भाजी विक्रेत्यावर बैलाचा हल्ला,भाजी विक्रेता थोडक्यात बचावला. नगर परिषदेला वारंवार पत्र देऊनही कारवाई नाही; विक्रेते व ग्राहकांमध्ये संतापाची लाट.बाजार मार्केट यार्ड परिसरातच भरविण्यात यावा:-जागृत ग्राहक राजा.
भाजी विक्रेत्यावर बैलाचा हल्ला,भाजी विक्रेता थोडक्यात बचावला.बाजार मार्केट यार्ड परिसरातच भरविण्यात यावा:-जागृत ग्राहक राजा.
नगर परिषदेला वारंवार पत्र देऊनही कारवाई नाही; विक्रेते व ग्राहकांमध्ये संतापाची लाट.
मूल : दीपक देशपांडे.
मूल शहरातील आठवडी बाजार म.फुले मार्केट यार्ड परिसरात मोकाट जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे भाजी विक्रेते तसेच बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आज याच मोकाट जनावरांपैकी एका बैलाने भाजी विक्रेते मुन्ना गुटके यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. सुदैवाने या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले.
आठवडी बाजाराच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक, महिला, लहान मुले तसेच भाजीपाला व इतर साहित्य विक्रेते येतात. मात्र बाजार परिसरात मोकाट गाई, बैल, म्हशी व जनावरे फिरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अचानक जनावरे अंगावर धावून येणे, भाजीपाला व साहित्याची नासधूस करणे तसेच रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
आज मुन्ना गुटके हे नेहमीप्रमाणे भाजी विक्री करत असताना एका बैलाने त्यांच्यावर हल्ला केला. प्रसंगावधान राखल्याने ते थोडक्यात बचावले. मात्र या घटनेमुळे आठवडी बाजारातील विक्रेते आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पत्र देऊनही नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष:-
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाला यापूर्वी पत्र देण्यात आले असूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप मार्केट यार्ड परिसरात येणारे ग्राहक,नागरिक व भाजी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मोकाट जनावरांमुळे एखाद्या नागरिकाला गंभीर दुखापत झाली किंवा एखाद्या लहान मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी कोणाची? असा संतप्त प्रश्नही बाजारातील विक्रेत्यांकडून उपस्थित होत आहे.
मोठी दुर्घटना होण्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी:-
नगर परिषद प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आठवडी बाजार परिसरातील मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजी विक्रेते,ग्राहक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच बाजाराच्या दिवशी विशेष पथक नियुक्त करून मोकाट जनावरांना पकडण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशीही मागणी होत आहे.
प्रशासनाने वेळीच कारवाई न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तशी अनुचित घटना होण्याची वाट न पाहता तातडीने कारवाई करा”, अशी मागणी भाजी विक्रेते ,ग्राहक,व परिसरातील जनतेकडून जोर धरत केली जात आहे.
जागृत ग्राहक राजा च्या कार्यालयात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने रस्त्यावर भरु लागलेल्या बाजारामुळे पादचारी व दुचाकी धारकांना तसेच आपले धान्य कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री साठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना आठवडी बाजाराचे दिवशी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते, त्यामुळे नगरप्रशासनाच्या वतीने मागील काळात राबविल्या प्रमाणे संपूर्ण बाजार मार्केट यार्ड परिसरातच भरविण्यात यावा अशी मागणी जागृत ग्राहक राजा मूल तालुका पदाधिकारी यांनी केली असून त्यांची तातडीने दखल घेण्याची विनंती नगरप्रशासनाला केली आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment