कालचक्र या सर्व मंडळींना डॉ. हेडगेवारांच्या नावाचा इतका विटाळ का..?

कालचक्र  

या सर्व मंडळींना डॉ. हेडगेवारांच्या नावाचा इतका विटाळ का..?

काल नागपुरात महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या उड्डाणपुलाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्यात आले आहे. सहाजिकच त्यामुळे काँग्रेस, बहुजन समाज पक्ष आणि रिपाईवाल्यांना चांगलाच पोटशुळ उठला आणि त्यांनी डॉ. हेडगेवार यांचे नाव देऊ नका यासाठी या लोकार्पण समारंभाच्या वेळी निदर्शने केली.

च्या रस्त्यावर हा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे त्या रस्त्याचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग असे आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाला देखील बाबासाहेबांचेच नाव द्यावे अशी या निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांची मागणी होती. यावेळी आपल्या भाषणात नितीन गडकरी यांनी खुलासा केला की रस्त्याचे नाव बाबासाहेब आंबेडकर मार्ग असेच राहणार आहे मात्र उड्डाण पुलाचे नाव डॉ. केशव बळीराम हेडगेवार मार्ग असे दिले आहे. त्यावर आंदोलकांचे म्हणणे होते की उड्डाणपुलालाही डॉ आंबेडकर यांचेच नाव द्यावे किंवा मग छत्रपती शिवाजी महाराज किंवा अशा महापुरुषाचे नाव द्यायला हवे होते. त्यावरून हा वाद उपस्थित करण्यात आला होता. 

आता इथे प्रश्न असा उपस्थित होतो की काँग्रेस रिपब्लिकन आणि  बसप वाल्यांना डॉ. हेडगेवार यांच्या नावाचा इतका विटाळ का व्हावा? आता ज्या रस्त्याला आंबेडकरांचे नाव आहे त्याच नावाने उड्डाण पूल व्हावा असा जर आग्रह असेल तर इतर ठिकाणी अनेक रस्त्यांना वेगळी नावे आहेत, तर तिथल्या उड्डाणपूलांना वेगळी नावे आहेत. नागपुरातच जो वर्धा रोड म्हणून ओळखला जातो त्या रस्त्याला पंडित जवाहरलाल नेहरू मार्ग असे नाव आहे. मात्र त्या रस्त्यावर राहटे कॉलनी ते शहीद गोवारी स्मारक या अंतरावर जो उड्डाणपूल उभारला आहे त्याला शहीद गोवारी स्मारक उड्डाणपूल असे नाव दिले आहे. इथेही हेडगेवार ऐवजी दुसऱ्या कोणाचे नाव दिले असते तर या मंडळींना इतका पोटशुळ उठला नसता हे निश्चित.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे संस्थापक तसेच इतर सर्व अधिकारी यांना आपल्या देशात काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीचे इतर पक्ष यांचा कायम विरोधच राहिला आहे. वस्तुतः बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात विचारांची क्रांती घडवून आणली आणि तळागाळातील नागरिकांचे संघटन केले त्यांचे काम निश्चितच दुर्लक्षण्याजोगे नाही. मात्र त्याच परिप्रेक्ष्यात बघितल्यास डॉ. हेडगेवार यांचे काम देखील लक्षणीय असेच राहिलेले आहे. या देशातील कोणताही राजकीय अभिनवेश न ठेवता सामान्य माणूस वैचारिक अधिष्ठान देत संघटित करण्याचे काम डॉक्टर हेडगेवार यांनी १९२५ साली या देशात सुरू केले. सुरुवातीला या देशातील बाल आणि तरुणांना मैदानावर खेळायला बोलावून बलशाली बनवणे आणि त्याचबरोबर त्यांना ठोस असे वैचारिक अधिष्ठान देणे या हेतूने ही संघटना हेडगेवार यांनी सुरू केली होती. मात्र ही संघटना कुठेतरी जनसामान्यांना रुचली, म्हणून हळूहळू समाजाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये या संघटनेचे काम पोहोचले. आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात फक्त तरुण येत होते. नंतर स्त्रियांना सुद्धा बलशाली बनवत सामाजिक आणि वैचारिक अधिष्ठान देण्यासाठी संघाच्याच धर्तीवर राष्ट्रसेविका समिती स्थापन करण्यात आली. त्या पाठोपाठ मग आदिवासी क्षेत्रात काम करण्यासाठी वनवासी कल्याण आश्रम, कामगार क्षेत्रात काम करण्यासाठी भारतीय मजदूर संघ, धार्मिक क्षेत्रात काम करण्यासाठी विश्व हिंदू परिषद, सांस्कृतिक क्षेत्रासाठी संस्कार भारती, विद्यार्थी क्षेत्रासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी आधी भारतीय जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्ष, सहकार क्षेत्रासाठी सहकार भारती, संस्कृतच्या प्रचारासाठी संस्कृत भारती, आरोग्य क्षेत्रासाठी आरोग्य भारती अशा विविध जवळपास ४० संघटना आज संघ परिवारात सक्रिय आहेत आणि या सर्व संघटनांच्या माध्यमातून आज या देशातील जवळपास ५० कोटी लोक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या संघ विचाराशी जुळलेले आहेत. एका व्यक्तीच्या पुढाकाराने आज या देशात इतके मोठे काम उभे होऊ शकते आणि याच विचारधारेच्या आधारावर देशात सत्ता बदल घडवला जाऊ शकतो, तो विचार एकदमच तिरस्करणीय तर मानता येणार नाहीच. आता तुम्हाला संघ विचारांचा विटाळ होतो कारण तिथे तुमचे विहित स्वार्थ दडलेले आहेत, तुमचा स्वार्थ साधण्यात संघ विचार आणि संघाचे कार्यकर्ते आडवे येऊ शकतात ही भीती आहे. आज संघ विचारातून प्रेरणा घेऊन आलेल्या व्यक्तींचे सरकार देशात सत्तेवर आल्याने अनेकांच्या दुकानदा-या बंद झाल्या आहेत. त्यामुळेच आज संघ विचाराला विरोध होतो आहे. 

एका काळात काँग्रेसचे नेते असलेले देशातील महापुरुष महात्मा गांधी यांनीही संघाचे कार्य पाहिले होते. डॉ. आंबेडकरांनी देखील संघ शिबिराला भेट दिली होती. १९६२ च्या युद्धात ज्यावेळी लष्करी आणि निमलष्करी दले सीमेवर लढत होती, त्यावेळी नागरी संरक्षणासाठी संघ स्वयंसेवक पुढे धावून आले होते. त्याची दखल दस्तूर खुद्द पंडित नेहरूंनाही घ्यावी लागली होती. त्यामुळेच १९६३च्या गणतंत्र दिनाच्या संचालनात संघ स्वयंसेवकांची तुकडी देखील सहभागी करून घेतली गेली होती. नंतर पुन्हा राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसच्याआणि डाव्या मंडळींनी आपली भूमिका बदलली आणि संघाला विरोध सुरू केला, हा भाग वेगळा. मात्र त्यांनी विरोध केला तरी सामान्य माणूस निर्णय निर क्षीर विवेकानेच काम करतो. त्यामुळे चांगले काय आणि वाईट काय हे त्याला निश्चित कळते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होऊन आज शंभर वर्षे झाली आहेत. मात्र या शंभर वर्षात तुम्ही सतत विरोध करूनही सामान्य माणूस संघाकडे आकर्षित होतो यामागे नेमकी कारणे काय हे शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा. मात्र तो न करता तुम्ही असा व्यर्थ विरोध करत असता.

ज्याप्रमाणे डॉ. आंबेडकर यांनी या देशात काम उभे केले त्याचप्रमाणे डॉ. हेडगेवार यांनी देखील मोठे काम उभे केले आहे हे वास्तव नाकारता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील मावळ्यांना एकत्रित करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यांचाच विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघात हाच पुढे नेला जातो आहे. हे लक्षात घेता हेडगेवारांचे नाव देखील देशवासीयांना लक्षात ठेवायलाच हवे असे आहे. 

दुसरे असे की गांधी नेहरू आंबेडकर यांची नावे आज या देशात ठिकठिकाणी दिलेली आढळतात. मध्यंतरी समाज माध्यमांवरच नेहरू गांधी कुटुंबातील व्यक्तींची नावे कुठे कुठे दिली याचा आढावा घेतला होता, तेव्हा मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, कमला नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी या सर्वांची नावे हिशोब लावला असता शेकड्यात दिलेली आढळून आली. सर्वत्र त्यांचीच नावे द्यायची काय आणि मग या देशात इतर कोणीच थोर व्यक्ती झाल्या नाहीत काय असाही प्रश्न उपस्थित होतो.

काँग्रेस बसप आणि रिपाई यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे एक तोंडीलावणे झाले आहे. जेव्हा काही विषय नसतो तेव्हा संघाचे नाव पुढे करून शिमगा करणे हा त्यांचा आवडीचा उद्योग असतो. आज या बहुतेक सर्व पक्षांनी जनाधार गमावलेला आहे, आणि राजकारणात पुढे येण्यासाठी त्यांच्याजवळ कोणाचाही मुद्दा उरलेला नाही. म्हणूनच असे फालतू मुद्दे उपस्थित करून ते लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 

मात्र या देशातील जनता सुजाण आहे. ती अशा तोंडी लावण्यांना फारसा भाव देणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळेच अशी आंदोलने कायम दुर्लक्षितच राहणार हे स्पष्ट दिसते आहे. 

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.