घ्या समजून राजेहो... संघविरोधात फोकनाडा मारण्याआधी संघ समजून घ्या..!

 घ्या समजून राजेहो...

संघविरोधात फोकनाडा मारण्याआधी संघ समजून घ्या..!

काल फेसबुकवर उज्वल वरभे यांची एक पोस्ट वाचायला मिळाली. वर्भे यांना सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल फारसे चांगले सांगितले गेले नव्हते. नंतर आयआयटी चे विद्यार्थी असताना त्यांनी राम पुनियानी यांचे संघविरोधातील युट्युब वरील व्हिडिओ ऐकले. त्यामुळे त्यांचे संघ विरोधातील मत अधिकच पक्के झाले होते, आणि जर समाजात काही चांगले करायचे असेल तर आपल्याला पुरोगामीत्वाची शाल पांघरायलाच हवी या ठाम निष्कर्षावर ते आले होते.

मात्र नंतरच्या काळात संघविचाराचा आणि हिंदुत्वाचा विचार मांडणाऱ्या काही मंडळींशी त्यांचा संपर्क आला. यांचे वरभे यांचे कथित पुरोगामी विचार ऐकून देखील या सर्व मंडळींची त्यांची मैत्री झाली आणि हळूहळू वरभे यांचे मत बदलू लागले. त्यातूनच गतवर्षीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी पुर्तीनिमित्त विजयादशमीच्या दिवशी नागपुरात झालेल्या मुख्य कार्यक्रमात ते एक प्रेक्षक म्हणून उपस्थित राहिले आणि नंतर वर्षभरात त्यांचे पूर्णतः मतपरिवर्तन झाल्यामुळे यंदा दोन दिवसांपूर्वी झालेल्या विजयादशमी उत्सवात उज्वल वरभे संघाच्या संपूर्ण गणवेशात उपस्थित राहिले, तसा त्यांचा आणि त्यांच्या सहकारी मित्राचा फोटोच त्यांनी फेसबुकवर अपलोड केला आहे, आणि आता आपल्याला हे संघाचे आणि हिंदुत्वाचे विचार पटले असल्याचे त्यांनी मान्य केले आहे.

या निमित्ताने मला लहानपणी संघ शाखेत शिकविलेले एक संघ गीत आठवले त्याच्या ओळी "संघ कसा, संघ कसा विचारता काय रे, संघात गेल्याबिगर समजायचं नाही रे.." अशा होत्या. तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खऱ्या अर्थाने समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला बाहेरून समजून घेता येणार नाही, तुम्हाला त्यासाठी संघात यावे लागेल, अशाच आशयाचे ते संपूर्ण गीत होते. मात्र आज देशात आणि देशाबाहेर सुद्धा संघाबाबत काहीही पुरेशी माहिती नसताना अनेक कथीत पुरोगामी मंडळींनी संघाबद्दल अनेक गैरसमज करून घेतले आहेत आणि तितक्याच हिरिरीने ही पुरोगामी मंडळी संघाबद्दल हे गैरसमज पसरवत असतात. अर्थात हे काही आजचे नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून संघ जसा जसा आकार घेऊ लागला, तसे तसे देशाच्या राजकारणात त्या काळात सक्रिय असणारे काँग्रेसच्या काँग्रेसजन, डावी मंडळी आणि समाजवादी गट यांनी कायम संघविरोधात स्वतः गैरसमज करून घेतले आणि गैरसमज पसरवण्याचेच काम केले आहे. साने गुरुजींसारख्या सिद्धहस्त लेखकाने देखील त्यांच्या "आपण सारे भाऊ" या कादंबरीत संघाचा उल्लेख "जातीयवादाचे डबके" असाच केला आहे. साने गुरुजी हे सुरुवातीपासूनच समाजवादी होते हे नव्याने सांगायची गरज नाही.

अधिक स्पष्टपणे सर्व मुद्दे मांडण्याआधी एक स्पष्ट करायचे आहे की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणताही अधिकारी किंवा प्रवक्ता नाही. मात्र संघाचा एक अभ्यासक, जुना स्वयंसेवक आणि एक पत्रकार या नात्याने मी केलेल्या अभ्यासातून मला जे काही आकलन झाले आहे तेच मी इथे मांडणार आहे. संघविरोधकांनी संघाबाबत वेळोवेळी जे टीका करणारे मुद्दे मांडलेत, ते अभ्यासले तर "एक हत्ती आणि सात आंधळे" ही गोष्ट आठवते. त्यात प्रत्येक आंधळ्याला आपल्या सोयीने हत्ती कसा आहे ते समजले होते. माझ्यामध्ये मते संघाला विरोध करणारी आणि संघविरोधात आम्ही अभ्यास केला आहे असा दावा करत ठामपणे बोलणारी सर्व कथित पुरोगामी मंडळी ही देखील या सात आंधळ्यांसारखीच चाचपडणारी आहेत. ऐकीव माहितीवर स्वतःचे ग्रह करून घेत तसेच स्वतःच कपोलकल्पित कथा तयार करत या मंडळींनी गैरसमज पसरवण्याचे काम केले आहे. त्यामुळेच उज्वल वर्भेसारख्या मंडळींचे अनेक गैरसमज झालेले आहेत. जेव्हा अशी मंडळी वास्तव जाणून घेतात तेव्हा त्यांचा भ्रमनिरास होतो आणि नेमके वास्तव काय ते त्यांना कळून येते. 

आजपासून शंभर वर्षांपूर्वी तत्कालीन परिस्थिती लक्षात घेत हिंदूंचे सशक्त संघटन व्हावे आणि भारत हे हिंदू राष्ट्र व्हावे यासाठी संघाची स्थापना डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती. त्यांनी संघ ही पूर्णतः गैरराजकीय संघटना असेल असेच ठरवले होते आणि आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही पूर्णतः गैरराजकीय संघटनाच म्हणून कार्यरत आहे. त्या काळात डॉ. हेडगेवार हे स्वतः काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यांच्यासोबत काँग्रेसमधले अनेक कार्यकर्ते संघात सहभागी झाले होते. संघाने देखील कधीच आपल्या स्वयंसेवकांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत आग्रह धरला नव्हता आणि आजही धरलेला नाही. आज भारतीय जनता पक्षाला संघाचाच राजकीय गट म्हणून ओळखले जाते. मात्र काही कारणाने भाजपपासून दुरावलेले किंवा प्रसंगी बंडखोरी करणारे संघात मात्र पूर्वीसारखेच सक्रिय राहतात आणि संघ देखील त्यांना विनातक्रार स्वीकारत असतो. 

मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही नोंदणीकृत संघटना नाही असा मुद्दा उपस्थित करत नागपुरातीलच एका महाभागाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने स्वतः वेगळी संघटना गठीत करण्याचा प्रयत्न केला होता आणि धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीसाठी अर्ज केला होता. तो अर्ज फेटाला गेला. त्यानंतर सदर महाभाग न्यायालयातही गेले. मात्र न्यायालयाने देखील त्यांच्या याचिका फेटाळल्या होत्या. संघाकडे येणारा पैसा आणि खर्च करण्यात आलेला पैसा याचा कोणताही हिशोब ठेवला जात नाही आणि त्यांना पैसा कुठून मिळतो हेही सांगितले जात नाही असा आरोप पुरोगामी संघविरोधक करतात. मात्र माझ्या माहितीनुसार संघाकडे येणाऱ्या प्रत्येक रुपयाची नोंद ठेवली जाते आणि खर्चाची देखील नोंद ठेवली जात असते. दर वर्षाचे ताळेबंद तयार केले जातात आणि सनदी लेखापालाकडून तपासून देखील घेतले जातात. तशी प्रमाणपत्र देखील संघाकडे उपलब्ध असल्याची माझी माहिती आहे. एकूणच नोंदणीकृत संस्थेला ज्या काही अटींचे पालन करावे लागते त्या सर्व अटी आणि सूचनांचे पालन संघात केले जाते. तरीही आज कर्नाटक सारख्या राज्यात तिथले मंत्री संघ नोंदणीकृत संस्था नाही हा दावा करतच असतात आणि या दाव्याच्या आधाराने संघाच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्याचा देखील अयशस्वी प्रयत्न केला जातो. संघात जातीयवाद शिकवला जातो असाही आरोप विरोधक करतात. इथे एक आठवण सांगावीशी वाटते. स्वातंत्र्यपूर्व काळात वर्धेत संघाचे एक शिबिर झाले होते. त्याला महात्मा गांधींना निमंत्रित करण्यात आले होते. तिथे आल्यावर महात्मा गांधींनी प्रश्न केला की या स्वयंसेवकांमध्ये दलित किती आहेत आणि भंगी समाजाचे किती आहेत. त्यावेळी संघात जात विचारली जात नाही असेच उत्तर त्यांना डॉ. हेडगेवार यांनी दिले होते. मग महात्मा गांधींनी तिथल्या काही स्वयंसेवकांना जात विचारले तेव्हा ते भिन्न जातीचे असल्याचे आढळून आले होते. एकूणच संघात जातीभेद न पाळता हिंदू म्हणून सर्वांनी एकत्रित येणे कसे गरजेचे आहे हे शिकवले जाते. तरीही इथे जातीयवाद शिकवला जातो हा अपप्रचार केला जातोच. माझा एक स्वयंसेवक या नात्याने संघाशी जवळजवळ साठ वर्षापासून संबंध आहे. मात्र मला तिथे कोणीही जातीपातीचा मुद्दा काढल्याचे लक्षात आलेले नाही.

संघावर ब्राह्मणी वर्चस्व आहे हा देखील एक प्रचार पुरोगामीयांकडून केला जातो. मात्र संघात सर्व जाती धर्माचे लोक येतात आणि अन्य जाती-धर्माच्या स्वयंसेवकांनाही संघात महत्त्वाची पदे दिली जातात. भिकुजी इदाते, रमेश पतंगे हे त्याचे एक चांगले उदाहरण म्हणता येईल. इतरही अनेक उदाहरणे सापडतील. आज राजकारणात सक्रिय असणारी बहुजन समाजाची अनेक मंडळी संघाशी संबंधित आहेत हे इथे नमूद करायला हवे. 

संघाला या देशात लागू असलेले संविधान मान्य नाही, तर त्यांना मनुस्मृतीवर आधारित संविधान लागू करायचे आहे, असा दावा अनेक संघविरोधकांकडून वेळोवेळी केला जातो. आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ ही मंडळी संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी लिहिलेल्या बंच ऑफ थॉट्स या पुस्तकातील उताऱ्यांचा आधार घेतात. मी स्वतः मनुस्मृति देखील वाचलेली नाही, आणि बँक ऑफ थॉट्स सुद्धा वाचलेले नाही. मात्र संघाने देशातील विद्यमान संविधानाचा कायम आदरच केलेला आहे हे निश्चितपणे सांगू शकतो. संघाचे इतर अभ्यासक यावर अधिक प्रकाश टाकू शकतील. दुसरे असे की मनुस्मृति ही ज्या काळात लिहिली गेली, त्या काळातील सामाजिक परिस्थितीवर आधारित नियम मनुस्मृतित देण्यात आले होते. कालांतराने जशी जशी परिस्थिती बदलत गेली. तसे तसे समाजाचेच धोरण बदलत गेले नव्हते. संघाने देखील बदलत्या सामाजिक स्थित्यंतरांचा मागवा घेत वेळोवेळी बदल घडवले आहेतच. अगदी साधे उदाहरण सांगायचे तर सुरुवातीला हाफ पॅन्टवर असलेला संघ आज फुलपाँटवर आला आहेच ना. इतरही बाबतीत संघाने बरेच बदल केलेले आहेत. तरीही संघाला मनुस्मृतीवर आधारित संविधान आणायचे हा आरोप अगदी कंठरवाने केला जातोच. 

संघ हा मुसलमानांचा द्वेष करणारा आणि त्यांना शत्रू मानणारा आहे असाही आरोप केला जातो. मात्र संघाने हिंदुत्वावर आधारित धोरणांचा अवलंब केला आहे. हिंदुत्व हे सहिष्णू धोरणांवर आधारित वाटचाल करते. हिंदूंनी कधीही परधर्मीयांना बळजबरी करत किंवा प्रलोभाने दाखवत आपल्या धर्मात येण्यास भाग पाडलेले नाही. जर कुणाला राजीखुशीने धर्म पटला तरच हिंदू त्याला आपल्याच सामावून घेतात परधर्मीयांवर अकारण कधीही हिंदू आक्रमण करत नाहीत. मात्र त्यांच्यावर कोणी आक्रमण केले तर त्याला सडेतोड उत्तर देण्याची हिंदूंची मानसिकता असते. संघाने नेमके हेच धोरण ठरवले आहे. क्षमा वीरस्य भूषणम् हे संस्कृत सुभाषित संघाने अवलंबले असून हिंदू समाज संघटित होऊन बलशाली झाला तर हिंदू आपल्यात सर्वांना सामावून घेऊ शकतात हेच त्यांचे धोरण राहिले आहे.

आज भारतात जे मुस्लिम किंवा ख्रिस्ती बांधव आहेत, ते आमचे हिंदूच होते. मुस्लिम आक्रमक भारतात आले आणि त्या काळात हिंदू संघटित नसल्यामुळे त्यांनी हिंदूंना तलवारीच्या जोरावर पाठवून मुस्लिम केले होते. तसेच ख्रिस्ती धर्मप्रसारक या देशात आले आणि त्यांनी इथल्या गोरगरिबांना लालूच दाखवून ख्रिस्ती करून घेतले होते हा इतिहास आहे. त्यामुळे इथले मुसलमान किंवा ख्रिस्ती हे इथलीच जीवनशैली अवलंबून इथल्याप्रमाणेच खानपान करून इतिहास प्रथा परंपरा पाळून आयुष्य जगत असतात. भारतीय भूमीत जो राहतो इथल्या जीवनपद्धती जो अवलंबतो, इथल्या प्रथा परंपराचे पाळतो, तो हिंदूच मानावा असे स्पष्टीकरण संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत वारंवार देत असतात. हे सर्व मुद्दे लक्षात घेता संघ मुसलमानांचा विरोधक आहे हा दावा देखील तकलादूच ठरतो. हिंदूंवर अन्य धर्मीयांनी दादागिरी करू नये, गुण्यागोविंदाने रहावे इतकीच संघाची माफक अपेक्षा असते. तरीही संघाला धर्माधर्मांमध्ये फूट पाडायची आहे असा आरोप काँग्रेसवाले आणि डावे वारंवार करतातच.

संघाला पुरुषसत्ताक पद्धती मान्य आहे, स्त्रीला संघात दुय्यम स्थान दिले जाते, त्यामुळे आतापर्यंत एकही महिला संघाची सरसंघचालक झालेली नाही असा आरोप संघविरोधक करतातच. सुमारे वर्षभरापूर्वी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील हा आरोप अगदी ओरडून ओरडून केला होता. संघात महिलांना येऊ दिले जात नाही, त्यांनाही येऊ द्यायला हवे अशीही मागणी संघ विरोधक करत असतात. संघाची स्थापना झाली त्या वेळचे वातावरण फार वेगळे होते. त्या काळात जर संघस्थानावर स्त्री आणि पुरुष एकत्र कसरत करायला किंवा खेळायला उभे केले असते, तर समाजाने जबरदस्त टीका केली असती, आणि अनेक कुटुंबातील महिलांना संघात पाठवले गेले नसते. त्यामुळे २०२५ मध्ये संघाची स्थापना झाली. संघ परिवारातीलच लेकीसुनांना देखील संघाची शिकवण मिळायला हवी, त्यांच्यावर संघाचे संस्कार व्हायला हवे म्हणून संघाशी संबंधित परिवारातील एक महिला मावशी केळकर या पुढे आल्या आणि त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या मार्गदर्शनात महिलांसाठी राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली. १९३६ साली स्थापन झालेल्या राष्ट्रसेविका समितीने आज ९० वर्षे पूर्ण केली आहेत. समितीचे कार्य देखील संघासारखेच देशव्यापी ठरलेले आहे. ज्यावेळी देशाची फाळणी झाली, त्यावेळी राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या आजच्या पाकिस्तान मध्ये तिथल्या पीडित महिलांच्या मदतीला धावल्या होत्या, याची इतिहासात नोंद आहे. संघाने राष्ट्रसेविका समितीसोबत समाजाच्या विभिन्न घटकांसाठी विविध संघटनांची स्थापना केली. त्या सर्व संघटना संघ परिवारातच मोडतात. राष्ट्रसेविका समिती ही देखील संघ परिवाराचा एक भाग आहे आणि संघ परिवाराची ध्येयधोरणे ठरवताना समितीच्या अधिकाऱ्यांना देखील विचारात घेतले जाते. त्यामुळे संघ पुरुषसत्ताक संस्कृती पुरस्कृत करतो आणि महिलांना मनुस्मृतीतील सूचनेनुसार दाबून ठेवायचा प्रयत्न करतो हा आरोप देखील निरार्थकच म्हणावा लागेल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्य लढ्यात कुठेही नव्हता इतकेच काय पण संघ इंग्रजांना मदत करणार आहोत होता असाही आरोप संघविरोधक करतात मात्र 1925 मध्ये संघाची स्थापना झाल्यावर 1930 स*** झालेल्या जंगल सत्याग्रहात अनेक स्वयंसेवक सहभागी झाले होते इतकेच काय पण यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या जंगल सत्याग्रहात स्वतः डॉक्टर हेडगेवार सहभागी झाले होते त्यांना अटक करून अकोला तुरुंगात ठेवण्यात आले होते अशाही नोंदी इतिहासात आहेत स्वातंत्र्यलढ्यात संघ स्वतः जरी उतरला नसला तरी सर्व स्वयंसेवकांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हावे अशा सूचना डॉक्टर हेडगेवार यांनी त्यावेळी दिल्या होत्या त्यामुळे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात या आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते 1940 मध्ये डॉक्टर हेडगेवार यांचे निधन झाले त्याच्यानंतर गोळवलकर गुरुजी शरद संघ चालक झाले गुरुजींनी 1942 च्या आंदोलनात देखील स्वयंसेवकांना सहभागी व्हायच्या सूचना केल्या होत्या आणि अनेक स्वयंसेवक या आंदोलनात सहभागी झाले होते त्याच्या नोंदी देखील सापडतात. 

राष्ट्रपिता महात्मा गांधींचा हत्या संघानेच घडवली असा आरोप आजही काँग्रेसचे लोक करतात. इतर लोक तर जाऊ द्या पण अस्वतः राहुल गांधी देखील हा आरोप करतात. मात्र हा आरोप काँग्रेस कधीच सिद्ध करू शकलेली नाही. ज्यावेळी गांधींची हत्या झाली त्यावेळी ज्यांच्यावर आरोप होता ते नाथुराम गोडसे काही काळ संघाचे स्वयंसेवक होते असा दावा केला जातो. मात्र हत्येचा कट स्वतः गोडसेंनी रचला होता, संघाचा त्यात कुठेही संबंध नव्हता, हे विविध चौकशी आयोगांनी केलेल्या चौकशीमध्ये निष्पन्न झालेले आहे. हाच आरोप करत १९४८ मध्ये संघावर बंदी घातली गेली होती. मात्र आरोप सिद्ध न झाल्यामुळे ती बंदी तत्कालीन काँग्रेस सरकारला उठवावी लागली होती, हा इतिहास देखील सर्वज्ञात आहे. नंतरही विविध चौकशी आयोगांनी याबाबत चौकशी केली, मात्र गांधींच्या हत्येमागे संघाचा हात होता हे कुठेही सिद्ध करता आलेले नाही. त्यामुळे हा आरोप देखील निराधारच ठरतो.

तरीही वर दिलेले हे आरोप आणि याच्या सारखे अनेक आरोप संघविरोधक करत असतात. हे आरोप करणारे कधीही संघात गेलेले नसतात, मात्र स्वतःच मनाने रचून अशा कथा ते इतरांना ऐकवत असतात. मला आठवते शाळेत असताना माझ्या वडिलांचे एक स्नेही घरी नेहमी यायचे. त्यांना मी संघात जातो हे कधीच आवडत नव्हते. त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले की संघात गुरुदक्षिणा देण्यासाठी संघाचे अधिकारी शालेय स्वयंसेवकांना प्रसंगी आपली पुस्तके विकायला सांगतात पण गुरुदक्षिणा द्याच असा आग्रह धरतात. माझ्या गेल्या साठ वर्षाच्या संघ संबंधात कधीही कोणत्याही बाल किंवा शिशुस्वयंसेवकाला तू प्रसंगी पुस्तके विकून टाक आणि आम्हाला गुरुदक्षिणा दे असा आग्रह धरलेला माझ्या कानावर आला नाही. जर कुणाला असा अनुभव आला असेल तर त्यांनी मला जरूर सांगावे. संघात गुरुदक्षिण ही स्वेच्छेने द्यावी असेच सांगितले जात असते, आणि तुम्ही किती दिली हे जाहीर न करता बंद लिफाफ्यात द्यावी असेच सांगितले जाते. त्यामुळे गरीब श्रीमंत असा भेदभाव तिथे नसतो हा माझा अनुभव आहे. मात्र संघात न जाता फक्त संघाबद्दलच्या आकसापोटी किंवा काही व्यक्तिगत स्वार्थातून असे आरोप केले जात असतात आणि संघाबद्दल असे नॅरिटिव्ह पसरवले जात असतात. 

 संघाबद्दल कोणतीही माहिती न घेता मनाला येतील असे आरोप करणाऱ्यांना उज्वल वरभे यांची पोस्ट आणि त्यांचा अनुभव हे एक सणसणीत उत्तर आहे असेच म्हणता येईल. वरभे यांच्या आयुष्यात आधी जी काही कथित पुरोगामी मंडळी आली त्यांनी संघाबद्दल जाणून न घेता पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरला आणि इतरांना फोकनाडा सांगायला सुरुवात केली, त्यातून अनेकांचे गैरसमज होत गेले. अशा फोकनाडा सांगणारे आजही अनेक कथित पुरोगामी आहेत. मात्र जनसामान्यांनी अशा फोकनाडांवर विश्वास न ठेवता स्वतः अनुभव घ्यावा आणि मगच आपले मत बनवावे इतकेच इथे सुचवावेसे वाटते.

 वाचकहो पटतय का तुम्हाला हे.....

 त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो....!

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.