माझंही मत कथित पुरोगाम्यांनी विदर्भ साहित्य संघाच्या वाटचालीला अपशकुन करू नये.

 माझंही मत

कथित पुरोगाम्यांनी विदर्भ साहित्य संघाच्या वाटचालीला अपशकुन करू नये.

नागपूरच्या झाशी राणी चौकातील विदर्भ साहित्य संघाचे सांस्कृतिक संकुल कथा ३१ वर्षापासून अपूर्णच राहिलेले आहे. आता तिथे काही तांत्रिक बाबी उद्भवल्यामुळे ती जागा आम्ही सोडतो आणि सरकारने आम्हाला दुसऱ्या जागी नवे संकुल बांधून द्यावे आणि ही जागा सरकारने ताब्यात घ्यावी असा प्रस्ताव साहित्य संघाच्या नव्या कार्यकारिणीने राज्य शासनाला दिला आहे. 

आज नागपूरातील एका प्रमुख दैनिकाने हा मुद्दा घेत साहित्य संघावर टिकेची झोड उठवली आहे. ही झोड उठवताना प्रस्तुत स्तंभलेखकाने उजवे आणि डावे हा वाद देखील उपस्थित केला आहे.

झाशी राणी चौकातील विदर्भ साहित्य संघाच्या जागेवरील जुनी विदर्भ साहित्य संघाची इमारत पाडून तिथे नवे सांस्कृतिक संकुल बांधण्यास सुरुवात १९९५ मध्ये झाली. त्या योजनेनुसार खाली तळघरात पार्किंगची व्यवस्था करायची, त्यानंतर दोन मजले दुकान आणि कार्यालयीन चेंबर्स बांधून भाडेपट्टीवर द्यायचे, आणि मग वर साहित्य संघाचे कार्यालय, काही दालने आणि सगळ्यात वरच्या मजल्यावर भव्य असे सभागृह उभारले जाणार होते. या सांस्कृतिक संकुल योजनेचा गाजावाजा देखील खूप झाला. मात्र ही योजना आज ३१ वर्षानंतरही अपूर्णच राहिली आहे. या संदर्भात बरेच वादही झाले. मात्र निष्पन्न काहीही झाले नाही. दरम्यानच्या काळात अर्धवट झालेले बांधकाम, त्यात खालच्या मजल्यावर झालेली दुकाने, ती भाड्याने दिल्यामुळे ते भाड्याचे उत्पन्न तर सुरू झाले. वरच्या मजल्यावर विदर्भ साहित्य संघाचे कार्यालय देखील सुरू झाले. मात्र १२५० खुर्च्यांचे भव्य सभागृह अद्यापही अपूर्णच आहे. आता या इमारतीला अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्यामुळे तिथे कार्यक्रम घेता येत नाहीत अशी परिस्थिती आली आहे. विकासाकाने बांधकाम करताना सदोष बांधकाम केल्यामुळे अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळणे देखील कठीण झाले आहे अशी माहिती मिळाली. त्यामुळेच साहित्य संघाच्या नव्या कार्यकारिणीने सरकारनेच ही जागा ताब्यात घ्यावी आणि आम्हाला नव्या जागेवर साहित्य संघाचे कार्यालय भव्य असे सभागृह आणि काही दालने बांधून द्यावी अशी विनंती शासनाकडे केली आहे. 

1995 पूर्वी या विदर्भ साहित्य संघ परिसरात एक वेगळाच माहोल असायचा. तिथे धनवटे रंगमंदिरात तर रोज वेगवेगळे कार्यक्रम चालायचे. त्यात काही नाटकं असायची. काही संगीताच्या मैफली असायच्या, तर काही वैचारिक आदान प्रदान करणारे कार्यक्रम देखील असायचे. सर्व कार्यक्रमांना भरगच्च गर्दी असायची. त्याशिवाय गडकरी सभागृह, बापूजी अणे सभागृह अशी वेगवेगळी चार  दालने तिथे होती. त्यात देखील छोटेखानी कार्यक्रम चालायचे. परिणामी त्या परिसरात सांस्कृतिक वातावरण असायचे. साहित्य संघाच्या कार्यालयासमोर असलेल्या मोकळ्या जागेत बगीचा करण्यात आला होता. तिथे बाक किंवा खुर्च्या टाकून संध्याकाळचे साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातले जाणकार येऊन बसायचे आणि त्यांच्या गप्पा चालायच्या. अनेक नवे लेखक आणि सांस्कृतिक क्षेत्रातले कार्यकर्ते देखील तिथे यायचे. त्यामुळे एक वेगळेच सांस्कृतिक वातावरण तिथे तयार झाले होते. 

मात्र इमारत पडली आणि तिथे दुकाने उभी झाली. त्यामुळे आता ते सांस्कृतिक वातावरण संपले आहे. विदर्भ साहित्य संघाचा मॉल झाला आहे अशी टीका नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक नारायण कुलकर्णी कवठेकर यांनी केली आहे. त्यातील वास्तव नाकारता येत नाही. 

आजच्या इमारतीत ते जुने सांस्कृतिक वातावरण पुन्हा निर्माण करणे अशक्य झाले आहे. त्याचप्रमाणे अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही आणि एखादी दुर्घटना घडली तर सर्व जबाबदारी साहित्य संघाच्या कार्यकारिणीवर येणार आहे, म्हणूनच साहित्य संघाच्या कार्यकारिणीने तिथे कार्यक्रम घेणे थांबवले असून आता सरकारने आम्हाला दुसरी जागा द्यावी आणि तिथे संकुल बांधून द्यावे अशी मागणी केली आहे. 

आजची परिस्थिती लक्षात घेता ही मागणी सद्यस्थितीत सगळ्यात वास्तववादी आणि सोयीची अशीच म्हणता येईल. कारण तिथे जवळजवळ ३०० गाळेधारकांनी दुकाने भाड्याने घेतली आहेत. ते सर्व दुकानदार बाहेर काढायचे म्हटले तर कोर्टकचेऱ्या करण्यातच दीर्घकाळ जाणार आहे. त्याचबरोबर ती इमारत पाडायची आणि पुन्हा नवी इमारत उभी करायची हे देखील खर्चिक काम होणार आहे. म्हणूनच विद्यमान कार्यकारिणीने केलेल्या मागणीचे खरे तर स्वागत करायला हवे. 

मात्र आज प्रकाशित झालेल्या लेखात या सर्वच प्रकारावर जोरदार टीका करण्यात आली आहे. ही टीका करताना तिथे डावे आणि उजवे हा वादही उपस्थित केला गेला आहे. प्रस्तुत स्तंभलेखकाच्या मते विदर्भ साहित्य संघ सध्या उजव्यांच्या हातात गेला आहे. भलेही आजच्या कार्यकारिणीचे नेतृत्व एका पुरोगामी संघटकाकडे असले तरी देखील त्याच्या हाताने जुने नामोनिशान मिटवून टाकायचे आणि सर्व काही नवे आणायचे हे उजव्यांचे तत्त्वज्ञान वास्तवात आणले जात आहे. 

खरे तर प्रस्तुत स्तंभलेखक एक बाब विसरतात की साहित्य संघात जे काही जुने होते ते खरोखरी विदर्भाची वांङमयीन आणि सांस्कृतिक जपणूक करणारे होते आणि त्याचेच नामोनिशान मिटवले गेले आहे. प्रस्तुत कार्यकारिणी जर इथे शक्य नसेल तर जवळपास कोणती नवी जागा शोधून तिथे तेच वाङ्मयीन आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण करणार असेल आणि पूर्वीसारखेच कार्यक्रम तिथे होणार असतील, तर त्याचे स्वागतच करायला हवे. त्यावर कारण टीका करण्यात काहीच अर्थ नाही. 

सोबतच इथे डावे आणि उजवे हा वाद उपस्थित करणे देखील निरार्थक आहे. तसे म्हटल्यास या भारतीय भूमीच्या जुन्या प्राचीन वैभवाच्या खाणाखुणा ज्या होत्या आणि इथला जो वैभवशाली इतिहास होता तो मिटवून परकीयांना सोयीचा इतिहास भारतीयांवर लादण्याचे पापच देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डाव्या मंडळींनी केले आहे. मात्र आज तेच डावे नाक वर करून हा इतिहास सुधारू बघणाऱ्यांवर टीका करीत आहेत. त्याला कारणेही आहेत. जर खरा इतिहास लोकांसमोर आला तर या डाव्यांची दुकाने बंद होणार आहेत. त्यामुळे व्यक्तिगत स्वार्थापोटी ही ओरड चालू आहे. 

विदर्भ साहित्य संघात देखील जे काही घडले त्याची सुरुवात एका कथित स्वयंघोषित पुरोगामी अध्यक्षाच्या काळातच झाली होती. नंतरच्या दोन अध्यक्षांनी तोच वसा पुढे चालवला. परिणामी झाशी राणी चौकात जे काही उभे राहिले ते जुन्या विदर्भ साहित्य संघाचे चैतन्ययहीन कलेवर आहे. नवे अध्यक्ष आणि त्यांची कार्यकारिणी जर या कलेवरात नवे प्राण फुंकण्याचा प्रयत्न करत असेल तर या कथित पुरोगामी पुरोगामी यांनी त्यांना अपशकुन करू नये, त्यांची वाटचाल सुरळीत चालू द्यावी इतकेच इथे सुचवावेसे वाटते. 

अर्थात हे माझे मत झाले.... तुमचे स्पष्ट आणि परखड मत तुम्ही देखील मांडू शकता.... त्याचे स्वागतच होईल...

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.