कालचक्र १९७५ च्या आणीबाणीची आजच्या परिस्थितीशी तुलना होऊच शकत नाही.

  कालचक्र

१९७५ च्या आणीबाणीची आजच्या परिस्थितीशी  तुलना होऊच शकत नाही.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सध्या देशातील विरोधी पक्ष देशभर आंदोलन करत आहेत. त्यांच्यासोबत अभिजीत दिपके यांची कॉक्रोच जनता पार्टी देखील मैदानात उतरली आहे. काल कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतर परिसरात आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यांना दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यावर देखील ते तिथे आंदोलन करणार असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे दिल्ली पोलीस आणि प्रशासन यांनी खबरदारी घेत पूर्णतः कडक बंदोबस्त करून कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन पूर्णतः उधळून लावले. त्यावर विरोधकांचे टीकास्त्र सोडणे सुरू असून देशात छुपी आणीबाणी लादली जात असल्याचा आरोप होत आहे. 


कॉकरोच जनता पार्टी जंतर-मंतरवर आंदोलन करणार म्हणजे सहाजिकच त्याचा परिणाम त्या परिसरातील रहदारीवर होणार होता. परिणामी जनजीवन विस्कळीत होणार होते. हे लक्षात घेत पोलीस आणि प्रशासनाने पावले उचलली होती. पोलिसांनी गृह विभागाच्या मदतीने आदल्या दिवशीच दिल्लीकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द केल्या होत्या. जंतर मंतरच्या चार किलोमीटरच्या परिसरात इंटरनेट सेवा स्थगित करून ठेवली होती. त्या परिसरातील दुकाने सुद्धा बंद केली होती. जंतर मंतरच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. 


अभिजीत दिपके आणि त्याचे काही सहकारी विमानाने दिल्लीत पोहोचणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना दिल्ली विमानतळावर विमानातच ताब्यात घेतले आणि अज्ञात स्थळी हलवले. त्याशिवाय जे जे आंदोलक जंतर-मंतर कडे कुच करत होते त्यांना आधीच पोलीस ताब्यात घेत होते. त्यामुळे आंदोलन जंतर-मंतरवर पोहोचू शकले नाहीत आणि याआधी जुलैमध्ये तिथे बसून सुमारे चार दिवस त्यांनी दिल्लीतील वाहतूक विस्कळीत करून टाकली होती तसे त्यांना करता आले नाही. परिणामी आज दिल्लीतील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती आहे. 


दिल्ली पोलिसांच्या या कृतीविरुद्ध कॉक्रोच जनता पार्टी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशभर आंदोलने केली. त्यांचा आरोप होता की सरकार आंदोलकांना घाबरलेले आहे. त्यामुळेच ते दडपशाही करत आहेत. शिल्लक शिवसेनेचे नेते आणि ठाकरे परिवाराचे युवराज आदित्य ठाकरे यांनी या प्रकाराची आणीबाणीशी तुलना केली. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी देखील ही दडपशाही असल्याचे नमूद केले. राहुल गांधी, सुप्रिया सुळे, ममता बॅनर्जी प्रभृतींनी देखील अशाच प्रकारचे आरोप केले आहेत. अभिजीत दिपके यांनी इंदिरा गांधींच्या दडपशाहीशी तुलना करत त्यांची दडपशाही देखील इतकी क्रूर नव्हती अशा आशयाचे विधान केले आहे. 


मुळात १९७५ ची आणीबाणी आणि त्या काळातील दडपशाही या कोणी अनुभवली आहे काय हा देखील प्रश्न मनात येतो. माझ्या माहितीप्रमाणे १९७५ ची आणीबाणी लागली तेव्हा आदित्य ठाकरे यांचा जन्मही झाला नव्हता. तोच प्रकार अभिजीत दीपके यांचा देखील आहे. तर राहुल गांधी किंवा सुप्रिया सुळे त्या काळात बालवाडीचे विद्यार्थी होते. त्यामुळे देशात काय घडत होते याची त्यांना कल्पना असण्याचे काहीही कारण नाही. तरीही ते बिनधास्तपणे असे आरोप करतात. कारण ते सर्वात राजकारणात आहेत. राजकारणात काहीही माहिती नसताना असे ठोकून देत आरोप करायला चालते असा सर्वसामान्य राजकारण्यांचा समाज आहे. त्यामुळेच त्यांनी ते केले असावे. 


आज मोदी सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जे काही केले जाते आहे, ते सर्व खुलेआम केले जाते आहे. जे काही काल दिल्लीतल्या जंतर-मंतरवर किंवा मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानात घडत होते, ते सर्व वृत्तवाहिन्या थेट दाखवत होत्या. अभिजीत दीपकेला ज्यावेळी विमानातून पोलिसांनी ताब्यात घेतले त्या वेळचे सर्व चित्रीकरण सर्व वाहिन्या प्रसारित करत होत्या. जंतर मंतरवर आंदोलकांना पकडून गाडीत टाकले जात होते ते देखील आम्ही लाईव्ह बघत होतो. विशेष म्हणजे हे सर्व विरोधी नेते त्यांची मते बिनधास्तपणे कॅमेरासमोर किंवा पत्रकारांशी व्यक्त करू शकत होते, आणि माध्यमे देखील निर्धास्तपणे हे सर्व वृत्त प्रसारित करू शकत होते.


त्या तुलनेत १९७५ मध्ये २६ जून रोजी पहाटे देशात आणीबाणी लागू झाली, तेव्हा रातोरात सर्व प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्याचे वृत्त प्रसारित करण्यासाठी त्यावेळी दूरदर्शन हे एकच सरकारी माध्यम होते. मात्र आज सारख्या २४ तास वृत्तवाहिन्या नव्हत्या. रेडिओवर जे काही थोडेफार येत होते तेवढेच लोकांना कळत होते. पहाटे आणीबाणी लागली आणि काही वेळातच सर्व माध्यमांवर निर्बंध लावले गेले. त्यामुळे २६ जूनच्या दिवशी वृत्तपत्रांनी ज्या बातम्या आपल्याकडे कंपोज केल्या त्या रातोरात पोलीस अधिकाऱ्यांनी जाऊन तपासल्या आणि त्यातल्या कित्येक बातम्या ज्या सरकार विरोधी वाटत होत्या त्या काढून घेण्यात आल्या. त्यामुळे २७ जून ची अनेक वृत्तपत्रे बातम्या काढल्या ती जागा मोकळी ठेवून प्रसिद्ध झाली होती. नंतर प्रत्येक वृत्तपत्रांमध्ये दररोज एक पोलिस अधिकारी जाऊन बसत असे आणि प्रत्येक बातमी त्याने तपासून होकार दिल्याशिवाय ती छापायला जात नसे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांना नागपुरात अटक करून विमानाने मुंबईला नेण्यात आले त्याची बातमी ज्या वृत्तपत्रांनी देण्याचा प्रयत्न केला त्यांना ती काढायला लावण्यात आली होती.


त्यावेळी थोड्याशाही संशयावरून कोणालाही मिसा खाली अटक करता येत होती आणि त्याला न्यायालयात उपस्थित करण्याची देखील जबाबदारी नव्हती. न्यायालये देखील दबावातच होती. त्यामुळे न्यायालयात उपस्थित केले तरी पुढली तारीख वाढवून दिली जात होती. कोणाला अटक केली ही माध्यमांना प्रकाशित देखील करता येत नव्हते. 


आज या कथित आणीबाणीच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष आंदोलन करत आहेत. त्यावेळी आंदोलन करणे, मोर्चा काढणे, इतकेच काय पण सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये रेल्वेमध्ये सरकार विरोधात बोलणे हे देखील गुन्हा मानले जात होते. उभ्या देशात सर्वांचीच मुस्काटदाबी केली जात होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक स्वयंसेवकांना अटक करून अगदी आणीबाणी उठेपर्यंत तुरुंगात डांबले होते. त्या काळात सरकारी नोकरीत असलेल्या सर्वांना सरकारने निलंबित केले होते. काहींना तर नोकरीतून काढूनही टाकले होते. कविवर्य सुरेश भटांनी त्या काळात असलेल्या परिस्थितीचे वर्णन आपल्या "उषःकाल होता होता काळरात्र झाली" या गीतात "उभा देश झाला आता एक बंदीशाला" असे केले आहे. आणिबाणीत सरकारला विरोध करणारे लाखो लोक दीड वर्षाहून अधिक काळ तुरुंगात डांबले गेले होते. या काळात विरोधी पक्षाचे खासदार तुरुंगात डांबले असताना त्यांच्या अनुपस्थितीत इंदिरा गांधींनी आपल्या सोयीची घटना दुरुस्ती देखील करून घेतली होती. ही परिस्थिती १९७७ च्या लोकसभा निवडणुका होऊन इंदिरा गांधींचा दारुण पराभव होईपर्यंत कायम होती हे विशेष.


त्या तुलनेत आज परिस्थिती काय आहे? आज देशात कोणीही उठून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मनाला येतील तशा शिव्या देऊ शकतो  महाराष्ट्रात दररोज सकाळी दहा वाजता शिल्लक शिवसेनेचे विश्व प्रवक्ते संजय राऊत तेच करत असतात ना. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. इंदिरा गांधींची आणीबाणी असती तर संजय राऊत एक दिवस बोलले असते आणि दुसऱ्या दिवशी त्यांची परवानगी ऑर्थर रोड तुरुंगातच झाली असती. 


आणीबाणी लागली तेव्हा राहुल गांधी बालवाडीत शिकत होते. त्यामुळे त्यांना हे गांभीर्य काहीच नव्हते. मात्र त्या काळात आणीबाणीच्या आडून  त्यांचे काका संजय गांधी यांनी काय आणि कसे अतिरेक केले  त्याची वर्णने आजही उपलब्ध आहेत. त्यांनी ती वाचावी ही त्यांना सूचना आहे. आदित्य ठाकरेंचे आजोबा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्या काळात मुंबईत एक फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जात होते. मात्र आणीबाणीत त्यांनी देखील गप्प राहणेच पसंत केले होते. आणीबाणीचे खरे भोग भोगले ते त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तत्कालीन जनसंघ आणि काही समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी. त्यावेळी या देशात खरोखरी हुकूमशाही होती असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही आणि हे सर्व घडले होते ते इंदिरा गांधींची खुर्ची वाचवण्यासाठी, गांधी नेहरू परिवाराकडे सत्ता कायम राहावी यासाठी. 


त्या तुलनेत आज जे काही घडते आहे ते देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी. नरेंद्र मोदींच्या काळात अनेक चांगल्या गोष्टी देखील झाल्या आहेत. त्यांच्या काळात मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम राबवला गेला. त्यात कदाचित काही त्रुटी असतील तर त्या सनदशीर मार्गाने सोडवता येऊ शकतात. मात्र त्याच्या आडून देशात अराजकाची परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याला संवैधानिक मार्गाने रोखण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्यात मला तरी काही चुकीचं वाटत नाही. त्याची तुलना १९७५ च्या  आणीबाणीशी करणे चुकीचेच ठरेल हे निश्चित. 

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.