माझंही मत विदर्भ साहित्य संघ लोकाभिमुख होईल अशी घटनादुरुस्ती डॉ गिरीश गांधींनी करावी.
माझंही मत...
विदर्भ साहित्य संघ लोकाभिमुख होईल अशी घटनादुरुस्ती डॉ गिरीश गांधींनी करावी.
विदर्भ साहित्य संघाची घटना तपासून त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या जातील अशी घोषणा विदर्भ साहित्य संघाचे नवे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी केली आहे. डॉ गिरीश गांधी यांची ही घोषणा निश्चितच स्वागतार्ह आहे, मात्र ही घटना दुरुस्ती करताना भविष्यात कोणत्याही दुर्घटना घडणार नाहीत आणि आता तरी सर्व कारभार सुरळीत आणि पारदर्शी पद्धतीने चालावा यासाठी घटनेत बदल केले जातील अशी साहित्य संघाच्या आजीवन सदस्यांची आणि विदर्भातील साहित्य प्रेमींची अपेक्षा आहे.
अशी अपेक्षा व्यक्त होण्याचे कारण असे की १९८० पासून च्या कालखंडात विदर्भ साहित्य संघात निव्वळ एकाधिकारशाही सुरू होती, परिणामी तिथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. जसा जसा काळ पुढे जात गेला तशी तशी दहशत अधिकाधिक वाढत गेली. ज्यांनी साहित्य संघात जे काही घडत होते त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यांना तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी चक्क बाहेरचाच रस्ता दाखवला होता. परिणामी दहशत अधिकाधिक वाढत गेली होती. आता थोडी दहशत कमी झाल्यामुळे काहीशा मोकळ्या वातावरणात निवडणुका झाल्या आणि त्यात डॉ गिरीश गांधी अध्यक्ष म्हणून निवडून आले. संपूर्ण कार्यकारणी देखील नव्याने निवडली गेली आहे.
अर्थात ही निवड जुन्याच घटनेच्या आधारावर झाली आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत कसे कसे घोळ होत होते हे हळूहळू समोर येते आहे. नुकत्याच चार महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तर एकाच व्यक्तीने पोस्टातून सगळ्या मतपत्रिका उचलून नेल्या अशी तक्रार एका जबाबदार सदस्याने आणि निवडणुकीतील उमेदवाराने केली होती. तिथे संबंधित पोस्टमास्तरने देखील तसा लेखी जबाब दिल्याची माहिती आहे. हे प्रकरण आता धर्मादाय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ठ आहे.
अशीच इतरही अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. इतकेच काय पण ज्या सांस्कृतिक संकुलामुळे विदर्भ साहित्य संघाचे जुने वैभव हरवले त्या संकुलाविरोधात देखील उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. तिचाही आता काय निकाल लागतो ते जाणून घेण्यास वैदर्भीय सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्व आतुर आहे.
डॉ. गिरीश गांधी हे साहित्यिक नाहीत. मात्र साहित्यप्रेमी जरूर आहेत. तसेच सांस्कृतिक क्षेत्रात देखील ते सातत्याने कार्यरत असतात. पूर्वी ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे देखील अध्यक्ष होते. आता तिथे अजय पाटील अध्यक्ष आहेत. डॉ गिरीश गांधी आणि अजय पाटील हे दोघेही राजकारणीच आहेत. राजकारणी माणसांना नाटकं चांगली जमतात म्हणे... त्यामुळेच अशांना नाट्य परिषदेचे अध्यक्ष केले गेले असावे.
गिरीश गांधी जरी साहित्यिक नसले तरी ते एक उत्तम प्रशासक आहेत. तसेच एक उत्तम संघटक देखील आहेत. राजकीय, सामाजिक आणि प्रशासनिक वर्तुळात त्यांचे चांगले वजन आहे. सांस्कृतिक क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी अनेक संस्था उभ्या केल्या आहेत. बहुतेक सर्व संस्था आज व्यवस्थित चालू आहेत. त्यामुळे आता विदर्भ साहित्य संघाचे हे सतीचे वाण असलेले नेतृत्व त्यांनी स्वीकारल्यावर विदर्भ साहित्य संघाची गाडी देखील ते मार्गावर आणतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. त्यांनी घटना दुरुस्ती अवश्य करावी मात्र साहित्य संघातील आणि संघाशी संबंधित सर्व घटकांना विश्वासात घेऊन ही घटना दुरुस्ती करावी अशीच सर्वांची अपेक्षा आहे.
विदर्भ साहित्य संघाच्या घटनेत दुरुस्ती करताना साहित्य संघ हा मूठभरांची मिरासदारी न राहता खऱ्या अर्थाने लोकाभिमुख व्हावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. तसे जर झाले तर विदर्भातील फक्त साहित्यिक आणि सांस्कृतिक विश्वच नव्हे, तर समस्त वैदर्भीय नागरिक त्यांना दुवाच देतील हे निश्चित.
अर्थात हे माझं मत झालं.........
तुमचंही मनमोकळं मत तुम्ही मांडू शकता..
त्याचे स्वागतच होईल..
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment