घ्या समजून राजेहो.‌.. भारतीय जनता पक्षात जुन्या निष्ठावंतांचा पुन्हा योग्य तो सन्मान होईल..?

 घ्या समजून राजेहो.‌..

भारतीय जनता पक्षात जुन्या निष्ठावंतांचा पुन्हा योग्य तो सन्मान होईल..?

अखेर नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार प्रा. अनिल सोले यांनी मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता भाजपचे या मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या विजयाचा मार्ग अधिक सोपा झाला आहे. मात्र तरीही भाजपमध्ये जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाते, त्यांना विश्वासात घेतले जात नाही, आणि त्यांना अक्षरशः मोडीत काढले जाते, त्याला तोंड फोडण्यासाठी आपली उमेदवारी होती, असे म्हणणाऱ्या अनिल सोले आणि त्यांच्यासारख्या भारतीय जनता पक्षासाठी झिजणाऱ्या "असू आम्ही सुखाने पत्थर पायातील" म्हणत "पायातील दगड" असलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष योग्य सन्मान करणार का आणि त्यांचे योग्य पुनर्वसन होणार का हा प्रश्न या क्षणी तरी अनुत्तरीतच आहे. 

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ हा अगदी महाराष्ट्राच्या गठनापासून म्हणजेच १९६० पासून आधीचा भारतीय जनसंघ आणि आताच्या भारतीय जनता पक्षाकडेच राहिला होता. मात्र २०२० मध्ये उमेदवाराची निवड चुकल्यामुळे हा मतदारसंघ पहिल्यांदाच काँग्रेसच्या हातात पोहोचला. त्याचे शल्य प्रत्येक भाजप कार्यकर्त्याच्या मनात होते. त्यामुळे यावेळी पक्षाने योग्य उमेदवार द्यावा आणि संघटनात्मक जुळवाजुळव सुचारू रूपाने व्हावी अशी जुन्या कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र जुन्यांना कुठेही विश्वासात न घेता सुधाकर कोहळे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

अनिल सोले हे अगदी तरुण वयापासून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मुळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक देखील आहेत. १९९२ साली ते सर्वप्रथम नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. तेव्हापासून नगरसेवक, मग विरोधी पक्षनेते, सत्ताधारी पक्षनेते आणि नंतर महापौर असा महापालिकेत त्यांचा प्रवास राहिला. तर २०१४ मध्ये याच पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून ते विजयी झाले होते. आपल्या सहा वर्षाच्या काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली आणि जनसंपर्क देखील चांगलाच वाढवला होता. परिणामी २०२० मध्ये देखील त्यांना उमेदवारी मिळेल अशी सर्वांना अपेक्षा होती. 

मात्र २०२० मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अगदी निकटवर्ती मानले जाणारे माजी महापौर संदीप जोशी यांना ऐनवेळी उमेदवारी दिली गेली. संदीप जोशींची काहीही तयारी नसल्यामुळे पहिल्यांदाच या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. ही जागा आपल्या हातून गेली याचे शल्य भाजप नेत्यांच्या मनात निश्चितच होते. त्यामुळे यावेळी योग्य अशी रणनीती आखली जाईल अशी अपेक्षा होती. 

अनिल सोले हे भाजपमधील ज्येष्ठ असे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ते उच्चविद्याविभूषित आहेत. बरीच वर्ष एका महाविद्यालयात ते गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्याशिवाय सहकार क्षेत्रात देखील त्यांचे चांगले काम आहे. शिक्षक सहकारी बँकेच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला असून बँकेला आजची ऊर्जितावस्था आणण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भात त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे. एक अभ्यासू आणि धडाडीचे नेते म्हणून ते ओळखले जातात. महाराष्ट्रातील भाजप नेते नितीन गडकरी यांचे ते निकटवर्ती मानले जातात. 

अनिल सोले आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर महापालिकेत एकदमच नगरसेवक झाले. अर्थात फडणवीस हे वयाने सोलेंपेक्षा तब्बल बारा वर्षांनी लहान आहेत. मात्र राजकारणाच्या सारीपटावर काही मोहरे मागचे पुढे आणि पुढचे मागे केले गेले आणि फडणवीसांना लवकर संधी मिळत गेल्या. १९९७ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी ते नागपूर नगरीचे महापौर झाले. वर्षभरातच नागपूर नगरीत मेयर इन काऊन्सिल लागू झाले. त्यामुळे मेयर इन काऊन्सिलचे पहिले महापौर म्हणजेच नागपूरचे पहिले मुख्यमंत्री देखील तेच होते. नंतर मेयर इन काऊन्सिल रद्द झाले हा भाग वेगळा. मात्र १९९९ मध्ये लगेच त्यांना पश्चिम नागपूरातून आमदारकीसाठी उमेदवारी देखील दिली गेली. तेव्हापासून दरवेळी ते आमदार म्हणून निवडून येत आहेत. ही त्यांची सहावी टर्म सुरू आहे. 

याशिवाय पक्ष स्तरावर देखील त्यांना विविध पदे दिली गेली. माझ्या आठवणीनुसार २००५ मध्ये ते भाजपाचे प्रदेश सरचिटणीस झाले होते. नंतर २०१३ मध्ये ते प्रदेशाध्यक्ष देखील झाले. २०१९ मध्ये महाराष्ट्रात भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची संधी देखील त्यांना मिळाली. नंतर विरोधी पक्ष नेते मग उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून ते विराजमान झाले आहेत. 

त्या तुलनेत अनिल सोले यांना तब्बल वीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महापौर पद आणि एकदाच आमदार पद मिळाले आहे. त्यांच्यातही संघटनक्षमता असतानाही त्यांना पक्षात कोणतेही पद दिले गेले नाही. २०१२ ते २०१४ या महापौर पदाच्या काळात आणि नंतर २०१४ ते २०२० या आमदारकीच्या काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. मात्र तरीही २०२० मध्ये पक्षाने त्यांना अडगळीत टाकले. त्यांना अडगळीत टाकून जर ही जागा पक्ष राखू शकला असता तर त्याचे स्वागतही झाले असते. मात्र सोलेंना बाजूला केले आणि ती जागा पक्षाने हातून गमावली. गेली सहा वर्षे सोले शांत होते. यावेळी आपल्याला उमेदवारी दिली तर आपण ती जागा काढू असा शब्द त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला असल्याची माहिती आहे. मात्र अंतर्गत राजकारणामुळे या मतदारसंघात पूर्णतः नवीन असलेल्या सुधाकर कोहळेंना मैदानात आणले गेले आणि सोलेंना पुन्हा बाजूला टाकले गेले. त्यामुळे सोले नाराज झाले आणि त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत असेच पक्षात क्षमता असूनही अनेक वर्ष दुर्लक्षित असलेले गिरीश व्यास हे देखील अनिल सोलेंना पाठिंबा देत मैदानात उतरले. त्यांनी आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाच राजीनामा दिला आणि सोलेंच्या प्रचाराला लागले. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा भाजपची ही जागा धोक्यात येणार असे बोलले जाऊ लागले होते. 

नागपूर पदवीधर मतदार संघात काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांचेच लढत आहे. त्यात अनिल सोले यांनी बंडखोरी केल्यामुळे भाजप नेत्यांचे धाबे दणाणले. सोलेंनी अर्ज भरल्यावर त्यांनी माघार घ्यावी म्हणून पक्ष स्तरावर बरेच प्रयत्न झाले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः सोलेंच्या घरी गेले. मात्र ते येणार कळताच सोले बाहेर निघून गेले आणि त्यांना भेटलेच नाहीत. त्यामुळे चव्हाण यांना हात चोळत परत फिरावे लागले होते. सोलेंनी या काळात आपला मोबाईलही स्विच ऑफ करून ठेवला होता. त्यामुळे सगळ्यांसाठीच ते नॉटरिचेबल झाले होते. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी पर्यंत सोले कुणालाही सापडले नव्हते. अर्ज मागे घेण्याची वेळ संपली आणि त्याच संध्याकाळी त्यांनी गिरीश व्यास यांच्या बडकस चौकातील कार्यालयात आपले निवडणूक प्रचार कार्यालय उघडले. तिथे पत्रपरिषदेला देखील त्यांनी संबोधित केले. त्यांच्यासोबत पक्षातील काही जुने लोक तसेच नीतिन गडकरींच्या खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतील अनेक दिग्गज पत्र परिषदेत उपस्थित होते. त्यामुळे भाजप नेत्यांच्या तोंडचे पाणीच पळाले होते. सुधाकर कोहळे यांच्या तुलनेत अनिल सोले हे उजवे म्हणूनच ओळखले गेले आहेत. उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांचा पूर्ण विदर्भात व्यापक जनसंपर्क आहे. त्यांनी महापौर आणि आमदार म्हणून केलेली कामे त्यांच्या क्रेडिटला आहेत. त्या तुलनेत कोहळेंना नागपूर वगळता फारसे कोणी ओळखतही नाही. त्यामुळे सोले वंजारी आणि कोहळे दोघांनाही पराभूत करून निवडून येऊ शकतील असे बोलले जाऊ लागले होते.

यावेळी कसेही करून पदवीधर मतदार संघाची ही जागा भाजपाला परत मिळवायची आहे. त्यासाठी मग काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विभागातील आमदार खासदार आणि सर्व प्रमुख नेत्यांची एक बैठक घेतली. या बैठकीत सर्वांनीच सोलेंच्या उमेदवारीपासून होणाऱ्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. या लढतीत कोहळे तर पराभूत होतीलच, पण सोले निवडून येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, हे चित्र मुख्यमंत्र्यांसमोर मांडले गेले. सोले निवडून आले असते तर ते भाजपासोबतच गेले असते. मात्र त्यांना बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असल्यामुळे सोले निवडून येणे हा निश्चितच मुख्यमंत्र्यांचा पराभव मानला गेला असता. मिळालेल्या माहितीनुसार याआधी फडणवीस यांनी सोलेंशी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी सोले नॉट रिचेबल होते. काल सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यावर फडणवीस यांना देखील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले आणि त्यांनी मग सोलेंना निरोप पाठवला आणि थेट सोलेंच्या लक्ष्मी नगरातील घरीच धडक दिली. त्यांच्यासोबत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे विदर्भ प्रदेश संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, सहसंघटन मंत्री सतीश धोंड हे देखील होते. सुमारे अर्धा तास बंदद्वार चर्चा झाल्यानंतर आपल्या विनंतीला मान देत सोलेंनी उमेदवारी मागे घेत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार करण्याचे मान्य केले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. सोले यांनीही आपण उमेदवारी मागे घेत असून पक्षाचाच प्रचार करू असे माध्यमांसमोर जाहीर केले. गिरीश व्यास यांनी देखील आपला राजीनामा परत घेतला असून ते देखील पक्षात सक्रिय राहतील असेही जाहीर करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह सर्वांनीच सुटकेचा श्वास टाकला. आता आज सोले सुधाकर कोहळे यांच्या प्रचारात कामाला लागले आहेत अशी माहिती मिळाली आहे.

इथे जे काही घडले ते पक्षांतर्गत असलेली स्पर्धा आणि राजकारण यामुळे घडले आहे हे उघडपणे बोलले जाते आहे. अनिल सोले हे सुरुवातीपासून नितीन गडकरी यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. फडणवीस सुरुवातीला गडकरीं सोबत होते. मात्र १९९० च्या दशकात पक्षात गडकरी विरुद्ध मुंडे या सुप्त संघर्षात मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी देवेंद्र फडणवीस यांचे तरुण वय, त्यांच्यातील हुशारी, अभ्यासू वृत्ती आणि व्यापक लोकसंग्रह हे गुण ओळखले आणि त्यांना ताकद देऊन पुढे आणले. थोडक्यात मुंडे आणि महाजनांनी नागपुरात नितीन गडकरींना एक नवा स्पर्धक तयार केला. मुंडे आणि महाजन यांच्या आधाराने फडणवीस हळूहळू पक्षात महत्त्वाची पदे मिळवत प्रदेशाध्यक्ष झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ कधी आणि कसे सरकले हे कोणालाच कळले नाही. त्यामुळे त्यांचे राजकारणातील वजन प्रचंड वाढले. 

सुरुवातीपासून फडणवीस आणि सोले यांच्यात सुप्त स्पर्धा होती. योगायोगाने फडणवीस वेगाने पुढे जात असताना सोलेंच्या काम कामात  हेतूपूर्वक अडथळे आणतात अशी नागरिकांमध्ये त्यावेळी चर्चा होती. फडणवीस वेगाने पुढे गेले. मात्र सोले क्षमता असूनही माघारत राहिले. २०२० ला त्यांना पुन्हा संधी मिळेल असे वाटले होते. मात्र नंतरच्या काळात पक्षाने त्यांना पुरतेच अडगळीत टाकले. त्यामुळे त्यांचा सात्विक संताप उफाळून आला होता. यावेळी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी दाद दिली नाही. परिणामी त्यांना बंडखोरी करावी लागली.

काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत पक्षातील सर्वच जुन्या कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे. असे झाले तर ते योग्यच  ठरेल. 

२००० नंतर भारतीय जनता पक्ष ज्या झपाट्याने वाढला, त्यात इतर पक्षातून त्यांच्याकडे इन्कमिंग मोठ्या प्रमाणात झाले. इथेच खरी संघर्षाची स्थिती निर्माण झाली. जे वर्षानुवर्ष एकनिष्ठ राहून पक्षात सतरंज्या उचलण्यापासून झाडू लावण्यापर्यंत सर्व काम करत मोठे झाले होते, त्यांना डावलून काल आलेल्या  उपऱ्यांना पायघड्या घातल्या जाऊ लागल्या." पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार" अशी परिस्थिती पक्षात येऊ लागली. काँग्रेसमधून आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यासाठी तीन पिढ्यापासून संघाशी संबंधित असलेले छोटू भोयर यांना उमेदवारी नाकारल्याने शेवटी त्यांना काँग्रेसमध्ये जावे लागले. गिरीश व्यास हे जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पं. बच्छराज व्यास यांचे चिरंजीव, मात्र त्यांनाही आमदारकी मिळवण्यासाठी लायक असूनही दीर्घकाळ संघर्ष करावा लागला. नागपुरातले हे काही प्रकार इतरत्र देखील असे अनेक प्रकार बघायला मिळाले. त्यामुळेच पक्षात अंतर्गत खदखद मोठ्या प्रमाणात होती. तिचाच या निमित्ताने स्फोट झाला असे म्हणता येईल. 

विशेषतः नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सुप्त संघर्ष असल्याचीही जोरदार चर्चा कायमच सुरू असते. त्यामुळेच फडणवीसांचे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात महत्त्व वाढल्यावर गडकरींची जवळीक असलेल्या कार्यकर्त्यांना ते डावलतात असा आरोप अनेक कार्यकर्ते चर्चेत करत असतात. त्यामुळे नागपुरात हा असंतोष आहेच. 

दुसरे असे की पूर्वी जुन्या जनसंघात आणि नंतर भारतीय जनता पक्ष सामूहिक नेतृत्वाच्या संकल्पनेचा स्वीकार केला गेला होता. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनाही चर्चेत सहभागी करून घेतले जात असे. मात्र आता ती पद्धत मोडीत काढली गेल्याची तक्रार कार्यकर्ते खाजगीत करतात. आता पक्षात पुन्हा एकदा सर्वांशी चर्चा करून सर्व सहमतीने निर्णय घेतले जातील आणि जुन्यांनाही सन्मान दिला जाईल, तसेच त्यांचे योग्य पुनर्वसन केले जाईल असा शब्द फडणवीस, बावनकुळे, कोठेकर आणि धोंड यांनी दिला असल्याची सुत्रांची माहिती आहे.

तसे जर होणार असेल तर त्याचे स्वागतच व्हायला हवे. भारतीय जनता पक्ष हा कॅडर बेस्ड पक्ष आहे. इथे घराणेशाही किंवा एकाधिरशाही चालत नाही, असे बोलले जाते मात्र मधल्या काळात जे काही समज गैरसमज झाले, त्यामुळे ही बंडखोरीची वेळ आली. असेच प्रकार नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात झाले होते. परिणामी काही जुन्या संघ स्वयंसेवकांनी मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचेही बोलले जात होते. ते थांबून आता सर्वसमावेशक धोरण अवलंबून सर्वांना विश्वासात घेत जुन्यांचा योग्य तो सन्मान करून त्यांना अडगळीतून बाहेर काढून योग्य जागा दिली जाणार असेल तर भाजपला अजून गतीन पुढे कुच करता येईल. २०४७ मध्ये देशाला जागतिक महासत्ता बनवण्याचे मोदींचे जे स्वप्न आहे, त्या दृष्टीने मग भारतीय जनता पक्ष वाटचाल करू शकेल हे निश्चित..... 

अर्थात हे माझं मत झालं........

 तुमचं स्पष्ट आणि परखड मत तुम्हीदेखील मांडू शकता...

 त्याचे स्वागतच आहे. 

वाचकहो पटतय का तुम्हाला हे...... त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो..

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.