माझंही मत.... अशा प्रकारामुळे शिक्षणाचे पावित्र्य आणि गांभीर्य धोक्यात येईल...!
माझंही मत....
अशा प्रकारामुळे शिक्षणाचे पावित्र्य आणि गांभीर्य धोक्यात येईल...!
आयआयटी मुंबई चा विद्यार्थी साहिल वाकोडेने परीक्षेत कॉपी करताना त्याला प्राध्यापकांनी पकडले आणि तुझ्यावर कारवाई केली जाईल असे सांगितल्यामुळे त्याने होस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेला चार दिवस उलटले असून त्यावर जोरदार राजकारण केले जात आहे. विद्यार्थी आणि राजकीय पक्षांच्या अनावश्यक मागणीमुळे परीक्षेच्या वेळी कॉपी पकडणारे प्राध्यापक डॉ. सूर्यनारायण डुल्ला यांना निलंबित करण्यात आले आहे., त्याच वेळी त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना अटक केली जावी, तसेच महाविद्यालयाचे डीन डॉ. शिरीष केदारे यांनाही अटक करावे ही मागणी जोर धरते आहे. या प्रकारामुळे आता काही मूलभूत प्रश्न उपस्थित होत आहेत.
वस्तुतः परीक्षेत कॉपी करणे हा जसा गुन्हा आहे तसेच ते अनैतिक देखील आहे. त्यामुळे जर कोणी कॉपी करत असेल तर त्याला प्रतिबंध करणे आणि प्रसंगी त्याच्यावर कारवाई करणे हे परीक्षागृहात असलेल्या पर्यवेक्षकाचे कामच असते. प्रस्तुत घटनेत साहिल वाकोळे हा मोबाईल बघून ए आई च्या मदतीने कॉपी करत होता. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार डॉ. डुल्ला यांनी त्याचा मोबाईल काढून घेतला आणि तुझ्यावर कारवाई केली जाईल असे ठणकावले. माझ्यामते त्यात चूक काहीही नाही. कॉपी करण्याचा गुन्हा जर तुम्ही केला असेल तर त्याचे शासन तुम्हाला व्हायलाच हवे. अशा वेळी त्या विद्यार्थ्याने संस्था प्रशासनाला विनंती केली असती तर कदाचित कारवाई टाळता सुद्धा आली असती. मात्र तसे न करता त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. याचाच अर्थ साहिल वाकोडे हा मानसिक दृष्ट्या कमकुवत होता असा निघतो.तो कॉपी करत असताना आणि त्याची कॉपी पकडली जात असताना काढल्या गेलेला व्हिडिओ देखील समाज माध्यमे तसेच काही वृत्तवाहिन्यांवर प्रसारित होतो आहे. त्यावरून चित्र स्पष्ट होते आहे.
तरीही त्याच्या आत्महत्येचे भांडवल करत आधी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. मग त्यात कॉक्रोच जनता पार्टी युवक काँग्रेस अशा संघटना देखील उतरल्या ,आणि डुल्ला आणि केदारे यांच्यावर कारवाई करा तसेच त्यांना टक्कर अटक करा अशी मागणी केली जाते आहे. या प्रकरणाला आता राष्ट्रीय स्वरूप दिले गेले असून दस्तूर खुद्द राहुल गांधी यांनी देखील दंड थोपटले असल्याची माहिती आहे.
साहिल हा अनुसूचित जातीचा विद्यार्थी होता अशी माहिती मिळते. त्यामुळे या प्रकरणात संबंधितांवर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल व्हावा अशी देखील मागणी केली जाते आहे. मात्र मुळात गुन्हा झाला आहे काय हाच प्रश्न उपस्थित होतो आहे.
अशा प्रकारात एखाद्या विद्यार्थ्याने कॉपी केली तर पर्यवेक्षकांनी त्याला पकडायचे नाही का हा देखील प्रश्न उपस्थित होतो. मग पर्यवेक्षक ठेवण्याची गरजच नाही, किंबहुना विद्यार्थ्यांनी घरीच बसून पेपर सोडवावे आणि कॉलेजमध्ये आणून द्यावे अशीही मागणी केली जाईल. अशा परिस्थितीत परीक्षा या प्रकाराचे पावित्र्य आणि गांभीर्य संपून जाते याचा कोणी विचार करणार का? या प्रकाराला जातीय रंग दिला जातो आहे. सदर प्राध्यापक डॉ. सूर्यनारायण डुल्ला हे जातीवाचक शब्द वापरून साहिलला आधीपासूनच त्रास देत होते असा आरोप केला जातो आहे. मात्र जर असा त्रास देण्याचा प्रकार आधी घडत असेल तर त्याबाबत अधिक तक्रारी झाल्या होत्या काय हे देखील समोर यायला हवे. कालपासून साहिल चे वडील हे देखील मुंबईत येऊन धडकले आहेत आणि त्यांनी आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. आता असे आमरण उपोषणाचे आक्रस्थळे पाऊल उचलण्याआधी त्यांनी आधीच जर साहिलला कमकुवत मनाचा न बनवता खंबीर बनवले असते आणि येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी सक्षम बनवले असते तर त्याने आत्महत्या केली देखील नसती. मात्र त्यांनी आधी तसे केले नसावे असे दिसून येते. अन्यथा साहिलने इतके टोकाचे पाऊल उचलले देखील नसते असे म्हणता येते.
अशाप्रकारे जर राजकारणच करायचे म्हणून विरोधकांनी प्राध्यापक डुल्ला आणि केदारे यांचे निलंबन आणि अटक यासाठी आग्रह धरला तर भविष्यात शिक्षकी पेशात यायला देखील विद्वान मंडळी निश्चितच घाबरतील आणि जे कोणी शिक्षकी पेशात येतील ते कोणतीही कॉपी पकडायला किंवा कोणत्याही कथित गैरप्रकाराला प्रतिबंध करण्याच्या भानगडीत पडणार नाहीत. मग अशा परिस्थितीत परीक्षा आणि पर्यायाने शिक्षणाचे महत्त्वच संपलेले असेल हा धोका देखील लक्षात घ्यायला हवा.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी आधी सखोल चौकशी व्हावी मगच कोणावर कारवाई करायची ते ठरवावे असे सुचवले आहे. ही सूचना निश्चितच विचारात घेण्याजोगी आहे. देशभरातील आयआयटीच्या प्राध्यापक संघटनांनी देखील सखोल चौकशीची मागणी केली आहे. तोवर संबंधित प्राध्यापकांवर कारवाई केली जाऊ नये असा देखील आग्रह धरला आहे. त्याचवेळी विद्यार्थी संघटना आणि विरोधी पक्ष आक्रस्थळेपणाने वातावरण तापवत आहेत. यातून काहीही साध्य होणार नाही मात्र भविष्यात शिक्षण क्षेत्रात अराजकाचीच स्थिती निर्माण होईल हा धोका देखील लक्षात घ्यायला हवा. त्यामुळेच सर्व संबंधितांनी सखोल चौकशी होऊन नेमके वास्तव समोर येईपर्यंत धीर धरायला हवा असे मला वाटते.
अर्थात हे माझं मत झाले.... तुमचं स्पष्ट आणि परखड मत तुम्ही देखील मांडू शकता..
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment