आठवणींच्या हिंदोळ्यावर....१९. आठवणी वामनराव जोशींच्या
आठवणींच्या हिंदोळ्यावर....१९.
आठवणी वामनराव जोशींच्या

सोमवारी सकाळी चहा घेताना रोजच्या सवयीने फेसबुक उघडले, तर वामनराव जोशी यांना विनम्र श्रद्धांजली अशा आशयाची एक ओझरती पोस्ट दिसली. ती पोस्ट पुन्हा शोधण्याचा प्रयत्न केला, पण दिसली नाही. मग काय करायचे म्हणून मी वामनरावांचा मुलगा राम जोशी याचेच फेसबुक अकाउंट उघडले. तिथे मला लगेचच ती पोस्ट दिसली. ती बघताच वामनराव जोशी सरांचे पहाटे निधन झाल्याची बातमी कळली.
लगेचच मी राम जोशीला फोन लावला. त्याने दिलेल्या माहितीनुसार पहाटेच वामनरावांची तब्येत जास्त बिघडली. त्यामुळे लगेच त्यांना विवेका हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र तिथे जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे त्याने सांगितले.
वामनराव जोशींचा माझा परिचय जवळ जवळ ५६ वर्ष जुना आहे. मला आठवते १९७० मध्ये संघ शिक्षा वर्गात रात्री शहरातील वेगवेगळ्या संघ शाखांमधले संघ शिक्षा वर्गात न आलेले स्वयंसेवक गार्डींगला येत असत. शेवटच्या आठवड्यात आमच्या लक्ष्मी नगर सायम् शाखेला गार्डींगची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे रात्री साधारणपणे दहा वाजता आम्ही काही मंडळी जेवण आटोपून सायकलने रेशीमबाग परिसरात पोहोचायचो. त्यावेळी संघ शिक्षा वर्ग प्रशिक्षणार्थ्यांची निवासाची सोय मोहता सायन्स कॉलेज आणि एसबी सिटी कॉलेज मध्ये केलेली असायची. त्या परिसरात आम्ही गार्डींगला जायचे. तिथेच एक दिवस वामनराव जोशींची माझी ओळख झाली. उंचीने ठेंगणे, मध्यम बांधा आणि चेहऱ्यावर कायम स्मितहास्य अशा उत्साही वामनराव जोशींची माझी त्या चार-पाच दिवसात चांगलीच गट्टी जमली. त्यावेळी ते संघ शिक्षा वर्गात व्यवस्थेत असायचे. त्यावेळी ते धरमपेठ शिक्षण संस्थेत प्रशासनिक कामात होते ही माहिती मिळाली.
मग हळूहळू भेटी होत गेल्या. वर्षभरातच मी धरमपेठ कॉलेजमध्येच प्रवेश घेतला. त्यावेळी जोशी सर तिथेच कॉमर्स विभागात प्राध्यापक म्हणून आले होते. त्यामुळे संबंध अधिकच वाढले जोशी सर हे एक उत्साहमूर्तीच होते असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. कॉलेजच्या कोणत्याही ऍक्टिव्हिटीत ते उत्साहाने पुढे यायचे.
शिक्षकी पेशा हे त्यांचे जीवनध्येय होते म्हटले तरी चुकीचे ठरू नये. त्यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना इमानदारीने शिकवले, मात्र कधीही खाजगी शिकवण्या घेतल्या नाहीत. विद्यार्थ्यांना अडचण असली तर ते विनामूल्य शिकवायचे. मात्र नियमित शिकवणी त्यांनी कधीच घेतली नाही.
जोशी सर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले व्यक्तिमत्व होते. त्यांचा मनमोकळा बडबड्या स्वभाव असल्यामुळे माणसं जोडण्याची कला त्यांना खूपच छान अवगत होती. त्यांचा जनसंपर्क अतिशय व्यापक होता. सर्वच क्षेत्रात त्यांची उठबस होती.
त्या काळात महाविद्यालयीन शिक्षकांना पगार काही फारसे नसायचे. त्यातही खाजगी महाविद्यालयात पगार मागे पुढे सुद्धा व्हायचे. तेव्हा महाविद्यालयीन प्राध्यापकी सोबत जोशी सरांनी विमा एजंट म्हणूनही काम सुरू केले. अल्पबचत योजनेतही गुंतवणूक करण्याबाबत ते सल्ला देत असत. त्याशिवाय इतरही छोटे मोठे उद्योग त्यांनी केले. मात्र हे सर्व करत असताना शैक्षणिक जबाबदारीकडे त्यांनी कधीच दुर्लक्ष केले नाही.
शिक्षण आटोपल्यावर मी व्यवसायात आलो. धरम पेठेत मी फोटो स्टुडिओ लावला होता. वामनराव जोशी यांचे रहाणे रामनगर चौकात, त्यामुळे त्यांना जवळचा बाजार धरमपेठचाच होता. मग तिकडे आले की आमची हमखास भेट व्हायची. माझ्याच स्टुडिओच्या शेजारी राहणारे धरमपेठ कॉलेजचे दुसरे एक प्राध्यापक प्रकाश पुराणिक हे त्यांचे घनिष्ठ मित्र, तसेच बाजूलाच असलेल्या जोशी मंगल कार्यालयाच्या विनोद जोशींचीही त्यांची मैत्री होती. तिथे आमच्या नेहमीच भेटी व्हायच्या. आपल्या विनोदी स्वभावाने ते समोरच्याला आपलंसं करून टाकायचे.
इतरांना कायम मदत करणे हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यातच संघाच्या उपक्रमांना ते सढळपणे मदत करायचे २००७ पासून संघानेच सुरू केलेल्या हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेचा विदर्भ ब्युरो चीफ म्हणून मी कार्यरत होतो. त्यावेळी संस्थेसाठी भाग भांडवल जमवण्याची आमच्यावर जबाबदारी आली. संघाचेच ज्येष्ठ प्रचारक असलेले हिंदुस्थान समाचार चे प्रभारी लक्ष्मीनारायण भाला हे नागपुरात त्या कामासाठी सक्रिय होते. वामनराव जोशी भाग भांडवल देऊ शकतील ही शक्यता वाटल्यामुळे मी त्यांना फोन केला आणि प्रयोजन सांगितले. तेव्हा ते म्हणाले "भाग भांडवल मी नक्की देतो, पण लक्ष्मीनारायणजी भाला यांना माझ्या घरी जेवायला घेऊन ये" मग ठरल्यावेळी मी आणि भालाजी त्यांच्या घरी भोजनाला गेलो. त्यावेळी जोशी सर म्हणाले,"माझी स्वतः संघ प्रचारक म्हणून जाण्याची इच्छा होती. मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे प्रचारकांना आपल्या घरी ठेवून घेणे तसेच कोणीही प्रचारक आला की त्याला जेवायला बोलावणे हे काम मी आवडीने करतो." मग जेवण झाल्यावर सरांनी माझ्याच जवळ काही स्वतःच्या नावावर आणि काही मुलगा रामच्या नावावर शेअर्स घेण्यासाठी फॉर्म भरून दिले आणि रक्कमही माझ्या स्वाधीन केली. तसेच काही मित्रांना फोन करून अविनाश पाठकला तुमच्याकडे पाठवतो आहे त्याला मदत करायची आहे असे सांगितले. त्यामुळे माझे काम खूपच सोपे झाले होते.
आयुष्यभर प्राध्यापकी केल्यानंतर काही काळ एका महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही जोशी सरांनी काम केले होते. याशिवाय विविध शैक्षणिक आणि सामाजिक कामात ते सक्रिय असायचे. मात्र तरीही एखाद्याला मदत करायला कुठलेही काम करण्यासाठी त्यांना कमीपणा वाटायचा नाही. मला आठवते जोशी मंगल कार्यालयाचे विनोद जोशी यांच्या मुलीच्या लग्नाचा स्वागत समारंभ माधवनगर सभागृहा बाजूच्या पटांगणात होता. तिथे भोजनोत्तर उपस्थितांना फळांची प्लेट दिली जात होती. त्यादिवशी फळे कापणारी मुले थोडी संथ होती. त्यामुळे त्या टेबलवर लोकांना खोळंबून राहावे लागत होते. ही परिस्थिती बघितल्यावर जोशी सर स्वतः तिथे गेले. एका मुलाच्या हातातला चाकू घेतला आणि भराभर सफाईने फळे कापणे सुरू केले. फळे कापून ते प्लेटही भरत होते आणि त्याचबरोबर सर्व उपस्थितांशी गप्पा मारणे हास्यविनोद करणे हे देखील सुरू होते. ते बघून मी त्यांची थट्टा केली. "सर आयुष्यभर पेपर तपासताना विद्यार्थ्यांचे मार्क जितक्या सफाईने तुम्ही कापायचात, तितक्याच सफाईने आज फळ कापता आहात." " त्यावर तुझा खोचकपणा काही कमी होत नाही" असे म्हणत त्यांनी आपले काम पुढे सुरू ठेवले होते.
२००९ ते २०१६ या काळात मी माझ्या आई-वडिलांच्या पुण्यतिथीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असे. विशेषतः आईच्या पुण्यतिथीला गाण्याचे कार्यक्रम आयोजित करायचो. २०१० मध्ये आम्ही तीन दिवसाचा संगीत महोत्सव करण्याचे ठरवले. त्यासाठी काही प्रायोजकांनाही भेटलो. मात्र ऐनवेळी काही प्रायोजक बॅक आउट झाले. मग मी जोशी सरांना फोन केला. त्या दिवशी दुपारी ते स्वतः घरी आले आणि काय व्यवस्था करता येईल त्यावर त्यांनी चर्चाही केली. अर्थात सुदैवाने मला दुसरे काही प्रयोजक मिळाले आणि थोडी फेरफार करून संगीत महोत्सव सुखरूप पार पडला. त्यादरम्यान ते सतत फोन करून चौकशी करत होते.
शेती हा देखील जोशी सरांचा आवडता विषय होता. त्यांनी स्वतः शेती घेऊन ती चांगली विकसित केली होती. तिथे वेगवेगळे प्रयोग ते करायचे. त्यांनी आसामला गेले असताना तिथल्या आंब्याची कलमे नागपूरला आणली होती, आणि ती आपल्या शेतात लावली. त्या झाडाला जुलै ऑगस्टमध्ये बहार यायचा. पेवंदी बोराच्या आकाराचे छोटे छोटे आंबे लागायचे. त्याचे लोणचे चटणी अतिशय चविष्ट व्हायची. दरवर्षी जुलै ऑगस्ट मध्ये आठवणीने जोशी सर ते आंबे आमच्या घरी पाठवायचेच. यंदाही त्यांनी ते पाठवले होते. अजूनही ते लोणचे आम्ही खातो आहोत.
कोणीही अडचणीत असला तर त्याला तात्काळ मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. मी सुद्धा काही वेळा अडचणीत आल्यावर त्यांना फोन केला. लगेच तू ताबडतोब ये आणि माझ्याकडून काय पाहिजे ते घेऊन जा असे ते सांगायचे आणि दिला शब्द पाळायचे देखील.
फोटोग्राफी सोबत मी पत्रकारिता देखील करायचो. नंतर मी फोटोग्राफी बंद करून पूर्ण वेळ पत्रकारितेत आलो. जोशी सर देखील पूर्ण वेळ शेती करू लागले होते. त्याशिवाय सामाजिक कार्य चालूच होते.नितीन गडकरींच्या पुर्ती ॲग्रोटेक चे ते संचालक होते. एकदा गडकरींच्या पूर्तीची एक पत्र परिषद होती. तिथे पत्रकार म्हणून मी गेलो होतो. पत्र परीक्षा दिनांक गटागटाने गप्पा सुरू होत्या. मी अनंतराव घारड आणि वामनराव जोशी सर गप्पा मारत उभे होतो. शेतीचा विषय निघाला आणि सर मला म्हणाले "तुला शेती करायची आहे का?" मी तत्काळ उत्तरलो "माझ्याकडे शेती कुठे आहे?" तेव्हा सर म्हणाले "मी तुला शेती देतो, ती तू कर आणि जे काही उत्पन्न होईल ते तूच ठेव." त्या काळात शेतकऱ्यांची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. अशावेळी शेती करणे ही एक रिस्कच होती. त्यामुळे अनंतराव घारड गमतीने म्हणाले," वामनराव तुम्ही अविनाशशी काही दुश्मनी निभावत आहे का?" त्यावर आम्ही सगळेच हसलो, पण वामनराव लगेच म्हणाले "अनंतराव अविनाशला शेती करायला दिल्यावर मी तसाच सोडणार नाही, त्याला पूर्ण गायडन्स देणार आणि त्याची शेती नफ्यात आणून दाखवणार, शेवटी तो माझा विद्यार्थी आहे, त्याला अर्ध्यात सोडणार नाही." अर्थात पत्रकारिता सोडून शेतीकडे वळण्याचा माझा विचार नव्हता, त्यामुळे तो प्रस्ताव तिथेच बारगळला हा भाग वेगळा.
गेल्या काही वर्षात सरांनी मूकबधिर विद्यालय सुरू केले होते. भेटलो की त्याची प्रगती ते सांगायचे. त्यांची माझी शेवटची भेट जुलै महिन्यात झाली होती, त्यावेळी आता माझ्याच्याने होत नाही म्हणून संजय भेंडे यांना अध्यक्ष केले आहे, असे त्यांनी सांगितले होते. इतरही विविध सामाजिक कामांमध्ये ते कायम सक्रिय होते. या सर्व उपक्रमांमध्ये ते माणसं जोडण्याचा त्यांचा आवडता छंद जपत होते.
आपल्या माणसाचं कौतुक करणं हे त्यांच्या स्वभावातच होते म्हटले तरी चालेल. माझ्याबद्दल वृत्तपत्रात कुठेही काहीही वाचलं की आवर्जून त्यांचा फोन येत असे. २०१०-११मध्ये तरुण भारतात माझा विदर्भेतर महाराष्ट्र म्हणून स्तंभ चालायचा. त्यावेळी प्रत्येक लेख वाचून त्याच्यावर प्रतिक्रिया देणारा फोन जोशी सर करायचे. मी रोटरीचा अध्यक्ष झालो, भारत विकास परिषदेचा अध्यक्ष झालो, तसेच साहित्य परिषदेचा अध्यक्ष झालो तेव्हा प्रत्येक वेळी ते आवर्जून फोन करायचे. शेवटी आपल्या माणसांचं कौतुक आपण नाही करायचं तर कोणी करायचं हे त्यांचे आवडते तत्व होते. माझ्या प्रत्येक पुस्तक प्रकाशनानंतर त्यांचा फोन येत असे आणि आवर्जून ते माझ्या पुस्तकाची प्रत विकत घेत असत.
असे माणूस वेडे वामनराव ८२ वर्षाचे सक्रिय आयुष्य जगले. त्यांनी शून्यातून विश्व उभे केले. मला आठवते अगदी सुरुवातीच्या काळात ते सायकलने फिरायचे. मग त्यांच्याजवळ एक जुनी व्हिकी होती, नंतर स्कूटर आणि आता तर दारासमोर दोन दोन चार चाकी गाड्या उभ्या होत्या.
असे वामनराव जोशी सर सक्रिय आयुष्य जगत आणि असंख्य माणसं जोडत दोन दिवसांपूर्वी आपल्यातून निघून गेले आहे ते गेले तरी त्यांच्या आठवणी कायम राहणार आहेत.
वामनराव जोशी सरांना विनम्र आदरांजली.
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment