"सहज सुचलं म्हणून" महागाईसोबत जगण्याची आता सवय करायला हवी.

"सहज सुचलं म्हणून"

महागाईसोबत जगण्याची आता सवय करायला हवी.

आज सकाळी समाज माध्यमावर एक पोस्ट बघायला मिळाली. त्यामध्ये एका वृत्तपत्राची बातमी होती. त्या बातमीत १९६० साली दहा रुपयांत काय काय किती भावाने मिळत होते ती सर्व यादी दिलेली आहे. त्यात आज ७२ रुपये लिटर मिळत असलेले दूध ३६ नवे पैसे लिटर मिळत असल्याचे दाखवले आहे, तर आज पन्नास रुपये किलोच्या वर असलेली साखर त्यावेळी १ रुपया २० पैसे प्रति किलो या दराने मिळत असल्याचे दाखवले आहे. इतरही गहू, तांदूळ, ज्वारी, कांदे, बटाटे इत्यादींचे भाव दिले असून १० रुपयात खूप काही खरेदी होऊ शकत होते असे त्या बातमीत दाखवले आहे.

ही बातमी बघितल्यावर आजची जेन झी किंवा जेन अल्फा पिढी या बातमीवर कधीच विश्वास ठेवणार नाही हे निश्चित, पण आमच्या पिढीतील सगळ्यांनीच तो काळ पाहिला आहे. त्यामुळे आमच्या पिढीचा विश्वास बसणार हे पक्के आहे. आज सोन्याचा दर दहा ग्राम ला म्हणजेच जुन्या एक तोळ्याला १,६०,०००/- रुपये इतका झाला आहे. तो अजूनही वाढतोच आहे. १९६६ साली माझी मुंज झाली. त्यावेळी आई-वडिलांनी काही थोडेफार सोने खरेदी केले होते. त्यावेळी सोन्याचा भाव १८० रुपये तोळा म्हणजेच आजचे दहा ग्रॅम इतका होता. हे बघता किती भयंकर दरवाढ झाली आहे हे स्पष्ट दिसते आहे. त्या काळात दोन हजार रुपये खर्च करून माझी मुंज अगदी थाटामाटात झाली होती हे आठवते.

आज लोणी कढवून तूप करायचे तर लोण्याचा भाव सातशे ते आठशे रुपये किलो इतका आहे. मला आठवते  १९७० मध्ये मी घरच्यासाठी ८ रुपये किलो दराने लोणी आणलेले आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार आले तेव्हा पेट्रोल माझ्या आठवणीनुसार ८६ रुपये लिटर इतके होते. आज ते ११५ रुपये लिटरच्या आसपास गेले आहे. त्यामुळे सामान्य माणूस प्रचंड ओरड करतो. मात्र मला आठवते आमच्या घरी वडिलांनी पहिली स्कूटर १९६९ साली घेतली होती. त्यावेळी ४२ नवे पैसे प्रति लिटर इतका पेट्रोलचा भाव होता. हे बघतात पेट्रोलचे दर सुद्धा किती झपाटून वाढलेत हे दिसते आहे. विशेष म्हणजे दरवाढ झाली की काही काळ सामान्य नागरिक आरडाओरडा करतो. मग ही दरवाढ त्याला अंगवळणी पडते. १९७४ मध्ये आखाती देशांमध्ये युद्ध झाले. त्यावेळी भारतात १ रुपया १० पैशावरून पेट्रोलचे भाव ३ रुपये १० पैसे प्रति लिटर इतके झाले, त्यावेळी प्रचंड गोंधळ केला गेला होता. अनेकांनी पेट्रोल परवडणार नाही म्हणून स्कूटर वरून सायकलवर येणे पसंत केले होते, तर ज्यांच्याकडे कार होत्या त्यांनी स्कूटर बाहेर काढल्या होत्या. हा प्रकार काही दिवस चालला. नंतर सर्वांनाच या दरवाढीची सवय झाली. हळूहळू सर्वजण पुन्हा आपल्या जुन्या वाहनांवर आलेले दिसले होते. 

त्या काळात नवी कोरी सायकल अडीचशे ते तीनशे रुपयाला मिळायची, तर सायकलमध्ये एका चाकात हवा भरण्यासाठी पाच पैसे द्यावे लागायचे. सायकल मध्ये एखादा पंक्चर झाला तर पंधरा नवीन पैसे दिले की पंचर सुधारून मिळायचा. आज त्याचे भाव किती आहे हे आपण सर्व बघतोच.

जो प्रकार सोने अन्नधान्य पेट्रोल आणि उपकरणे याबाबतीत होतो आहे, तोच प्रकार जमिनींच्या बाबतीतही झालेला आहे. १९५९ साली नागपुरात लक्ष्मी नगर परिसरात भूखंड दोन हजार रुपये भावाने विकले गेले. तेच भूखंड आज दहा कोटी रुपयांना विकले जात आहेत. शेत जमिनींचे भाव देखील अमर्याद वाढलेले आहेत. वाहनांच्या बाबतीत देखील तेच आहे. १९७० साली साडेतीन हजार रुपयाला मिळणारी वेस्पा स्कूटर आता भलेही कालवाह्य झाली आहे, मात्र त्याच पद्धतीच्या इतर स्कूटर्स आज ८०हजार ते एक लाख या घरात विकल्या जात आहेत. चार चाकी गाड्यांच्या किमती देखील अशाच वाढलेल्या आहेत. 

१९७० साली एसएससी परीक्षा मी पास होऊन मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी आमच्या हिस्लॉप कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चार आणे म्हणजेच आजचे २५ पैसे प्रति प्लेट समोसा मिळत होता. आज नागपुरात किंवा इतरत्र देखील ३० रुपये प्लेट पेक्षा स्वस्त दरात समोसा मिळणे कठीण आहे.. हे बघता गेल्या ६०-७० वर्षात किती झपाटून कशी दरवाढ झाली हे लक्षात येईल. 

ही दरवाढीमुळे ओळखफक्त गेल्या ६०-७०वर्षातच झाली असे नाही, तर त्यापूर्वी देखील होती. आजपासून ९० वर्षांपूर्वी माझ्या आजोबांच्या काळात एक शाळा शिक्षक म्हणून त्यांना दहा रुपये महिना पगार मिळत होता अशी माहिती वडील द्यायचे. त्या दहा रुपयात चार मुलांचा संसार, पै पाहुणे असे सर्व काही सांभाळून बचतीचा देखील विचार करू शकायचे. आज दहा रुपयात एका दिवसात फुटाणे खाऊन जगतो म्हटले तरी शक्य होणार नाही. 

पगाराचे हे दर वाढत वाढत माझे वडील नोकरीला लागले तेव्हा म्हणजे १९५० च्या दरम्यान त्यांना दोनशे रुपये महिना इतका पगार मिळत होता. नंतर तो तीनशे रुपये महिना झाला होता. त्यातही ते चार मुलांचा संसार चालवत होते, तितकेच काय पण याच पगाराच्या भरवशावर त्यांनी नागपुरात स्वतःचे घर देखील बांधले होते. आज ५० हजार रुपये महिना पगार सुद्धा आम्हाला अपुरा पडतो. याला कारण वाढती महागाई हेच आहे. 

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर देशात काँग्रेसचे सरकार आले. आधीच्या महागाईसाठी इंग्रज सरकारला जबाबदार धरले जात होते. मात्र काँग्रेसच्या काळात देखील महागाई वाढतच होती.महागाई वाढली की पगार देखील वाढायचे आणि पगार वाढले की महागाई वाढत राहायची, असे दुष्टचक्र सुरू होते. ते आजही सुरू आहे. देशात अगदी १९९८ पर्यंत काँग्रेस प्रणितच सरकार सत्तेत होते. तेव्हा महागाई वाढतच होती आणि विरोधक सरकारच्या नावाने महागाई आटोक्यात आणता येत नाही म्हणून शंख करत होते. १९९८ ते २००४ या काळात देशात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार होते. त्यावेळी देखील भाववाढ होतच होती. तेव्हा विरोधक भाजपच्या नावाने ओरडत होते. पुन्हा २००४ ते २०१४ या काळात काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार देशात सत्तेवर होते. तेव्हा तर महागाई अधिकच वेगाने वाढली. त्यावेळी भाजपवाले या आघाडी सरकारला भाव वाढीसाठी कायम धारेवर धरत होते. हे सर्व प्रकार आपण बघतोच आहोत. आता २०१४ पासून नरेंद्र मोदी सरकार देखील भाववाढ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असेलही. मात्र त्याला दाद न देता महागाई वाढतेच आहे आणि विरोधक मोदी सरकारच्या नावे आरडाओरड करत आहेतच. 

हे बघता मुद्दा असा येतो या अवास्तव दरवाढीला फक्त सत्ताधारीत जबाबदार आहेत का? कारण इंग्रजांपासूनचा काळ बघितला तर प्रत्येक राज्यकारभारात दरवाढ ही होतेच आहे. महागाई ही वाढतेच आहे. कोणतेही सरकार आले तरी त्यांना महागाईवर अंकुश ठेवणे शक्य झालेले नाही. महाराष्ट्रात शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार आले तेव्हा त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू असे वचन दिले होते. त्यांनी मंत्रालयासमोर डाळ तांदूळ गहू तेल इत्यादींचे प्रति किलोचे भाव देखील एका बोर्डावर रंगवून ठेवले होते आणि आम्ही ते स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत असे तत्कालीन मुख्यमंत्री सांगत होते. काही काळ त्यांना ते शक्य झाले, मात्र नंतर परिस्थिती त्यांच्याही आटोक्याबाहेर गेली होती हे विशेष. 

हे बघता महागाई ही एक सतत चालू राहणारी प्रक्रिया आहे हे मान्य करत आपल्याला त्यासोबतच जगण्याची सवय करायला हवी आणि आयुष्याचे तसे नियोजन करायला हवे. तसे जर झाले तरच आम्हा सर्वांचे आणि विशेषतः पुढच्या पिढ्यांचे आयुष्य सुकर होईल.. इतकेच सहज सुचले म्हणून सांगावेसे वाटते.

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.