"सहज सुचलं म्हणून" आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आपल्यावर स्वार होऊ देऊ नका.

 "सहज सुचलं म्हणून" 

आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आपल्यावर स्वार होऊ देऊ नका.



सध्या आरटीफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आलेला आहे. सर्वच क्षेत्रात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रस्थ वाढू लागले आहे. त्यामुळे आता अनेक क्षेत्रांमध्ये अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ लागलेली आहे. 

वृत्तपत्रीय क्षेत्रात देखील आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याचे नियोजन होते आहे. त्यामुळे अनेक मोठ्या समूहांमध्ये अनेक विद्यमान पत्रकारांना घरी बसवले जात असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात देखील असंतोष वाढत असलेला दिसून येतो आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कॉम्प्युटर इंटरनेट मोबाईल स्मार्टफोन याच मालिकेतले पुढले पाऊल आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आज कॉम्प्युटरमध्ये एकदा डाटा फीड केला की फक्त कमांड द्या तुम्हाला हवी ती माहिती मिळते.गुगलवर तर आता सगळीच काही माहिती उपलब्ध होते आहे. त्याचेच पुढले व्हर्शन म्हणजे ए आय म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असे म्हणता येईल. 

मात्र काहीही झाले तरी त्यात मानवी हातांचे कौशल्य उतरू शकेल काय हा प्रश्न निर्माण होतो. आता रोबोटिक्सच्या मदतीने शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र एखाद्या कुशल धन्वंतरीच्या हातून झालेली शस्त्रक्रिया आणि या रोबोटिक्सच्या मदतीने झालेली शस्त्रक्रिया यात कितीही नाही म्हटले तरी फरकच असतो. आज हृदयावर शस्त्रक्रिया करण्यासाठी एका काळात डॉ. नीतू मांडकेंकडे रुग्णांची लाईन लागत असे. तसेच अस्थिरोगाबाबत समस्या असल्या तर मुंबईतले डॉ. बावडेकर किंवा मग नागपूरचे डॉ. मारवा यांनीच शस्त्रक्रिया करावी असा आग्रह धरला जात असे. महिलांची आरोग्यविषयक समस्या असली की त्या काळात डॉ. पुरंदरे यांचे नाव सर्वप्रथम घेतले जात असे. तर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. शिरोडकरांचे हात कोणी धरत नव्हता असे बोलले जायचे.  कारण या डॉक्टरांचा अनुभव आणि रुग्णासाठी मन एकाग्र करून काम करण्याची त्यांची मानसिकता ही इथे महत्त्वाची असायची. रोबोटिक्स ते करू शकणार का हा प्रश्न इथे उपस्थित होतो. 

तोच प्रकार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे. तुम्ही एखाद्या घटनेची माहिती त्या सॉफ्टवेअरमध्ये टाकली की तुम्हाला हवी तितक्या शब्दांची बातमी तयार मिळेल असे सांगितले जाते. मात्र ती बातमी मिळवण्यासाठी जेव्हा तू पत्रकार धडपड करतो आणि मग आपल्या खास शैलीत तो ती बातमी रंगवतो त्या बातमीचा दर्जा वेगळाच असतो. कालपर्यंतची पत्रकारिता याच पद्धतीने केली जात होती.ज्येष्ठ  पत्रकार नव्या पत्रकारांना याच पद्धतीने घडवत असत.

साहित्याच्या बाबतीतही आता तेच होते आहे. नव्या पिढीतले लोक म्हणतात आता लेखक आणि साहित्यिकांची गरज नाही. ए आयला कमांड दिली की हवी ती कथा किंवा मग कादंबरी देखील लिहून मिळेल. मात्र जो एक दर्जा आणि त्यातून वाचकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असणारे मराठीतले अनेक नामवंत लेखक ज्यात हरि नारायण आपटे, वि.स. खांडेकर, ना सी फडके विद्याधर गोखले,  वामन चोरघडे, महेश एलकुंचवार, गिरिजा कीर, योगिनी जोगळेकर, सुमती क्षेत्रमाडे, गो.नि. दांडेकर यांच्यासह अनेकांचे योगदान तुम्ही बासनात गुंडाळून ठेवणार काय हादेखील प्रश्न निर्माण होतो. या लेखकांनी लिहिण्यापूर्वी असंख्य माणसे वाचली, अभ्यासली, आपल्यात उपजत असलेली लेखन शैली विकसित केली आणि मग त्यांनी लिहिले ते वाचकांना रुचले म्हणूनच वाचकांनी त्यांना डोक्यावर घेतले. त्यामुळेच हे सर्व अक्षर साहित्य म्हणून आजही ओळखले जाते.

हाच प्रकार वृत्तपत्रांच्या किंवा माध्यमांच्या बाबतीत देखील आहे. आज एखादी बातमी किंवा एखादा लेख तयार करायचा तर त्या पत्रकाराला प्रचंड अभ्यास करावा लागतो. वर्षानुवर्षे अभ्यास करून पत्रकार जेव्हा तयार होतात तेव्हाच ते दर्जेदार लिखाण करू शकतात. जुन्या पिढीत नानासाहेब परुळेकर, भाऊसाहेब माडखोलकर, विद्याधर गोखले, माधव गडकरी, माधव गोविंद वैद्य, अरुण साधूअशा मान्यवरांचे वर्तमानपत्रातील दैनंदिन अग्रलेख वाचण्यासाठी वृत्तपत्रे विकत घेतली जात असत. ते अग्रलेख माहितीपूर्ण असत. आज अशा पत्रकारांच्या अग्रलेखांची पुस्तके निघाली आहेत आणि ती स्थायी दस्तावेज म्हणून जपली गेली आहेत. या अग्रलेखांवर अनेक अभ्यासू विद्यार्थ्यांनी संशोधन पर प्रबंध सादर करून पीएचडी सारख्या पदव्या देखील मिळवलेल्या आहेत. आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मदतीने तयार झालेल्या अग्रलेखांमधून हा दर्जा मिळेल का आणि वाचक असे अग्रलेख वाचतील का याचेही उत्तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे अनाठायी समर्थन करणाऱ्यांनी द्यायला हवे. 

विज्ञान आणि तंत्रज्ञानाने गेल्या शतकामध्ये आश्चर्यकारक प्रगती केलेली आहे. संपूर्ण माहितीचा खजिना आज बोटाचे एक टोक कॉम्प्युटरच्या बटनावर ठोकले की तुम्हाला उपलब्ध होतो आहे. मात्र अशाही परिस्थितीत जुने ग्रंथ आणि जुने अभ्यासक यांचे महत्त्व कधीही कमी होत नाही. तुमच्याजवळ वेगवेगळ्या रंगांची मनमोहक फुले कितीही उपलब्ध असतील पण जोवर कुशल कारागीर आपल्या हात सफाईने त्या फुलांचा एक सुंदरसा गुच्छ किंवा सुंदरशी मला माळ बनवत नाही तोवर त्याला फारसे महत्त्व नसते. ती फुले तशीच पडून राहिली तर काही वेळाने त्याचे  निर्माल्य होते याचे भान आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या समर्थकांनी ठेवायला हवे. 

आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जे काही ज्ञानाचे भंडार सहज उपलब्ध झाले आहे, त्याचे स्वागत करायलाच हवे. मात्र त्याच्या आहारी न जाता त्याचा योग्य उपयोग करून त्यात मानवी कौशल्य आणि ते हाताळणाऱ्या माणसाचे मन ओतले गेले तरच निर्माण होणारी कलाकृती ही अजरामर असेल. अन्यथा जे काही हातात येईल ते निव्वळ पाट्या टाकणे असेल हे लक्षात घ्यायला हवे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर जरूर करा, मात्र त्याला आपल्यावर स्वार होऊ देऊ नका, तर त्यावर स्वार होऊन आपण आपल्याला हवे ते निर्माण करण्याची तयारी करायला हवी आणि ती जिद्द ठेवायला हवी इतकेच इथे सहज सुचले म्हणून सांगावेसे वाटते.

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.