ऐतिहासिक नगरातील गणेश विसर्जन

 ऐतिहासिक नगरातील गणेश विसर्जन 

मूल,दीपक देशपांडे 

मूल शहरांत  बहुचर्चित प्रदिर्घ  परंपरा लाभलेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होत असून, गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी शहर सज्ज झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या गणेशोत्सवाला आज  पूर्णविराम मिळणार असून बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जाणार असून, गणेशभक्त जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला डोळे भरून बघण्यासाठी आणि पुढल्या वर्षी लवकर या अशी विनवणी करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत.

मूल येथे आजच  सर्वधर्मीय गणेश महाआरतीचे आयोजन

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश देण्यासाठी मूल शहरांत  आज दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी सर्वधर्मीय गणेश महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
मूल शहरातील गांधी चौक येथील श्री अष्टविनायक युवा गणेश मंडळ येथ विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून, दुपारी ३ वाजता महाआरती संपन्न होणार आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणत सामाजिक सलोखा आणि परस्पर बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
या महाआरतीला आमदार तथा माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा उत्सव ठरावा, या उद्देशाने सर्वधर्मीय महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गणरायाचे दर्शन व महाआरतीचा लाभ घ्यावा, तसेच सामाजिक एकतेचा संदेश अधिक दृढ करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हा राजकारणाचा भाग ठरु नये आणि कालच्या विसर्जन सोहळ्यात असलेल्या डिजेचा वापर आज चर्चेचा विषय ठरु नये एवढीच या बाप्पा चरणी प्रार्थना.
तर.......

आज गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मूल नगरपरिषदेने तलाव परिसरात विशेष तयारी केली असून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तलावाजवळ विशेष  सुरक्षा सुविधा करण्यात आली असून, गर्दीचे नियोजन करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलीस प्रशासनानेही सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त तैनात केला आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतूक व गर्दीचे नियोजन सुरळीत व्हावे यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे.
शहरातील मुख्य गांधी चौकात गणेश मंडळांच्या स्वागतासाठी विशेष मंच उभारण्यात आला असून, परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला आहे. विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका गांधी चौकातून मार्गक्रमण करताना त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
गणेश विसर्जनाचा हा सोहळा शांततेत, शिस्तीत आणि बंधुभावाने साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने गणेश मंडळे व नागरिकांना केले आहे. तसेच मूल नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व गणेश मंडळांना गणपती विसर्जनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
काल सायंकाळी मूलमधील नोंदणीकृत गणेश मंडळांपैकी मोजक्या गणेश मंडळांनी विसर्जन केले असल्याने आज मोठ्या प्रमाणात विसर्जन सोहळा संपन्न होणार आहे, त्यामुळे  मूल परिसरातील गणेशभक्त आणि नागरिकांना गणपती विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हा सोहळा कुठलेही गालबोट न लागता सालाबादप्रमाणे शांततेत पार पडावा अशी कामना आणि मूल शहराची शांत शहराची प्रतिमा कायम रहावी अशी अपेक्षा.



दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.