कालचक्र :- रोहित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील...?

 कालचक्र :-

रोहित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील...?

एम पी एस सी च्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांचे नातू आणि कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता बोलतांनाचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. त्या व्हिडिओत "होय रोहितदादांना मुख्यमंत्री करायचं आहे म्हणून आम्ही आंदोलन करतो आहोत," अशा आशयाचे विधान केले होते. हा व्हिडिओ भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी माध्यमांना दाखवला. त्यावरून आता रोहित पवार मुख्यमंत्री बनण्यासाठी जोर मारत आहेत का यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. 

राजकारणात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला आपण मुख्यमंत्री व्हावे, किंवा मग पंतप्रधान व्हावे असे स्वप्न पडणे यात गैर काहीही नाही,  रोहित पवारांचे आजोबा दस्तूरखुद्द शरदराव पवार यांनी देखील आपण पंतप्रधान होऊ असे स्वप्न दीर्घकाळ पाहिले होते. ते जमले नाही तर ते राष्ट्रपती होण्याचे ही स्वप्न बघत होते. दोन्हीही न जमल्यामुळे आता ते मुलीला एक तर केंद्रात मंत्री करायचे किंवा महाराष्ट्रात मुख्यमंत्री करायचे हे स्वप्न सातत्याने बघत असल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे शरद पवारांचे नातू असलेल्या रोहित पवारांना आपण मुख्यमंत्री बनावे हे स्वप्न पडण्यात काहीही गैर नाही. 

असे असले तरी रोहित पवारांना आज मुख्यमंत्री बनण्याची संधी कितपत आहे हे देखील तपासले जाणे गरजेचे आहे. राजकारणात काहीही होऊ शकते म्हणतात. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या भारतीय जनता पक्षाला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. त्याच भारतीय जनता पक्षाचे अटल बिहारी वाजपेयी १९९६ मध्ये तेरा दिवसाचे का होईना पण पंतप्रधान बनले होते. नंतर १९९८ मध्ये ते पुन्हा पंतप्रधान बनलेच. त्याच भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी २०१४ मध्ये चक्क स्पष्ट बहुमत मिळवून पंतप्रधान झाले होते आणि गेली बारा वर्षे ते देशावर राज्य करत आहेत. त्यामुळे आज रोहित पवारांचे पक्षाचे महाराष्ट्राच्या विधानसभेत फक्त दहा आमदार असले तरी उद्या ते शंभर व्हायला वेळही लागणार नाही. त्यामुळे त्यांनी हे स्वप्न जरूर बघावे, बित्तमबातमीच्या त्यांना शुभेच्छा आहेत.

मात्र त्याचवेळी या शक्यतेचे स्वॉट असेसमेंट होणे गरजेचे आहे. स्वॉट असेसमेंट म्हणजे स्ट्रेंग्थ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट्स, शुद्ध मराठी भाषेत सांगायचे झाल्यास तुमची बलस्थाने कमतरता संधी आणि आव्हाने याचा विचार करायला हवाझ. रोहित पवार हे शरद पवारांचे नातू आहेत. त्यामुळे राजकीय वारसा त्यांना लाभलेला आहे. मात्र माझ्या मते ते त्यांचे जसे बलस्थान आहे,ब तसेच ती त्यांची सुद्धा उणीव सुद्धा ठरू शकतेच. साधारणपणे १९६७ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झालेले शरद पवार १९७८ मध्ये वयाच्या ३७ व्या वर्षी मुख्यमंत्री बनले होते. त्यावेळी त्यांना पक्षातून पुरेशी ताकद होती असे नाही, मात्र पक्ष फोडून आणि इतरांशी हात मिळवणी करून त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात गेली ४८ वर्षे ते कायम आपला वर्चस्व ठेवूनच राहिले आहेत. शरद पवारांनी आपल्या कुटुंबातील राजकीय वारस हवा म्हणून आधी अजित पवारांना म्हणजेच पुतण्याला पुढे केले. मात्र २००५ मध्ये जेव्हा सुप्रिया सुळे महाराष्ट्रात आल्या तेव्हा अजित पवारांना बाजूला सारत त्यांनी सुप्रिया सुळे यांना पुढे आणले.सुप्रियांना पुढे आणण्यासाठी त्यांनी प्रसंगी अजित पवारांचे खच्चीकरण करायलाही मागेपुढे पाहिले नाही. २००५ मध्ये मला मुख्यमंत्री बनण्याचीऋ संधी होती, मात्र काकांनी ती घालवली असा आरोपच अजित पवारांनी केला होता हा इतिहास ताजा आहे. त्यामुळेच दीर्घकाळ संघर्ष करून अजित पवारांनी शेवटी पक्ष सोडला आणि सोबत चाळीस आमदार नेत वेगळी चूल मांडली होती हा इतिहास ताजा आहे. त्यानंतर अथक प्रयत्न करूनही अजित पवार त्यांच्यासोबत आले नाहीत. अजित पवार अपघातात गेल्यावर तरी आपण एक होऊ असे शरद पवारांना वाटले. तसे करून पुन्हा जमल्यास सुप्रियांनाच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनवायचे असाही त्यांचा प्रयत्न असावा. मात्र आजही ते शक्य झाले नाही. उलटपक्षी शरद पवारांची ताकद हळूहळू संपत असलेली दिसून येते आहे. नुकत्याच झालेल्या सोमनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ते दिसून आले आहे. शरद पवारांना पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होता आले नाही याचे दुःख तर आहेच, आता मुलीला तरी सन्मानाची जागा मिळावी हीच त्यांची अपेक्षा राहिलेली आहे. त्यामुळे जर संधी आली तर ते रोहित पवारांना डावलून सुप्रिया सुळे यांना पुढे आणण्यासाठी ताकद लावतील हे उघड आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर रोहित पवारांना देखील आजोबांच्या छत्रछायेतून बाहेर निघून काकांप्रमाणेच स्वतःची ताकद निर्माण करावी लागेल तरच त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकते. 

शरद पवार मुख्यमंत्री होण्यापूर्वी महाराष्ट्रात आधी साधा आमदार, मग राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्री होते. त्यावेळी ते फारसे प्रसिद्धीच्या झोतात राहायचे नाहीत. मात्र आतून जुळवाजुळव करत राहणे हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यामुळे ते मंत्री, मुख्यमंत्री, विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते, लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार, केंद्रात मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते ही सर्व पदे मिळवू शकले. रोहित पवारांना मात्र सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहायला आवडते. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिल्यामुळे त्यांना अनेक शत्रूही तयार झाले आहेत. अनेकांना ते अकारण अंगावर घेत असतात. बरेचदा त्यांचे सातत्याने माध्यमांशी बोलणे हे काहीसे वादग्रस्त ठरत असते. शरद पवारांनी अशी चूक कधी केली नव्हती. त्यामुळे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा पवार फक्त काँग्रेस फोडून बाहेर पडले, यापलीकडे त्यांच्या विरोधात कोणतेही वाद नव्हते. रोहित पवार मात्र सतत वेगवेगळी विधाने करून वाद निर्माण करत असतात. आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात त्यांनी उडी घेतली खरी, पण त्यातून हवे ते साध्य झालेले नाही. परिणामी विद्यार्थ्यांची त्यांच्यावर कुठेतरी नाराजी असल्याचे जाणवते आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर तो अपघात होता की घातपात हा मुद्दा खरे तर सुनेत्रा पवार आणि त्यांच्या पार्थ आणि जय या दोन मुलांनी ताणून धरायला हवा होता. मात्र रोहित पवारच तो ताणून धरत राहिले. त्यातून साध्या काहीही झाले नाही. सुनेत्रा पवार आणि त्यांची दोन्ही मुले शांतपणे पुढे जात राहिली. हा हा अतिवाचाळपणा कदाचित त्यांना अडचणीचाही ठरू शकतो. 

आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचे तर २८८ आमदारांच्या सभागृहात किमान दीडशे आमदार तुमच्या सोबत असायला हवे. तुमच्या पक्षात आज १० आमदार देखील नाहीत. पक्षाचे नेतृत्वही तुमच्या हाती नाही जर फोडाफोडीच्या राजकारणात तुमच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळायची वेळ आली तर सर्वप्रथम तुमचे आजोबा तुमच्या आत्याला म्हणजेच आपल्या मुलीला संधी देतील. मग कदाचित तुम्ही रांगेत राहू शकाल. जर तोवर रेवती लखानी पुढे आल्या तर तुमचाही अजित पवार व्हायला वेळ लागू शकत नाही. हा धोका देखील रोहित पवारांनी लक्षात घ्यायला हवा. 

आज मुख्यमंत्री व्हायचे असेल तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून कसा पाठिंबा मिळतो त्यावर तुमचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. आज पश्चिम महाराष्ट्र कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात रोहित पवारांना कोणीही फारसे ओळखत नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात देखील ते शरद पवारांचे नातू म्हणून ओळखले जातात. शरद पवारांच्या छत्रीखालून निघत स्वतःची स्वतंत्र ओळख त्यांना निर्माण करावी लागेल आणि स्वबळावर आपण चमत्कार घडवू शकतो हे महाराष्ट्राला दाखवून द्यावे लागेल. शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून त्यांच्यासोबत विश्वासू शिलेदार आले होते, तसे विश्वासू शिलेदार रोहित पवारांना देखील आपल्या सोबत आणावे लागतील. तरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याची संधी त्यांना मिळू शकते. फक्त पवारांच्या छत्रछाये खालून बाहेर निघायचे, इतकेच नाही तर त्याचवेळी आपला कथित पुरोगामी चेहरा कायम ठेवत प्रसंगी भाजपाला आणि प्रसंगी शिवसेनेला जवळ करून त्यांना पुढे जावे लागेल. त्याचबरोबर कधी रिपब्लिकन कधी शेकाप कधी वंचित तर कधी बसत या सगळ्यांना चुचकारून जवळ करावे लागेल. हे सर्व रोहित पवारांचा अति आक्रमक स्वभाव लक्षात घेता त्यांना जमेल का हाही प्रश्न आहे. त्यांचे आजोबा शरद पवार हे ठाम निर्णय घेणारे असले तरी प्रसंगी जुळवून घेत माणसे जोडणारे आहेत. ते गुण रोहित पवारांमध्ये असल्याचे आज तरी  जाणवत नाही. 

अर्थात राजकारणात काहीही आणि कधीही घडू शकते याचा अनुभव गेली ५४वर्षे राजकीय पत्रकारिता करताना घेतला आहे. अन्यथा बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधीच झाले नसते. त्यामुळे रोहित पवारांच्या कुंडलित राजयोग असेल आणि मुख्यमंत्रीपद मिळण्याचे योग असतील तर मुख्यमंत्री जरूर होतील. ते मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आमच्याही त्यांना शुभेच्छा आहेत.

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.