हितगुज राजकारणाकडे डोळस नजरेने बघा.. त्याचा विटाळ मानू नका..

 हितगुज

राजकारणाकडे डोळस नजरेने बघा.. त्याचा विटाळ मानू नका..



गेली ५४ वर्षे मी राजकीय पत्रकारिता करतो आहे. एक राजकीय विश्लेषक म्हणून माझी ओळख आहे. त्यामुळे सहाजिकच माझ्या लेखनात राजकीय विषय जास्त येत असतात. मी जा वृत्तपत्रांसाठी लेखन करतो ते देखील मला राजकीय विषयांवरच लिहायला आग्रह धरत असतात. म्हणूनच मी राजकीय विषयांवर लिहीत असतो. 

मी जे काही लिहितो ते साधारणपणे दररोज समाज माध्यमांवर प्रसारित करत असतो. अनेकांना ते आवडते, काहींना आवडत देखील नाही. त्यात त्यांची तक्रार असते की या समूहात राजकीय विषय नकोत. आज मी शिकलो त्या शाळेच्याच एका समूहात माझ्या राजकीय लेखाच्या पोस्टवरून वाद सुरू असलेला दिसला. काहींचे म्हणणे होते की इथे राजकीय पोस्ट नकोत, मात्र काहींचे म्हणणे होते की आम्हाला ते आवडतात मग त्या का नको? त्यावरून मग बराच वाद रंगला होता. म्हणून आज हाच विषय घेऊन मी सर्वांशी संवाद साधायचे ठरवले आहे. 

माझ्या राजकीय पत्रकारितेच्या कारकिर्दीत मी राजकारण अगदी जवळून पाहिले आहे. परिणामी अनेक राजकीय नेत्यांशी माझे व्यक्तिगत संबंध आहेत. या मंडळींच्या जवळ गेल्यावर लक्षात येते की शेवटी ती देखील आपल्यासारखीच माणसं आहेत. फक्त ते राजकारणी आहेत म्हणून त्यांना दूर ठेवायचे हे कुठेतरी चुकीचेच ठरते. 

आज आपल्या देशातील एकूणच राजकारणाचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे हे वास्तव नाकारण्याचे काहीच कारण नाही. मात्र त्याला जबाबदार आपण सर्वसामान्य नागरिकच आहोत असे मला मनापासून वाटते. आपण सर्वजण राजकारणाचा विषय आला की प्लेगचा उंदीर दूर करावा तसा तो विषय टाळायला बघतो. राजकारणात काय चालले आहे याचा कधीच विचार करत नाही. त्यामुळेच या देशातल्या राजकारण्यांचे फावते आहे असा निष्कर्ष काढता येतो. या देशातला सामान्य माणूस देशातल्या राजकारणात थोडाफार जरी रस घेऊ लागला आणि कुठे चुकते आहे हे दाखवून राजकारण्यांवर वचक ठेवू लागला तर या देशातील राजकारण आणि राजकारणी हे निश्चित सुधारू शकतात असे माझे मत आहे. मात्र आम्ही सर्वच मला काय त्याचे असे म्हणत सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो आणि फावल्या वेळात राजकारणावर टीका करण्यात धन्यता मानतो. निवडणुकीच्या वेळी आमच्यातले अनेक जण मतदानाला देखील जात नाहीत. मात्र जे काही होते आहे ते सुधारण्यासाठी आम्ही काय करू शकू हा आम्ही विचारही करत नाही. 

शेवटी राजकारण तरी काय आहे? राजकारण म्हणजे दोन माणसांमध्ये असलेले संबंध, त्यात अनेकदा डावपेच खेळले जातात. इतरत्र जाऊ द्या पण एका घरात दोन भावांमध्ये भावा-बहिणींमध्ये आई मुलांमध्ये किंवा वडील मुलांमध्ये देखील व्यवहारात डावपेच खेळले जातात. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातो, अशी उदाहरणे आपल्याला आपल्या अवतीभवती असंख्य दिसतात. याला राजकारण म्हणायचे नाही तर काय म्हणायचे आणि राजकारणी तरी नेमके काय करतात? ते देखील हेच करत असतात. मात्र आम्ही त्याकडे लक्ष देत नाही हे आमचे दुर्दैव म्हणावे लागेल. 

आम्ही राजकारणाकडे दुर्लक्ष करतो. राजकारण्यांशी कशाला संबंध ठेवायचे असेही म्हणतो. मात्र कोणतेही काम पडले की शेवटी आम्ही राजकारण्यांकडे जातोच. साधे घरात नळाला पाणी येत नाही किंवा मग पावसाळ्यात झाल्या तुंबून घरात पाणी येते तर आम्ही कोणत्यातरी राजकीय पक्षाचा असलेल्या नगरसेवकाला गाठतोच ना. कधी तो काम करतो आणि कधी करतही नाही. कारण सामान्य नागरिक किंवा मतदार म्हणून तुम्ही त्याच्यावर कोणताही वचक निर्माण केलेला नसतो. याला कारण एकच, तुम्ही राजकारणात कधी रस घेत नाही. तुम्ही जर राजकारण समजावून घेतले आणि प्रत्येक राजकारण्यावर अंकुश ठेवला तर या देशातले ९० टक्के राजकारणी निश्चित सुधारतील आणि या देशाची व्यवस्था देखील सुधारेल यात शंका नाही. 

एक राजकीय पत्रकार या नात्याने आधी म्हटल्याप्रमाणे माझे या राजकीय नेत्यांशी जवळीकीचे संबंध येतात. अनेकदा असे राजकारणावर टीका करणारे लोक त्यांना काही काम पडले की मला येऊन सांगतात की तुझी अमुक अमुक राजकारण्याशी मंत्र्याशी किंवा आमदाराशी जवळीक आहे, त्याच्याकडून माझे इतके काम करून दे. म्हणजे तुम्हालाही राजकारणाची गरज पडतेच ना. मग राजकारणाचा विटाळ कशासाठी? तुम्ही देखील सर्वच जण उघड्या डोळ्यांनी राजकारण बघू लागलात आणि ते समजावून घेत त्या राजकारण्यांवर अंकुश निर्माण करू शकला तर हा देश हळूहळू निश्चित सुधारेल हे नक्की. 

तुम्ही म्हणाल मी एकट्याने काय करायचं? इथे मला एका जैन साधुने सांगितलेली एक गोष्ट आठवते. एकदा एका अतिभव्य इमारतीला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाचे लोक आणि इतर नागरिक ती आग  विझवण्याचा प्रयत्न करत होते. त्या इमारतीतील नागरिक घाबरून बाहेर पडले होते. त्या इमारतीच्या वळचणीला असलेली पाखरे देखील दूर उडून गेली होती. त्याचवेळी त्या इमारतीच्या वळसळीला घरटे करून राहणारी एक चिमणी बाहेरच्या एका पाण्याच्या टाक्यातून आपल्या चोचीत बसेल इतके पाणी घेऊन त्या आगीवर नेऊन टाकत होती. 

त्यावेळी बाजूच्या झाडावर बसलेल्या एका कावळ्याने तिला विचारले," ही इतकी महाभयानक भीषण आग आहे, इतका पाण्याचा मारा होतो आहे, पण ती विझत नाही, त्यावेळी तुझ्या थेंब थेंब पाण्याने असा काय फरक पडणार आहे?" या प्रश्नावर ती चिमणी हसली आणि म्हणाली "काय फरक पडेल ते मला माहित नाही. मात्र भविष्य ज्यावेळी या आगीचा इतिहास सांगितला जाईल, त्यावेळी त्या इतिहासात माझे नाव आग भडकवणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये लिहिले जाईल. याचाच मला आनंद होईल." 

आपल्याला वाटते मी एकटा काय राजकारण सुधारणार? बरोबर आहे, पण एकाने प्रयत्न केला तर हळूहळू सर्वच प्रयत्न करू लागतील, आणि भविष्यात जेव्हा हा देश आणि इथले राजकारण सुधारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या असंख्य सामान्य माणसांमध्ये तुमचेही नाव देश बरबाद करणारे म्हणून नाही तर देश सुधारणारे म्हणून लिहिलेले असेल हे नक्की. 

म्हणूनच सांगतो राजकारणाचा विटाळ मानू नका..‌ डोळस नजरेने राजकारणाकडे बघा आणि विचार करा इतकेच सांगावेसे वाटते. 

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.