काँग्रेस @ 35only ! याला म्हणतात धिं ड व डे
काँग्रेस @ 35only !
याला म्हणतात धिं ड व डे
"ये क्या हाल बना रखा है पार्टीका ! कुछ करते क्यूं नही ?" असा प्रश्न महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाला विचारावा, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली दिसते आहे. राहुल गांधींवर गुन्हा नोंदविल्याचा निषेध करण्यासाठी अकोला कॉंग्रेसनं 4 ऑक्टोबरला मोजून 30-35 आंदोलकांचा 'अतिभव्य' मोर्चा काढून आपल्या राष्ट्रीय पक्षाची प्रतिमा 'उजळवली'. प्रत्यक्षात इज्जत मिट्टीमें मिलाई...!
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं 5 दिवस आधी सूचना देऊन सुद्धा अकोला महानगर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस या दोघांना मिळून हजारो सोडा, शंभर मोर्चेकरी सुद्धा गोळा करता आले नाहीत ! नाशिकच्या शिबिरात जावं लागल्यानं मोर्चाच्या नियोजनाला पुरेसा वेळ मिळाला नाही, असा खुलासा दोन्ही जिल्हाध्यक्षांनी केला म्हणे. पण तो मान्य करायला कोणीच तयार नाही. चारदोन पदाधिकारी नाशिकला गेले असतील. इतर नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी काय केलं, या प्रश्नाचं उत्तर कोणाजवळच नाही. 10 लाख लोकवस्तीच्या शहरात तीन डझन आंदोलकांचा मोर्चा काढून पक्षाची जी शोभा झाली, तिला जबाबदार कोण ? राष्ट्रीय नेतृत्वाचा हा अपमानच नाही का ? असे प्रश्न आता विचारले जात आहेत. अकोला शहरात गेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना 80 हजारावर मतं मिळाली. एक आमदारही निवडून आला. अशा, क्रमांक दोनच्या पक्षाला मोर्चासाठी तीन डझन माणसं सापडू नयेत ? इतका फ्लॉप शो ! कॉंग्रेस समर्थक संतापून विचारताहेत- अशानं कॉंग्रेस टिकेल का ?
पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावरील गुन्ह्याचा साधा निषेधही जोरकसपणे नोंदवता येणार नसेल तर हा पक्ष त्या नेत्याला पंतप्रधान बनविण्याचं स्वप्न पाहण्याच्या सुद्धा लायकीचा राहिलेला नाही, असा त्याचा अर्थ होतो. मध्यंतरी अभिजित दीपकेच्या सीजेपीनं पेपरफुटीवर रणकंदन माजवलं म्हणून काँग्रेसला 'काडीचा आधार' तरी मिळाला ! आता त्याच जेन झीचा जप करीत राहुल गांधी भाषणं देत गूंज... गूंज... करत आहेत. मोदींच्या गेल्या बारा वर्षात देशात जेन झी नव्हती का ? त्यांचे प्रश्न नव्हते का ? त्याकाळात त्यांच्यासाठी काय केलं काँग्रेसनं ? पेपर तेव्हाही फुटत होतेच की. काँग्रेसशासित राज्यांमध्येही फुटत होते. (ताजे उदाहरण- झारखंड)
काँग्रेस पक्षाला 'स्टार्टिंग ट्रबल' चा त्रास सुरू झाला की काय ! जेन झीची गुटी सीजेपीनं दिली तेव्हा कुठं काँग्रेसचे 'तरुण' नेते राहुल गांधी जागे झाले आणि पंतप्रधान निवासाच्या प्रतिबंधित क्षेत्रात 'घुसले'. देशाचा विरोधी पक्षनेता आणि प्रमुख विरोधी पक्ष यांची ही अवस्था केविलवाणीच म्हणायला हवी. इंडी आघाडी नावाचं विरोधकांचं कडबोळंही ज्यांना नीट एकत्र बांधून ठेवता येत नाही, ते 'महाशक्ती'शी टक्कर कसे घेणार, असा प्रश्न अनेकांच्या बोलण्यातून विचारला जातो. मुख्य विरोधी पक्ष हा उद्याचा संभाव्य सत्तारूढ पक्ष असतो. तो तसा भासायलाही हवा. काँग्रेस त्या मजबुतीनं उभा असलेला जाणवत नाही. त्यांचं संघटन जागोजागी खिळखिळं झालेलं दिसतं. अकोला हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. पश्चिम विदर्भातील एवढ्या मोठ्या महानगरात या पक्षाला फक्त तीन डझन मोर्चेकरी सापडावे, यापेक्षा वाईट स्थिती काय असू शकते. मुंबई-दिल्लीत बसून सत्तेच्या खेळात मश्गूल असलेल्या पक्षनेत्यांना हे कळत नाही का ? कळतं, पण वळत नाही ! म्हणूनच मग काँग्रेसचे असे धिंडवडे निघत आहेत. यापेक्षा दुसरं काय घडणार राजेहो...!
✍️ विनोद देशमुख, नागपूर ✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment