माझंही मत ही आंदोलने देशात अराजकाची स्थिती निर्माण करण्यासाठी...
माझंही मत
ही आंदोलने देशात अराजकाची स्थिती निर्माण करण्यासाठी...
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने जंतर मंतर या दिल्ली शहरातील महत्त्वपूर्ण चौकात आंदोलन करण्यास बंदी घातली आहे. शहरात आंदोलन करण्यासाठी ज्या जागा निश्चित केल्या होत्या. त्यात आधी जंतर मंतर ते नाव होते. मात्र नुकत्याच झालेल्या काही प्रकारांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. सहाजिकच देशातील सर्व विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या या निर्णयावर तुटून पडलेले दिसून येत आहेत. याचा निषेध म्हणून दोन दिवसांपूर्वी कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जंतर मंतर चौकात जाऊन तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असल्याची बातमी आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी या निर्णयाची तुलना इंग्रज सरकारच्या काळाशी केली आहे. आपल्या देशात तिरंगा फडकवण्यासाठी देखील बंदी केली जाते. अशी बंदी इंग्रजांच्या काळात घातली जात होती आणि तिरंगा फडकवणाऱ्यांना अटक करून तुरुंगात डांबले जात होते. तसेच प्रकार केंद्र सरकार आज करते आहे असा आरोप दिपके यांनी केला आहे. नरेंद्र मोदी हे भेकड पंतप्रधान आहेत. ते घाबरलेले असल्यामुळेच असे निर्णय घेत असल्याचा आरोप देखील दिपके यांनी केला आहे.
वस्तूतः केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने जंतर मंतर मध्ये आंदोलन करण्यास अशी बंदी का घातली याचाही विचार होणे गरजेचे आहे. आतापर्यंत जंतर-मंतरवर आंदोलने व्हायची मात्र ती योग्य पद्धतीने परवानगी घेऊन नियमाच्या चौकटीत राहून केली जायची. अभिजीत दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीने जुलैमध्ये धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी केलेले आंदोलन आणि नंतर काँग्रेसने केलेले आंदोलन मात्र नियमांच्या चौकटी तोडून केलेले आंदोलन होते असा आरोप केला जातो आहे. त्यांच्या आंदोलनामुळे त्या परिसरातील रहदारी पूर्णतः विस्कळीत झाली होती. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. जंतर-मंतर, कॅनॉट प्लेस हे सर्व दिल्लीतील गजबजलेले भाग आहेत. त्यामुळे इथे असे दीर्घकालीन आंदोलन झाले तर जनसामान्यांची चांगलीच अडचण होत असते. आपण जनसामान्यांना वेठीस धरले आहे याचा वृथा अभिमान आंदोलक बाळगत असतात. मात्र जनसामान्यांच्या गैरसोयीचे त्यांना काहीच सोयर सुतक नसते.
त्यामुळेच जनसामान्यांची होणारी गैरसोय लक्षात घेत केंद्र सरकारने जंतर-मंतरवर आंदोलन करण्यास बंदी घातली आहे. सध्या एस आय आर च्या मुद्द्यावरून विरोधक मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागत आहेत. वस्तुतः एस आय आर म्हणजेच मतदार यादी पुनरिक्षण हे गरजेचेच होते. त्यामुळे ते झाले त्याला काहीच हरकत नाही. त्या प्रक्रियेत देशातील १३ कोटी मतदारांची नावे गाळली गेली असेही समोर आले आहे. ही नावे का गाळली असा विरोधकांचा सवाल आहे. मात्र ज्यांची नावे गाळली त्यांना पुन्हा सक्षम अधिकाऱ्यासमोर उभे राहून आपली बाजू पटवून देण्याचा हक्क देण्यात आला आहे. मात्र तो न बजावता आमचे मतदार गाळले म्हणून ज्ञानेश कुमारांचा राजीनामा असा बालिश हट्ट विरोधक करत आहेत. अभिजीत दीपके यांना देखील त्याच आंदोलनात विरोधकांनी उतरवले आहे. त्यांचाही जंतरमध्येच आंदोलन करण्याचा डाव होता. त्यामुळे जंतर-मंतरवर आंदोलन करण्यास बंदी घातली गेली. जनसामान्यांच्या नजरेतून विचार करता हा निर्णय स्वागतार्ह म्हणावा लागेल. मात्र विरोधक या मुद्द्यावर केंद्र सरकारवर जबरदस्त टीका करत असून त्यांचे याबाबत राजकारण देखील सुरू आहे.
या देशात नियमांच्या अधीन राहून तिरंगा फडकवण्यास कोणाचीही हरकत नसते. किंबहुना गेल्या काही वर्षात स्वातंत्र्य दिन आणि गणतंत्र दिन या सणांच्या दरम्यान हर घर तिरंगा हे अभियान देखील राबवले जाते आहे. ही बाब लक्षात घेता अभिजीत दिपके आणि त्यांचे सहकारी जर तिरंगा घेऊन जंतर-मंतर चौकात गेले असते, आणि त्यांनी तिथे तिरंगा फडकवून राष्ट्रगीत गाऊन तिथून परत फिरले असते तर त्यांना परवानगी मिळायला कोणतीही अडचण आली नसती. मात्र त्यांचा हेतू फक्त तिरंगा फडकवण्याचा होता का याचा देखील खुलासा त्यांनी करायला हवा. आज दिल्लीत एका पत्र परिषदेत बोलताना अभिजीत दिपके यांनी देशात इंग्रजांचे राज्य सुरू आहे असा आरोप केला. इतकेच काय पण त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औकात काढली. देशाच्या पंतप्रधानाची अशी जाहीरपणे पोरासोराने औकात काढणे कितपत योग्य आहे याचाही विचार व्हायला हवा.
आज अभिजीत दिपके यांच्या पत्र परिषदेनंतर भारतीय जनता पक्षाची पत्र परिषद झाली. त्यात भाजप प्रवक्त्याने असा आरोप केला आहे की ज्याप्रमाणे बांगलादेश आणि पाकिस्तान मध्ये युवकांना पुढे करून अराजक माजवले गेले आणि सत्ता बदल घडवला गेला, तसाच प्रकार परकीय शक्तींना भारतात घडवायचा आहे. त्यासाठी हे सर्व प्रकार सुरू आहेत या आरोपातील तथ्य देखील नाकारता येत नाही.
काल काल एका खाजगी वृत्तवाहिनीवर दोन माओवाद्यांमधील पत्रव्यवहाराचा दाखला देत आपल्या देशात युवाशक्तीला हाताशी धरून अशाप्रकारे अराजक घडवण्याचा माओवाद्यांचा डाव असून त्यासाठी परदेशातून फंडिंग होते आहे असा दावा केला गेला. अमेरिकेतील एका प्रसिद्ध गायिकेचे पत्र दाखवून आधी अमेरिकेत असलेल्या भारतीयांचे ब्रेन वॉशिंग करायचे आणि मग त्यांना भारतात पाठवून युवाशक्तीला भडकवण्यासाठी त्यांचा उपयोग करायचा असा डाव असल्याचाही दावा यावेळी केला गेला. यातील तथ्य देखील नाकारता येत नाही. अभिजीत दिपके हे शिक्षणासाठी अमेरिकेत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी तरुणाईला कॉक्रोच म्हटले आणि त्याची दखल घेत लगेच या अभिजीत दिपके याने कॉकरोच जनता पार्टी ऑनलाइन गठीत केली. त्याला मिळालेला प्रतिसाद बघून त्याने आपले शिक्षण सोडून देत भारतात येऊन आंदोलन केले. टीव्हीवरील बातम्यांमधून मिळालेल्या माहितीनुसार अभिजीत दिपके हा एक सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. मग तो खास आंदोलन करण्यासाठी अमेरिकेतून भारतात येतो काय, भारतातही सर्वत्र विमानाने फिरतो आणि आंदोलन उभे करतो त्यासाठी लागणारा पैसा तो कुठून उभा करतो याचे वास्तव देखील जनसामान्यांसमोर यायला हवे. एकूणच अभिजीत दिपकेच्या मागे बोलविता धनी कोण आहे हे लोकांसमोर यायला हवे.
नरेंद्र मोदी २०१४ मध्ये देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांनी धडाकेबाज कार्यशाहीने कार्य शैलीने देशात अनेक सुधारणा घडवण्याचा प्रयत्न केला आहे. आज भारत जगातील चौथ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता आहे. भारतातील अंबानी अदानी टाटा हे उद्योगपती जगातील टॉप टेन मध्ये गणले जातात. भारत शस्त्रास्त्रांच्या बाबतीत देखील स्वयंपूर्ण होतो आहे. पाकिस्तानला दोनदा भारताने चांगलेच पाणी पाजले आहे. हेच देशातील प्रगत राष्ट्रांना खटकते आहे. त्यांना भारत त्यांच्या ताटाखालचे मांजर असावे अशी अपेक्षा आहे. मात्र मोदींच्या कार्यशैलीने आणि देशातील जनतेने त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासामुळे नजीकच्या भविष्यात तरी ते शक्य नाही. त्यामुळेच देशातील अंतर्गत शक्तींनाच हाताशी धरून देशात अराजक निर्माण करायचे आणि मग देश खिळखिळा करून तिथे सत्ता बदल घडवायचा आणि आपल्या सोयीचे सरकार आणून भारतावर आपल्या रिमोट कंट्रोल ने राज्य करायचे हे यांचे धोरण आहे. मोदींमुळे ते शक्य होत नसल्यामुळे ते असा देशांतर्गत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप काही जाणकारांकडून केला जातो आहे. त्यातील वास्तव देखील नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर देशातील जनसामान्यांनीच आता जागृत व्हायला हवे. आपले भले कशात आहे, हा देश प्रगतीच्या शिखरावर कशामुळे जाऊ शकतो, याचे नीरक्षीर विवेकाने परीक्षण करून योग्य असे सरकार देशात आणणे आणि ते टिकवणे ही इथल्या प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपण सर्वांनीच पाळायला हवी असे मला वाटते.
अर्थात हे माझे मत झाले.......
आपले स्पष्ट आणि परखड मत आपण सर्वच मांडू शकता.....
त्याचे स्वागतच होईल.....
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment