गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कर्णकर्कश डीजेविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कर्णकर्कश डीजेविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई

दोन स्वतंत्र कारवायांत तब्बल २६ लाख १० हजार रुपयांचे डीजे साहित्य, जनरेटर व वाहने जप्त

मूल : दीपक देशपांडे.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषण व नियमबाह्य डीजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूल पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. आलेवाही-नवेगाव परिसरात केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये सुमारे २६ लाख १० हजार रुपये किमतीचे डीजे साहित्य, मिक्सर, मशीन, स्पीकर, जनरेटर, पॉवर सेव्हर तसेच दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.
मूल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कनाके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना डीजेचा मोठा आवाज होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ध्वनीक्षेपक यंत्राद्वारे आवाजाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अनुक्रमे ७७.०३ डेसिबल व ७३.४० डेसिबल इतकी ध्वनीतीव्रता नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पहिली कारवाई – १५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
आलेवाही-नवेगाव येथे MH-36-AA-4191 क्रमांकाच्या टाटा LPT वाहनामधून डीजे साऊंड सिस्टीमद्वारे मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपण सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी केलेल्या तपासणीत ७७.०३ डेसिबल ध्वनीतीव्रता नोंदविण्यात आली.
या कारवाईत डीजे मालक/ऑपरेटर रोहित युवराज येलमुले (वय २५, रा. सिंदपुरी, ता. पवनी, जि. भंडारा) याच्यासह वाहन चालक भास्कर प्रल्हाद ढोरे (वय २५, रा. ईटन, ता. लाखांदूर, जि. भंडारा) आणि सुरज राजू मारबते (वय २५, रा. आलेवाही, ता. मूल, जि. चंद्रपूर) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
या कारवाईत डीजे साऊंड सिस्टीम, मिक्सर, मशीन, स्पीकर, जनरेटर तसेच टाटा LPT वाहन असा अंदाजे १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई – १० लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त
नवेगाव-आलेवाही परिसरात MH-01-BR-2461 क्रमांकाच्या टाटा ७०९ पिकअप वाहनातून डीजे साऊंड सिस्टीमद्वारे मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपण सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तपासणीमध्ये ७३.४० डेसिबल ध्वनीतीव्रता नोंदविण्यात आली.
या प्रकरणात डीजे मालक/ऑपरेटर गंगाधर सुखदेव बोरकर (वय ४२, रा. टेकरी, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर), वाहन चालक रोशन गजानन ठीकरे (वय २१) आणि वैभव धर्मराज तलांडे (वय २२, रा. नवेगाव-आलेवाही, ता. मूल, जि. चंद्रपूर) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
या कारवाईत डीजे साऊंड सिस्टीम, मिक्सर, स्पीकर, जनरेटर, पॉवर सेव्हर व टाटा ७०९ पिकअप वाहन असा अंदाजे १० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कायदेशीर कारवाई
दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहिता कलम २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे मूल पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काटकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये पोलीस ठाणे मूल येथील अधिकारी व अंमलदार सहभागी होते.
पोलिसांचे आवाहन
गणेश विसर्जन मिरवणूक व आगामी सार्वजनिक उत्सव शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडावेत, यासाठी सर्व गणेश मंडळे, आयोजक, डीजे मालक व ऑपरेटर यांनी ध्वनीक्षेपणाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मूल पोलिसांनी केले आहे. डीजे किंवा ध्वनीक्षेपणासाठी आवश्यक परवानगी घेणे तसेच निर्धारित ध्वनीमर्यादेचे पालन करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.