"सहज सुचलं म्हणून..." गणेशोत्सवाचे बिभत्स स्वरूप बदलण्यासाठी सुजाण नागरिकांनीच पुढाकार घ्यायला हवा

 "सहज सुचलं म्हणून..." 

गणेशोत्सवाचे बिभत्स स्वरूप बदलण्यासाठी सुजाण नागरिकांनीच पुढाकार घ्यायला हवा



सोमवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रभर सर्वत्र वाजत गाजत सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. ठिकठिकाणी लोक सहभागातून गणेश मूर्ती ची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मूर्तीभोवती जमतील त्या पद्धतीने देखावे देखील तयार करण्यात आले आहेत. या मूर्तीच्या दर्शनासाठी नागरिक मोठ्या संख्येत गर्दी देखील करताना दिसत आहेत.

मात्र जनजागरणाची जी संकल्पना डोळ्यासमोर ठेवून लोकमान्य टिळकांनी 1893 स*** देशात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले, ते जनजागरण आणि जनसामान्यांचे मनोरंजन या दोन्ही संकल्पना या सार्वजनिक गणेशोत्सवातून पूर्णतः बाद झालेल्या दिसून येत आहेत‌ फक्त लोकांकडून पैसे गोळा करून भव्य दिव्य असा देखावा करणे, आणि दहा दिवस  डीजेचा दणदणाट करून ध्वनी प्रदूषण करणे इतकेच या गणेशोत्सवाचे स्वरूप राहिलेले दिसून येत आहे. 

१९८४-८५ पर्यंत महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप काहीसे वेगळे होते. त्यावेळी देखील गणेशोत्सवात भव्य अशा मूर्ती आणल्या जायच्या. मूर्तीभोवती आकर्षक असे देखावे देखील केले जायचे. गणेश मूर्ती प्रतिष्ठापणे साठी आणली जात असताना जशी वाजत गाजत आणली जायची तशीच विसर्जनासाठी देखील वाजत गाजत नेली जात असे. मात्र त्याचबरोबर दहा दिवस गणपती समोर विविध समाजप्रबोधनाचे आणि मनोरंजनाचे कार्यक्रम देखील होत असत. 

आज पासून ७०-७५ वर्षांपूर्वी गणेशोत्सवाचे स्वरूप फार वेगळे होते. त्यावेळी गणेशोत्सवासमोर त्या त्या वस्तीतील स्थानिक कलावंत एकत्र येऊन सामाजिक विषयांवरील तीन अंकी गाजलेल्या लेखकांची नाटके सादर करत असत. नवोदित गायकांच्या मैफिली आयोजित करत असत. मुंबई पुणे सांगली सातारा नागपूर येथे गणेशोत्सवात आणि शारदोत्सवात होणाऱ्या नाटकांमधूनच अनेक व्यावसायिक कलावंत पुढे व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत देखील आपले कर्तृत्व दाखवून गेले. अनेक गाजलेले गायक वादक संगीताकार हे सुरुवातीच्या काळात गणेशोत्सवातच आपली कला सादर करत असत. मला आठवते ९७०-७१-७२ या काळात ख्यातनाम संगीतकार आणि गीतकार यशवंत देव यांचे कार्यक्रम नागपुरातल्या गणेशोत्सवात साजरे होत असत. विख्यात लोकशाहीर शरद मुठे हे देखील गणेशोत्सवातूनच पुढे आले होते. अनेक  वाद्यवृंदांचे संच देखील गणेशोत्सवातूनच पुढे व्यावसायिक स्तरावर विकसित झाले. 

गणेशोत्सवात केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे असे नाही, तर वैचारिक खाद्य पुरवणारे देखील अनेक कार्यक्रम होत असत. प्रचलित विषयांवर परिसंवाद कथाकथन कविता वाचन वादविवाद स्पर्धा असे विविध कार्यक्रम गणेशोत्सवात साजरे होत असत. पाठपुरात त्या काळात कॉम्रेड ए बी वर्धन, वसंत साठे, सुमतीबाई सुकळीकर, डॉ. सुनील सुभेदार असे राजकारणी आणि विचारवंत अशा वैचारिक परिसंमादात सहभागी होत असत. याशिवाय त्या त्या वस्तीतील बालकलाकारांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम साजरे होत असत. त्यातून अनेक बालकलाकारांची कला विकसित होत असे. मुलांसाठी खेळांच्या स्पर्धा तसेच वादविवाद भावगीत गायन अशा विविध स्पर्धा त्यावेळी होत असत. त्यातून अनेक नव्या कलाकारांना आपले कलागुण दाखवण्याची संधी मिळत असे. त्यांना योग्य असे पुरस्कार देखील दिले जात असत.

इतकेच काय पण गणपती समोर दररोज भजन प्रवचन कीर्तन असे धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रम देखील साजरे होत असत. मला आठवते नागपुरात शिवकथाकार विजयराव देशमुख यांच्या शिवाजी वरील व्याख्यानमालांचे कार्यक्रम प्रभावती राजेंच्या व्याख्यानाचे कार्यक्रम असे वैचारिक खाद्य देणारे कार्यक्रम देखील दरवर्षी विविध ठिकाणी होत असत.

आता मात्र देखाव्यांच्या जगात हे लोक शिक्षणाचे आणि लोक मनोरंजनाचे कार्यक्रम पूर्णतः नामशेष झालेले दिसत आहेत. आता फक्त मोठ्या मोठ्या मूर्ती उभारल्या जातात. दहा दिवस तिथे डीजेचा  कानठळ्या बसवणारा दणदणाट सुरू असतो आणि शेवटच्या दिवशी मिरवणुकीचा धांगडधिंगा हा देखील बघायला मिळतो. हे बघून सभ्य आणि सुजाण नागरिकांना नको तो गणेशोत्सव असे वाटू लागलेले आहे. 

गणेशोत्सवाचे हे बिभत्स संताप जनक स्तरुप बदलायलाच हवे. त्यासाठी समाजातील प्रत्येक सुजाण नागरिकाने पुढाकार घ्यायला हवा. दरवर्षी गणेशोत्सवासाठी लोक तुमच्याकडे वर्गणी मागण्यासाठी येतात. त्यावेळी आधी तुम्ही कोणते कार्यक्रम करणार याची माहिती विचारून मगच आम्ही वर्गणी देऊ असे प्रत्येकाने ठरवायला हवे. फक्त दहा दिवस गणेश मूर्ती बसवून डिजेचा

 दणदणात करणार असाल तर वर्गणी देणार नाही अशी भूमिका प्रत्येक नागरिकांनी घ्यायला हवी. अशी भूमिका घेतली तरच लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेले गणेशोत्सव पुन्हा सुरू होतील तितकेच सहज सुचले म्हणून सांगावेसे वाटते. 


✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.