कालचक्र .... मनोज जरांगेंच्या आंदोलनामागचे नेमके वास्तव आता समोर यायला हवे.

 कालचक्र ....

मनोज जरांगेंच्या आंदोलनामागचे नेमके वास्तव आता समोर यायला हवे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आता पंधरावा दिवस आहे. काल त्यांनी आपण १५ सप्टेंबरला मुंबईकडे कुछ करणार असून १९ सप्टेंबर पासून आझाद मैदानात उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी मुंबई पोलिसांनी त्यांना आझाद मैदानात उपोषण करण्याची परवानगी नाकारण्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले आहे. मात्र जरांगे आंदोलन करण्यावर ठाम आहेत त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याच दरम्यान मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला काही स्तरातून विरोध देखील होताना दिसतो आहे. मराठा समाजाचे अभ्यासक अभय बारस्कर यांनी मनोज जरांगे यांचे आंदोलन मराठ्यांचे भले व्हावे यासाठी नसून या आंदोलनाच्या कडून मनोज जरांगे आणि त्यांच्या काही प्रमुख साथीदारांनी वाळू माफियांकडून करोडोची माया जमवली असल्याचा आरोप केला आहे. त्याच वेळी ओबीसी समाजाचे लक्ष्मण हाके, बबन तायवाडे यांनी देखील आंदोलनाला विरोध केला आहे. 

राजकारणात विरोधकावर टीका करताना पातळी सोडू नये हे अपेक्षित असते. मात्र मनोज जरांगे यांनी यावेळी अक्षरशः पातळी सोडून सर्व मंत्र्यांवर एकेरीत टीका करणे सुरू केले आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी एकेरीत टीका केल्यामुळे शिवसेनेचे इतर मंत्री त्यांच्यावर संतापलेले आहेत. 

याच दरम्यान मनोज जरांगे यांच्याकडे चर्चेला जाणारे एक मंत्री उदय सामंत यांनी घटनेच्या चौकटीत बसणाऱ्या सर्व मागण्या आम्ही मान्य केल्या असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आम्ही घटनेच्या चौकटीत बसणाऱ्या सर्व मागण्या पूर्ण करत आहोत, ज्या अपूर्ण आहेत त्यातूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे असे स्पष्ट केले आहे. तरीही मुंबईत येऊन आंदोलन करणारच हा मनोज जरांगे यांचा हट्ट कायम आहे. ऐन गणपतीत मुंबईला येऊन त्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले तर मुंबईत पुन्हा कायदा आणि  सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता काय होईल याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. 

मनोज जरांगे मराठ्यांच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते म्हणून गेल्या चार वर्षातच पुढे आले आहेत. यापूर्वी त्यांचे कुठेही नाव घेतले जात नव्हते. नाही म्हणायला २०१४ ते १९ या काळात मराठ्यांनी आरक्षणासाठी बरीच आंदोलने केली. मात्र त्यात मनोज जरंगे कुठेही नव्हते. अचानकच ते पावसाळ्यातल्या कावळ्याच्या छत्रीसारखे वर आले आणि त्यांनी कसं तीन-चार वर्षात शासनाला आणि समाजाला सुद्धा वेठीस धरल्याचे चित्र दिसून येते आहे. शासन देखील मवाळ भूमिका घेताना दिसत असून त्यामुळे आंदोलन जास्त चिघळत तर नाही ना असे बोलले जाते आहे. कालच एका ओबीसी नेत्याने राज्य शासनाने जरांगे यांना लाडावून ठेवले आहे, ते लाडोबा आहेत, अशी टीका केली आहे. हे बघता जरांगे यांच्या बाबत कुठेतरी आता नाराजी जाणवू लागली आहे हे स्पष्ट दिसते आहे. 

गत चार वर्षांपासून अचानक समोर आलेले जरांगे यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री फडणवीस विरोध करणारे कोणतीतरी अदृश्य शक्ती असल्याचेही बोलले जाते आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यात संभाजी ब्रिगेडने ब्राह्मणांना विरोध म्हणून दादोजी कोंडदेवांचा  पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यात एक आरोपी मनोज जरांगे असल्याची माहिती समोर आली होती. हे बघता फक्त फडणवीसांना विरोध म्हणून जरांगे कोणाच्यातरी इशाऱ्यावरून आंदोलन करत आहेत या शंकेला कुठेतरी आधार आहे. मात्र त्याचवेळी त्यांच्या मागे आज तरी मराठा समाज उभा राहतो आहे असे चित्र निर्माण करण्यात ते किंवा त्यांच्या मागची अदृश्य शक्ती यशस्वी झालेली दिसते आहे. 

इथे प्रश्न असा येतो की मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे हा आग्रह का? मराठा समाजातील जे आर्थिक दृष्ट्या मागासलेले आहेत, त्यांना सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हणून आरक्षण देण्याची घोषणा यापूर्वीच केलेली आहे. त्याच सोबत मराठा समाजासाठी राज्य सरकारने इतर अनेक सवलती जाहीर केल्या असून विविध योजना देखील आखलेल्या आहेत. तरीही जरांगे ही कथित गर्दी  जमवण्यात यशस्वी कसे होतात हा देखील प्रश्न अभ्यासकांना पडतो आहे. 

आज मराठा समाजात मनोज जरांगे हे एकमेव नेतृत्व आहे असे चित्र नाही. आज राजकारणात देखील अनेक मराठा नेते सक्रिय आहेत. सत्ताधारी महायुतीत देखील दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे मराठा समाजाचे नेते आहेत. चंद्रकांतदादा पाटील, नितेश राणे हे देखील मराठा समाजाचे आहेत. माझ्या आठवणीनुसार २००६ साली नागपुरात नितेश राणे यांचे तीर्थरूप आणि महाराष्ट्राचे तात्कालीन महसूल मंत्री नारायणराव राणे यांनी चिटणीस पार्क स्टेडियमवर झालेल्या मराठा समाजाच्या एका मेळाव्यात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्याही आरक्षण नव्हते तरीही त्यांनी मराठ्यांचे साम्राज्य उभे केले, मग मराठ्यांना आरक्षण का मागता अशा आशयाचे विधान केले होते. त्यावरून वादही निर्माण झाला होता. हेच मुद्दे घेऊन मराठा समाजातील या नेत्यांनी जर राज्य शासन आणि केंद्र शासन मराठा समाजासाठी आवश्यक ती पावले उचलायला तयार असेल्याचे किंबहुना त्यांनी उचललेली पावले आणि त्या संदर्भातील इतर मुद्दे घेऊन समाजासमोर का येत नाहीत असा प्रश्न मनात येतो. जर कोणत्यातरी अदृश्य शक्तीच्या तालावर नाचून  जरांगे मराठा समाजाला आपल्यामागे फरफटत नेत असतील तर समाजातील या नेत्यांनी पुढे येऊन ही फरफट थांबवायला हवी. जर मनोज जरांगे खरोखरीच चुकीच्या मागण्या घेऊन समाजाची दिशाभूल करत असतील तर ते देखील उघड व्हायला हवे. त्यासाठी सरकारमधील आणि मराठा समाजातील सुजाण ,सुबुद्ध नेत्यांनी समोर येऊन वास्तव काय ते समाजासमोर मांडायला हवे. आज अभय बारस्करांसारखे अभ्यासक त्याबाबतीत पुढाकार घेत आहेत. त्यांना समाजातील इतर सुजाण आणि सुबुद्ध मंडळींनी पुढे येऊन पाठिंबा द्यायला हवा. जर सरकार खरोखरी मनोज जरांगे यांना लाडोबा बनवून ठेवत असत तर तेही उघडकीला आणायला हवे. 

त्याच सोबत अभय बारस्कर यांनी जे काही आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप मनोज जरांगे आणि त्यांच्या सहका-यांवर केले आहेत, त्याची देखील सखोल चौकशी केली जायला हवी. तसे जर झाले तर नेमके वास्तव काय हे समोर येईल. 

मागासलेल्या समाजाचे भले व्हावे म्हणून कोणी आंदोलन करत असेल, तर त्याचे स्वागतच आहे. मात्र त्या आंदोलनाच्या आडून जर कोणी सरकारला वेठीस धरत असेल तर ती चुकीचेच ठरणार आहे. मनोज जरांगे नेमके काय करत आहेत हे वास्तव आता समोर आणण्याची वेळ आली आहे. ते जर खरोखरी समाजाच्या हितासाठी आंदोलन करत असतील, तर संविधानाच्या चौकटीत राहूनच त्यांनी मागण्या कराव्या. अवास्तव मागण्या करून त्यांनी सरकारला आणि समाजाला वेठीस धरू नये. तसेच आंदोलन करताना इतर राजकीय नेत्यांवर पातळी सोडून शिवीगाळ करू नये. तसे ते जर करणार असतील तर सरकारने त्यांना वेळीच पायबंद घालायला हवा, त्याची आता वेळ आली आहे, इतकेच सुचवावेसे वाटते. 


✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.