स्पष्ट आणि परखड राहुल गांधींची व्यर्थ आदळआपट

 स्पष्ट आणि परखड

राहुल गांधींची व्यर्थ आदळआपट






भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीने आधी पक्ष फोडतो मग निवडणूक चिन्ह देखील चोरतो असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. भाजपने आधी शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, आणि आता तर तृणमूल काँग्रेस देखील फोडली आहे असाही दावा राहुल गांधी यांनी केला आहे. 

२०२२ मध्ये शिवसेना फुटली तर २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन तुकडे झाले. दोघांनीही आपले निवडणूक चिन्ह गमावले. आता २०२६ मध्ये तृणमूल काँग्रेस देखील  फुटली. अद्याप त्यांचे निवडणूक चिन्ह गेलेले नसले तरी त्याबाबतही काय होईल ते सांगता येत नाही. सध्या तृणमूल काँग्रेसचे निवडणूक चिन्ह गोठवल्याची बातमी आहे. मात्र ते भविष्यात दोन पैकी एका गटाला दिलेही जाऊ शकते. त्यातही निवडणूक आयोगाला जो गट खरा वाटेल त्यालाच ते दिले जाईल. त्यामुळेच राहुल गांधी हे आरोप करत आहेत. 

इथे प्रश्न असा येतो की भाजपने पक्ष फोडण्याचे लाख प्रयत्न केले असतील, तरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, किंवा मग तृणमूल काँग्रेस हे का फुटले? त्यांचे नेते आणि कार्यकर्ते इतके खंबीर नव्हते का? की इथे पक्ष नेतृत्वाचे काही प्रश्न होते म्हणून हे पक्ष फुटले, याचाही विचार व्हायला हवा. मात्र तसे न करता राहुल गांधी भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगावरच आरोप करत सुटलेले आहेत. हे आरोप फक्त राहुल गांधीच करतात असे नाही तर इतर विरोधी पक्ष देखील हे आरोप करत आहेत. मात्र वास्तवाचा विचार कोणीच करत नाही हे दिसून येते आहे. 

२०२२ मध्ये शिवसेना फुटली. काँग्रेस आणि राहुल गांधी या फुटीला भारतीय जनता पक्षाला जबाबदार ठरवतात. मग १९९२ मध्ये देखील शिवसेना फुटली होती. त्यावेळी शिवसेनेतून फुटलेले १६ आमदार काँग्रेसमध्येच आले होते. तोच प्रकार २००५ मध्ये देखील झाला होता. मग दोन १९९२ आणि २००५ च्या शिवसेना फुटीची जबाबदारी काँग्रेस पक्ष घेणार का? आणि काँग्रेसचे विद्यमान नेते या नात्याने राहुल गांधी या पापाचे परिमार्जन करणार का? याचेही उत्तर त्यांनी द्यायला हवे. त्याचबरोबर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राहुल गांधींचे पंजोबा पंडित जवाहरलाल नेहरू आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांनी देखील अनेकदा अनेक पक्ष फोडले आणि त्यातून त्यांचे आमदार खासदार आणि कार्यकर्ते आपल्याकडे ओढले. त्याची जबाबदारी देखील ते घेणार का याचेही उत्तर त्यांनी द्यायला हवे.

२०२२ मध्ये शिवसेना फुटली त्याला खऱ्या अर्थाने जबाबदार शिवसेना नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या भोवतीची चांडाळ चौकडीत होती हे वास्तव नाकारता येत नाही. उद्धव ठाकरेंनी सत्तेच्या मोहापायी २०१९ मध्ये जनादेशाशी गद्दारी केली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांना भाजपसोबत जाण्याचा कौल दिला होता. मात्र तो कौल नाकारत न दिलेल्या वचनाचा, किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत अमित शहा यांनी आश्वासन दिले असा कोणताही पुरावा न देता बिन बुडाचा दावा करत जनादेशाचा अनादर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी अभद्र शैयासोबत करत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कुटुंबाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे तत्व पाळले होते. ते तत्व झुगारून देत स्वतःच मुख्यमंत्री बनले आणि आपल्या मुलाला देखील कॅबिनेट मंत्री बनवले. यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी लाचारी पत्करली. त्यामुळे सच्चे शिवसैनिक नाराज झाले होते. त्यातही या सरकारमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व होते. शिवसेनेला दुय्यम स्थान होते. त्यामुळे नाराज शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बाहेर पडले आणि त्यांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले. अर्थात आपली चूक लक्षात न घेता उद्धव ठाकरे आणि त्याची चांडाळ चौकडी भाजपवरच आरोप करते आहे आणि ४० गद्दार आमदार आणि बारा गद्दार खासदार जरी भाजपसोबत गेले तरी शिवसैनिक आमच्या सोबत आहे असा खोटाच दावा उद्धव ठाकरे आणि चौकडी करत आले. तो दावा देखील २०१९ मध्ये जनतेने खोटा ठरवला आहे. तरीही राहुल गांधी भाजप आणि निवडणूक आयोगाला या फुटीसाठी जबाबदार धरत आहेत, हा या शतकातला विनोदच म्हणावा लागेल, आणि त्याचबरोबर त्यांचा उल्लेख पप्पू म्हणून केला जातो तो सार्थच आहे हे सिद्ध होते. 

जो प्रकार शिवसेनेचा झाला तोच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी काकाच्या खांद्याला खांदा लावून पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र अजित पवारांना बाजूला सारून राजकारणात फारशी गती नसलेल्या आपली कन्या सुप्रिया सुळे यांना पक्षाचे नेतृत्व सोपवायला निघाले होते. ते बघून अजित पवार दुखावले आणि त्यांच्यासोबत त्यांचे नेतृत्व मानणारे ४० आमदार देखील बाहेर पडले. एखादा पक्ष फुटून त्यातील आमदार बाहेर येणार असले तर सत्ताधारी पक्ष त्यांना तुम्ही आमच्याकडे येऊ नका असे म्हणायला काही साधू संन्यासी नाही. आलेल्यांचे स्वागत करून त्यांनाही सत्तेत सहभाग घ्यायला सत्ताधारी कायम तयारच असतात. याचा अर्थ भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस फोडली असा होत नाही.

तोच प्रकार तृणमूल काँग्रेसचा देखील झाला आहे. तिथे पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांची  हुकूमशाही चालत होती. त्याने त्रासलेल्या सुधेंदू अधिकारी यांनी बंड केले आणि वेगळा गट स्थापन केला. त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. ममता बॅनर्जींची हुकूमशाही जर या नेत्यांना अस्वस्थ करत असेल तर त्याला भाजप जबाबदार कसा? 

मात्र तरीही भारतीय राजकारणात सध्या पप्पू म्हणून ओळखले जाणारे राहुल गांधी भाजपलाच याबाबत दोषी ठरवत आहेत. अर्थात त्यांच्या मंदबुद्धीला साजेसेच त्यांचे वर्तन आहे असे म्हणावे लागते. तुम्हाला तुमचे पक्ष सांभाळता येत नाहीत. तुमच्या कार्यकर्त्यांना सांभाळून ठेवता येत नाही. तुम्ही कौटुंबिक एकाधिकारशाहीसाठी पक्षाची वाट लावायला तयार होता, मग तुमचे कार्यकर्ते तुमच्या पासून दुरावले तर त्याला भाजप आणि निवडणूक आयोग जबाबदार कसा याचेही उत्तर तुम्ही द्यायला हवे. अर्थात हे राहुल गांधींना समजत नाही आणि 'मेरी मुर्गी की एकैच टांग" या न्यायाने ते बडबडतात. मात्र देशातील जनता सुजाण आहे. ती खरे काय आणि खोटे काय हे जाणते. त्यामुळेच राहुल गांधींची ही आदळआपट व्यर्थ आहे असे म्हणता येते.

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.