राहणाऱ्या नागरिकांच्या मालमत्तेची, चीजवस्तूंची सुरक्षा करणे हे काम असते. या सुरक्षारक्षकांनी इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर थांबून तिथे आत कोणी येते आणि बाहेर कोण जाते याची नोंद ठेवणे आणि कोणी अनोळखी व्यक्ती इमारतीत घुसण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याची रीतसर चौकशी करून मगच आज सोडणे तसेच इमारतीच्या पार्किंग मध्ये असलेली सदनिकाधारकांची वाहने, इमारतीच्या आवारात केलेली विद्युत व्यवस्था, पाणीपुरवठ्यासाठी असलेली व्यवस्था याकडे लक्ष ठेवून त्याची सुरक्षा करणे, हे काम अपेक्षित असते. मग संध्याकाळ झाली की बाहेरचे सर्व लाईट्स लावले गेले आहेत की नाही, तसेच पाणी खालच्या विहिरीतून किंवा रिझर्वायरमधून वरच्या टाकीत चढवणे इत्यादी कामे हे सुरक्षारक्षक करत असतात. मात्र मुख्य काम त्यांनी  इमारतीची तसेच सदनिकाधारकांच्या चीज वस्तू, वाहन इत्यादींची सुरक्षा बघणे हेच काम करायचे असते. 

मात्र आज अनेक ठिकाणी इमारतींमध्ये या सुरक्षारक्षकांचा उपयोग अक्षरशः सार्वजनिक घरघड्यासारखा केलेला दिसून येतो. वस्तुतः आज या मोठ्या इमारती मधल्या सदनिका देखील चांगल्याच प्रशस्त असतात. त्यांची किंमत देखील करोडोत असते. इथे सदनिका विकत घेणारे सदनिकाधारक हे देखील उच्च मध्यमवर्गीय किंवा त्याही वरच्या स्तरावरचे असतात. ते सर्व आपल्या घरी वर कामासाठी एखादा नोकर  ठेवू शकतात, तेवढी त्यांची आर्थिक क्षमता असते. मात्र या इमारतींमधील जे सदनिकाधारक असतात ते अगदी छोटी मोठी कामे देखील या सदनिकाधारक सुरक्षारक्षकाला सांगत असतात. त्याने इमारतीतील कोणी महिलेने फोन केला तर तिला चौकावर जाऊन भाजी आणून द्यावी, किंवा मग बाजूच्या किराणा दुकानातून काही सामान आणून द्यावे अशा अपेक्षेने या सुरक्षारक्षकांना वापरले जात असते. इतकेच काय पण इमारतीतील सदनिकांमध्ये राहणाऱ्या या उच्चभ्रू महिला इतक्या बेजबाबदार असतात, की त्यांच्या बाल्कनीतून सामान खाली पडले कपडे उडून खाली गेले तरी त्यांना शुद्ध नसते. मग बरेचदा शेजारच्या आवारात गेलेली भांडी कपडे इत्यादी चीज वस्तू आणण्यासाठी सुद्धा या सुरक्षारक्षकालाच पिटाळले जाते. 

इमारतीच्या सहकारी सोसायटीचे जे पदाधिकारी असतात, ते सोसायटीच्या इतर कामांसाठी देखील याच सुरक्षा रक्षकाला वापरत असतात. मग त्याने प्रसंगी विजेचे किंवा पाण्याचे बिल भरून यावे, इमारतीचा कार्पोरेशन टॅक्स भरण्यासाठी त्याने जावे जुन्यातले बल्ब फ्युज झाले तर बल्ब किंवा ट्यूबलाईट किंवा नळाच्या तोट्या आणायला इलेक्ट्रिकच्या दुकानात जाणे हे कामे देखील ही पदाधिकारी मंडळी याच सुरक्षारक्षकाकडून करून घेत असतात. 

मोठ्या शहरांमध्ये असे सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या एजन्सीज आहेत. ते असे सुरक्षारक्षक या इमारतीतील सहकारी संस्थांना पुरवत असतात. या सुरक्षारक्षकांना मग त्या एजन्सीज व्यवस्थित गणवेश देखील देत असतात आणि हे गणवेशधारी सुरक्षारक्षक इमारतीत सुरक्षा रक्षक कम घरगडी म्हणून वावरात असतात.

हे कितपत योग्य आहे, याचा विचार कोणी करणार आहे की नाही? इमारतीतील सुरक्षारक्षक प्रवेशद्वार सोडून कुठे किराणा दुकानात किंवा भाजीच्या दुकानात किंवा विजेचे बिल भरायला गेला, तर तेवढा वेळ इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणीही सुरक्षारक्षक राहत नाही. अशावेळी कोणी बाहेरचा माणूस आत शिरला आणि त्याने पार्किंगमधली एखादी स्कूटर किंवा नाही काही तर स्कूटरची स्टेपनीच पळवून नेली, तर नुकसान त्या स्कूटर चालकाचे होणार आणि शेवटी जबाबदार तो गरीब विचारा सुरक्षारक्षक धरला जाणार, मात्र याचे भान कोणालाही नसते. 

अनेकदा अशा इमारतींमध्ये काही मान्यवर व्यक्ती राहत असतात. त्यांची काहींशी खुन्नस असू शकते. मग अशी खुन्नस काढण्यासाठी तिथे प्रसंगी गुंड देखील पाठवले जातात. मध्यंतरी एका प्रसिद्ध सिनेनटाच्या घरात मध्यरात्री अशाच काही व्यक्ती शिरून त्यांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजीच आहे. अशा अनेक घटना घडल्याच्या बातम्या कानावर येतच असतात.

बरेचदा अशा इमारतींमध्ये सुरक्षारक्षक दारावर नसला की कोणी परका माणूस सहज आत मध्ये आपले वाहन ठेवून जातो. काही वेळा ते वाहन चोरीचे देखील असू शकते. ते सोसायटीच्या आवारात सापडले तर ससेमिरा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या मागे लागतो. मागे नागपुरात एका वस्तीत एक तरुण मुलगा आणि एक मुलगी रोज संध्याकाळी लक्ष्मीनगरमधील एका बहुमजली इमारतीजवळ यायचे. तिथे समोर कोणी नाही असे पाहून पार्किंग मध्ये आपल्या गाड्या ठेवायचे आणि मग बाजूच्याच एका सुनसान रस्त्यावर रात्री फिरायला जायचे. तिथे कोणी सुरक्षारक्षक नसल्यामुळे हा फुकटचा स्कूटर स्टॅन्ड ते वापरत होते. एकदा त्या इमारतीत राहणाऱ्या काही ज्येष्ठांच्या हा प्रकार लक्षात आला. मग एक दिवस पाळत ठेवून त्या तरुण मुला मुलीला त्यांनी पकडले आणि त्यांच्या पालकांना तिथे बोलावले गेले. मग जो काही तमाशा व्हायचा तो झालाच. असे प्रकार या बहुमजली इमारतीच्या पार्किंगमध्ये सहज घडू शकतात. म्हणूनच तिथे सुरक्षारक्षकाने डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे गरजेचे असते. मात्र सुरक्षारक्षकाचा घरगडी बनवला जातो आणि मग असे प्रकार घडतात. 

असे प्रकार टाळायचे असतील तर या बहुमजली इमारतीतील प्रत्येक सदनीकाधारकाने जबाबदार व्हायला हवे आणि त्याने स्वतःहूनच असे प्रकार टाळायला हवेत. जर कोणी असे प्रकार करू बघत असेल आणि सुरक्षारक्षकाला घरगडी म्हणून वापरु बघत असेल तर सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनीच त्याला प्रतिबंध करायला हवा. तरच या बहुमजली इमारतींची आणि तिच्या सदनिका धारकांची सुरक्षा नीटनेटकी होऊ शकेल, इतकेच सहज सुचले म्हणून सांगावेसे वाटते.

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.