आठवणींच्या हिंदोळ्यावर १८. मोठ्या मनाचे गुणग्राहक मुख्य संपादक.
आठवणींच्या हिंदोळ्यावर १८.
मोठ्या मनाचे गुणग्राहक मुख्य संपादक.
नागपूरचा गणेशोत्सव म्हटला की चंद्रशेखर आझाद गणेशोत्सव मंडळाची काही ना काही बातमी येणार हे ठरलेलेच असते. विशेष म्हणजे पोलिसांनी ही मूर्ती आणि देखावा जप्त केल्याचीच बातमी वृत्तपत्रात येत असते.
या चंद्रशेखर आझाद गणेशोत्सव मंडळाचा बराच जुना इतिहास आहे. गुलाब पुरी नामक समाजवादी कार्यकर्त्याने सुरू केलेला हा गणेशोत्सव आहे. विशेष म्हणजे या गणेशमूर्तीसमोर काहीतरी सरकारवर टीका करणारे व्यंगात्मक देखावे तयार केलेले असतात जे की जनसामान्यांच्या भावना भडकावणारे असू शकतात. त्यामुळे पोलीस लगेच कारवाई करून जप्त करतात. मग कधीतरी वर्ष सहा महिन्याने ती मूर्ती आणि तो देखावा पोलिसांकडूनच विसर्जित केला जातो.
माझ्या आठवणीनुसार १९६८ मध्ये विदर्भात कृषी विद्यापीठ व्हावे म्हणून जोरदार आंदोलन झाले होते. त्यावेळी या आंदोलनावर आधारित देखावा गुलाब पुरींनी गणेशमूर्तीसमोर तयार केला होता. तो लगेचच जप्त झाला होता. मग वर्षभराने कोर्टाच्या आदेशाने त्याचे विसर्जन करण्यात आले. तेव्हापासून दरवर्षी गुलाब पुरी असे देखावे करायचे आणि ते जप्त व्हायचे. कालांतराने त्यांचे वय झाले आणि त्यांचे निधन झाले. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा त्यांची परंपरा पुढे चालवतो आहे, आणि असेच देखावे करून ते पोलिसांना जप्त करू देतो आहे. बरेचदा मग गणेशोत्सव काळात त्याच्यावर तडीपारीची नोटीस देखील बजावली जाते.
यंदाही गणेश मूर्तीची स्थापना झाली, आणि एक दोन दिवसातच या मंडळाचा गणपती आणि समोरचा देखावा जप्त केल्याची बातमी वृत्तपत्रात झळकली. ही बातमी वाचल्यावर मला आठवण झाली ती महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि माझे एक सुहृद ह.मो. मराठे यांची...
आज सांगणार आहे हा प्रसंग १९९८सालचा आहे. त्यावेळी ह.मो. मराठे सर मुंबईच्या दैनिक नवशक्तीचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत होते, आणि मी दैनिक नवशक्तीचा विदर्भ प्रतिनिधी म्हणून कार्यरत होतो. गणेशोत्सव सुरू झाला आणि एक दोन दिवसातच गुलाब पुरीचा गणपती आणि देखावा जप्त झाल्याची बातमी आली. नेहमीचीच रड आहे म्हणून मी दुर्लक्ष केले. मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी मला मराठे सरांचा फोन आला. गुलाब पुरीचा गणपती आणि देखावा जप्त केल्याची बातमी यु एन आय या इंग्रजी वृत्तसंस्थेने प्रसारित केली होती. त्यात इंग्रजीमध्ये वर्णन करताना "कार्टून सीन वुइथ गणेश आयडॉल" असा उल्लेख होता. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचे सरकार होते. या सरकारचा रिमोट कंट्रोल व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात होता. हा मुद्दा आधार म्हणून घेत यूएनआय च्या बातमीच्या आधारे मराठे सरांनी त्या दिवशी दैनिक नवशक्तीत उपग्रह लिहिला होता त्यात एका व्यंगचित्रकाराच्या हाती राज्याचा रिमोट कंट्रोल असताना अशा व्यंग व्यंगात्मक देखाव्याला जप्त का केले जाते असा सवाल त्यांनी केला होता. हे सर्व वर्णन मला फोनवर सांगून मराठे सर म्हणाले "तू याबाबतीत थोडी सखोल चौकशी कर, आणि एक स्टोरी फाईल कर." त्यावर मी त्यांना स्पष्ट केले की नवशक्तीने घेतलेली भूमिका आणि वास्तव हे वेगवेगळे आहे. गुलाब पुरी, आणि आता त्याचा मुलगा हे अत्यंत कल्पक असले तरी ते तयार करत असलेले देखावे हे सरकारला अडचणीत आणणारे असतात आणि प्रसंगी जनसामान्यांना प्रक्षोभित करणारे असतात. म्हणूनच ते जप्त केले जातात. त्यामुळे आपण घेतलेल्या भूमिकेच्या विपरीत अशी ही स्टोरी असेल. तेव्हा "तशीही स्टोरी तू चालवली तरी मला चालेल, मात्र फॅक्ट्स काय आहेत ते समोर यायला हवे" असे मराठे सरांनी स्पष्ट केले.
मराठे सरांनी हिरवी झेंडी देताच मी लगेच कामाला लागलो. माझ्या आठवणीनुसार नागपुरच्या छिंदवाडा रोड वरून जाताना जरीपटका किंवा पाचपावली त्या परिसरात ही गणेश मूर्ती बसवली जात होती, आणि तिथल्याच पोलीस ठाण्याने ही गणेशमूर्ती जप्त केली होती. मग मी स्कूटर छिंदवाडा रोड वरून त्या परिसरात पळवली. ते पोलीस ठाणे शोधून काढले. तिथले पोलीस इन्स्पेक्टर सुदैवाने फारच सज्जन निघाले. त्यांनी मला पूर्ण सहकार्य केले आणि संपूर्ण माहिती दिली. जप्त केलेला देखावा कशाचा होता आणि त्यामुळे काय होऊ शकले असते ही संपूर्ण माहिती त्यांनी सांगितली, आणि गुलाब पुरीच्या मुलाला आम्ही गणेशोत्सव काळात तडीपार देखील केले आहे असेही त्यांनी सांगितले. तो बहुतेक आता यवतमाळ परिसरात त्याच्या नातलगांकडे असेल हे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते त्यामुळे त्याच्याशी संपर्क शक्य नव्हता, त्यामुळे त्याचा कोट घेता आला नाही.
मग मी त्या परिसरातील नगरसेविका बाईंना त्यांच्या घरी जाऊन भेटलो. अजूनही काही प्रतिष्ठित नागरिकांना भेटलो. एकूणच संपूर्ण प्रकाराची सविस्तर माहिती घेतली आणि मग एक सविस्तर वार्तापत्रच त्या विषयावर तयार केले आणि लगेचच फॅक्सने मुंबई नवशक्तीला पाठवून दिले.
यानंतर मी माझ्या रोजच्या धावपळीत हा मुद्दा विसरूनही गेलो होतो. आठवडाभराने पोस्टाने घरी नवशक्तीचा अंक आला. तो उघडून पाहिल्यावर बघितले तेव्हा अग्रलेख पानावरच संपादकीच्या बाजूला विशेष लेख म्हणून मराठे सरांनी हे वार्तापत्र प्रकाशित केले होते. सोबत त्यांनी संपादकीय टिपणी करणारी चौकट देखील टाकली होती. त्यात त्यांनी लिहिले होते की हे प्रकरण एका वृत्तसंस्थेने प्रसारित केल्यावर आम्ही या प्रकरणात जी भूमिका घेतली होती, तिला छेद देणारे वास्तव असल्याचे आमचे नागपूर प्रतिनिधी अविनाश पाठक यांनी कळवले आणि त्यांनी याबाबत नेमके वास्तव काय ते सांगणारा हा लेख सोबत पाठवला आहे. तो आम्ही प्रकाशित करत आहोत. वाचकांना नेमके वास्तव काय ते कळावे हाच यामागचा हेतू आहे.
अग्रलेख पानावर अग्रलेखाच्या बाजूलाच मुख्य लेख म्हणून माझ्या वार्ता पत्राला स्थान मिळावे ही बाब मला निश्चितच सुखावणारी होती. त्याचवेळी ह.मो. मराठ्यांसारख्या ज्येष्ठ संपादकाने देखील संपादक म्हणून आपली भूमिका कुठेतरी चुकली होती हे जाहीररित्या मान्य करावे याचे मला अधिकच अप्रूप वाटून गेले. त्यामुळे मराठे सरांबाबतचा माझा आदर अधिकच वाढला होता.
कालांतराने मराठे सरांनी नवशक्ती सोडले. मात्र तरीही त्यांचे माझे व्यक्तिगत संबंध कायम राहिले. त्या संबंधातच दोनदा विविध कार्यक्रमांना त्यांना वक्ते म्हणूनही मी बोलावले होते. तसेच मी प्रकाशित करत असलेल्या दिवाळी अंकात ते माझे नियमित लेखकही राहिले होते. मी लिहिलेल्या दाहक वास्तव या माझ्या पहिल्या पुस्तकाला त्यांनी प्रस्तावना देखील दिली होती.
साधारणपणे मोठ्या पदावरील व्यक्ती आपली चूक सहज मान्य करत नाही असा अनुभव येतो. मात्र मराठे सरांनी आपली चूक मान्य करत माझ्यासारख्या एका नवोदिताला पुढे आणत गुणग्राहकता दाखवली आणि अग्रलेख पानावर स्थान दिले होते, ही आठवण माझ्याकरिता कायम सुखदच राहिलेली आहे. आज मराठे सर आपल्यात नाहीत, मात्र त्यांच्या आठवणी माझ्याकरिता कायम आनंददायीच आहेत.
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment