आठवणींच्या हिंदोळ्यावर ...२१. सकस वाचनाच्या आवडीतून माझ्यातला लेखक घडत गेला...

 आठवणींच्या हिंदोळ्यावर..२१

सकस वाचनाच्या आवडीतून माझ्यातला लेखक घडत गेला...

आज सकाळी फेसबुक बघत असताना समकालीन प्रकाशनाची एक पोस्ट बघण्यात आली. समकालीनचे एक लेखक आणि ख्यातनाम विज्ञान कथा लेखक निरंजन घाटे यांचे मनोगत त्यात दिले होते. निरंजन घाटे यांची आतापर्यंत १८० च्या वर विज्ञान कथांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. एक  प्रतीथयश विज्ञानकथा लेखक म्हणून त्यांचे नाव आहे. घाटेंनी लिहिले आहे की बालवयात सकस वाचन केल्यामुळेच त्यांच्यातला लेखक घडत गेला. लहानपणी मिळेल ते पुस्तक घाटे वाचायचे. कित्येकदा रेशनच्या रांगेत नंबर येईपर्यंत ते हातात पुस्तक वाचत असायचे. त्यामुळेच त्यांच्या लेखनावर चांगले संस्कार होऊ शकले असे त्यांनी लिहिले आहे. 

घाटेंचे हे मनोगत वाचून मी स्वतःचा विचार करू लागलो. आज निरंजन घाटेंसारखा प्रतीथयश लेखक मी नाही, मात्र तरीही लेखक म्हणून माझी थोडीफार ओळख आहे. घाटेंची आतापर्यंत १८० पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. माझी देखील १८० नाही पण १८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात आठ ललित लेखसंग्रह, चार वैचारिक लेखांचे संग्रह, तीन राजकीय कथांचे संग्रह, एक लघु कादंबरी, एक संपादित पुस्तक आणि एक कोळसा घोटाळ्यावरील अभ्यासपूर्ण पुस्तक याचा समावेश आहे. शिवाय अजून एक पुस्तक प्रकाशानाच्या वाटेवर देखील आहे. त्यातील सुमारे आठ ते दहा पुस्तकांना विविध पुरस्कार देखील मिळाले आहेत वृत्तपत्रांमध्ये आणि नियतकालिकांमध्ये माझे नियमित लेखन सुरू असते. इतकेच काय पण सध्या समाज माध्यमांवर मी दिवसाला किमान एक लेख तरी लिहितो. त्यामुळे एक सामान्य लेखक म्हणून तरी किमान माझी ओळख निश्चित आहे. 

 निरंजन घाटे यांच्यातला लेखक जसा सकस वाचनातून घडला, तसाच माझ्यातला लेखक सुद्धा सकट सकस वाचनातूनच घडत गेला आहे. आणि त्याला माझ्या दिवंगत आईचे वाचनवेड कारणीभूत ठरले आहे. मला आठवते, लहानपणी शाळेत शिकत असताना गोष्टीची पुस्तके दिसली की मी ती वाचून काढायचो. आईला सकस मराठी वाचनाची खूप आवड होती. मग तिच्यासाठी वाचनालयातून वडील आणि चांगली पुस्तके आणायचे. त्या काळात घरी खांडेकर फडके खाडिलकर यांची पुस्तके यायची. त्याचबरोबर घरी एक सर्क्युलेटिंग लायब्ररी देखील लावली होती. त्या लायब्ररीतून आठवड्यातून दोनदा दोन नवी मासिके घरी येत असत. फावला वेळ मिळाला, की मी ती पुस्तके आणि मासिके वाचून काढायचो. त्या काळात मराठी मासिकांमध्ये देखील अनेक नामावंत मान्यवर लेखकांच्या कथा आणि कादंबऱ्या प्रकाशित होत असत. तसेच काही वैचारिक लेख देखील असायचे. विशेषतः किर्लोस्कर स्त्री, वांग्मय शोभा, माहेर, मेनका, प्रपंच, अमृत या मासिकांमध्ये खूप वाचनीय साहित्य असायचे. फावला वेळ मिळाला की मी ही पुस्तके आणि मासिके वाचून काढत असे. ती वाचता वाचताच अनेकदा आपण देखील असे काहीतरी लिहावे असे मनात कुठेतरी वाटून जायचे. त्या काळात मग घरी एक लहान मुलांसाठी असलेली सर्क्युलेटिंग लायब्ररी सुद्धा लावली होती. त्यातही आठवड्याला चार पुस्तके मिळायची. विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्टीत ही लायब्ररी लावली जात असे. ती पुस्तके देखील मी आधाशासारखी वाचून टाकायचो. 

प्राथमिक शिक्षण संपले आणि पाचव्या वर्गात मी नागपूरच्या हडस हायस्कूलमध्ये शिकायला गेलो. तिथे विद्यार्थ्यांसाठी वेगळे वाचनालय होते. मधल्या सुट्टीत ग्रंथपाल सोमणबाई वाचन कक्षात सर्व पुस्तके मांडून ठेवायच्या. मुलांनी तिथे यावे आणि ती पुस्तके सुट्टीत वाचावी ही पद्धत सुरू केली होती. त्यावेळी मी सुट्टी झाली की तिथे वाचनालयात धावत असे आणि त्या चाळीस मिनिटात मिळेल ते पुस्तक वाचून काढत असे. बाबासाहेब पुरंदरेंच्या राजा शिवछत्रपती च्या काही खंडांचे वाचन मी तिथेच केले. साने गुरुजींची सुंदर पत्रे मी शाळेत शिकत असतानाच वाचली. त्याशिवाय त्या काळात लहान मुलांसाठी असलेली कुमार फुलबाग मुलांचे मासिक अशी मासिके देखील तिथे मी नियमित वाचत असे. आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या एका कौटुंबिक स्नेहाकडे स्नेह भेटीसाठी गेलो होतो त्यांच्याकडे श्यामची आई पुस्तक दिसले मी ते ते पुस्तक तिथेच वाचायला सुरुवात केली मग निघताना त्याच मंडळींनी तू घरी घेऊन जा आणि नंतर आणून दे असे सांगितले ते घरी घेऊन आलो आणि दोन-तीनदा वाचून काढले होते.

यातूनच कुठेतरी माझ्यातला लेखक विकसित होत गेला. मला आठवते मी सातव्या वर्गात शिकत असताना आम्हाला मराठी शिकवणाऱ्या परांडे बाईंनी एक दिवस वर्गात एक उतारा फळ्यावर लिहून दिला आणि या उताऱ्याच्या अनुषंगाने पुढे तुमच्या मनात येतील ते सर्व विचार तुम्ही लिहून काढा असे सुचवले. त्यादिवशी कसे काय तर माझ्या स्फूर्तीला अक्षरशः धुमारे फुटले होते. मी मनात येईल तसे खरडत गेलो. तास संपल्यावर बाईंनी सर्व मुलांच्या वह्या गोळा केल्या आणि तपासायला घेऊन गेल्या. दोन दिवसांनी त्यांनी एक एक करत प्रत्येक मुलाची वही दिली. शेवटी दोघा तिघांच्या राहिल्या होत्या. त्यात मी देखील होतो. आपल्याला आता जाम शिव्या पडणार असे मला वाटून गेले. पण तिथे मला धक्का बसला. परांडे बाईंनी माझी वही घेतली आणि सांगितले," अविनाश पाठकने हा निबंध खूप सुरेख लिहिला आहे, त्याने तो सर्वांना वाचून दाखवावा." मग मी सर्वांना तो निबंध वाचून दाखवला होता. त्याचवेळी "तू प्रयत्न केला तर पुढे जाऊन मोठा लेखक होशील," असे भाकीत त्या दिवशीच त्यांनी केले होते. नंतर आठव्या वर्गात मराठी शिकवताना देखील त्यांनी हे भाकीत केले होते.

यातूनच स्फूर्ती घेत मग मी नवव्या वर्गात असताना एक एकांकिकाच चक्क लिहून काढली. अर्थात ती कधीच रंगमंचावर आली नाही हा भाग वेगळा. नंतर दहावीत असताना शाळेच्या वार्षिकात देखील मी एक लेख लिहून दिला होता. अर्थात तो प्रकाशित केला गेला नाही हा भाग वेगळा.

कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी हळूहळू फुटकळ लेखन करू लागलो होतो. त्या काळात देखील घरी आईसाठी आणलेली पुस्तके वाचायचो. भरपूर पुस्तके नियतकालिके आणि दैनिके वाचायला मिळावी म्हणून मी नागपूरच्या राजाराम वाचनालयात संध्याकाळी काही वेळ जाऊ नये बसत असेल. मला आठवते, जेमतेम वीस वर्षाचा असताना मी पराभूत नावाची एक कथा लिहिली होती. अर्थात ती कुठेच प्रकाशित झाली नाही. मात्र लिहीत राहायचे हा छंद तेव्हाच लागला. मग वयाच्या पंचविशीत नागपूर आकाशवाणीने माझी "राखेतला फिनिक्स" ही कथा सर्वप्रथम प्रसारित केली. त्याच वर्षी सौरभ या दिवाळी अंकात माझी वेणीदान ही कथा प्रकाशित झाली. त्यानंतर उफाळलेली वेदना, मे गोड ब्लेसिंग हिम अशा काही कथा प्रकाशित झाल्या होत्या. अधून मधून लेखही लिहू लागलो होतो. मी २५ वर्षाचा असताना तरुण भारत साप्ताहिकात माझा एक लेख प्रकाशित झाला होता. 

शाळेत असतानापासून घरी येणारे दैनंदिन वृत्तपत्र दैनिक तरुण भारत नियमित वाचत असे. त्यातल्या बातम्या वाचल्यावर आपण देखील अशाच बातम्या लिहाव्या असे कधीतरी वाटून जायचे. कॉलेजमध्ये असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्यानंतर नागपूर युवक केंद्र या उपक्रमांमध्ये मी सक्रिय झालो होतो. तिथल्या कार्यक्रमांच्या बातम्या मी लिहू लागलो आणि मग सायकल दामटून त्या वर्तमानपत्रांमध्ये पोहोचवून देऊ लागलो. तिथून बऱ्यापैकी बातमी लिहिण्याची सवय लागली. १९७६मध्ये दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून काम सुरू केल्यावर त्यांना जी फिल्म पाठवत असे, त्यासोबत बातमी सुद्धा देऊन पाठवावी लागायची. त्यातून हळूहळू बातम्या लिहिण्याची सवय लागली. पुढे जाऊन १९८३ मध्ये एका कार्यक्रमाचे वृत्तचित्रण करायला मी जाणार होतो. तिथे त्या दिवशी तरुण भारतचा कोणीही प्रतिनिधी येणार नव्हता. मला तरुण भारताचे तत्कालीन वृत्त संपादक लक्ष्मणराव जोशींचा फोन आला. "अविनाश, आज आम्हाला बातमी तू द्यायची आहेस." मी होकार तर दिला, पण आपल्याला जमेल की नाही ही भीती वाटू लागली. मी बातमी लिहून काढली आणि ती लक्ष्मणरावंना दिली. त्यांनी दुसऱ्या दिवशी ती बातमी तशीच्या तशी छापली होती. त्यामुळे माझी बातमी लिहिण्याची देखील हिम्मत वाढली.

पुढे व्यवसायामुळे माझे लेखन काहीसे बाजूला पडले. दरम्यानच्या काळात माझ्या आयुष्यात उलाढाली झाल्या. काही काळ दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून मान्यता आणि प्रसिद्धी मिळालेला मी काही सरकारी धोरणे बदलल्यामुळे अचानक रस्त्यावर आलो होतो. आयुष्यातली चार-पाच वर्षे खूप खडतर गेली. त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी माझे लेखनच माझ्या कामी आले. 

वयाच्या चाळीशीत मी पूर्णवेळ पत्रकार झालो. तिथून माझा लेखन प्रवास वेगाने सुरू झाला. विविध वृत्तपत्रांमध्ये नागपूरचा प्रतिनिधी म्हणून मी बातम्या  पाठवू लागलो. मी ज्या बातम्या पाठवत होतो त्या तशाच्या तशा लागतही होत्या. त्यामुळे माझा उत्साह वाढत होता. मग छोटे-मोठे लेखही लिहू लागलो. त्यालाही प्रसिद्धी मिळू लागली. १९९८ मध्ये मी मुंबईच्या दैनिक नवशक्तीत नागपूर प्रतिनिधी म्हणून काम करत असताना तेव्हाचे संपादक आणि प्रख्यात लेखक ह.मो. मराठे यांनी मला वाजपेयी सरकारचा रिमोट कंट्रोल नागपूरच्या संघ मुख्यालयात आहे का या विषयावर अभ्यास करून काहीतरी लिही असे सांगितले. मी अभ्यास करून एक लेख लिहिला आणि त्यांना तो पाठवला. त्यांनी तो लेख चक्क रविवारच्या पुरवणीत कव्हर स्टोरी म्हणून प्रकाशित केला. त्या दिवशी मुंबईहून मला अनेकांचे कौतुकाचे  फोन आले. त्यामुळे माझी हिम्मत वाढली. मग मी नियमित लेखन करू लागलो.

एका राजकीय मित्राच्या आग्रहासाठी मी २००२ मध्ये रामटेकच्या गडावरून हे नियतकालिक सुरू केले. २००२ चा त्याचा दिवाळी अंक मी स्वतः पूर्णतः संपादित केला होता. पहिल्याच वर्षी त्याला चिन्मय कम्युनिकेशन्सचा पुरस्कार मिळाला. त्यातही माझा एक लेख होताच. नंतर काही काळ हे साप्ताहिक ही चालवणे साप्ताहिकात जागा भरण्यासाठी मग नियमित लेखन करावेच लागत होते. त्यानंतर आर्थिक अडचणीमुळे साप्ताहिक बंद केले, पण पुढली आठ वर्ष दिवाळी अंक मात्र काढला. या दिवाळी अंकाने आठ वर्षात २५ मान्यवर पुरस्कार मिळाले होते. 

याच काळात शेतकरी आत्महत्या अगदी पीक वर आल्या होत्या. त्यावेळी राज्य आणि केंद्र सरकारने त्यांना दोन पॅकेजेस जाहीर केले होते. हे दोन्ही पॅकेजेस कसे बोगस आहेत याची चिरफाड करणारे मी लेख लिहिले होते. ते दोन्ही लेख दैनिक गावकरी मध्ये कव्हर स्टोरी म्हणून छापले गेले होते. त्यातील एका लेखाला २००७ चा अरविंद बाबू देशमुख स्मृती उत्कृष्ट लेख पुरस्कार मिळाला होता. माझ्या लेखन प्रवासाला उत्तेजन देणारीच ही घटना होती.

याच उद्योगातून मराठीतील  ख्यातनाम साहित्यिक डॉ. द भि. कुलकर्णी यांचा माझा परिचय झाला. माझे लेख वाचून त्यांनी आता माझे पुस्तक निघायला हवे असा खूप आग्रह धरला. त्यातून माझा पहिला वैचारिक लेख संग्रह दाहक वास्तव हा प्रकाशित झाला. तिथून माझी पुस्तके निघत गेली आहेत आणि इतरत्रही लेख मागवले जात असल्याने लेखक म्हणून थोडीफार का होईना मान्यता मला मिळत आहे. 

आधी नमूद केल्यानुसार माझी आतापर्यंत १८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. एक प्रकाशानाच्या वाटेवर आहे, तर एका कादंबरीचे लेखन सुरू आहे. शिवाय जे विविध स्तंभ लिहितो त्याचीही पुस्तके निघावी अशा सूचना अनेक जण देत असतात. याशिवाय विविध वृत्तवाहिन्यांवर देखील मला निमंत्रण येत असतेच. अनेकदा काही मित्र "तुला इतके सुचते कसे?" हा प्रश्न विचारतात. पण सतत वाचन केल्याने माझी तशी मानसिकता तयार झाली आणि लिहायला बसल्यावर सुचत गेले म्हणून मी लिहीत जातो आहे .मला आठवते, एकदा एका वर्तमानपत्राने "सुचलं ते लिहिलं" याच शीर्षकाचा माझा स्तंभ सुमारे दीड वर्ष चालवला होता. मनात विचार येतात आणि ते कागदावर उमटवले जातात. ते लोकांना रुचतात म्हणून मग त्यांचा प्रतिसाद मिळाल्यावर मी लिहित जातो. 

अर्थात हे लिहू शकतो आहे, ते लहानपणापासून सकस वाचन केल्यामुळे, आणि ती माझी आवड जपली गेल्यामुळे. याच आवडीतून आज माझा स्वतःचा जवळजवळ हजार पुस्तकांचा संग्रह आहे. मला सकस वाचनाची सवय लागली ती माझी दिवंगत आहे सुमती विष्णुपंत पाठक हिच्यामुळे. त्यातूनच माझ्यातला लेखक घडत गेला असावा असे मला वाटते. 

आज २० ऑक्टोबर २०२६, आज आईचा विसावा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने आज या सर्व आठवणी जाग्या झाल्या आणि त्या आपल्याशी शेअर केल्या आहेत. 

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.