सहज सुचलं म्हणून ... अशा जाहिराती करणाऱ्या सेलिब्रेटींनी नाना पाटेकरांचा आदर्श ठेवावा.
सहज सुचलं म्हणून ...
अशा जाहिराती करणाऱ्या सेलिब्रेटींनी नाना पाटेकरांचा आदर्श ठेवावा.
ख्यातनाम चित्रपट अभिनेते आणि समाजभान असलेले कार्यकर्ते नाना पाटेकर यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झाले. परिणामी आज सर्वच वृत्तपत्रांमध्ये अनेक मान्यवर तसेच पत्रकारांनी त्यांच्या आठवणी लिहिल्या आहेत. या आठवणींमध्ये दोन आठवणी मला खरोखरी भावल्या आणि नाना पाटेकर हा खरोखरी माणूस होता याची खात्री पटली. त्यामुळे त्यात संदर्भात आज मी लिहिणार आहे.
त्यात एका आठवणीत शेतकऱ्यांसाठी नाना पाटेकर यांनी एका बहुराष्ट्रीय कंपनीचे ब्रँड ॲम्बेसेडरपद सोडल्याबाबतचे वृत्त आहे. २००५ मध्ये विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अगदी चरमसीमेला पोहोचलेले होते. त्यावेळी नाना पाटेकर बीटी कॉटनचे बियाणे उत्पादन करणाऱ्या एका बहुराष्ट्रीय कंपनीचे ब्रँड अँबेसेडर म्हणून काम करत होते. त्या कंपनीची जाहिरात करण्याच्या दृष्टीने नाना यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत होते आणि छोट्या छोट्या सभा आयोजित करून शेतकऱ्यांना आपले बियाणे वापरण्याबाबत माहिती देत होते.
मात्र याच दौऱ्यात अनेक शेतकऱ्यांनी तुमची कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करत असून त्यांचे कपाशीचे बीटी कॉटनचे बियाणे बोगस असल्याची तक्रार केली. याबाबत नानांनी अधिक चौकशी केली असता या शेतकऱ्यांनी अनेक उदाहरणे देखील दाखवले. हे बघून नाना पाटेकर व्यथित झाले आणि त्यांनी तात्काळ त्या कंपनीचे ब्रँड अँबेसडरपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाची देखील त्यांनी पर्वा केली नाही. तो निर्णय त्यांनी अंमलात देखील आणला होता.
दुसरी आठवण नागपूरच्याच एका छायाचित्रकाराने दिली आहे. पुरुष नाटकाच्या प्रयोगासाठी या छायाचित्रकाराच्या कारमधून नाना नागपुरात विद्यापीठ परिसराकडे जात असताना एका कॉलेज समोर कॉलेजचे दोन विद्यार्थी सिगारेट ओढताना नानांना दिसले. नानांनी तत्काळ कार थांबवायला सांगितली आणि खाली उतरून त्या विद्यार्थ्यांना चांगलेच झापले. त्यावेळी नाना पाटेकर प्रसिद्धीच्या झोतात यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी लगेच नानांना ओळखले. तुम्ही शिकायला येता की सिगारेट ओढायला आणि याचे दुष्परिणाम काय हे लक्षात घेता की नाही? असे नानांनी त्या विद्यार्थ्यांना फटकारले आणि सिगारेट सोडण्याचे वचन घेऊनच ते पुढे निघाले होते.
गेल्या कित्येक वर्षांपासून चित्रपट सृष्टी तसेच क्रीडा विश्वातील सेलिब्रेटींना घेऊन आपल्या उत्पादनाच्या जाहिराती करण्याची पद्धत भारतीय जाहिरात सृष्टीत रुजलेली आहे. या जाहिरातींसाठी या सेलिब्रेटींना भरपूर पैसाही दिला जातो. मात्र ज्या उत्पादनासाठी ते जाहिरात करतात त्या उत्पादनामुळे मानवी जीवनावर काही दुष्परिणाम होतात का याचा हे सेलिब्रिटी कधीच विचार करत नाहीत. बऱ्याच वर्षांपूर्वी पानपराग नामक तंबाखूजन्य पदार्थाची जाहिरात करणाऱ्या जाहिरातींमध्ये अनेक मान्यवर अभिनेते पान पराग वापरा म्हणून तोंड भरून सांगताना दिसत. इतरही अशाच तंबाखूजन्य पदार्थांची किंवा मग मानवी जीवनावर दुष्परिणाम करणाऱ्या पदार्थांची जाहिरात अनेक सेलिब्रेटी करत असतात. त्यांना त्यासाठी मिळायचा पैसा त्यांनी आगाऊ घेतलेला असतो. मात्र आपण केलेल्या जाहिरातीमुळे आपल्याला चाहणारा जो वर्ग आहे तो आंधळेपणे ही उत्पादने विकत घेईल आणि त्याचे दुष्परिणाम या वापरणाऱ्यावर होतील याचा ते कधीच विचार करत नाहीत. त्यांचे हे वर्तन माणुसकीला धरून म्हणता येईल का याचाही विचार वाचकांनी करायला हवा. या पार्श्वभूमीवर नाना पाटेकर यांचे हे वर्तन माणुसकीपूर्ण म्हणायला हवे आणि नाना पाटेकर हे खऱ्या अर्थाने माणूसच होते हे मान्य करायला हवे.
मध्यंतरी अन्न व औषधी प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाद्यपदार्थांबाबत अशा जाहिराती करणाऱ्यांना सज्जड दम दिला होता आणि अशा दुष्परिणामा बाबत तुम्हालाही जबाबदार धरू असे स्पष्ट केले होते. मात्र त्याचा काहीच उपयोग झालेला दिसत नाही.
त्यामुळेच अशा जाहिराती करून पैसा कमावणाऱ्या सर्वच सेलिब्रेटींनी आपण जी जाहिरात करतो आहोत त्यातील उत्पादने खरोखरी जाहिरात करण्यालायक आहेत काय याची पूर्ण चौकशी करून मगच जाहिरातींना होकार द्यावा. आंधळेपणाने फक्त पैशाच्या मागे जाऊन अशी जाहिरात करू नये. या सर्वच सेलिब्रेटींनी नाना पाटेकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, इतकेच सहज सुचले म्हणून सांगावेसे वाटते.
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment