सहज सुचलं म्हणून मराठीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी मराठी माणसालाच जागे व्हावे लागेल...
सहज सुचलं म्हणून
मराठीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी मराठी माणसालाच जागे व्हावे लागेल...
एका खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीवर लवकरच मराठी मिडीयम नावाची मालिका सुरू होणार असल्याची जाहिरात सध्या त्या
वाहिनीवर दाखवली जाते आहे. यात सध्या मराठी शाळा बंद होत असल्याचे जे प्रकार होत आहेत, ते हाताळले जाणार असल्याची जाणवते आहे. एकंदरीतच एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाला या वाहिनीने आणि मालिका निर्मात्याने हात घातला आहे असे म्हणता येईल.
सध्या एकूणच मराठी भाषेची दुर्दशा आणि त्यावरून होत असलेले राजकारण हे कायम चर्चेचे विषय राहिलेले आहेत. यात राजकारणी आणि मराठीचे समर्थक शासनाला आणि परप्रांतीयांना दोष देत आहेत, मात्र खोलात जाऊन विचार केल्यास मराठीच्या या दुर्गतीला मराठी माणूसच जबाबदार आहे असे नाईलाजाने म्हणावे लागते. १९९७ मध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेला पन्नास वर्षे पूर्ण झाली, तेव्हा विख्यात साहित्यिक कुसुमाग्रजांनी सध्या मराठी मंत्रालयाच्या दारासमोर लक्तरे पांघरून उभी असल्याचे दुःख व्यक्त केले होते. आजही तेच वास्तव आहे हे निश्चित.
पूर्वी मराठी भाषिक भाग वेगवेगळ्या प्रांतांमध्ये विभागले गेले होते. त्यात आजचा विदर्भ जुन्या मध्य प्रांतात होता, तर मराठवाड्याचा बराचसा भाग हा निजाम स्टेट मध्ये होता. इकडे कोल्हापूर नजीकचा भाग कर्नाटकात होता आणि मुंबई पुणे हा भाग जरी मुंबई प्रांतात असला तरी गुजरात त्याला जोडलेला होता. त्यामुळे मराठी भाषेवर या इतर सर्व प्रादेशिक भाषांचा आजही प्रभाव पडलेला दिसतो आहे. ज्ञानेश्वरकालीन मराठी किंवा त्यापूर्वीही चक्रधर स्वामींच्या काळातील मराठी आणि आजची मराठी यात प्रचंड तफावत आहे हे वास्तव नाकारता येत नाही.
सर्व मराठी भाषिक भाग एकत्र आणावे आणि मराठीचे एक राज्य व्हावे या संकल्पनेतून संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यात आली मात्र तरीही आज काही मराठी प्रांत इतर प्रदेशांमध्ये सामावलेले आहेत हे देखील नाकारता येत नाही. मध्य प्रदेशातील भोपाळ ग्वाल्हेर इंदोर हे टापू किंवा छत्तीसगडातील रायपूर जबलपूर भिलाई हे भाग कर्नाटकातील बेळगाव कारवार निपाणी हे भाग गुजरात येथील ही काही भाग आणि इकडे तेलंगणातील काही जिल्हे हे मूळचे मराठी भाषिकच होते. त्यामुळे आजही तिथे मराठीचे अस्तित्व जाणवते. मात्र महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर राज्यकर्त्यांनी फक्त जो महाराष्ट्र आपल्याला मिळाला आहे तोच आपला, आणि तिथेच मराठीचे संवर्धन असा विचार करत पुढली पावले टाकली.
महाराष्ट्रातले मुंबईसह बहुतेक सर्व जिल्हे आधी इतर कोणत्यातरी भागाला जोडलेले असल्यामुळे तिथे परप्रांतीय देखील मोठ्या संख्येत होते. त्यामुळे बघ व्यवहाराची भाषा हिंदी बनली आपोआपच मराठीला दुय्यम स्थान दिले जाऊ लागले.
त्या पाठोपाठ गतपन्नास वर्षात आपल्या शिक्षण पद्धतीत इंग्रजीचे महत्त्व अतोनात वाढलेले आहे. त्यामुळे मराठीत शिकला तर तो जागतिक स्पर्धेत पुढे टिकूच शकणार नाही अशी एक भावना सर्वसामान्य मराठी कुटुंबांमध्ये रुजलेली आहे. त्यामुळे आजही उच्च मध्यमवर्गीय किंवा मध्यमवर्गीय कुटुंबात तर आपल्या मुलाला अगदी बालवाडी पासून इंग्रजी माध्यमात शिकवायचे वेड आले आहे्. तसेच हळूहळू हे वेळ कनिष्ठ मध्यमवर्गीयांमध्ये देखील पोहोचलेले आहे. गरिबाघरची मुले सुद्धा इंग्रजी माध्यमातून शिकायचे म्हणून धडपडत असतात. मग अशा परिस्थितीत मराठी शाळा टिकतील कश्या हा प्रश्न उपस्थित होतो.
मराठी ही आमची मातृभाषा आहे तिला प्राचीन इतिहास आहे. आता केंद्र शासनाने मराठीला अभिजात दर्जा सुद्धा दिला आहे. मग या मराठीसाठी प्रत्येक मराठी माणसाने आग्रह का धरू नये? आपण सर्वांनीच मराठीत संवाद साधायचा असे ठरवले तर हळूहळू मराठीचे महत्त्व वाढत जाऊ शकते हे लक्षात घ्यायला हवे. आपण जर अन्य प्रांतात गेलो तर तिथले नागरिक त्यांच्या भाषेचाच आग्रह धरताना आपण बघतो. दक्षिणेत आंध्र तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू केरळ या राज्यांमध्ये पर्यटनासाठीच प्रवास करण्याचा योग आला, तेव्हा हा अनुभव मला प्रकर्षाने आलेला जाणवला. मात्र आम्ही समोरच्या माणूस मराठी आहे हे माहीत असूनही त्याच्याशी इंग्रजीत बोलायला सुरुवात करतो. मग मराठी मोठी कशी होणार?
जागतिक स्पर्धेत आमचे मूल टिकायला हवे म्हणून आम्ही अगदी बालवाडी पासून त्याला इंग्रजी शाळेतच टाकतो. पण त्यावेळी हे विसरतो की आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ जयंत नारळीकरांसारखे संशोधक हे सुरुवातीला मराठी माध्यमातून शिकले होते. आजही जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली माननीय व्यक्तिमत्वे ही त्यांच्या मातृभाषेतच शिकून मोठी झाली आहेत. मग आपले मूल देखील मातृभाषेत शिकले तर ते जागतिक स्पर्धेत मागे पडेल हा न्यूनगंड सर्वप्रथम मनातून बाहेर काढायला हवा.
त्याचबरोबर लहानपणापासून मुलांची घरात इंग्रजीत बोलण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा मराठीतच संवाद साधून त्यांच्या मनात मराठीची आवड निर्माण करायला हवी. चांगली मराठी शाळा शोधून तिथेच त्याला दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जावे असा आग्रह धरायला हवा. शासनाने देखील मराठीत सर्व क्षेत्रातील ज्ञान भांडार उघड व्हावे यासाठी मराठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे उपक्रम हातात घ्यावे. त्याचबरोबर अवांतर वाचन म्हणून मराठी वाचन करण्याची सवय लावावी. एकूणच "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" ही भावना प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जागी व्हायला हवी.
अशी भावना जागृत झाली तर प्रत्येक मूल मराठी शाळेतच शिकायला जाईल. मग तिथे दर्जेदार शिक्षण उपलब्ध करणे ही संस्था चालकांची जबाबदारी राहील आणि तसे शिक्षण उपलब्ध करून दिले तर कोणतीही मराठी शाळा बंद पडण्याची वेळ येणार नाही इतकेच सहज सुचले म्हणून सांगावेसे वाटते.
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment