पटतंय का बघा... आता संजय राऊतांच्या बाष्कळ बडबडीकडे काय लक्ष द्यायचे..?
पटतंय का बघा...
आता संजय राऊतांच्या बाष्कळ बडबडीकडे काय लक्ष द्यायचे..?
शिल्लक शिवसेनेचे विश्व प्रवक्ते राज्यसभा सदस्य संजय राऊत रोज सकाळ संध्याकाळ पत्रकारांना गोळा करून वेगवेगळ्या बातम्या देत असतात. त्यात आपल्या विरोधकांवर टीका करणे हाच त्यांचा एकमेव उद्योग असतो. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या या उद्योगावर सकाळी नऊचा भोंगा या शब्दात टीका करत असतात. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन हे देखील याला सकाळी नऊचा भोंगा म्हणूनच हिणवत असतात.
मात्र विरोधकांवर टीका करताना संजय राऊत अनेकदा पातळी सोडून टीका करत असतात असे जाणवते. आता एकनाथ शिंदे वर त्यांचा विशेष राग आहे. कारण त्यांच्या मते एकनाथ शिंदे हे गद्दार आहेत. त्यांनी शिवसेना पक्ष चिन्हासकट पळवला असाही आरोप संजय राऊत करतात. अर्थात खरी शिवसेना कोणाची हे मतदारांनी दाखवून दिले आहे. तरीही मतदार काय म्हणतात त्याकडे लक्ष न देता मी म्हणतो तेच खरे या पद्धतीने संजय राऊत यांच्या वल्गना सुरूच असतात.
एकनाथ शिंदे यांना नुकताच ब्रिटनच्या पार्लमेंट मध्ये एक विशेष पुरस्कार मिळाल्याची बातमी आली. तसे तिथे त्यांना दोन-तीन पुरस्कार मिळाल्याचे सांगण्यात येते आहे. आता यावेळी ब्रिटनच्या अधिकाऱ्यांना किंवा राज्यकर्त्यांना एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही गुण विशेषत्वाने आढळले असतील. म्हणून त्यांनी पुरस्कारासाठी निवड केली असणार हे नक्की. मात्र त्यामुळे संजय राऊत यांना प्रचंड पोटशूळ उठला आहे. एकनाथ शिंदे यांनी ब्रिटनच्या पार्लमेंट मध्ये इंग्रजीतून भाषण केले. आता तिथे शिंदे काही मराठीतून बोलू शकणार नाही हे निश्चित. त्यावरही संजय राऊत यांची टीका सुरू आहे. आता लंडनच्या रस्त्यावर म्हणे एकनाथ शिंदेंनी वडापाव खाल्ला. तो संजय राऊत यांना पचवायला जड जातो आहे. एकनाथ शिंदे मराठीपेक्षा इंग्रजी चांगले बोलतात त्यामुळे आता पुढली निवडणूक ते लंडन मधून किंवा आयर्लंड मधून लढवणार अशी फोकनाड संजय राऊत यांनी मारली आहे.
वस्तूतः राजकीय मतभेद काहीही असोत, मात्र एका मराठी नेत्याचा इंग्लंडमध्ये सन्मान होतो आहे याबद्दल प्रत्येक मराठी माणसाने त्याचे कौतुकच करायला हवे. मात्र तसे न करता संजय राऊत यांना कारण टीका करणे आणि खिल्ली उडवणे यातच काय आनंद मिळतो हे त्यांचे त्यांनाच नाही माहित. एकंदरीतच मराठी माणूसच मराठी माणसावर कायम टीका करत असतो. तो कधीच आपल्या माणसाला साथ देत नाही असे बोलले जाते, तेच शेवटी खरे.
आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले. अमित शहा यांनी गृहमंत्री म्हणून गेल्या सहा वर्षात लक्षणीय कामगिरी बजावली आहे. विशेष म्हणजे त्यांनी काश्मीरमध्ये नेहरू सरकारने लावलेले कलम ३७० हटवले. परिणामी दहशतवाद्यांची चांगलीच गोची झाली. देशात दहशतवादाची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी त्यांनी कंबर कसली. आता नक्षलवाद देखील त्यांनी संपवत आणला आहे. म्हणूनच अमित शहा हे आजही दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असणारच. अशावेळी त्यांना पुरेशी सुरक्षा पुरवणे हे राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे देखील दायित्व आहे. म्हणूनच विमानतळापासून तर कार्यक्रम स्थळापर्यंत त्यांच्या ताब्यात सशस्त्र दलाच्या पुरेशा सैनिकांसह वाहने असतात. आता हा काही टीका करण्याचा विषय नाही. मात्र संजय राऊत हे आज त्यासाठी देखील टीका करत असताना इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दाखवले. त्यातही राऊत यांनी आणखी एक जावई शोध लावला आहे. तो असा की जंतर-मंतरवर जेन झी च्या आंदोलनात झालेल्या कथीत लाठी हल्ल्यानंतर अमित शहा मुंबईत थांबतच नाहीत ते सतत मुंबईत येत असतात, असा दावा राऊत यांनी केला आहे. त्याचबरोबर मुंबई धनाड्य मंडळी बरीच आहेत. त्यांच्याकडून पैसा गोळा करण्यासाठी अमित शहा मुंबईत येतात असाही दावा राऊत करतात. आता अमित शहा यांना एखाद्या धनाड्य व्यक्तीला पैसा मागायचा असेल तर एका फोनवर तो धनाड्य व्यावसायिक अमित शहांच्या बंगल्यावर दिल्लीला धावत जाईल. मात्र मात्र हे समजून न घेता संजय राऊत नको ती टीका करतच सुटतात.
२०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सुमारे सहा महिने ते मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राहायला गेले नव्हते. त्याबाबत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी खुलासा देखील केला. त्यांची मुलगी दिविजा त्यावर्षी दहावीला होती. तिची परीक्षा झाल्यावरच जायचे असे त्यांनी ठरवले होते. त्यामुळे उशीर झाला, हे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. मात्र तरीही संजय राऊत रोज सकाळी नऊ वाजता भोंगा वाजवताना सांगत सुटले होते की, एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये आसाम मध्ये कामाख्या देवीला रेड्याचे बळी दिले होते आणि त्या रेड्याची शिंगे वर्षाच्या आवारात पुरली आहेत. त्या भीतीने फडणवीस तिथे राहायला जात नाहीत असा फालतू दावा संजय राऊत त्यावेळी रोज सकाळी करत होते. अर्थात ठरल्याप्रमाणे दिविजाची परीक्षा आटोपली आणि फडणवीस परिवार वर्षावर राहायला गेला. त्यालाही आता दीड वर्ष लोटले आहे. वर्षाच्या आवारात शिंदेंनी पुरलेल्या रेड्याच्या शिंगांनी फडणवीस परिवाराला कोणताही त्रास देण्याची कोणतीही बातमी कानावर आलेली नाही. अर्थात अजूनही संजय राऊत यांना एखादा कुठेतरी धागा मिळाला तर पुन्हा ते कामख्या देवी आणि रेड्याची शिंगं बाहेर काढतील हे निश्चित. तसेही सुतावरून स्वर्ग (की नरक) गाठण्याची त्यांना सवय आहेच.
अर्थात राऊत यांच्या रोज सकाळच्या या भोंग्याचे कोणालाही फारसे काही वाटेनासे झाले आहे. ज्यांच्यावर ते टीका करतात ते देखील संजय राउतांकडे दुर्लक्ष करत असतात.
मला कायम एक प्रश्न पडतो की सगळं राऊत रोज काही फारशी महत्त्वाची माहिती माध्यमांना देत नाहीत. तरीही रोज सकाळी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे कॅमेरे आणि पत्रकार तिथे का गर्दी करतात? त्यांनी गर्दी केली की राऊत काहीतरी बोलणारच. जर या माध्यमांनीच ठरवले की राउतांना आता कारण प्रसिद्धी द्यायची नाही, तर आपोआपच राउतांचे हे बोलणे बंद होईल.
एक हिंदी म्हण आहे, "हाथी चले बाजारो.. कुत्ते भोकते हजारो.." तसेच राउतांचे होते आहे. ते रोज सकाळी बडबड करतात. मात्र ही बाष्कळ बडबड म्हणून त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही, हेच शेवटी खरे.
अर्थात हे माझे मत झाले.. तुम्हाला पटतय का ते बघा...
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

कौतुक करायला कौतुकास पात्र व्यक्ती पाहिजे गद्दारी करून भाजप समोर लाचार होणाऱ्यांचे कसले आले कौतुक
ReplyDelete