अभिजात मराठी भाषा गौरव दिन

अभिजात मराठी भाषा गौरव दिन



             *माझ्या मराठीची गोडी*

           *मला वाटते अवीट,*

           *माझ्या मराठीचा छंद*

           *मना नित्य मोहवित*

        *अतिप्राचीनता.. समृद्ध आणि मौल्यवान साहित्य.. ज्ञानग्रंथ आणि कोरीव पुरावे या निकषांवर भाषेला 'अभिजात भाषा' म्हणून सन्मान केला जातो.*

        *आज ३ ऑक्टोबर.. मराठी अभिजात भाषा गौरव दिन. दोन वर्षापूर्वी आजच्याच दिवशी आपल्या माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि समस्त मराठी जन आनंदले.*

        *अमृताशी पैज जिंकणाऱ्या मराठी भाषेला अभिजात म्हणून राजमान्यता मिळाली. महाराष्ट्र शासनाने २०१२ साली 'रंगनाथ पठारे समिती' स्थापन केली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्तीसाठी त्यांनी तयार केलेला अहवाल हा सर्वात मुख्य आधार ठरला. एक तप केलेले प्रयत्न.. तथ्य.. प्राचीनत्व पुरावे मान्य झाले. माय मराठीत किमान ५२ बोलीभाषा आहेत.*

        *अभिजात भाषा सिद्ध होण्यास ही भाषा.. त्यातील साहित्य प्राचीन.. किमान १५००-२००० वर्ष जुने हवे. त्यासाठी पिढ्यांनी जपलेले मौल्यवान ग्रंथ.. शिलालेख.. नाण्यावरील मजकूर असा मौलिक ठेवा हवा. भाषेची मूळ साहित्य परंपरा स्वतंत्र असावी. आजचे भाषेचे रुप प्राचीन भाषेशी ऐतिहासिक व सजीव संबंध हवा.*

        *अभिजात भाषा सिद्ध करताना २२०० वर्षापूर्वीचा नाणेघाट (जुन्नर) येथील शिलालेख, २००० वर्षापूर्वीचा 'गाथा सप्तशती' ग्रंथ.. चक्रधर स्वामींचे 'लीळाचरित्र', मुकुंदराज विवेकसिंधू आणि संत ज्ञानेश्वरांची 'ज्ञानेश्वरी' इ. पुरावे मान्य झाले.*

        *'अभिजात भाषा' म्हणून आता मराठी भाषेचे केवळ संवर्धनच नाही, तर उच्च शिक्षण.. संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. विद्यापीठांमध्ये 'अभिजात मराठी भाषा केंद्रे', केंद्र सरकार अनुदानीत देश- विदेशातील प्रमुख केंद्रीय विद्यापीठांमध्ये (४५०) मराठी भाषेचे स्वतंत्र अध्यासन स्थापन होत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी साहित्याचा अभ्यास वाढतोय.*

        *मराठी भाषा संशोधनास केंद्र सरकार निधी देत आहे. मराठी भाषेमध्ये पीएच.डी. पोस्ट-डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय शिष्यवृत्ती सुरू झालीय.*     

        *मराठी भाषेतील ज्येष्ठ विचारवंत.. संशोधकांसाठी आंतरराष्ट्रीय विशेष पुरस्कार, प्राचीन ग्रंथांचे डिजिटलायझेशन.. अनुवाद.. संत साहित्य, मोडी लिपीतील कागदपत्रे, हजारो वर्षे जुनी हस्तलिखिते यांच्या संवर्धनास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.*

        *प्राचीन ज्ञानग्रंथांचे जगातील इतर प्रमुख भाषांमध्ये अनुवादाचे काम तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांना मिळत आहे. रोजगार वाढतोय. अभिजात दर्जा प्राप्तीने जागतिक स्तरावर एक प्रतिष्ठित ज्ञानभाषा म्हणून मान्यता मिळाली आहे. आमचे ज्ञानोबा.. तुकोबा.. रामदास आदि संत.. तसेच पु.ल.. गदिमा.. कुसुमाग्रज जगाला समजतील तेव्हा जग अवाक होईल.*

        *आज एकूण ११ भारतीय राजभाषांना अभिजात भाषा दर्जा प्राप्त आहे. जेवढ्या जास्त भाषा लोकांना समजतील.. ज्ञानाचे आदानप्रदान होईल तेवढी एकात्मता बळकट होईल. शासकीय वापरात किचकट शब्दरचना टाळून ही भाषा सर्वसामान्यांना समजेल अशी नित्य व्यवहारातील असावी. ज्ञानभाषा होण्यासाठी अभियांत्रिकी.. कायदे.. विज्ञान.. नविन ए.आय. तंत्रज्ञान हे विषय मराठीत उपलब्ध असावेत.. जेणेकरुन लोकांचा मराठीकडे कल वाढेल.. मराठीचे प्रेम वृद्धिंगत होईल.*

        *एकूणच काय तर अभिजात दर्जा प्राप्तीने माय मराठीच्या भरारीचा वेग वाढतोय हे गौरवास्पद आहे तसेच आम्हा समस्त मराठी जनांना अभिमानास्पद आहे. म्हणून नित्य व्यवहारात.. घरादारात.. परदेशातही मराठीचा जाणीवपूर्वक वापर करुन आपण हा आनंद साजरा करुया. आपणांस मराठी अभिजात भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा.*

        *"माझा मराठाचि बोलु कौतुकें" या ज्ञानेश्वरीच्या ओवी मराठी भाषेचा असीम गौरव आणि तिचे अमृतापेक्षाही श्रेष्ठ असणारे माधुर्य दर्शवतात. ज्ञानेश्वरांनी प्राकृत (मराठी) भाषेत अध्यात्मिक ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या शब्दांची गुंफण केली आहे.*

  *माझा मराठाचि बोलु कौतुकें ।*

  *परि अमृतातेंही पैजां जिंके ।*

  *ऐसीं अक्षरें रसिकें ।*

  *मेळवीन ॥१॥*


  *जिये कोंवळिकेचेनि पाडें ।*

  *दिसती नादींचे रंग थोडे ।* 

  *वेधें परिमळाचें बीक मोडे ।*

  *जयाचेनि ॥२॥*


  *ऐका रसाळपणाचिया लोभा ।*

  *कीं श्रवणींचि होती जिभा ।*

  *बोलें इंद्रियां लागे कळंभा ।*

  *एकमेकां ॥३॥*


  *सहजें शब्दु तरी विषो श्रवणाचा ।*

  *परि रसना म्हणे रसु हा आमुचा ।*

  *घ्राणासि भावो जाय परिमळाचा ।*

  *हा तोचि होईल ॥४॥*

                ०३.१०.२०२६

संकलन:-अभय बक्षी नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.