आठवणींच्या हिंदोळ्यावर..१४. नागपूरच्या पत्रकारांनी घातला होता पंतप्रधानांच्या नागपूर भेटीवर बहिष्कार
आठवणींच्या हिंदोळ्यावर...१४
नागपूरच्या पत्रकारांनी घातला होता पंतप्रधानांच्या नागपूर भेटीवर बहिष्कार
आज पत्रकारितेत वेगवेगळे आयाम आलेले आहेत. सुमारे ४५ वर्षांपूर्वी फक्त मुद्रित माध्यमेच होती. मात्र आता मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, डिजिटल माध्यमे, युट्युब चॅनेल्स, पोर्टल्स, समाज माध्यमे असे सर्वच माध्यम जगतात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे एकाची बातमी सुटली तरी दुसरा ती बातमी देतोच आणि आपलीच बातमी एक्सक्लुझिव्ह असावी असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.
मात्र ४५-५० वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. बातमी चुकली की सगळ्यांची ठरवून चुकायची. त्यामुळे पत्रकारांची देखील एकी होती. जर एकाने ठरवले की आज या नेत्यावर बहिष्कार टाकायचा, तर सर्वच त्याच्या सोबतीला जात असत. आज तशी परिस्थिती नाही. कारण स्पर्धा वाढली आहे. आज इथे मी सुमारे ४४ वर्षांपूर्वीचे पत्रकारांच्या एकीची आठवण इथे वाचकांना सांगणार आहे. विशेष म्हणजे त्या प्रकरणात मी देखील एक महत्त्वाची व्यक्ती ठरलो होतो. त्यामुळे ही आठवण माझ्या खास लक्षात राहिली आहे.
ही घटना डिसेंबर १९८२ ची आहे. त्या काळात विमानतळावर छायाचित्रण करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागत असे. साधारणपणे अतिविशिष्ट महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे असले की विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी पोलिसांना परवानगी देण्याचे अधिकार सोपवत असत आणि माध्यम प्रतिनिधी तसेच पत्रकारांना आणि छायाचित्रकारांना सहज परवानगी मिळत असे.
१९८१ मध्ये नागपूर विमानतळावर एक काहीसे विक्षिप्त मनोवृत्तीचे अधिकारी कंट्रोलर ऑफ एरोड्रोम्स म्हणून रुजू झाले होते. माध्यम प्रतिनिधींना परवानगी देताना ते प्रचंड त्रास देत असत. त्यावेळी मी दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून कार्यरत होतो. कोणत्याही अतिविशिष्ट व्यक्तीची भेट नागपूरला असली आणि त्यांचे विमानतळावर चित्रीकरण करायचे असले की मला याच महाशयांकडून परवानगी घ्यावी लागत असे. दरवेळी ते अक्षरशः छळत असत. त्यांचा माझा दोन तीनदा वादही झाला होता. मग मी त्यांची लेखी तक्रार दूरदर्शन महानिर्देशालयाकडे केली होती. त्याची चौकशीही सुरू झाली होती.
३० डिसेंबर १९८२ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या नागपूर विमानतळावर काही काळ थांबणार होत्या. त्या दिल्लीहून येणार होत्या आणि नागपूरला सुमारे पंधरा मिनिटे थांबून मध्य प्रदेशच्या पुढल्या दौऱ्यावर दुसऱ्या विमानाने जाणार होत्या. त्यावेळी नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशनही सुरू होते. त्यामुळे मुख्यमंत्री, राज्यपाल तसेच तत्कालीन केंद्रीय मंत्री वसंत साठे, एन के पी साळवे हे सर्व नेते नागपुरातच होते.
त्या दिवशी सकाळी इंदिरा गांधी येण्याच्या सुमारे एक तास आधी मी या कंट्रोलर ऑफ एरोड्रोम्स महाशयांना त्यांच्या केबिनमध्ये जाऊन भेटलो आणि मला चित्रीकरणाची परवानगी द्यावी अशी विनंती केली. त्यावेळी त्यांनी १९३७ च्या भारतीय हवाई वाहतूक कायद्यातील एक तरतूद दाखवून मला खाजगी छायाचित्रकार ठरवत परवानगी घेण्यासाठी प्रत्येक तासाचे रुपये दोनशे पन्नास आणि किमान तीन तासाचे असे रुपये सातशे पन्नास जमा करावे. मगच मी चित्रीकरणाची परवानगी देतो असा पवित्रा घेतला. त्यावेळी माझ्या खिशात तितके पैसे नव्हते आणि त्यावेळी ते पैसे भरले असते तरी दूरदर्शन कडून मला ते परत मिळाले नसते. मी त्यांना माझे दूरदर्शनचे ओळखपत्र दाखवून मला खाजगी व्यक्तीं न ठरवता सरकारी कामावरील व्यक्ती म्हणूनच परवानगी द्यावी अशी विनंती केली. मात्र हे साहेब काही ऐकायला तयार नव्हते. शेवटी मी त्यांच्या केबिन मधून निघून खाली आलो.
खाली आलो तर तिथे नागपुरातील वृत्त संकलनासाठी आलेल्या सर्व पत्रकारांना देखील पोलिसांनी अडवून धरले होते आणि कंट्रोलर ऑफ एरोड्रोम्स ची परवानगी घ्या असे सांगितले होते. त्यामुळे ते सर्वच संताप्त झाले होते. तितक्यात मी खाली पोहोचून माझ्या सर्व सहकारी मित्रांना माझी देखील आपबिती सांगितली आणि मला साडेसातशे रुपये मागितल्याची देखील माहिती दिली. तितक्यात हे कंट्रोलर ऑफ एरोड्रोम्स देखील खाली आले. त्यांची उपस्थित पत्रकारांशी वादावादी झाली. मात्र ते ऐकायला तयार नव्हते. त्याचवेळी याच महाशयांनी जी सुरक्षा व्यवस्था केली होती त्यामुळे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यासारख्या व्यक्तींना देखील दारोदार फिरावे लागलेले दिसून येत होते.
या प्रकाराने तिथे जमलेले सर्वच पत्रकार अतिशय संतप्त झाले. त्यावेळी लोकमतचे दत्ता कवीश्वर हे नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष होते, तर तरुण भारतचे प्रकाश देशपांडे हे सचिव होते. उपस्थित सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे आणि आम्हा सर्व पत्रकारांचे अतिशय हिवाळ्याचे संबंध होते. मात्र त्यांचा देखील नाईलाज झाला होता.
मग पुढली दहा मिनिटे सर्वांची चर्चा झाली, आणि सर्वांनीच इंदिरा गांधींच्या या नागपूर भेटीच्या बातमीवर बहिष्कार टाकायचा असा निर्णय घेतला. येताना सर्व पत्रकार माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वाहनाने विमानतळावर आले होते. आता माहिती खात्याचे वाहन देखील वापरायचे नाही, त्यावरही बहिष्कार टाकायचा असा सर्वांनी एकमताने निर्णय घेतला. त्यावेळी आम्ही जवळजवळ वार्ताहर आणि छायाचित्रकार म्हणून ४०-४५ जण तिथे होतो. मग इतक्यांनी परत कसे जायचे, तर विमानतळावर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आलेले जे काँग्रेसचे कार्यकर्ते होते, त्यांनाही त्यादिवशी या अधिकारी महाशयांनी आत मध्ये जाऊ दिले नव्हते. परिणामी तेही संतप्त होते. मग त्यांनी आम्हा सर्वांना नागपूर शहरात आणून सोडायची तयारी दर्शवली. प्रकाश देशपांडे, दत्ता कवीश्वर आणि काही प्रमुख मंडळी एकेकाला एकेकाच्या गाडीवर डबल सीट बसवू लागले आणि शहराकडे रवाना करू लागले. त्यावेळी विधानपरिषद सदस्य असलेले कृष्णराव पांडव यांच्या स्कूटरवर मला डबल सीट बसवले आणि मी नागपूरकडे रवाना झालो.
जरी वार्ताहरांना आतमध्ये प्रवेश मिळाला नव्हता तरी माहिती खात्याचे अधिकारी आत गेले होते आणि त्यांनी पंतप्रधानांच्या आगमन आणि स्वागताची बातमी माध्यमांना पाठवली होती. मात्र नागपूरचे आकाशवाणी केंद्र वगळता उर्वरित सर्व स्थानिक वृत्तपत्रांनी आपल्या दुसऱ्या दिवशीच्या बातमीमध्ये या कंट्रोलर ऑफ एरोड्रोम्स महाशयांचा आडमुठेपणा आणि त्यामुळे पत्रकारांचा झालेला अपमान, परिणामी सर्वांनी टाकलेला बहिष्कार याच बातम्या रंगवून टाकल्या. इंदिरा गांधी नागपूर विमानतळावर उतरल्या, मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी त्यांचे स्वागत केले, आणि त्या दुसऱ्या विमानाने पुढल्या प्रवासाला रवाना झाल्या, इतकी तीन ओळीचीच फक्त त्यांच्या भेटीची बातमी देण्यात आली होती. सर्व वृत्तपत्रांच्या बातम्यांमध्ये दूरदर्शनच्या छायाचित्रकार अविनाश पाठक यांना विमानतळ अधिकाऱ्याकडून चित्रीकरणाची परवानगी देण्यासाठी साडेसातशे रुपये मागितले गेल्याची बातमी देखील सगळ्यांनी चौकटीत टाकली होती.
त्यावेळी यु एन आय पीटीआय हिंदुस्तान समाचार आणि समाचार भारती या चार प्रमुख वृत्तसंस्था देशात कार्यरत होत्या. त्यांनी देखील बहिष्कारात सहभाग नोंदवला होता. परिणामी त्यांनीदेखील फक्त तीन ओळीची बातमी दिली आणि बाकी पत्रकारांचा बहिष्कार तसेच अविनाश पाठक यांना मागितलेले साडेसातशे रुपये हेच सर्व रंगवून सांगितले. परिणामी मला चित्रीकरणाची परवानगी देण्यासाठी पैसे मागितले गेले ही बातमी देशभर प्रसिद्ध झाली आणि या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून संसदेत देखील तत्कालीन लोकसभा खासदार शांताराम पोटदुखे यांनी प्रश्न टाकला होता. या प्रकरणानंतर सदर अधिकाऱ्याची ताबडतोब नागपुरातून बदली झाली होती.
या प्रकरणाला आता ४४ वर्ष लोटली आहेत. त्यावेळी हे शक्य झाले कारण पत्रकारांची एकी होती. परस्परांमध्ये स्पर्धा जरूर होती, पण त्याचबरोबर एकमेकांना सांभाळून घेण्याची सुद्धा मानसिकता होती. दुसरे म्हणजे अशा परिस्थितीत संपादक आणि प्रसंगी वृत्तपत्रांचे मालक सुद्धा पत्रकारांच्या बाजूने उभे राहत असत.
आज परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे. आता काहीही करा पण ब्रेकिंग न्यूज आम्हाला पाहिजे हाच संपादकांचा आणि मालकांचा आग्रह असतो. त्यातही या २४ तासाच्या चॅनल्स सुरू झाल्यापासून प्रकरणातले गांभीर्य जास्तच वाढले आहे. परिणामी आता पूर्वीसारखी एकी राहिलेली नाही. कसेही करून ब्रेकिंग न्यूज मिळवायचीच, बाकीचे सहकारी जाऊदेत खड्ड्यात, आपली नोकरी टिकली पाहिजे हीच मानसिकता झाली आहे. त्यामुळेच आता ती एकी राहिलेली नाही.
मात्र माझ्या करिता आज ४४ वर्षांनंतरही त्या आठवणी ताज्याच राहिल्या आहेत.
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment