कालचक्र प्रियंका गांधींची आचरट बडबड.

  कालचक्र 

 प्रियंका गांधींची आचरट बडबड.

गेल्या आठवड्यात संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर घणाघाती चर्चा झाली. या चर्चेत बोलताना काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी परीक्षा सुधारणा समितीतील एक तज्ञ आणि मद्रास आयआयटीचे संचालक व्ही कामकोटी यांच्यावर गोमूत्र विशेषज्ञ अशा शब्दात टीका केली. प्रियंका गांधी यांच्या या टीकेमुळे नाराज झालेल्या देशातील २०० पेक्षा अधिक शिक्षण तज्ञ आणि संशोधकांनी प्रियंका गांधी यांना आपली नाराजी व्यक्त करण्याचे करणारे पत्र पाठवले असल्याची बातमी आहे. यावरून आता देशात नवा वादही उत्पन्न होऊ शकतो असे चित्र दिसते आहे. 

व्ही. कामकोटी यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील संशोधन कार्य कधीच नाकारता येणार नाही. त्यामुळेच सरकारने त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित देखील केले आहे. त्यांचे काम फक्त गोमूत्रावरच आहे, असे नाही तर अगदी अवकाश क्षेत्रातही त्यांनी केलेल्या संशोधनाला जगमान्यता मिळाली आहे. तरीही प्रियांका गांधी यांनी त्यांचा "गोमूत्र संशोधक विशेषज्ञ" असाच उल्लेख करावा ही बाब दुर्दैवीच म्हणावी लागेल.

प्रियंका गांधी यांनी कामकोटी यांचा गोमूत्र विशेषज्ञ असा उल्लेख करण्यामागे त्यांचा हिंदू धर्माविषयी असलेला आकस हेच प्रमुख कारण आहे हे स्पष्टच आहे. देशाच्या राजकारणातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे आज सर्वेसर्वा  असल्याचा आभास निर्माण करणाऱ्या नेहरू गांधी परिवाराने कायम हिंदू धर्माचा द्वेषच केला आहे. अगदी नेहरूंच्या काळापासून हिंदूंना या देशात दुय्यम स्थान देत मुस्लिमांचे अतिरेकी लाड करायचे हे त्यांचे धोरण स्पष्ट दिसून येते. नंतर इंदिरा गांधींच्या काळात देखील काही फारसे वेगळे घडले नाही. राजीव गांधी यांनी तर शहाबानो खटला प्रकरणात धर्मांध मुस्लिमांना डोक्यावर घेण्यासाठी चक्क संविधानात बदल केला होता. प्रियंका गांधी यांचे बंधू राहुल गांधी यांनी या संदर्भात उधळलेली मुक्ताफळेही जगजाहीर आहेत. त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांचे ख्रिस्ती धर्माविषयीचे प्रेम आणि देशातील ख्रिस्ती धर्मियांना झुकते माप देण्याचे त्यांचे प्रयत्न हे देखील सर्वश्रुतच आहेत. त्यामुळे हिंदू धर्माविषयी असलेल्या याच आकसातून त्यांनी कामकोटी यांना गोमूत्र विशेषज्ञ म्हणून पदवी प्रदान करून टाकली आहे.

आता प्रश्न येतो तो गोमूत्राचा. गोमूत्र किंवा मग गोमय म्हणजेच गाईचे मूत्र आणि गाईचे शेण यांना हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. धार्मिक विधींमध्ये देखील या दोन्ही घटकांना सन्मानाचे स्थान दिलेले दिसून येते. हिंदू धर्मियांना एकूणच गाय या प्राण्याविषयी असलेले आदराचे स्थान हे अन्य धर्मीयांना विशेषतः मुस्लिमांना जास्त खटकते. त्यामुळेच गाईंना मारून त्यांचे गोमास खाणे आणि हिंदू धर्मीयांना दुखावणे हे प्रकार नित्य नियमित चालतात. यातूनच गोमूत्रावर आणि गाईच्या शेणावर टीका करण्याचे प्रकार सातत्याने सुरू असलेले दिसून येतात.

मात्र गोमूत्र किंवा गोमय म्हणजेच शेण यातील गुणसूत्रांचा वैज्ञानिक दृष्ट्या अभ्यास करण्याचे कष्ट या काँग्रेसवाल्यांनी कधीच घेतलेले नाहीत. गोमूत्रात अनेक औषधी गुणसूत्र आहेत. त्यामुळेच आयुर्वेदात गोमूत्राला विशेष महत्त्व दिले आहे. हिंदू धर्मात काही अशुद्ध कृत्य झाले की तिथे गोमूत्र शिंपडून तो परिसर शुद्ध करून घेण्याची पद्धत आहे. पूर्वी कोणताही धार्मिक विधी करायचा तर आधी जिथे विधी करायचे ती भूमी गाईच्या शेणाने सारवून मग त्यावर गोमूत्र शिंपडून शुद्ध केली जात असे. त्यामागे देखील विज्ञान आहे. जुन्या काळात शेतकरी शेती करताना गोमूत्राचा वापर करत असत. शेतात बियाणे पेरण्यापूर्वी ते बियाणे गोमूत्रात भिजवून घेतले की पीक चांगले येते असे म्हटले जायचे. तसे अनुभव देखील अनेकांना आले होते. त्यामागे धार्मिक श्रद्धा हा भाग वेगळा, मात्र त्या गोमूत्रात असलेले वैज्ञानिक गुणसूत्र त्या बियाण्यांची जनन क्षमता वाढवत असत. नंतर कृषीतज्ञांनी संशोधनाने ही बाब समोर आणली होती. त्याला "सीड फर्टिफिकेशन" असे नाव देण्यात आले होते.

गाईच्या शेणात देखील तशीच वैज्ञानिक मूल्य असणारी गुणसूत्रे आढळून आली आहेत. त्यामुळेच रासायनिक खते येण्यापूर्वी गाईचे शेणखत हे शेतात सर्वोत्तम मानले जायचे. ज्यावेळी मातीची घरे होती,  त्यावेळी ती शेणाने  सारवण्याची पद्धत होती. शेणाने सरवल्यामुळे त्या परिसराचे किडे मुंगी किटाणू यापासून रक्षण होत असे. अंगणात देखील शेणाचा सडा घातला जात असे. त्यामागे देखील हीच भावना होती. शेणाचे आणि गोमूत्राचे जे विविध उपयोग आहेत, त्यावर नागपूर जिल्ह्यात देवलापार येथे विविध प्रयोग करण्यात आले आहेत. त्यातील औषधी मूल्ये शोधण्याचेही यशस्वी प्रयत्न झाले आहेत. नागपूरच्या केंद्र सरकारच्या अख्त्यारीतील नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच निरीने देखील याबाबत संशोधन केले आहे. आणि जागतिक परिषदेत याबाबत संशोधन पत्रिका देखील सादर करण्यात आल्या आहेत.

मात्र हिंदू धर्माला आंधळा विरोध करणाऱ्या नेहरू गांधी परिवाराला आणि त्यांची री ओढणाऱ्या काँग्रेस पक्ष्यांना हे मुद्दे कधीच लक्षात येत नाहीत, किंवा त्यांना लक्षात घ्यायचेच नाहीत, असे म्हणता येईल. त्यामुळेच गोमूत्र आणि गोमय याबाबत असे टीकेचे उद्गार प्रियांका गांधी काढू शकतात.

प्रियंका गांधी काहीही बोलल्या तरी देशवासीयांना मात्र गोमूत्र, गोमय आणि गोमाता याविषयी आदर तर आहेच. मात्र त्यांचे उपयोग देखील समजलेले आहेत. त्यामुळेच गोमूत्र आणि गोमय यांच्यावर संशोधन करून मानव जातीच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग योग्य रीतीने करता यावा म्हणून प्रयत्न करणाऱ्या व्ही कामकोटी यांच्यासारख्या शास्त्रज्ञांबद्दलही देशवासीयांना संपूर्ण आदर आहे. त्यामुळे प्रियंका गांधींच्या या आचरट बडबडीकडे देशवासीय लक्ष देणार नाहीत, किंबहुना असल्या आचरट बडबडीची देशवासीय निंदाच करतील याची खात्री आहे.

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

  1. अशा घटनेचा फायदा घ्यायला भाजप कमी पडते,असे मत आमच्या एका वाचक मित्राने व्यक्त केले आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.