कालचक्र . असे गैरमुद्यांचे राजकारण काँग्रेसने करणे टाळायला हवे.

 कालचक्र .

असे गैरमुद्यांचे राजकारण काँग्रेसने करणे टाळायला हवे.



दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात काल तिन्ही निवडणूक आयुक्तांची संयुक्त बैठक झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने प्रसारित केलेल्या निवेदनात निवडणूक आयोगाचे सर्व निर्णय तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या एकमताने झाले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विशेषतः मतदार यादी पुनरीक्षण म्हणजेच एस आय आर च्या संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि उर्वरित दोन निवडणूक आयुक्तांचे मतभेद होते, तरीही ज्ञानेश कुमार यांनीच आपले मत उर्वरित दोघांवर लादले आणि हा निर्णय राबवला असा जो आरोप झाला त्यावर खुलासा झाला आहे. 

एस आय आर संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी उर्वरित दोन आयुक्तांचे मतभेद होते आणि ज्ञानेश कुमार यांनीच हा निर्णय लादला अशा आशयाची बातमी इंडियन एक्सप्रेस नमक राष्ट्रीय दैनिकाने तीन दिवसांपूर्वी प्रकाशित केली होती. त्यावरून देशातील विरोधी पक्षांनी चांगलाच गदारोळ केला होता. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर कारवाई केली जावी अशीही मागणी केली होती. त्या पाठोपाठ त्यांनीच हा मोदी आणि शहांचा डाव आहे त्यामुळे ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे असेही आवाहन केले होते. आता काँग्रेस पक्ष प्रत्येक जिल्ह्यात ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनही करणार आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रितपणे मोर्चा काढून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामाची मागणी करणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ज्ञानेश कुमारांवर देशद्रोहाचा खटला भरावा अशी देखील मागणी केली आहे. आता निवडणूक आयोगाच्या खुलाशानंतर या गदारोळातील हवा निघून गेली आहे. तरीही आता शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार विरोधक करताना दिसत आहेत.

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी सुरुवातीपासूनच विरोध केलेला आहे. मात्र हे पुनरीक्षण होणे गरजेचे होते यात कोणतेही दुमत नसावे. १९९० पूर्वी आपल्या देशात प्रत्येक सर्वत्रिक निवडणुकीच्या आधी सहा महिने देशभरात मतदार याद्यांचे पुनरीक्षण होत असे. त्यावेळी निवडणूक आयोगाचे कर्मचारी घरोघरी जाऊन त्या घरी किती मतदार आहेत त्यांची नावे नोंदवून घेत असत. त्यात जुनी यादी देखील त्यासोबत ठेवत असत., त्या यादीतील ज्या व्यक्ती मृत झाल्या आहेत किंवा मग घर सोडून दुसऱ्या वस्तीत राहायला गेल्या आहेत काही वेळा दुसऱ्या गावी गेल्या आहेत अशा सर्वांची नोंद केली जात असे. १९९० नंतर हे प्रकार पूर्णतः बंद झाले. याच काळात आपल्या देशात परकीय घुसखोर मोठ्या प्रमाणात आले. त्यांनी काही दलालांच्या आणि काही स्थानिक नेत्यांच्या मदतीने बोगस रेशन कार्ड बनवून घेतले आणि त्या आधारावर त्यांनी आपली नावे मतदार यादीत देखील नोंदवून घेतली. यातील बोगस आधार कार्ड देखील करून घेतली. आता एस आय आर मध्ये असे अनेक बोगस मतदार आढळून आलेले आहेत. यातील अनेक बांगलादेशी आणि म्यानमार मधून आलेले रोहिंगे देखील होते. त्यातल्या काहींना आपल्या देशात परत देखील पाठवण्यात आले आहे. ओ

दुर्दैवाने हे सर्व बाहेरून आलेले आणि अवैधरित्या मतदार बनलेले काँग्रेसला मतदान करणारे होते, तर भाजपाला विरोध करणारे होते. त्यामुळे ज्यावेळी ही एस आय आर मोहीम राबवली गेली त्यावेळी यांचे पितळ उघडे पडले. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीत जे काही निकाल आले, त्यामागे एस आय आर मोहीम कारणीभूत होती असे बोलले जाते तृणमूल काँग्रेसचे मतदारांपैकी असे अनेक बांगलादेशातून आलेले बोगस मतदारच होते. हेच बोगस मतदार ममता बॅनर्जी यांची क

व्होट बँक होते. त्यामुळेच ममता बॅनर्जी एस आय आर सुरू होताच थयथयाट केला होता. इतरही ज्या काही निवडणुका झाल्या त्या सर्वांमध्ये आलेले निकाल बघून सर्वच विरोधी पक्षांची ओरड सुरू झाली होती. 

इंडियन एक्सप्रेसच्या या बातमीने या विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आणि त्यांनी गदारोळ सुरू केला. मात्र त्यात काही दम नाही हे स्पष्ट झाले आहे. विरोधकांच्या दाव्यातील हवा पूर्णतः निघून गेली आहे. आता त्यांचा हा शिळ्या कढीला होत आणल्याचा प्रकार सुरू दिसतो आहे. 

या गटारासाठी गदारोळात राहुल गांधी हे आघाडीवर असलेले दिसून आले. त्यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांचा संविधानावर बिलकुल विश्वास नाही, आणि त्यांना जनमताचा आधार न राहिल्यामुळे सर्व संविधानिक संस्था मोडीत काढून देशात डावी राजवट आणायची आहे असा आरोप केला आहे. आता याला राहुल गांधी किंवा महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते काय उत्तर देतात ते बघायचं आहे.

राहुल गांधी यांनी आतापर्यंत दरवेळी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधान मोडीत काढायचे आहे असा आरोप केला आहे. संविधान बदलायचे आहे असाही दावा ते वारंवार करत असतात. मात्र संविधानात सर्वात जास्त बदल त्यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरू आणि त्यांची आजी इंदिरा गांधी यांनीच केलेले आहेत, या वास्तवाकडे ते डोळेझाक करतात. आणीबाणीत विरोधी पक्षाला तुरुंगात डांबून इंदिरा गांधींनी आणि संविधानाच्या प्रास्ताविकेतच बदल करून त्यात निधार्मिकतावाद आणि समाजवाद हे दोन शब्द अक्षरशः घुसले होते हे देखील राहुल गांधींनी लक्षात घ्यायला हवे. मात्र हे सर्व विसरून ते टीका करत आहेत. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींचा मेंदू तपासण्याची मागणी केली आहे. त्यावर आता काँग्रेस काय उत्तर देते ते बघायचे. 

आज लोकशाही व्यवस्थेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे दोघेही जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि जनसामान्यांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी निवडून दिले गेलेले असतात. त्यामुळे विरोधकांनी विशेषतः काँग्रेस पक्षाने जनसामान्यांच्या समस्या समोर आणून रस्त्यावर उतरावे आणि सत्ताधारी पक्षाला परेशान करावे. तसे केले तर त्यांना जन समर्थन मिळू शकेल. मात्र तसे न करता काँग्रेस पक्ष ही गैरमुद्यांचे राजकारण करीत आहे. हे काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने हितावह ठरणार नाही याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी.

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.