पटतंय का बघा... डीजेवाल्यांचे पोट भरावे म्हणून ध्वनी प्रदूषणाने इतरांच्या तब्येती बिघडवणार का?

 पटतंय का बघा...

डीजेवाल्यांचे पोट भरावे म्हणून ध्वनी प्रदूषणाने इतरांच्या तब्येती बिघडवणार का?



सध्या  गणेशोत्सवात डिजिटल जॉकी म्हणजेच डीजे वाजवावा किंवा नाही यावर जोरदार वाद सुरू आहे. ते प्रकरण मुद्द्यावरून 

गुद्यांवर आल्यामुळे आज या गुद्दागुद्दीच्या निषेधार्थ पुण्यात नागरिकांचा मोर्चा देखील निघाला होता. त्यातच आता डीजे मालकांनी पत्र परिषदा घेऊन डीजेवर बंदी घातली तर आमची आणि आमच्या कामगारांची उपासमार होईल अशी भूमिका मांडली आहे. एकूणच हा वाद चांगलाच चिघळतो आहे असे चित्र दिसते आहे. 

डीजे मालकांच्या या दाव्या वरून मला एक जुनी गोष्ट आठवली. एका गावात एका स्मशानात एक लाकडे विकणारा होता. तो म्हणे दररोज त्याच स्मशानात असलेल्या भगवान शंकराच्या पिंडीसमोर प्रार्थना करायचा की आज माझा धंदा चांगला चालू दे. त्याचा धंदा चांगला चालण्यासाठी गावात जास्तीत जास्त लोकांचे मृत्यू होणे गरजेचे असायचे. म्हणजे या लाकडे विकणाऱ्याचा धंदा चालावा, त्याच्या मुलाबाळांच्या पोटात अन्न जावे म्हणून दहा लोकांचे मृत्यू होणे गरजेचे असायचे. एकूणच दररोज काही लोकांचे मृत्यू व्हावे अशीच प्रार्थना हा लागते लाकडे विकणारा करत होता असेच म्हणता येईल. 

डीजे मालकांची आमचे धंदे बंद झाले तर आमची आणि आमच्या कामगारांची उपासमार होईल ही रडकथा म्हणजे या लाकडे विकणाऱ्याची प्रार्थना आहे असेच म्हणता येईल. आज डीजे मग तो गणेशोत्सवात, दहीहंडीत, किंवा मग ख्रिसमसच्या रात्री नववर्षाच्या स्वागतार्थ किंवा शाही संदल शरीफ मध्ये वाजवला गेला असो, त्याच्या दणदणाटाने ज्या कानठळ्या बसतात, त्याने अनेकांच्या कानाचे पडदे फाटण्याची शक्यता असते. अनेक वृद्ध हृदय रोग्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरात असलेल्या तान्ह्या मुलांच्या प्रकृतीवर देखील परिणाम होऊ शकतो. म्हणजे या डीजेवाल्यांचे पोट भरावे म्हणून इतक्या सगळ्यांच्या तब्येती बिघडवायच्या असाच अर्थ होतो ना. प्रत्यक्षात तुम्ही अशा लोकांच्या तब्येती बिघडवणारा व्यवसाय का हाती घेता हा देखील प्रश्न विचारावासा वाटतो. 

डीजेची आज ठीकठिकाणी दहा ते पंधरा स्पीकर्सची भिंत उभारली जाते आणि त्यातून वाद्यांचा दणदणाट ऐकवला जातो आणि त्याला विरोध केला तर आमच्या धार्मिक उत्सवांना तुम्ही विरोध का करता असा प्रश्न विचारला जातो. त्यासाठी मुजोरी देखील केली जाते. मात्र डीजे हा प्रकार केल्या पंधरा-वीस वर्षात आला आहे. त्याआधी धार्मिक सण आणि सांस्कृतिक उत्सव होतच नव्हते का? ते शांतपणे होत होते ना. पैसे देता आषाढी एकादशीला पंढरपूरला अनेक ठिकाणाहून वारी जाते. या वारीमध्ये टाळ मृदुंग वाजवून अभंग म्हणतच जात असतात. कोणताही वाद्यांचा दणदणाट नसतो. तरीही हा उत्सव साजरा होतोच ना. मग आताच डीजेचा हट्ट का हा देखील मुद्दा उपस्थित होतो. 

डीजेच्या दणदणाटाने ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. एकीकडे आम्ही पर्यावरण रक्षणाच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे अशा दणदणाटाला प्राधान्य देतो, त्याचा आग्रह धरतो, हे कितपत योग्य आहे, हा देखील प्रश्न उपस्थित होतोच. आज नागपुरात एक माजी महापौर संदीप जोशी यांनी या ध्वनी प्रदूषणाला विरोध केला तर त्यांच्याच पक्षाचे दुसरे दोन माजी महापौर प्रवीण दटके आणि दयाशंकर तिवारी यांनी आमच्या धार्मिक उत्सवात अडथळे आणू नका असा आक्रोश केला आहे. हे तीनही माजी महापौर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले आहेत. संघाने शताब्दी वर्षात जो पंच परिवर्तनाचा नारा दिला आहे, त्यात पर्यावरणाचे रक्षण हा देखील एक मुद्दा आहे. जर संघाचे स्वयंसेवक  असे ध्वनी प्रदूषणाला उत्तेजन देणार असतील, तर ते कितपत योग्य आहे?. अर्थात त्या दोघांनी देखील पोलिसांनी घालायचीच असेल तर सर्व ठिकाणी डीजे वाजवायला बंदी करावी, हिंदूंच्याच सणांमध्ये डीजेला बंदी आणि इतरत्र मात्र नाही असे नको अशी भूमिका घेतली आहे.

या जगात प्रत्येकाला आपले पोट भरण्याचा अधिकार आहे. मात्र ते दुसऱ्यांच्या जीवावर नव्हे. मागे चंद्रपूर जिल्ह्यात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दारूबंदी करण्यात आली. त्यावेळी तत्कालीन काँग्रेसच्या आमदारांनी दारूबंदी झाली तर दारू विकणाऱ्यांचे काय? या व्यवसायावर जे पोट भरतात त्यांची उपासमार होईल, म्हणून दारूबंदीला विरोध केला होता. हा डीजेचा वाद सुरू झाला तेव्हा समाज माध्यमावर एक पोस्ट फिरत होती, की डीजेवर बंदी घातली तर डीजेवाल्यांचे पोट कसे भरायचे हा प्रश्न विचारता, मग  ड्रग विक्रीवर बंदी आहे, तर ड्रग विक्रेत्यांचे पोट कसे भरणार असा प्रश्न विचारणार का? ही पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय ठरलेली होती. 

वरील मुद्दे लक्षात घेता डीजेच्या वापरावर सरसकट अगदी बारमाही बंदी घालणै खरोखरी गरजेचे आहे. जर डीजे चालकांचे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पोट कसे भरेल हा विचार कोणाच्या मनात येत असेल तर त्यांनी या सर्वांसाठी दुसरा व्यवसाय शोधून त्यांचे पुनर्वसन करून देण्याची तयारी करावी असे सुचवावेसे वाटते 

अर्थात हे माझे मत आहे.... तुम्हाला पटतंय का ते बघा..


✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.