स्पष्ट आणि परखड राज ठाकरे आणि संजय राऊत यांना पडलेली दिवास्वप्ने
स्पष्ट आणि परखड
राज ठाकरे आणि संजय राऊत यांना पडलेली दिवास्वप्ने
पुढील दोन-तीन महिन्यात या देशात पंतप्रधानाच नसेल अशी परिस्थिती येईल अशा आशयाचे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एका पत्र परिषदेत केले आहे. राज ठाकरे यांचे कायम तळ्यात मळ्यात सुरू असते. कधी ते स्वतःला शरद पवारांच्या कळपात सोडतात, तर कधी नरेंद्र मोदींशी त्यांचे सख्य झालेले दिसते. अनेक वर्ष भांडून ते आता आपल्या सख्या चुलत भावाशीच पुन्हा हातमिळवणी करते झाले आहेत. ते कधी काँग्रेस सोबत अभद्र शय्यासोबत करतात, तर कधी अभिजीत दीपकेला डोक्यावर घेऊन नाचतात. एकंदरीतच कोणतीही स्थिर भूमिका नसलेला नेता असे त्यांचे वर्णन करता येते. त्यांनी देशात पंतप्रधानच नसेल असे भाकीत कशाच्या आधारावर केले, आणि त्यावेळी त्यांनी देशाची घटना अभ्यासली होती का, प्रथा परंपरा काय आहेत ते पाहिले होते का, हा देखील माझ्यासारख्या अभ्यासकाला प्रश्न पडतो.
आपल्या देशात संविधानातील तरतुदीनुसार पंतप्रधानपद हे कधीच रिक्त ठेवता येत नाही. जर एखाद्या देशात किंवा उद्या जर संधी राज्यात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि नवा मुख्यमंत्री निवडला जाऊ शकत नसेल किंवा विद्यमान मुख्यमंत्र्याचे निधन झाले असेल आणि नवा मुख्यमंत्री येऊ शकत नसेल तर तिथे राष्ट्रपती राजवट लावता येते. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, किंवा सरपंच नसेल तर तिथे प्रशासक नेमता येतो. मात्र पंतप्रधान नसेल तर देशात राष्ट्रपती राजवट लावून राष्ट्रपती कारभार चालवतील अशी परिस्थिती आणता येत नाही. त्यामुळेच काही कारणाने पंतप्रधानांनी राजीनामा दिला तर नवा पंतप्रधान येईपर्यंत त्यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करावेच लागते. जर एखादेवेळी पदावर असतानाच पंतप्रधानांचे निधन झाले तर नवा हंगामी पंतप्रधान नियुक्त होईपर्यंत पंतप्रधानांचे निधन झाले ही बातमी अधिकृतपणे घोषित करता येत नाही. नव्या काळजीवाहू पंतप्रधानांचा शपथविधी झाल्यावरच अशी घोषणा करता येते. माझ्या आठवणीनुसार १९६४ मध्ये पंडित नेहरूंचे निधन झाल्यावर हंगामी पंतप्रधान म्हणून गुलजारीलाल नंदा यांना शपथ दिल्यावरच नेहरूंच्या निधनाची घोषणा केली गेली होती. असाच प्रकार लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर देखील झाला होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांना एम्समध्ये हलवता हलवताच त्यांचे निधन झाले होते. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली होती. मात्र हंगामी पंतप्रधान म्हणून राजीव गांधी पश्चिम बंगाल मधून दिल्लीत परत येऊन शपथ घेईपर्यंत इंदिराजींच्या निधनाची बातमी घोषित करण्यात आली नव्हती त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्यांना जखमी अवस्थेत एम्स मध्ये हलवण्यात आले आहे इतकीच बातमी दुपारभर रेडिओ आणि टीव्हीवर दिली जात होती.
१९७९ मध्ये चौधरी चरणसिंह यांनी संसद बरखास्त केली होती. तरीही तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी त्यांना नवे सरकार येईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून राहण्यास सांगितले होते. तसाच प्रकार चंद्रशेखर (१९९१) इंद्रकुमार गुजराल (१९९७) आणि अटल बिहारी वाजपेयी (१९९९) यांच्या बाबतही घडला होता. हे बघता देशात पंतप्रधानपद रिक्त ठेवता येत नाही. त्यामुळे देशात पंतप्रधानच नसेल अशी परिस्थिती येईल हा राज ठाकरे यांचा दावा काहीसा हास्यास्पद वाटतो. राज ठाकरे आणि एकूणच मोदी विरोधकांना वाटते त्याप्रमाणे या देशात पुढील चार महिन्यात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि खरोखरी पंतप्रधान मोदींना राजीनामा द्यावा लागला तरी नवीन पंतप्रधान येईपर्यंत त्यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करावेच लागेल. राष्ट्रपती तशी त्यांना सूचना देतील. ही घटनात्मक तरतूद आहे. मात्र राज ठाकरे मनात येईल ते बोलून मोकळे होतात. कित्येकदा त्याला काहीही आधार नसतो. तसाच हा प्रकार आहे. त्यामुळे त्यांचे हे विधान किती गांभीर्याने घ्यायचे हे आपणच ठरवायचे आहे.
पुढील तीन-चार महिन्यात देशात प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण होईल आणि देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, देशात सत्ता बदल होईल असे भाकीत शिल्लक शिवसेनेचे स्वयंघोषित विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना केल्याचे वृत्त आहे. सध्या अभिजीत दिपके यांच्या पहिल्या आंदोलनानंतर देशातील विरोधकांना सत्ता बदल होणार हे दिवा स्वप्नच दिसू लागले आहे. वस्तूतः नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी गत बारा वर्षापासून देशात राज्यकारभार चालवत आहेत. त्यांनी बरीच चांगली कामे देखील केली आहेत. त्यामुळे देशातील सामान्य माणूस कुठेतरी त्यांच्या बाजूने असल्याचे चित्र दिसते आहे. नाही म्हणायला २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाला थोडाफार सेटबॅक बसला. ३०३ वरून लोकसभेत भाजप २४० वर आला. त्यावेळी विरोधक एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात का याची काही काळ भाजपने वाट पाहिली होती. मात्र त्यांच्या आपापसातल्या लाथाळ्या बघता बहुसंख्य छोट्या पक्षांनी भाजपसोबत येऊन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात स्थापन होणाऱ्या सरकारसोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज हळूहळू भाजपचा पाठिंबा वाढतो आहे. काही पक्षात पुन्हा फूट पडत ते खासदार आता भाजपासोबत आले आहेत. शिवाय आधी काही भाजपला विरोध करणाऱ्या पक्षांनी देखील आता भाजपासोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. मग विरोधक भलेही ओरडत की हा ईडी आणि सीबीआयचा प्रताप आहे. मात्र विरोधकांसोबत राहण्यात काही हशील नाही हे त्या खासदारांना पटल्यामुळेच त्यांनी आपली मूळ जागा सोडत भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एप्रिल २०२६ मध्ये दोन तृतीयांश बहुमताअभावी जे महिला आरक्षण विधेयक फेटाळले गेले ते आता पुन्हा पारित करून घेण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे आणि त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले जाईल असे चित्र दिसते आहे.
विरोधकांना कसेही करून सध्याचे सरकार पायउतार कसे होईल ते बघायचे आहे. ही फक्त विरोधकांची इच्छा आहे असे नाही, तर त्यांना परकीय शक्तींचाही साथ असल्याचे खात्रीलायक पुरावे मिळाल्याची माहिती आहे. गत बारा वर्षात मोदींच्या नेतृत्वात देशाची जी काही प्रगती झाली ती देशाबाहेरील प्रगत राष्ट्रांना सहन होत नाही. त्यामुळे या देशात अशांतता कशी पसरवता येईल आणि त्याचा फायदा घेऊन सरकार कसे पायउतार करता येईल हे त्यांचे प्रयत्न आहेत. ही अशांतता पसरवण्यासाठीच परकीय शक्ती अशी आंदोलने स्पॉन्सर करत असतात. अन्यथा परदेशातील शिक्षण सोडून विशेष विमानाने अभिजीत दिपकेला भारतात पाठवले जाते आणि त्याचा आंदोलनाचा डोलारा उभा करण्यासाठी हातभार लावला जातो याचा अर्थ काय घ्यायचा? सध्या मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावर देखील आंदोलन पेटवणे सुरू आहे. मात्र या आंदोलनात सामान्य माणूस किती हे देखील तपासणे महत्त्वाचे आहे. सामान्य माणसाला त्याच्या रोजी रोटी ची पहिली चिंता आहे. तो असल्या आंदोलनात कधीच येणार नाही हे स्पष्ट आहे.
आज संजय राऊत यांचे बोलणे फारसे कोणी मनावर घेत असेल असे कोणालाच वाटत नाही. संजय राऊत रोज सकाळी सर्व माध्यमांना बोलावून घेत वेगवेगळ्या फोकनाडा हाकलत असतात. काही मराठी माध्यमे वगळता त्यांची विधाने कोणीही गांभीर्याने घेत नाही. मराठी वृत्तवाहिन्यांवर जेव्हा संजय राऊतांचे बोलणे दाखवले जाते तेव्हा सामान्य माणूस एक टाइमपास म्हणूनच ते बघत असतो. त्याला फारसे गांभीर्याने कोणीच घेत नाही. मात्र संजय राऊत निष्ठेने पोपटपंची करत असतात. त्यांच्या बऱ्याच कपोलकल्पित कथा या फक्त मनोरंजन करणाऱ्या असतात. त्यात तथ्य फारसे नसते
आज देशात विरोधकांनी काही आंदोलने उभी करण्याचा प्रयत्न जरूर केला. त्यातून हिंसाचार घडवण्याचा देखील त्यांचा इरादा असल्याचे संकेत मिळत होते. मात्र हिंसाचार अजून तरी घडलेला नाही आणि मोदी सरकार ते घडू देईल असे चित्र आज तरी दिसत नाही. अशा परिस्थितीत पुढील चार महिन्यात हे सरकार पडण्यासाठी काय कारणे होणार हे संजय राऊत यांनी स्पष्ट करायला हवे. अर्थात ती कारणे हवेतली नसावी तर तथ्यांवर आधारित असायला हवी. अन्यथा पुन्हा एकदा या संजय राऊत यांच्या सकाळच्या फोकनाडा आहेत म्हणून सामान्य माणूस दुर्लक्ष करेल. एरवी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी नऊचा भोंगा म्हणून त्यांचा उल्लेख करत असतातच ना..
हे बघता पुढील काही महिन्यात देशात अराजक माजेल आणि सत्ताबदल होईल तसेच काही महिने देशात पंतप्रधानाच राहणार नाही अशी परिस्थिती येण्याचे चित्र आज तरी दिसत नाही. राज ठाकरे आणि संजय राऊत यांना दिवसा स्वप्न पडतात, हा त्यांचा मानसिक आजार देखील असू शकतो. तसे असेल तर त्यांनी त्यावर इलाज करावा....
अर्थात हे माझं मत झालं......
तुमचं स्पष्ट आणि परखड मत तुम्ही देखील मांडू शकता.....
त्याचे स्वागतच होईल...
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment