आठवणींच्या हिंदोळ्यावर.... आठवण पहिल्या शासकीय पुरस्काराची...

 आठवणींच्या हिंदोळ्यावर.... २०

आठवण पहिल्या शासकीय पुरस्काराची...



आपल्या आयुष्यात कोणताही पुरस्कार हा महत्त्वाचा असतो. मात्र एखादवेळी तुमच्या एखाद्या कामाला शासकीय पुरस्कार मिळाला म्हणजे तुमच्या कामावर ती शासकीय मोहोर उमटली असते. त्यामुळे अशा शासकीय पुरस्कारांचे महत्त्व बहुतेकांना जास्तच असते. तसेच मलाही होते. आयुष्यात शालेय जीवनात काही पाठांतर स्पर्धेत वगैरे पुरस्कार मिळाले. नंतर व्यवसायात आल्यावर फारसा पुरस्कारांशी संबंध आला नव्हता. नंतर दिवाळी अंक काढणे सुरू केले आणि त्याला सर्व वर्षी दरवर्षी काही ना काही पुरस्कार मिळू लागले. त्याच दरम्यान पत्रकारितेसाठी देखील काही सामाजिक संघटनांचे पुरस्कार मिळाले. मात्र ग्रंथ पुरस्कार असा कधीच मिळाला नव्हता, आणि त्यातही शासकीय पुरस्कार हा तर नव्हताच. माझ्या आयुष्यात मला मी संपादित केलेल्या पुस्तकासाठी पहिला पुरस्कार मिळाला तो महाराष्ट्र शासनाचाच. माझ्यासाठी तो आनंदाचाच प्रसंग होता, इतकेच काय पण माझ्या कामावर शासनाची मोहोर उमटली होती असे म्हटल्यास चुकीचं ठरू नये. त्याचीच आठवण आज मी सांगणार आहे. 

पत्रकार या नात्याने मी लेखन खूप करत होतो. दिवाळी अंकांचे संपादन देखील करत होतो. मात्र माझ्या लेखांचे संकलन किंवा एखाद्या विषयावर लिहिलेले लिहिलेले पुस्तक असे प्रकाशित झाले नव्हते. मराठीतील  ख्यातनाम साहित्यिक आणि समीक्षक डॉ. द.भि. कुळकर्णी यांचा माझा नियमित संपर्क होता. माझ्या दिवाळी अंकाचे ते नियमित लेखक होते. दिवाळी अंक किंवा इतरत्र मी लेख जे लेख लिहिले होते, ते वाचून एकदा द. भि. सरांनी मला प्रश्न केला "अविनाश तुझी आतापर्यंत किती पुस्तके प्रकाशित झाली आहेत?" ज्यावेळी मी "एकही नाही" असे उत्तर दिले, त्यावेळी ते चांगलेच रागावले. अर्थात तरीही मी मनावर घेतले नव्हते. त्याच काळात विनायक देशपांडे नामक माझा प्रकाशक मित्र हा देखील माझ्या मागे पडला होता. मात्र दोघांनाही मी दाद देत नव्हतो. 

ही घटना २००४ ची,अशीच दोन वर्षे गेली.  २००७च्या दिवाळी अंकासाठी माझी तयारी सुरू होती. त्यावेळी मी द.भि. सरांना लेखासाठी फोन केला. मग आमच्या इतर गप्पा देखील सुरू झाल्या. त्यावेळी साहित्य संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक सुरू होती. त्याच पार्श्वभूमीवर मी त्या आधीचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण साधू यांना एक अनावृत्त पत्र लिहिले होते. ते प्रकाशित देखील झाले. त्यातील काही मजकूर मी सरांना वाचून दाखवला. मग तो ऐकल्यावर सरांनी मला प्रश्न विचारला "अविनाश तुझे असे किती लेख असावेत?" जेव्हा मी त्यांना सांगितले की हजारच्या वर तरी आहेत, तर ते म्हणाले "त्यातले २५ लेख निवड आणि त्याचे पुस्तक कर." मी टाळायचा प्रयत्न करत होतो. योगायोगाने त्यावेळी विनायक देशपांडे देखील समोर बसला होता. त्याने देखील ते सूत्र धरले, "तू पुस्तक काढतोस असा होकार दिला तरच मी तुला दिवाळी अंकात लेख देईल" अशी अटच द.भि. सरांनी मला घातली.नाईलाजाने मी होकार देऊन बसलो. 

यातूनच "दाहक वास्तव" हा माझा पहिला वैचारीक लेखसंग्रह प्रकाशित झाला. त्याचे प्रकाशन २००८ च्या मे महिन्यात झाले होते. त्याच दरम्यान मी एक कादंबरी देखील लिहायला घेतली होती. ती देखील प्रकाशित करावी असा आग्रह धरला गेला. त्याच बरोबर मी दोन दिवाळी अंकांमध्ये जे वांङमयविषयक परिसंवाद घेतले होते, त्याचे संकलन पुस्तक रूपात प्रकाशित व्हावे असाही आग्रह डॉ द.भि.कुळकर्णी आणि डॉ यशवंत मनोहर यांच्याकडून होत होता. मग "पूर्णांक सुखाचा"ही कादंबरी, आणि "मराठी वाङमय व्यवहार- चिंतन आणि चिंता" हे संपादित पुस्तक असे ऑक्टोबर २००८ मध्ये प्रसिद्ध झाले. 

२००९ मध्ये जानेवारी महिन्यात राज्य शासनाची उत्कृष्ट वांग्मय पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याबाबत जाहिरात आली. त्यासाठी ३१ जानेवारी२००९ पर्यंत पुस्तके पाठवायची होती. पहिलेच वर्ष असल्यामुळे उत्साहाने मी तिनही पुस्तके पाठवून दिली आणि  विसरूनही गेलो.

डिसेंबर २००९ ची ३ तारीख होती ती. त्या दिवशी संध्याकाळी माझ्याच घरी असलेल्या माझ्या ऑफिसमध्ये बसून मी कोणत्या बातम्या पाठवायच्या त्याचे नियोजन करत होतो. सोबत माझी डी टी पी ऑपरेटर संगीता चांदेकर आणि माझा सहकारी पत्रकार महेश उपदेव हे देखील होते. बाजूलाच खुर्चीवर ऑफिसमध्ये वर काम करणारा राजेंद्र हा चपराशी देखील होता. कोणत्या बातम्या घ्यायच्या याची सूचना देणे तसेच आलेल्या बातम्या तपासणे आणि काही बातम्यांची फोनवरून जास्तीची माहिती मिळवणे हे माझे काम सुरू होते. अचानक माझ्या मोबाईलची रिंग वाजली. मी बघितले तर स्क्रीनवर विनय खरे असे नाव दिसले. विनय खरे हा माझा मुंबईतील पत्रकार मित्र होता. तो मंत्रालय बिटच कव्हर करत असे. त्यावेळी संध्याकाळी दिवसभराचे कार्यक्रम आटोपून ही मंडळी मंत्रालयाच्या प्रेस रूममध्ये बसायची आणि तिथूनच बातम्या फॅक्सवर पाठवायची. तसाच विनय तिथे बसला होता. मी फोन उचलला आणि बोलायला सुरुवात केली." बोला विनय खरे, कशी काय आठवण केली?" लगेच विनयने प्रश्न विचारला "अविनाश जी.. अविनाश विष्णुपंत पाठक, शुभेच्छा, आर १४, राणी लक्ष्मी नगर, नागपूर, हा तुमचाच पत्ता आहे ना?" मी होकार देताच त्याने पुढला प्रश्न केला "संवाद प्रकाशन हे तुम्हीच प्रकाशित करत असलेले पुस्तके आणि नियतकालिकांचे प्रकाशन आहे ना?" त्यालाही मी होकार दिला. लगेच त्याने पुन्हा प्रश्न विचारला." मराठी वाङ्मय व्यवहार- चिंतन आणि चिंता हे पुस्तक तुम्हीच संपादित केले आहे?" मी त्यालाही होकार दिला, तर अत्यानंदाने विनय ओरडला," अभिनंदन राव तुमच्या पुस्तकाला राज्य शासनाचा रा.ना. चव्हाण उत्कृष्ट संपादित ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे, आता पार्टी द्या." हे ऐकून मलाही आनंद झाला, मात्र माझा विश्वास बसत नव्हता. पहिल्याच झटक्यात आपल्या तीन पैकी एका पुस्तकाला शासनाचा पुरस्कार मिळावा हा माझ्यासाठी सुखद आश्चर्याचा धक्का होता. विनयने पुढे सांगितले "आज उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. आता बातमी लिहिण्यासाठी सर्व यादी वाचत असताना त्यात तुमचे नाव दिसले, म्हणून तुम्हाला फोन केला." मी त्याला सांगितले "माझा विश्वास बसत नाही, तू ते पूर्ण प्रेस रिलीजच मला फॅक्स कर, मग माझा विश्वास बसेल." " मी ताबडतोब फॅक्स करतो" असे विनयने सांगितले आणि फोन बंद केला. अवघ्या पाच मिनिटात फॅक्स फोनची रिंग वाजली आणि फॅक्स यायला सुरुवात झाली. ते जवळजवळ आठ पानांचे प्रेस रिलीज होते. त्यात मला मिळालेल्या पुरस्कारावर विनयने मुद्दाम गोल करून पाठवला होता. तो फॅक्स बघताच आम्हा सर्वांचीच खात्री पटली. दहा हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतीचिन्ह असा तो पुरस्कार होता. हा पुरस्कार सोहळा फेब्रुवारी २०१० मध्ये सांगलीला होणार असेही त्या प्रेस रिलीज मध्ये म्हटले होते. ही बातमी बघताच मी घरात असलेल्या पत्नीला आणि मुलीला देखील आवाज दिला आणि त्यांना ही बातमी सांगितली, तर लगेच महेशने "सर आता पेढे आणा आणि काहीतरी खारा सुद्धा बोलवा,"अशी मागणी केली. मग राजेंद्रला पिटाळले. तो पेढे आणि कचोऱ्या घेऊन आला. तोवर आता "दहा हजार मिळत आहेत तर वहिनींना पैठणी घेऊन द्या" असा अनाहूत सल्ला सुद्धा महेशने देऊन टाकला. पहिल्याच झटक्यात आपल्या तीन पैकी एका पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळतो आहे ही सर्वांसाठीच अतिशय आनंद देणारी बाब ठरली होती. 

विनयने प्रेस रूम मध्ये ही बातमी सांगितल्यामुळे मंत्रालयातील इतर पत्रकार मित्रांचे देखील फोन येणे सुरू झाले. पुस्तकाची संकल्पना डॉ यशवंत मनोहर आणि डॉ द.भि.कुलकर्णी सरांची होती. त्या दोघांनाही फोन करून  कळवले. पुस्तकाला प्रस्ताव सुरेश द्वादशिवारांची होती. त्यांनाही फोन केला. सर्वांनीच पहिल्याच झटक्यात मिळालेल्या यशाचे कौतुक केले. दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरला वाचून वडिलांचे वयोवृद्ध मित्र पुण्याचे प्रभाकर ठाकूर आणि नागपुरातीलच बाळ मोहरील यांचाही आवर्जून फोन आला होता

दुसऱ्या दिवशी ही बातमी सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाली तसेच आकाशवाणी आणि सह्याद्री वाहिनीवर ही सांगितले गे.ले मला मग अनेकांचे अभिनंदनाचे फोन येऊ लागले. माझ्या साहित्यिक विश्वातल्या मार्गदर्शक आणि सुहृद गिरीजाताई कीर यांचा दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तू चक्क सिक्सर मारलास म्हणून त्यांनी माझे कौतुकही केले. त्यादिवशी आम्हाला नागपूर जिल्ह्यात असलेल्या मोहपा येथे एका कौटुंबिक कार्यक्रमाला जायचे होते. मग जाताना आम्ही आमची कार आदाशाच्या दिशेने नेली आणि तिथे तिथला श्री गणेश चिंतामणी ला नैवेद्य दाखवून आणि नारळ फोडून आलो. दुपारी मी वृत्तांकन करत असलेल्या नाशिकच्या दैनिक गावकरीमधून फोन आला त्या यादीत गावकरीचे चार पत्रकार आणि लेखक पुरस्काराचे लाभार्थी होते. त्या सर्वांच्याच मुलाखती फोनवर घ्या आणि प्रकाशित करा असे संपादकांनी सांगितल्यामुळे स्वानंद बेदरकरचा मला फोन आला. त्याने फोनवरच माझी प्रतिक्रिया घेतली आणि दुसऱ्या दिवशी ती प्रकाशितही केली होती. 

ठरल्याप्रमाणे १४ फेब्रुवारी २०१० ला सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात पुरस्कार वितरण सोहळा नियोजित करण्यात आला होता. पुरस्काराच्या रोख राशीसह पुरस्कारार्थी आणि त्याच्यासोबत एक व्यक्ती अशा दोघांचाही प्रवासाचा एसी थ्री टायरचा खर्च सरकारतर्फे दिला जाणार होता. त्यामुळे आम्ही उभयता आणि सोबत आमची मुलगी असे तिघेही या सोहळ्यासाठी जाण्याचे नियोजन केले. सांगली पर्यंत जायचेच आहे तर थोडे पुढे कोल्हापूरला जाऊया आणि तिथे दर्शन घेऊन मग सांगलीला यावे असे आम्ही ठरवले. पुरस्कार सोहळा रविवारी होता. आम्ही शुक्रवारच्या महाराष्ट्र एक्सप्रेसने निघालो. शनिवारी दुपारी आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. तिथे एका राजकीय मित्रानेच गेस्ट हाऊसमध्ये निवासाची सोय केली होती. तिथे त्या दिवशी फ्रेश झालो आणि संध्याकाळी गावातच फिरलो, दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. पत्नी अनुरूपाने महालक्ष्मीची ओटी भरली आणि मग तिथून टॅक्सीनेच आम्ही सांगलीला निघालो. सांगलीला शासनातर्फेच आमची निवासाची सोय करण्यात आली होती. तिथे पोहोचून आम्ही तयार होऊन चार वाजता कार्यक्रम स्थळी पोहोचलो. 

कार्यक्रमाला राज्य मंत्रिमंडळातील तत्कालीन मंत्री जयंत पाटील, पतंगराव कदम प्रभृती उपस्थित होते. शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधी देखील मोठ्या संख्येत उपस्थित होते. प्रास्ताविकानंतर एकेकाचे नाव पुकारणे सुरू झाले. त्यावेळी मोठ्या स्क्रीनवर पुरस्कारार्थी लेखक साहित्यकाचा फोटो आणि त्याने काय काय काम केले आहे त्याची माहिती दाखवली जात होती, तसेच निवेदक सुद्धा वाचून दाखवत होते. 

यादीनुसार माझे नाव पुकारले गेले आणि मी सभागृहातून व्यासपीठावर पोहोचलो. मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या स्वाक्षरीचे मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख रकमेचा धनादेश असे स्वीकारून खाली उतरू लागलो, तर व्यासपीठावर असलेले एक मंत्री पतंगराव कदम आणि माझी चांगली ओळख होती. मला बघून पतंगराव समोर आले आणि माझा हातात हात घेत त्यांनी अभिनंदन केले. "तुम्ही पत्रकार आहात हे माहीत होते, पण पुस्तके देखील लिहिली हे आजच कळले. अजून काय काय करता ते खाजगीत सांगा," असे थट्टेत पतंगराव उच्चारले तेव्हा "नागपूर अधिवेशनात भेटलात की सविस्तर सांगतो" असे उत्तर देऊन हसतच मी खाली उतरलो. सांगली शहर नागपूरपासून बरेच दूर आहे. तिथे मला ओळखणारे फारसे कोणी नसणार म्हणजे मग माझे हे कौतुक बघायलाही घरचे वगळता कोणीच नाही, ही खंत कुठेतरी मनात होती. मात्र व्यासपीठावरून खाली उतरताना सभागृहाच्या एका दाराकडे लक्ष गेले, तर तिथे मला शाळेत शिकवणारे आणि नंतरही माझ्या उचापतींवर प्रेम करत माझ्याशी सतत संपर्क ठेवणारे शिक्षक विजय रानडे हे माझ्याकडे बघत हसत उभे होते. मला आज पुरस्कार मिळणार हे त्यांना माहीत होते त्यामुळे ते आवर्जून तिथे आले होते. मी त्यांच्याकडे जाऊ लागलो, तर त्यांनीच हाताने थांबवत नंतर भेटू असे सांगितले. 

कार्यक्रम संपल्यावर त्या परिसरातच सर्व पुरस्कारार्थी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. आम्ही बाहेर निघाल्यावर आधी रानडे सरांशी बोललो,  तोवर पुरस्कारार्थींमधील इतर परिचित मंडळींची देखील बोलणे सुरू झाले. त्या काळात मी कोल्हापूरच्या दैनिक पुढारीसाठी देखील वृत्तांकन करत असे. दैनिक पुढारीच्या सांगली ऑफिसने त्यांच्या प्रतिनिधीला कार्यक्रमानंतर माझ्याशी आवर्जून बोलायला सांगितले होते. ते प्रतिनिधी आणि छायाचित्रकार सुद्धा माझ्याशी बोलायला आले. मग त्या छायाचित्रकाराकडून पुरस्कार हातात घेत आम्हा सगळ्यांचे फोटोही काढून घेतले. दुसऱ्याच दिवशी ऑफिसमध्ये फोटो देतो असे त्याने सांगितले. 

स्नेहभोजनाचे वेळी देखील माझा सर्व मंडळींशी जनसंपर्क चालूच होता. त्यात या समारंभात गिरिजाताई खीर यांच्याही एका पुस्तकाला पुरस्कार होता. मी इकडे तिकडे भटकत होतो आणि माझी पत्नी अनुरूपा आणि मुलगी दिव्येशा गिरीजा ताईजवळच माझी वाट पाहत थांबल्या होत्या. मी तिथे पोहोचलो तेव्हा गिरिजाताई थट्टेत म्हणाल्या "दिव्येशा, तुम्ही मायलेकी आता वाट पाहू नका, जेवू.न घ्या, तुझा बाबा चांगलाच गरजला आहे. आज त्याला काही जेवणाची शुद्ध नाही त्याची वाट बघू नका." त्यावर सर्वांनाच हसू आवरले नव्हते. 

त्या दिवशी रात्री आम्ही तिथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी एक टॅक्सी करून आम्ही नरसोबाच्या वाडीला जाऊन आलो. दुपारी रानडे सरांकडेच स्नेहभोजन केले आणि दुपारी चारच्या महाराष्ट्र एक्सप्रेस ने नागपूरला परत यायला निघालो. येताना त्या गाडीत देखील विदर्भातील शैलजा काळे, डॉ. यशवंत मनोहर, मिर्झा रफी बेग असे काही पुरस्कारार्थी होतेच. सगळ्यांशी गप्पा मारतच आम्ही तो २४ तासांचा प्रवास सुकर केला होता. 

अशी ही माझ्या आयुष्यात माझ्या कामावर शासकीय मोहर उठवणारी पहिली घटना, त्यानंतर मला अनेकविध पुरस्कार मिळाले. पत्रकारितेतील राजरत्न सारखा पुरस्कार मला सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचे हस्तेही देण्यात आला. रोटरी चळवळीत देखील इतर अनेक पुरस्कार मिळाले. मात्र या पुरस्काराची आठवण कायम मनात घर करून राहिलेली आहे. 

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.