आठवणींच्या हिंदोळ्यावर..१६ आठवण रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नरच्या पदग्रहणाची
आठवणींच्या हिंदोळ्यावर...१६.
आठवण रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नरच्या पदग्रहणाची
आज मी जे प्रसंग सांगणार आहे ते २०१२ आणि २०१४ चे. त्याला आज एक टप ओलांडले आहे मात्र अनेकांच्या मनात ती आठवण अगदी ताजी आहे. त्यामुळे काही वेळा काही बैठकांमध्ये मला उगाचच भाव दिला जातो हे विशेष.
२९१० मध्ये एका मित्राच्या आग्रहामुळे मी रोटरी चळवळीत सहभागी झालो. नागपूर आतल्या रोटरी क्लब ऑफ नागपूर मेट्रोचा मी सदस्य बनलो. माझ्या नेहमीच्या उचापती स्वभावामुळे मी तिथल्या उपक्रमांमध्ये हळूहळू रस घेऊ लागलो.
रोटरीचा कारभार नीट चालावा यासाठी रोटरीने साधारणतः दहा ते पंधरा जिल्ह्यांचा एक असा प्रांत तयार केलेला असतो. त्याला डिस्ट्रिक्ट असे म्हटले जाते आणि त्याला एक क्रमांक देखील दिला जातो. त्यावेळी विदर्भातील ११ जिल्हे आणि खानदेशातील जळगाव आणि नाशिक हे दोन जिल्हे असा मिळून डिस्ट्रिक्ट ३०३० बनला होता. रोटरीच्या व्यवस्थेत या प्रत्येक डिस्ट्रिक्टचा एक डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असतो. या डिस्ट्रिक्ट गव्हर्नरचा कालखंड साधारणपणे एक वर्षाचा असतो मात्र त्याचा कार्यकाळ सुरू होण्यापूर्वी सुमारे दोन वर्ष आधीच त्याची निवड केली जात असते. ही निवड त्या वेळच्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स मध्ये केली जात असते.
२०११-१२ या वर्षाची रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० ची डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स जानेवारी २०१२ मध्ये नागपुरातच होणार होती. मी त्या कॉन्फरन्समध्ये सहभागी झालो होतो. उद्घाटनाच्याच दिवशी सकाळी तिथे बाहेर नाशिकचे रोटेरियन मेजर कृष्णाराव खोत भेटले. कृष्णराव खोत पूर्वी नागपूरलाच असायचे. मला कॉलेजमध्ये त्यांनी शिकवले देखील होते. त्यामुळे त्यांचा माझा चांगला स्नेह होता. त्यांनी तिथे माझी नाशिकचेच त्यांच्याच क्लबचे रोटेरियन दादा देशमुख यांची. माझी ओळख करून दिली. दादा याच कॉन्फरन्स मध्ये २०१४-१५ या वर्षासाठी होणाऱ्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नरच्या निवडणुकीत एक उमेदवार होते. मग आमच्या जनरल हवापाण्याच्या गप्पा झाल्या. तितक्यात उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू होणार म्हणून आम्ही सभागृहात गेलो.
त्याच दिवशी दुपारी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर २०१४-१५ ची निवड होणार होती. ही निवडणूक नाशिकचे दादा देशमुख विरुद्ध अकोल्याचे डॉ. निखिल किबे यांच्यात होती.
निवडणूक आटोपली, मतमोजणी झाली, आणि दादा देशमुख विजयी झाले.
त्यावेळी मी नाशिकचे तत्कालीन प्रसिद्ध दैनिक गावकरीचा विदर्भ प्रतिनिधी म्हणून कार्यरत होतो. दादांचे अभिनंदन केल्यावर अचानक माझ्या डोक्यात विचार आला की आपण दादांची छोटीशी मुलाखत घेऊन गावकरीत का टाकू नये? मग लगेच मी त्यांच्याशी विषय काढला त्यांनी देखील डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून त्यांच्या डोक्यात काय योजना आहे त्याची सविस्तर माहिती दिली. मी लगेच मोबाईलवर फोन करून गावकरीच्या नाशिक ऑफिसमध्ये मी आज बातमी देतो आहे, आणि ती उद्याच्या संकटात हवी आहे असे सांगितले. मग लक्षात आले की बातमीसोबत गावकरीत दादांचा फोटो हवा. त्याचे काय करायचे अशा विचारात असतानाच दादांच्या सौभाग्यवती म्हणाल्या," तू काळजी करू नकोस, मी मुलाला फोन करून गावकरीत फोटो पोहोचवून घ्यायला सांगते." मग मी लगेचच दादांच्या मुलाखतीवर बातमी तयार केली आणि ती ऑफिसमध्ये येऊन नाशिकला ताबडतोब ई-मेल करायला सांगितले.
दुसऱ्या दिवशी सकाळीच मी डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सच्या जागी पोहोचलो, तर तिथे नाश्त्याच्या मंडपात दादा भेटले. भेटताच त्यांनी मला धन्यवाद दिले आणि म्हणाले की गावकरीत बातमी आल्यामुळे आज सकाळपासून मला नाशिकहूनच खूप अभिनंदन आणि फोन येत आहेत. दादांसोबत मेजर खोत सुनील सौंदणकर आणि दादांचे इतर सहकारी देखील चांगलेच सुखावले होते. दिवसभर त्यांनी सर्वांनीच माझे चांगलेच कौतुक केले होते.
यानंतर अधून मधून दादांशी माझे फोनवर बोलणे होत असे. नागपूरला आले की देखील त्यांची भेट होत असे.
२०१२-१३ मध्ये मी आमच्या क्लबचा सेक्रेटरी निवडला गेलो होतो. त्यामुळे वर्षभर मी माझ्या उचापती स्वभावानुसार भरपूर विविध कार्यक्रम आयोजित केले. त्यामुळे रोटरीत माझे चांगले नाव झाले होते. दरम्यानच्या काळात आमच्याच क्लब मध्ये झालेल्या काही राजकारणामुळे मी त्या क्लबमधून बाहेर पडलो. रोटरी सोडण्याचाच मी विचार करत होतो. मात्र त्याचवेळी रोटरीतील माझे दुसरे काही सुहृद डॉ. प्रफुल मुकदम, संजय मेश्राम, दिलीप चव्हाण या मंडळींनी मला रोटरी सोडण्यापासून परावृत्त केले. त्यांच्या मानण्यानुसार माझ्यात नवा रोटरी क्लब उभा करण्याची क्षमता आहे, त्यामुळे मी तो प्रयत्न करावा, आम्ही तुला पूर्ण मदत करू. मग त्यानुसार मी कामाला लागलो आणि २०१३-१४ मध्ये रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट हा नवा क्लब मी उभा केला आणि त्याचा संस्थापक अध्यक्ष बनलो. या काळात देखील अधून मधून दादांशी फोनवर संपर्क व्हायचा. ते योग्य ते मार्गदर्शन देखील करत होते.
२०१३-१४ ची रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० ची डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स अमरावतीला होती. माझ्या नव्या क्लबचा प्रेसिडेंट या नात्याने मी तिथे गेलो होतो. तिथे दादांची भेट झाली आणि त्यांचे इतर सहकारी देखील भेटले. त्यावेळी मेजर खोत आणि सुनील सौंदणकर यांनी मला सांगितले की ज्या दिवशी दादांचा नाशिक मध्ये पदग्रहण समारंभ असेल, त्या दिवशी नाशिकच्या गावकरी मध्ये तू दादांवर एक लेख छापून आणावा. मी देखील जोशात होकार देऊन टाकला.
जून २०१४ च्या शेवटच्या आठवड्यात दादांचा नाशिकमध्ये पदग्रह समारंभ होता. सुमारे पंधरा दिवस आधी मला मेजर खोतांचा आठवण देणारा फोन आला. मग मी देखील तयारीला लागलो. दादांची सर्व माहिती घेतली आणि त्यांच्यावर एक लेख तयार केला. गावकरी मध्ये संपादकांशी मी बोललो. त्यांनी देखील त्याच दिवशी लेख लावण्याचे मान्य केले. मग दादांच्या सहकारी रोटरीयन्सना हे कळवले. जेव्हा हे कळवले तेव्हा त्यांनी गावकरीच्या ५०० प्रति त्या दिवशी विकत घेऊन कार्यक्रम स्थळी वाटण्याचाच निर्णय घेतला.
रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट चा अध्यक्ष या नात्याने दादांच्या पदग्रहण समारंभाला मी देखील जाणार होतो. कार्यक्रम सकाळी ११ वाजता होता. आम्ही सर्व नागपूरची मंडळी रात्रीच्या सेवाग्राम एक्सप्रेसने नाशिकसाठी निघालो होतो. नागपूरहून निघाल्यावर वर्धा बडनेरा अकोला जळगाव इथून रोटेंरियन्स आम्हाला जॉईन होतच होते.
कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी आम्ही सर्व नागपूरची मंडळी नाशिक रोड स्टेशनवर उतरलो. तिथे आम्हाला न्यायला एक मिनीबस येणार होती. मिनी बसची वाट बघत असताना मी तिथे गावकरीचा अंक मिळतो का म्हणून शोध घेत होतो. त्यावेळी बाकी सहकारी रोटेरीयन्स या पत्रकाराला न्यूज पेपर शिवाय काही सुचतच नाही अशी माझी थट्टा करत होते. स्टेशनवर काही गावकरीचा अंक मिळाला नाही. तोवर बस आली, त्यामुळे ज्या हॉटेलवर आमची सोय होती तिथे आम्ही पोहोचलो.
हॉटेलच्या रिसेप्शन रूम मध्ये सर्व वृत्तपत्रे ठेवली होती. आमच्यातली नेतेमंडळी तिथे कोणत्या रूम्स मिळाल्या त्याची चौकशी करत होते. तोवर मी त्यातून गावकरीचा अंक उचलला आणि लगेच बघायला सुरुवात केली आतल्याच पानावर दादांचा तो लेख आणि त्यांचा फोटो आला होता. त्या लेखात मी लेखकाचे नाव म्हणून "अविनाश पाठक, नागपूर प्रतिनिधी" असे न टाकता "अविनाश पाठक, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट" असे टाकावे असे सांगितले होते. तसेच बरोबर छापून आले होते मी लगेचच तिथे आमच्या सोबत नागपूर विदर्भातून आलेल्या सर्व सहकारी मित्रांना तो अंक दाखवला. सर्वजण चकित झाले. तू नागपूर मध्ये बसून नाशिकच्या वृत्तपत्रात दादांवर एक कसा छापून आणू शकतोस? असा प्रश्न मला विचारला जाऊ लागला. तो लेख बघून त्या दिवशी माझे सर्वच विदर्भातील सहकारी सुखावले होते.
हॉटेलवरून फ्रेश होऊन आम्ही सर्व मंडळी कार्यक्रम स्थळी पोहोचलो. तिथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला गावकरीचा तो अंक वाटणे चालू होते. तिथे प्रवेशद्वारावरच स्वागत करणाऱ्या मंडळींमध्ये मेजर खोत सुद्धा होते. त्यांनी प्रत्येकाला आवर्जून सांगितले की दादांवरचा लेख लिहिणारा अविनाश पाठक हाच आहे. परिणामी त्या सभागृहात माझा भाव प्रचंड वाढला होता. कार्यक्रम संपल्यावर दादांनी मला त्यांच्या घरी येण्याचा देखील खूप आग्रह केला. मात्र त्या दिवशी लगेच रात्री निघायचे असल्यामुळे ते जमले नाही नंतरही पुन्हा दादांकडे जाणे जमले नाही.
दादांचा कालखंड संपला. नंतर वर्षभराने वर्ध्याचे महेश मोकळकर हे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर झाले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आवर्जून मला प्रसिद्धीच्या सहकार्यासाठी बोलावून घेत होते. त्यावेळी प्रत्येकाला ते आवर्जून सांगायचे." हा माणूस नागपुरात बसून दादा देशमुख डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून चार्ज घेणार होते, त्या दिवशी त्यांच्यावर लेख छापून आणू शकला, हा काहीही करू शकतो". मोकळकर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असताना त्यांच्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स मध्ये पूर्ण प्रसिद्धीची जबाबदारीच त्यांनी माझ्यावर टाकली होती. नंतरचेही दोन-तीन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आवर्जून माझी आठवण करायचे आणि दादांच्या पदग्रहणाच्या दिवशी तू गावकरीत लेख प्रकाशित करून आणला होतास याची नोंद घ्यायचे. अर्थात त्यावेळी एक पत्रकार या नात्याने मी जे काही केले ते मला सहज शक्य असल्यामुळेच मी करू शकलो. मात्र इतरांच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचे काम ठरले होते.
२०२०-२१ पर्यंत मी रोटरीत थोडाफार सक्रिय राहिलो. २०२१ नंतर मग मी रोटरीतून बाहेर पडलो. मात्र रोटरीच्या दहा वर्षाच्या काळात झालेले मित्र आजही भेटतात आणि मग जुन्या आठवणी व्यक्त करतात निघतात.
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment